True Blue Friend

शाळेतून बाहेर पडल्यावर झालेला माझा जिवलग मित्र म्हणजे भालचंद्र देवधर उर्फ भाल्या. एकदा मला म्हणाला मी प्रेमात पडलोय. मी पटकन म्हटले तुझ्याबरोबर लग्न करणे कुठल्या मुलीला शक्य आहे का? म्हणाला एकदा तिला भेट तर कारण तिलाही तुला भेटायचे आहे. म्हटले नाव गाव काय तर म्हणाला निलीमा आपटे.
 
निलीमा  म्हणजे एक अजब रसायन होते. बरीच वर्षे हॉंगकॉंगमध्ये राहिल्यामुळे असेल पण ती एकदम मोकळी ढाकळी. जिच्या प्रेमात भाल्या पडला ती कोण याची मला प्रचंड उत्सुकता होती. तिला बघितलं आणि वाटलं काय सुंदर मुलगी आहे; भाल्याला अशीच कोणीतरी मिळायला हवी होती. भाल्याने तिला माझ्याबद्दल तिला काय सांगितले होते माहित नाही पण जेव्हा तिला भेटलो तेव्हा तिने चक्क मला मिठीच मारली. मी तसा बाळबोध आणि सरळधोप विचारसरणीचा त्यामुळे मला धक्क्यातून सावरायला जरा वेळ लागला.
 
 
 
लग्न ठरल्यानंतरचा निलीमाचा मी पहिला मित्र. आणि खरं सांगायचं तर माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण. मला बायकांशी कसे बोलावे याची अक्कल अजिबात नव्हती; ती अजूनही नाहीचेय. ती गंमतीत मला true blue friend म्हणायची. खरं सांगायचं ना तर माझा अशारीरिक स्त्री पुरुष मैत्रीवर फारसा विश्वास नव्हता त्यामुळे platonic love वगैरे तर फारच लांबचे. पण निलीमामुळे माझा या गोष्टीवर विश्वास बसू लागला. ती माझ्याशी वाटेल ते बोलायची, मनात येईल ते शेअर करायची, खांद्यावर डोकं ठेवायची परंतु ते खरंच इतके स्वच्छ आणि निर्मळ होतं की कधी एक टक्कासुद्धा तिला किंवा मला फरक पडला नाही. भाल्या कुठे बाहेरगावी गेला असेल तर मला फोन करायची की जेवायला कुठेतरी बाहेर जाऊ. मीच म्हटलं, अगं लोक काय म्हणतील? मला म्हणाली, तुला त्रास होणार आहे का माझ्याबरोबर यायला? नाही ना? मग लोकांकडे नको लक्ष देऊ.
 
आमच्या तिघांची आवडती जागा म्हणजे कॅफे नाझ (हँगिंग गार्डन समोर). बऱ्याच वेळेला त्यांची मुलगी अदिती हिला प्रॅम मध्ये घालून घेऊन यायची. आणि वर निलीमाचा फतवा काय तर अदिती कुरकुरायला लागली तर तिची प्रॅम आळीपाळीने फिरवून आणायची. मला स्वतःला लहान मुलांचे काही फार कौतुक नाही पण मला सुद्धा तिने सोडले नाही. गंमतीत बोलायचे म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा मी असे फिरवले नसेल.
 
निलीमाच्या आई वडिलांच्या दृष्टीने मी जावयाचा मित्र पण आपट्यांच्या घरात माझे अगदी मुलगा असल्याप्रमाणे कायम स्वागत झाले. वडील डॉ. वसंत आपटे, आई प्रभाताई आणि कुमारकाका यांनी माझ्यावर ज्या प्रकारे निरपेक्ष प्रेम केले ते मी कधीच विसरू शकत नाही.
 
निलिमाचा आवाज अतिशय सुरेल होता आणि छान गाणी म्हणायची. एकत्र भेटलो आणि निलीमाचे गाणे ऐकले नाही असे कधी झालेच नाही. पण भाल्या काय करायचा तर त्याला आवडणारी गाणी निलीमाला म्हणायला लावायचा - तरुण आहे रात्र अजुनी, शुक्रतारा मंदवारा किंवा बकुळफुला कधीची तुला धुंडते वनातं. मी त्याला खूप वेळा सांगायचो, अरे दुसरी कुठलीतरी गाणी तिला म्हणू देत की कधीतरी. पण ती देखील भालूला आवडतात म्हणून तेवढ्याच कौतुकाने ती गाणी म्हणायची.
 
या सगळ्या गोष्टींना कसली तरी दृष्ट लागली असेच म्हणावे लागेल. वयाच्या फक्त 39 व्या वर्षी सगळा संसार अर्धवट सोडून, मोडून भाल्या काळाच्या पडद्याआड निघून गेला. निलीमा 35 वर्षांची, अदिती आणि गार्गी 10 आणि 2 वर्षांच्या; काय ही नियतीची करणी.
 
एकच गाणं तेव्हा आठवलं -
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी.
 
त्या दिवशी निलीमाला कसे सामोरे जायचे ह्या विचाराने मी भांबावून गेलो होतो. तिच्या घरी गेल्यावर तिने जी घट्ट मिठी मारली ती मी अजून विसरू शकलेलो नाही. आजही अंगावर काटा उभा राहतो. भाल्या असा अचानक अर्धवट सोडून गेल्यामुळे तिला खूप सोसावे लागले. तिने पुढची 24 वर्षे नोकरी करून मुलींना चांगले वाढवले.
 
काळ हे सर्वावर औषध असते. कालांतराने दहा वर्षांनंतर तिने पुन्हा लग्न केले त्यावेळी मला खरंच खूप बरं वाटलं. सुदैवाने तिच्यावर मनःपूर्वक प्रेम करणारा असा अतुल तिचा साथीदार झाला. पण ह्या सगळ्या काळात आमच्या भेटी मात्र एकदम कमी झाल्या. वर्षातून फार तर एकदा किंवा दोनदा. ऑगस्ट 2018 मध्ये तिचा एकदा अचानक फोन आला. भरभरून बोलली. मला म्हणाली की एप्रिल 2019 मी रिटायर होणार आणि मग मी परत कुठलीही नोकरी करणार नाही. मी तिला थोडे टोचून म्हटले की मला true blue friend म्हणतेस ना, मग गेल्या इतक्या वर्षात काय संपर्क ठेवलास? म्हणाली, अगदी खरं आहे; we have to catch up on so many lost years. त्यावेळी असे ठरले की लवकरच शांतपणे भेटायचं.
 
But man proposes and fate disposes. सप्टेंबर 2018 मध्ये तिने अचानक या जगाचा निरोप घेतला. रात्री बारा वाजेपर्यंत ठणठणीत असणारी निलीमा पुढच्या एक-दोन तासात तडकाफडकी जाते यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या हृदयातील एक कप्पा कायमच निलीमाच्या आठवणींनी दरवळत राहील.
 
आज 12 एप्रिल 2021.. निलीमा असती तर साठीची झाली असती. देवाला सुद्धा चांगल्या लोकांची गरज भासत असते म्हणून मग अशा लोकांची आपल्या जीवनातून exit होत असते.
 

Wherever you are my dear friend; be at peace. Your unique personality and kindness will always be fondly remembered.

आणि हो, इथली चिंता करू नको. अदिती-राहुल-अवनी मजेत आहेत. गार्गीचा साखरपुडा देखील झाला. अतुल तसा एकटा पडला आहे पण आम्ही घेऊ त्याची काळजी. तू देखील तुझ्या दुःखावर मात केली होतीसच की; आणि तुझ्याकडून तो तेवढी गोष्ट नक्की शिकला असेल.  

 
@ यशवंत
yeshwant.marathe@gmail.com 

Leave a comment



Mahendra Paralkar

4 years ago

Very touching and so effectively narrated!

Prashant Naik

4 years ago

काय अफाट व्यक्तींना भेटून तू जीवन जगला आहेस. खरच मला हेवा वाटतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼

सुयश वझे

4 years ago

खूप छान लिहिलंय.

Manali Londhe

4 years ago

Wonderfully penned article... Reaches direct to the heart . Great 👍👍

Shubhada

4 years ago

Very well expressed yeshwant

पूर्वाश्रमीची कु. भारती विवेकानंद मटकर आताची सौ. भाग्यश्री चंद्रशेखर पवार

3 years ago

अप्रतिम. येशा खूप छान लिहीतोस. माझ्याकडून अनेक शुभेच्छा. असाच लिहीत रहा.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS