हॅपी न्यू ईयर !!

2021 हे वर्ष साथीच्या रोगापूर्वी आपण जिथे होतो तिथे जाण्याचे वर्ष असेल अशी आपली सर्वांची इच्छा होती. मोठ्या उत्साहात आपण त्याचे स्वागत केले होते; सर्वांना सुख, समाधान, आरोग्य चिंतले होते आणि कोरोनाच्या महामारीतून या पृथ्वीची सुटका होऊ दे अशी त्या जगनियंत्याकडे प्रार्थनाही केली होती. या वर्षात आपल्या चेहऱ्यावरचे मास्क निघतील, लस घेऊ की नको हा संभ्रम दूर होईल आणि राजकीय मतभेद बाजूला ठेऊन जीवनात पुढे सरकू असा आशावाद होता. या सर्व आकांक्षा मनात ठेऊन आपण 2020 या वर्षाला निरोप दिला होता. परंतु आज एक वर्षानंतर आज परिस्थिती आहे? जैसे थे; एक प्रकारे déjà vu. अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन, विमान उड्डाणे कॅन्सल होणे आणि कोविडचे निर्बंध व चाचण्या तसेच सुरु असणे; 2021 चा शेवट असा होईल असे आपल्यापैकी कोणाला वाटले नव्हते. 

 

त्यामुळेच आज या 2021 वर्षाला निरोप देताना मनात अनेक गोष्टींचे मोहोळ माजले आहे. मृत्यूचे हे भयानक सावट दोन वर्षे झाली तरी अजून सरलेले नाही. तिसरी लाट येणार का? याच्या भीतीने लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. सर्व जगात तांडव माजवणारे असे हे संकट आपल्याला कधी भोगावे लागेल याची कोणी स्वप्नात देखील कल्पना केली नसेल. कोविडची आकडेवारी परत एकदा वाढत चालली आहे आणि ती आकडेवारी पाहत असताना, त्यात आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्ती भरडल्या जाता आहेत याचे दुःख आहे. तसेच होत्याचे पार नाहीसे होण्याची भीती लोकांनी आयुष्यात या आधी कधी अनुभवली नसेल. मग असं म्हणायचं का की या दोन वर्षांनी फक्त दुःखच दिले? सरताना देखील कडू आठवणी ठेऊन गेले? सकारात्मक काहीच घडले नाही का या दोन वर्षात?

 

जरा थोडा काळ ही काळी बाजू ठेवली तर काय दिसते?

  • कोरोना दिला पण निर्धारसुद्धा दिला.
  • स्वच्छतेची व्याख्या लोकांना शिकवून गेला.
  • पैसा, गाड्या आणि स्टेटस यातील फोलपणा दाखवून गेला.
  • अशिक्षित लोकांना देखील लॉकडाऊन, क्वारनटाईन सारखे इंग्रजी शब्द शिकवून गेला.
  • सर्व माणसे बसल्या जागी जखडून बसली पण त्यामुळे प्राथमिक गरजा आणि कुटुंब यांची महती अधोरेखित करून गेला.
  • बाका समय "अकेले आये थे और अकेलेही जाना है" हे मनावर बिंबवून गेला.
  • आर्थिक बचतीचा मूलमंत्र पुन्हा शिकवून गेला.
  • हरवलेल्या नात्यांचे ऋणानुबंध पुन्हा नव्याने जोडून गेला.
  • आपल्यातील सुप्त कलागुणांना पाझर फोडून गेला.
  • ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांचे महत्व पुन्हा पटवून गेला.
  • डॉक्टरांबद्दलचा आदर द्विगुणित करून गेला.
  • आपल्या देशाची या अडचणीवर पण मात करण्याची क्षमता आहे हे दर्शवून गेला.

 

सरत्या वर्षाने त्रास दिला असला जरी खऱ्या जगण्याची रीत मात्र शिकवून गेला. कधीच न शिकलेला धडा आयुष्यभरासाठी स्मरणात ठेऊन गेला.

 

माणसाला माणूस म्हणून जगण्यास शिकवून गेला.

 

परंतु हे करतानाच आपल्या भारतीयांना सर्व गोष्टी सरकारनेच केल्या पाहिजेत या मानसिकेतून बाहेर पडले पाहिजे. ते काय आणि किती करू शकतात याला मर्यादा आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने केंद्र आणि राज्य सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची आज आत्यंतिक गरज आहे. तसेच या महामारीचा संसर्ग आपल्याकडून कसा होणार नाही याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. निसर्ग आपल्याला परत परत आठवण करून देत आहे की जितका तुम्ही उत मात कराल, त्याची दामदुप्पट किंमत भविष्यात मोजावी लागेल. निदान या महामारीतून हा धडा माणसाने लक्षात ठेवला तरच भविष्यातील आपल्या पिढ्या जगतील. 

 

त्यामुळे मी नाही म्हणणार की गेली 2 वर्षे फक्त वाईट आठवणी देऊनच गेली कारण त्यांनी दुःखासोबत काही आनंदाचे क्षण आणि जीवनाची शिकवण दिली.

 

तेव्हा सकारात्मक भावनेने वरील गोष्टी लक्षात ठेऊन येणाऱ्या 2022 ह्या नववर्षाचे झोकात स्वागत करूया. 

 

नववर्षाच्या तुम्हा सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा!!!

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS