निसर्ग आणि पर्यावरण

मानवाची उत्क्रांती व्हायच्या आधी ही आपली वसुंधरा म्हणजे फक्त पाणी, जंगले आणि वन्य पशू. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत होता की नव्हता हे समजण्याची काहीही शक्यता नाही. मी स्वतः अशाच मताचा आहे की मनुष्याचा जन्मच मुळी निसर्गाची वाट लावण्याकरता झाला आहे. बाकी सर्व पशु, पक्षी आणि अन्य जीवित जीव हे निसर्गाशी पूर्णपणे जोडलेले असतात आणि म्हणूनच निर्सगाने दिलेले धोक्याचे संकेत त्यांना जाणवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा त्सुनामी आली तेव्हा अंदमान बेटांवरील हत्ती देखील उंच ठिकाणी स्थलांतरित झाले. तेथील आदिवासी जमातींनी त्या प्राण्यांचे फक्त अनुकरण केल्यामुळे त्या जमाती वाचल्या पण इंडोनेशिया वगैरे देशात प्रचंड मनुष्यहानी झाली.

इ.स. पूर्व १०००० साली पूर्ण जगाची लोकसंख्या साधारणपणे १ कोटी होती असा अंदाज वर्तविण्यात येतो (आज फक्त मुंबई शहराची लोकसंख्या १ कोटी ८० लाख आहे हे लक्षात घ्या) आणि पुरातत्व पुराव्यांनुसार तेव्हा देखील प्रचंड लोकसंख्येचा प्रश्न जगाला भेडसावत होता. याचे कारण कदाचित जागाच नाही असे असू शकेल. पुढे जसजशी लोकसंख्या आणखीन वाढू लागली तेव्हा रिकाम्या जागेची अडचण भासू लागली आणि त्यामुळे साहजिकच जंगले साफ करून जमीन मोकळी करण्यात अली असणार. अगदी पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीचा जरी विचार केला तरी महाभारतात काय दिसून येते? धृतराष्ट्र आणि कौरवांनी राज्याचे विभाजन करून पांडवांना काय दिले तर खांडववनाचे घनदाट जंगल. तेव्हा कृष्णाने काय केले? तर त्याने अर्जुन आणि भीम यांना संपूर्ण जंगल पेटवून द्यायला सांगितले. किती लाखो झाडे, वन्यपशू आणि इतर हानी झाली असेल याचे मोजदाद करणे अशक्य आहे. परंतु इंद्रप्रस्थ नगरी वसविण्याकरिता दुसरा पर्यायच नव्हता.

आधुनिक काळात नवनवीन शहरे वसू लागली आणि तेव्हा तर निसर्गाचा ऱ्हास अपरिहार्यच होता. बांधकामात लाकूड, फर्निचर करता लाकूड, पेपर बनविण्याकरता लाकूड; जिथे तिथे फक्त लाकूड, लाकूड, लाकूड आणि ह्या भस्मासुराची भूक मिटविण्यासाठी झाडांची कत्तल होणे अत्यावश्यक झाले. जी लोकसंख्या इ.स. पूर्व १०००० साली एक कोटी होती ती १८०४ साली १०० कोटी झाली. पुढे १२३ वर्षात (१९२७ साली) दुप्पट म्हणजे २०० कोटी, मग ३३ वर्षात (१९६० साली) ३०० कोटी, मग १४ वर्षात (१९७४ साली) ४०० कोटी, मग १३ वर्षात (१९८७ साली) ५०० कोटी, मग १२ वर्षात (१९९९ साली) ६०० कोटी, नंतर १३ वर्षात (२०१२ साली) ७०० कोटी आणि जी त्यानंतर १५ वर्षांनी (म्हणजे २०२७ साली) ८०० कोटी होईल असा अंदाज आहे.

आता एवढी लोकसंख्या म्हणजे त्यांना जागा तर पाहिजे? त्यामुळे मग जगभर झालेले शहरीकरण क्रमप्राप्तच होते, नाही का? बरं , एवढ्या लोकांना नुसती जागा नाही तर अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी यांचीही सोय करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याचा परिपाक म्हणजे कालांतराने झालेले औद्योगिकरण आणि यांत्रिकीकरण. तसेच शेतीसाठी आणि शहरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजेसाठी मग भली मोठी अवाढव्य धरणे. या पर्यावरणवाद्यांना वाटते की पर्यावरणाचा ऱ्हास हा फक्त वृक्षतोडीमुळेच होतो म्हणजे बाकीच्या घडणाऱ्या घटनांना काहीच महत्व नाही?

भारतीय लोकांच्या आयुष्यात नद्यांचे स्थान फार मोठे आहे. नद्या पिण्याचे पाणी तर देतातच परंतु त्या दळणवळण आणि वीजनिर्मितीचे, तसेच अनेक लोकांच्या उपजीविकेचे ते एक मुख्य साधन आहे. त्यामुळे आपली बहुतेक शहरे नदीकाठी का वसली आहेत हे लक्षात येईल. हिंदू धर्मात नदीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि बहुतेक सर्व नद्यांना देवता मानले जाते. पण आज काय झालंय? हे वरील सगळं विसरलं जाऊन पाणी म्हणजे मोठी धरणे हे समीकरण रूढ झाले आहे. धरणांनी आपल्या शहरांना पाणी दिले, शेतात उस पिकवला, औद्योगिकीकरणाला चालना दिली परंतु या घडीला भारतातील सगळ्यात जास्त वाद पाण्याशी निगडीत आहेत. आणि महाराष्ट्रात तर हे वाद unregulated धरणांच्या भवती रेंगाळत आहेत. कारण दुर्दैवाने आपण उस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ बघतो आहोत.

तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण आज महाराष्ट्रात आणि भारतातच काय पण जगभरात वाहती नदी हे अप्रूप झाले आहे. जगातील साधारण १७५ मोठ्या नद्यांपैकी जेमतेम एक तृतीयांश नद्या मुक्तवाहिनी आहेत. १००० कि.मी. पेक्षा जास्त लांबीच्या फक्त २१ नद्या या थेट समुद्रास मिळतात. आज आपण जेव्हा नद्यांची दैनावस्था पाहतो तेव्हा पहिल्यांदा काय आठवते? प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, दुष्काळ, पूर. त्यामुळे नदी वाहती नसणे हे आपण खूप सहज मान्य केले आहे, नाही का?

अनेकदा उद्योगसमूह नद्यांना गटारासारखं वापरून बिनधास्त सगळा प्रदूषित माल नदीत ढकलतात, सरकारी यंत्रणा निर्बंधाची अंमलबजावणी शिथिलपणे करतात किंवा करत नाहीत, आणि गावोगावचे बिल्डर्स आटलेल्या नद्यांवर, ओढ्यांवर, नाल्यांवर बिनधास्त इमारती बांधून रग्गड पैसे मिळवतात. आणि या स्वैर काँक्रिटीझेशनमुळे नंतर होते काय? पावसाचे पाणी जमिनीत मुरायच्या ऐवजी या काँक्रीटवरून अजून जोरात धावते आणि शहरात शिरते आणि मग एकच हाहाकार. दीड महिन्यांपूर्वी कोल्हापूर, सांगली आणि आता काही दिवसांपूर्वी पुणे याचीच साक्ष देतात. पण आपण यातून काय धडा शिकणार? काहीही नाही. हा पर्यावरणाचा ऱ्हास नाही?

तसेच आपण आपल्या जमिनीची काय वाट लावली आहे याचा अंदाज करणे सुद्धा कठीण आहे. जास्तीत जास्त पीक मिळावं म्हणून मनमुराद केलेल्या रासायनिक फवारणीने जमिनीच्या मातीचा पोत इतका खालावला आहे की विचारता सोय नाही. माझ्या वाचनात श्री. आर एम जोशी यांच्या पेपर्स आणि लिखाणांवर संकलित एक १९२५ साली लिहिलेले पुस्तक आले की ज्यात ते स्पष्टपणे म्हणतात की शेतीवर इतक्या लोकांनी आपल्या उपजीविकेसाठी अवलंबून रहावे एवढी जमीनच भारतात नाही. हे त्यांचे भाष्य जर १९२५ साली असेल तर आज जवळजवळ शंभर वर्षांनी काय परिस्थिती झाली असेल याचा विचार करा. आज गावोगावी शेतकरी नाईलाज म्हणून शेती करतात. त्यांची मुले पुढे शेतकरी व्हायला तयार नाहीत म्हणून मग जमिनी विकून पैसे कमावणे हा मुख्य व्यवसाय झाला आहे. गरीब शेतकरी बऱ्याच वेळा आपल्या जमिनीची माती वीट कारखान्यांना विकतात. अजून काही वर्षांनी त्या जमिनीत काय राहील? दगड आणि धोंडे; आणि पडीक ओसाड जमीन. हा पर्यावरणाचा ऱ्हास नाही?

आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात होणारा कागदाचा अनियमित वापर बघितला की अंगावर काटा उभा रहातो. प्लास्टिक वापराने केलेला उन्माद तर आपण सगळे अनुभवतोच आहोत. आज बऱ्याच सोसायटींमध्ये वीज वाचविण्यासाठी सोलर पॅनेल वापरतात. परंतु आंघोळीच्या आधी गिझरमधून सुरुवातीला येणारे जवळजवळ एक बादली थंड पाणी शांतपणे ओतून देण्यात येते. हा पर्यावरणाचा ऱ्हास नाही?

पर्यावरणवाद्यांचा एक लाडका सिद्धांत असतो की वृक्षतोड झाली तर पाऊस पडणार नाही. पण खरंच तसे आहे का? गेली अनेक वर्षे केदारनाथ, उत्तराखंड येथे जंगलतोड चालू आहे पण तरी सुद्धा वर्षा दोन वर्षां आड येणारी अतिवृष्टी कमी झालेली नाही. तसेच असेही खूप ठिकाणी दिसून येते की भरपूर जंगल असले तरी पाऊस चांगला पडेलच अशी खात्री देता येत नाही. पाऊस हा अनेक जागतिक गोष्टींवर अवलंबून असतो.

आपल्यावर कुरघोडी करणार्‍यांना निसर्ग धडा शिकवत असतो आणि त्याची मोठी किंमत प्रकोप वा संकटातून वसुल करतो. याची दखल सर्वांनीच घेतली पाहिजे. कारण ही संकटे निसर्गनिर्मित नसून डिवचलेल्या निसर्गाचा प्रक्षोभ आहे. निसर्गाला गुलाम समजून वागवण्याच्या मानसिकतेने आमंत्रण दिलेला हा प्रकोप आहे. सरकार असो, कायद्याचे अंमलदार असोत, किंवा पर्यावरणवादी असोत; प्रत्येकाने निसर्गाच्या लहरीला गंभीरपणे समजून घेण्याची गरज यातून स्पष्ट होते. तो इशारा आहे, तो समजून घेणार्‍यांसाठी आहे. नसेल त्यांना निसर्ग आपल्या न्यायाने वागवतो. तिथे दयामाया नसते. Nature Auto Corrects itself. याची काही उदाहरणे बघू.

१. डायनोसॉर हे साधारण २४ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आणि सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी त्यांचे या पृथ्वीवर राज्य असल्यासारखे ते प्रबळ झाले. निसर्गाने साडेसहा कोटी वर्षांपूर्वी असा काही आघात केला की ते संपूर्णतया नष्टच झाले.

२. सातव्या शतकात युरोपची लोकसंख्या प्लेगच्या साथीने अर्धी झाली.

३. इ.स. १३४० ते १४०० या कालावधीत जगाची लोकसंख्या सुमारे ४५ कोटी होती आणि ती Black Death Pandemic ने १६ कोटींनी कमी झाली. (एकट्या चीनमध्ये दुष्काळ आणि प्लेग त्यामुळे ७ कोटी लोकसंस्ख्या कमी होऊन ती निम्मी झाली.)

४. त्याशिवाय अधूनमधून होणारे प्रचंड भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, दुष्काळ हे तर आहेतच.

तुम्हाला वाटेल की मी तर अगदी डोनाल्ड ट्रम्प प्रमाणे बोलतोय की पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे काही नसतो आणि झाला तरी फार काही फरक पडत नाही. माझे तसे म्हणणे अजिबात नाही. माझ्या मते प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन चक्रातून जावेच लागते आणि त्याला आपली पृथ्वी अपवाद नाही. परंतु ही चक्रे किती मोठी असतात याची आपल्याला कल्पना नसते. सायन्समुळे आयुष्य दर वर्षागणिक वाढतंय आणि त्यामुळे जगाची लोकसंख्या अशीच अमर्याद वाढत राहिली तर निसर्गाचा सतत होत राहणारा ऱ्हास कोणीच थांबवू शकणार नाही.

यावर तोडगा म्हणून आपल्या पूर्वजांनी बसवलेली एका व्यवस्था तुमच्या नजरेस आणून देतो.

शंकराचे देवस्थान आणि तळे यांचे अतूट नाते जोडून प्रत्येक गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमची व्यवस्था लावली गेली. तळे शंकराला अभिषेक करण्याच्या पाण्याचे असल्याने त्याच्यात कोण कपडे धुवेल? अथवा गाई गुरांना पाणी पाजेल? कोणताही कायदा न करता अपप्रवृतींना पायबंद घालण्याच्या हुशारीचे खरोखरच कोतुक करायला हवे. देवाकरिता सोडलेले जंगल म्हणजे "देवराया" किंवा "देवराई". एका तऱ्हेचे संरक्षित जंगल. आज सुद्धा अशा अनेक देवराया अजून शाबूत आहेत आणि जैवविविधता (biodiversity) टिकवून आहेत. फॉरेस्टर, वनरक्षक कोणाचीही जरुरी नाही. देव आणि वनस्पती यांचे नाते जोडून या वनस्पती घराजवळ टिकून राहतील हे बघितले. विष्णूला तुळशीचे एक पान किंवा डिक्षा वाहिली तरी चालते परंतु आज आपण सत्यनारायणासाठी तुळशी ओरबाडून त्यांचा नाश करतो आहोत हे आपल्याला कळत नाही. माझ्या मते देवाचा इतका सुंदर उपयोग कोणीच केला नसेल. आपण आपल्या चालीरिती मागील शास्त्रीय भाग समजून घेण्यास तयारच नाही. देव शब्द उच्चारला की, आपण त्यावर अंधश्रद्धेचा शिक्का मारण्यास उतावीळ होतो. असो.

माणसांसाठी निसर्ग आत्ता जागा मोकळी होताना काहीच करणार नाही परंतु नंतर त्याची दामदुप्पट किंमत वसूल केल्याशिवाय राहणार नाही. आपण सध्या लय या प्रक्रियेत आहोत त्यामुळे तो लय कसा सुसह्य करता येईल याचा विचार करायला हवा. पहिली गोष्ट म्हणजे आपण जगाला सुधारू या स्वप्नरंजनातून बाहेर येऊन मी स्वतः काय करीन याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आजपासून पुढे प्रत्येकाने जर असे ठरवले की मी एका मुलापेक्षा जास्त मुलं होऊन देणार नाही, मी राहतो त्या भागात जास्तीत जास्त रेनवॉटर हार्वेस्टिंग करेन, single use plastic वापरणार नाही, मुख्यत्वे करून use & throw ऐवजी recycling करीन, हवा आणि पाणी यांचे कमीत कमी प्रदूषण मी करीन असा पण केला तरी या जगाला सुधारण्यासारखेच आहे.

वसुधैव कुटुम्बकम !!

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#निसर्ग #पर्यावरण #ऱ्हास #लोकसंख्या #Population #Environment #Nature

Leave a comment



Suhas Kelkar

5 years ago

Good one

Hemant Marathe

5 years ago

Good article. 👍

aroundindiaghansham

5 years ago

उत्तम

गीता तळवडेकर

5 years ago

अतिशय सुरेख व अभ्यासपूर्ण लिखाण

shubhamsirsath40

5 years ago

अतिशय सुरेख लेख

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS