गिरणगाव

ये कोहिनूर मुर्गे की आवाज है!!

कोणाला काही आठवतंय का? नाही ना? कालची गोष्ट आठवत नाही; 40-50 वर्षांपूर्वीची कशी आठवणार?

कोहिनूर सरताज नावाचा कोहिनूर मिल प्रायोजित गाण्यांचा कार्यक्रम, 1970 च्या दशकात, दर रविवारी रेडियोवर प्रसारण होत असे. टॉप टेन सारखे त्याचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि पहिल्या गाण्याच्या आधी निवेदक ते पहिले वाक्य म्हणायचा आणि मग कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज. बिनाका गीतमाला एवढाच हा कार्यक्रम देखील खूप लोकप्रिय होता. प्रायोजन सहज करू शकतील अशा भरभराटीला आलेल्या अनेक गिरण्या या शहरात होत्या. सकाळी पावणे सात, सात, नऊ आणि अकरा वाजता शहरात भोंगे वाजत असत. मुंबईतील गिरण्यांची फर्स्ट शिफ्ट, जनरल शिफ्ट आणि जेवणाची वेळ दर्शविणारे हे संकेत होते. तो जमाना होता चावीच्या घड्याळांचा त्यामुळे ती अधूनमधून बंद पडायचीच. या भोंग्याच्या आवाजानुसार लोक घड्याळ सेट करत असत. या एका उदाहरणावरून गिरण्या या शहराचा किती अविभाज्य घटक होते हे लक्षात येऊ शकेल. किती लोकांना हा इतिहास माहित आहे अथवा आठवतो?

मुंबईतील लोकल ट्रेनने जे कोणी चर्चगेट किंवा व्हीटी (मी CSMT म्हणू शकत नाही) कडे प्रवास करत असतील त्यांनी आजूबाजूला काही इमारतींचे भग्नावशेष बघितले असतीलच परंतु ते बघताना त्यांना काय वाटत असेल? दु:ख होत असेल का? ज्यांना या वास्तूंचा इतिहास माहितच नसेल त्यांची काय प्रतिक्रिया होत असेल असा प्रश्न मला नेहमीच भेडसावतो. या वास्तू एकेकाळी हजारोंच्या उपजीविकेचे साधन होते परंतु आता जेव्हा मुंबईचे पावसाळी ढग त्यांना तासनतास वेढा घालतात, तेव्हा तर त्या भुताटकीने पछाडलेल्या भासतात.

1970 च्या दशकात मात्र जेव्हा आम्ही प्रवास करीत असू, तेव्हा भायखळा, चिंचपोकळी, लालबाग, लोअर परेल, वरळी, डिलायल रोड आणि जेकब सर्कल यासारखे गजबजलेले भाग दिसत. उंच उंच धुरांड्यानी मुंबईचे आकाश सजवणार्‍या त्या भागांना गिरणगाव (म्हणजे गिरण्यांचे गाव) म्हणून ओळखले जाई.

गिरण्यांचा इतिहास

भारतात व्यापार सुरू करण्याचा ब्रिटीश आणि पोर्तुगीजांचा निर्णय हा मुंबई बंदराची आणि पर्यायाने या शहराची पायाभरणी करणारा ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबई आज जी काही आहे ती व्यापार आणि औद्योगिकीकरणाला मिळालेल्या चालनेमुळेच आहे. चरितार्थ चालवण्यासाठी, देशाच्या ग्रामीण भागातून कामाच्या शोधात येणार्‍यांना आपल्याकडे खेचून घेत ह्या प्रचंड वास्तू बहरल्या व फोफावल्या आणि मुंबईतील हा भाग ‘गिरणगाव’ म्हणून नावारूपाला आला.

ताडदेव येथे 1856 मध्ये स्थापन करण्यात आलेली बॉम्बे स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी ही मुंबईतील सगळ्यात पहिली कापड गिरणी. त्यानंतर वस्त्रोद्योगाला तेजी आली आणि पुढील नऊ दहा वर्षात 6,500 कामगारांना रोजगार देणार्‍या 10 कापड गिरण्या मुंबईत स्थापन झाल्या. कालांतराने ह्यात वाढ होत जाऊन 1900 सालापर्यंत एकूण 136 गिरण्या स्थापन झाल्या. गिरण्यांमुळे अर्थकारण आणि रोजगाराला ऊर्जितावस्था मिळाल्यामुळे वस्त्रोद्योगाला उत्तेजन मिळावे या हेतूने दीर्घ मुदतीसाठी सरकारकडून, अतिरिक्त जमिनी, 999 वर्षांसाठी, भाडेपट्टीवर देण्यात आल्या.

एकेकाळी या सर्व भागात जवळपास 150 कापड गिरण्या होत्या, त्यापैकी बहुतांश सूती कापडाच्या होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गिरण्यांनी मुंबईची भरभराट करून तिला समृद्ध बनविले आणि तिचे रूपांतर एका मोठ्या औद्योगिक महानगरात करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गिरणगाव सुमारे 600 एकरावर (2.4 चौरस किमी) पसरले होते आणि ज्यात कामगार वस्तीचा समावेश नव्हता.

एकेकाळी व्यापारी असलेल्या टाटा, पेटिट्, वाडिया, करिमभाॅय, मफतलाल, ठाकरसी, ससून, खटाव, गोकुलदास यांच्या मालकीच्या या गिरण्या होत्या. गिरणी कामगारांपैकी बहुतेक कामगार मुंबईच्या आसपासच्या भागातून आलेले होते आणि त्यात खास करुन कोळी लोकांचे प्रतिनिधित्व होते. कामगारांच्या सर्व चाळी सरकार अथवा मिलमालकांनी बांधल्या नव्हत्या. बीडीडी चाळी, बीआयटी चाळी या सरकारी होत्या. कोहिनूर, स्प्रिंग मिल, टाटा स्वदेशी, मुकेश, जाम मिल, दिग्विजय मिल, फिनिक्स मिल यांच्या चाळी मालकांनी बांधल्या होत्या. बाकी बहुसंख्य चाळी खाजगी मालकांनी बांधलेल्या होत्या. या चाळी ताडदेव, भायखळा, माझगाव, रे रोड, लालबाग, परळ, नायगाव, शिवडी, वरळी आणि प्रभादेवी या भागात होत्या आणि हे भाग हळूहळू गिरणगाव ("गिरण्यांचे गाव") म्हणून ओळखले जाऊ लागले.

गिरणगावतील जीवन

गिरण्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही अगदी 16 व्या वयापासून काम करत असत. 1947 साली कामाचे तास दिवसाला 10 इतके मर्यादित केले जाईपर्यंत, दिवसाचे 12 तास (सूर्योदय ते सूर्यास्त) ते काम करत.

गिरण्यांत काम करणारे 90% कामगार, हे गिरण्यांच्या जवळपासच चालत 15 मिनिटांच्या अंतरावर चाळीवजा इमारतींमध्ये राहत होते. 1921 साली केलेल्या एका सर्वेक्षणात परळमधील 27% जनता, ही चाळीतल्या एकेका खोलीत सहा किंवा अधिक लोकांसमवेत राहते असे आढळून आले होते. त्यातूनच विसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबईला आकार देणारी एक अनोखी कामगार संस्कृती उदयास आली आणि जोपासली गेली.

एका 10X12 च्या रुममध्ये 10-15 माणसे कशी राहत असत हे समजून घेणे महत्वाचे आहे. ते कामगार मुंबईत एकटे राहत असत, त्यांची बायका मुले गावी असत. प्रत्येकाच्या सामानाची एक ट्रंक असे आणि त्यांच्या शिफ्टनुसार पाळीपाळीने रूममध्ये राहायचे. बहुतांश कामगार कोकणातून आले होते जे मुख्यत्वे अकुशल होते. जे कामगार पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरून यायचे ते जास्ती कणखर असल्यामुळे जादा मेहनतीची कामे करायचे.

ज्या कामगारांच्या बायका त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी खानावळी सुरु केल्या. जे कामगार एकटे असत ते जेवायला खानावणीत जायचे. तेथे या कामगारांना त्यांच्या शिफ्टच्या वेळा सांभाळून दोन वेळा unlimited जेवण मिळत असे, जेवणाची सुट्टी सकाळी ११ ते ११-३० व संध्याकाळी ७ ते ७-३० असे. एकेका खानावळीत १००-१२० लोक असत. परंतु ते शिफ्टनुसार जेवायला येत आसल्यामुळे जमत असे. खानावळ हा गिरणगावातील एक अविभाज्य घटक होता.

चाळींच्या बांधणीकडे आणि त्याच्या गुणवत्तेकडे कोणीच फारसे लक्ष दिले नाही. 1929 मध्ये दादरमधील एका चाळीचे वर्णन "प्रकाशाचा शिरकाव होऊ शकणारी अंधारी कोंदट गुहा की ज्यामुळे आजार आणि रोगराईचा फैलाव होणे अपरिहार्य आहे" असे केले जात असे. बहुतांश खोल्या हवेशीर नसत; शौचालय आणि धुणी धुण्यासाठी आवश्यक सोयी नसल्याने महिला वर्गाला विशेष त्रास सहन करावा लागत असे. सांडपाण्याच्या दुर्गंधीपासून बचावासाठी आणि पावसाळ्यात घाणीचे पाणी आत येऊ नये म्हणून खिडक्या बंदच ठेवल्या जात.

ह्या दाटीवाटीमुळे घर आणि रस्ता ह्यामधील सीमारेषा पुसट झाल्या होत्या. गिरणगावातील रहिवाशी, घरापेक्षा जास्त वेळ घराबाहेर रस्त्यावर घालवत. जुगाराचे अड्डे, बेकायदेशीर दारूचे गुत्ते आणि पैसे वसुलीसाठी उभे असलेले पठाण हे नित्य परिचयाचे चित्र दिसायचे.

गणेश चतुर्थी आणि गोकुळाष्टमी ह्या सारख्या सण, उत्सवात कामगार मोठ्या संख्येने सहभागी होत असत. स्थानिक दुकानदार आणि गिरणी मालकांना नेहमीच अशा उत्सवात बळजबरीने वर्गणी देण्यास भाग पाडले जात असे. आजूबाजूच्या परिसरात कोणाची किती वर्गणी जमली ह्यात चढाओढ असे. तेथील दारूचे गुत्ते आणि व्यायाम शाळा, हे सगळ्यांचे एकत्र येण्याचे, भेटण्याचे ठिकाण असे. गिरणगावातील कामगारांनी नाटक, तमाशा, काव्य ह्यासारख्या कलांना अभय दिले. अनेक प्रसिद्ध कलाकार येथूनच प्रथम नावारूपाला आले.

उतरती कळा आणि अस्त

1980 च्या सुमारास हा वस्त्रोद्योग, अत्युच्च शिखरावर असताना, गिरण्यांतुन सुमारे 300,000 कामगार काम करीत होते. 1980 आणि 1990च्या दशकातील अनेक भारतीय चित्रपटांची कथाबीजे, गिरणी कामगारांच्या आयुष्यात आढळतात. त्यानंतर बहुतांश गिरण्या बंद पडल्या, कारण मिल मालकांनी वस्त्रोद्योग तोट्यात चालत असल्याचे दाखवून आणि कामगारांना पगार देणे शक्य नसल्याचे जाहीर केले. तेव्हा मुंबई गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप 1982 मध्ये दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली पुकारला गेला. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की या संपाला डॉ दत्ता सामंत यांचा हेकेखोरपणा कारणीभूत होता. परंतु सत्य काहीतरी वेगळेच होते. डॉ सामंतांनी कामगारांना संपापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. १९८२ च्या १८ महिने संपानंतर जवळपास सर्व मिल सुरू झाल्या. एकही मिल तेव्हा बंद पडली नव्हती. हा ऐतिहासिक संपाने या एकेकाळच्या भरभराटीत असलेल्या या उद्योगाचा अस्त झाला. आणि त्याचबरोबरीने महिला वर्गाने चालविलेल्या खानावळी देखील बंद झाल्या. 2007 साली उर्वरित काही गिरण्यांमध्ये काम करणार्‍यांची संख्या फक्त 25,000 इतकी झाली होती. परंतु अधिकृतपणे संप कधीच मागे घेतला गेला नाही. It is ironical that the strike is still officially on. Unbelievable but true.

काही प्रसिद्ध गिरण्या

झेन्झी, फिन्ले, कोहिनूर, इंडिया युनायटेड, फिनिक्स, मधुसूदन, कमला, जाम, सीताराम, पोदार, भारत, डॉन, श्रीराम, टाटा, पोदार, बॉम्बे स्पिनिंग, दिग्विजय, खटाव, कोहिनूर, मफतलाल, न्यू हिंद, ओर्के, रघुवंशी, अंबिका, कॅसीलो, सिंप्लेक्स, कमानी, नोवेल्टी, सन आणि शक्ती अशी काही आठवणारी नावे.

संपानंतरची परिस्थिती

18 महिन्याच्या अयशस्वी लढ्यानंतर कामगारांना कोणतीही सवलत देण्यात आली नाही. संपकाळात कामगार फक्त जगण्यासाठी झगडत होते. पुढील काळातील गॅंग वॉरची पाळंमुळं या संपात दडलेली आहेत. त्या काळातील अनेक तरुण नैराश्येपोटी गुन्हेगारीकडे वळली. संपानंतरचा गिरणगाव म्हणजे रियल इस्टेटचा विस्फोट या तीन शब्दात वर्णन करता येईल. त्याने काय झालं तर खऱ्या अर्थाने मराठी माणूस कायमचा या शहराबाहेर फेकला गेला.

बहुतेक मिल्स मुंबईबाहेर हलवल्या गेल्या आणि मध्य मुंबईतील जवळपास 100 गिरण्या बंद पडल्या. ह्याची परिणीती मुंबईच्या वस्त्रोद्योगाचा अंत होण्यात झाली. त्यानंतर लवकरच मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार मुलाबाळांसहित मुंबईतून निघून गेले. जे काही थोडेफार मागे राहिले त्यांना जे मिळेल ते काम करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही; मग ते हेल्पर किंवा प्यून किंवा सिक्युरिटी गार्ड असो; आणि आपल्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली पाहण्याचे नशिबी आले. मुंबईतील आर्थिक बदलाच्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीची सर्वाधिक झळ आपल्या मराठी बांधवांनी सोसली.

मिल कामगारांची ही कथा अत्यंत दुःखद असून त्यांच्या दैन्यावस्थेचा इतिहास विशद करतो. दुर्दैवाने त्यांच्या या परवडीला जबाबदार असलेले स्वार्थी आणि लोभी मिल मालक आणि भ्रष्ट राजकारणी यांना मात्र काहीच झळ पोहोचली नाही.

कदाचित कालानुरूप ही श्रमसंस्कृती नैसर्गिकरित्या काळाच्या उदरात गडप झालीही असती परंतु ती ज्या निष्ठुरपणे चेचली आणि चिरडली गेली ते निश्चितच भयावह होते.

ज्यांना या संपाची माहिती करून घ्यायची असेल त्यांनी, 18 जानेवारी 2007 रोजी, संपाला 25 वर्षे झाली म्हणून, लेखक जयंत पवार यांनी लिहिलेला "खच्चीकरणाची पंचवीस वर्षं" हा महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला लेख आवर्जून वाचावा. कुठलाही संवेदनशील माणूस मुळापासून हादरल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना वाचण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी त्या लेखाची लिंक देत आहे.

https://maharashtratimes.com/-/articleshow/2641831.cms

आजची परिस्थिती

मुंबईचा पुढील विकास होत असताना बदलत्या जीवनशैलीच्या गरजा यामुळे व्यावसायिक अथवा निवासी गगनचुंबी इमारतींची मागणी वाढत गेली आणि याचाच परिपाक म्हणून लोअर परळ सारख्या ठिकाणी रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आली मात्र त्या रेट्याने वारसा असलेल्या ऐतिहासिक गिरण्या आणि त्यांची धुरांडी ह्यांना पूर्णपणे संपवून टाकले.

आज लोअर परेलमध्ये फेरफटका मारला तर उत्तुंग इमारती, फिनिक्स, पॅलेडियम सारखे भव्य शॉपिंग मॉल्स मुंबईचा विकास दर्शवतात. सुमारे 365,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या जागेच्या आवारात, सभोवती पंचतारांकित हॉटेल, मल्टिप्लेक्स, व्यापारी आस्थापने आणि निवासी टॉवरदेखील आहेत. पण 1905 सालापासूनचा इतिहास जपणारी फिनिक्स मिल, जी एकेकाळी असंख्य कामगार वर्गाच्या कठोर परिश्रमाची जागा होती, ती आज श्रीमंतांसाठीचे ठिकाण झाले आहे. बॉम्बे डाईंग मिल कॉम्प्लेक्समधील सुप्रसिद्ध ‘हार्ड-रॉक कॅफे’ हे त्याचेच आणखी एक उदाहरण. तथापि, फिनिक्स मिल हे असे एक दुर्मिळ उदाहरण आहे जिथे गिरणीचा मूळ ढाचा शक्य असेल तिथे कायम ठेवून त्याचे पुनर्निर्माण एका विलासी शॉपिंग मॉलमध्ये केले गेले. बाकीच्या गिरण्यांच्या नशिबी मात्र ते भाग्य नव्हतं.

दुर्दैवाने आज, अधुरी स्वप्ने आणि अपूर्ण इच्छांनी भरलेल्या ह्या गिरण्या विस्मृतीत गेल्या आहेत. एकेकाळी अवाढव्य असणार्‍या ह्या इमारतींच्या भिंती आज भंगार सामानाच्या गराड्यात दु:खाचे हुंकार देत उभ्या आहेत आणि ज्यांच्या कहाण्या काळानुसार अधिकाधिक धुसर होत चालल्या आहेत. त्या इतिहासाच्या खुणा आता शिल्लकच राहणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या जागेत राहणारी माणसे बदलली, ह्या भिंतीमागचे उद्देश बदलले. परंतु भिंतींवरचे तडे त्यांच्या भूतकाळ आणि इतिहासाबद्दल अजूनही खूप काही सांगू इच्छितात. काळानुसार जागा, माणसे बदलतात परंतु स्मृती कधीच पुसल्या जात नाहीत. ह्या भिंती त्यांच्या इतिहासाच्या कथा सांगायला उत्सुक आहेत; त्यांना बोलू द्यावे, त्यांना कधीही गप्प करू नये आणि त्यांचे शक्य तेवढे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

काळानुरूप बदलत जाणाऱ्या मुंबईशी दुवा सांधुन राहण्याचे भाग्य गिरण्यांच्या नशिबी नव्हते. नाही म्हणायला, कुलाब्याची मोडकळीला आलेली मुकेश मिल भुताखेतांनी पछाडलेली आहे अशा वावड्यांच्या जोरावर अधुनमधून पेपरामध्ये उल्लेखली जाते पण बाकी बहुतांशी मिल्स दुर्लक्षित बनून राहिल्या आहेत.

भविष्यात काय?

1985 नंतर महाराष्ट्रातील कुठल्याही सरकारने या गतकाळाच्या इतिहासाकडे फक्त दुर्लक्षच केले आहे. फक्त पैसे छापून देणाऱ्या जागा असा विचार न करता, मूळ संरचनेला हात न लावता त्यांचे नूतनीकरण केले तर ते जास्त श्रेयस्कर होईल. कल्पक दृष्टिकोन स्वीकारून, या गिरण्यांचा वस्त्र संग्रहालये किंवा मनोरंजन (Recreation) पार्कमध्ये रूपांतर करून विकास केला जाऊ शकतो. या शहराच्या पायाभरणीचा इतिहास विस्मरणात जात आहे आणि पुढची पिढी तो कायमचा विसरण्यापूर्वी शक्य असेल तितके जतन करणे ही काळाची गरज आहे.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Girangaon #Mills #Mill_Strike #Phoenix #गिरणगाव #गिरणी_संप #फिनिक्स

Leave a comment



Lokesh Umak

4 years ago

Khup masta lihile🙏👍

अविनाश वाघ.

4 years ago

यशवंत लेख खूप भावला.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS