शिवाजी पार्कच्या गप्पा
सुमारे १००-१२५ वर्षांपूर्वी पर्शिया (इराण) मधून बरीच झोरास्ट्रीयन्स (पारसी), इराणी लोकं मुंबईत आली आणि त्यांनी शहरातील अनेक मोक्याच्या जागा विकत किंवा भाड्याने घेऊन तिथे हॉटेल्स सुरु केली ज्यांचे इराणी कॅफे असे नामकरण करण्यात आले.
सगळ्या इराण्यांचे साधारण स्वरूप सारखेच असायचे. मार्बल टॉप लाकडी टेबल्स, टिपिकल लाकडी खुर्च्या, काउंटरवर मोठ्या मोठ्या काचेच्या बरण्या ज्यायोगे त्यात काय आहे हे समजावं, भिंतींना मोठे आरसे ज्यामुळे आहे त्यापेक्षा जागा मोठी वाटावी. तिथे मिळणारे पदार्थही तसे मर्यादितच. चाय, पानी कम चाय, खारी, बन किंवा ब्रून मस्का, आमलेट, खिमा बस्स. इराण्याचा चहा बकरीच्या दुधापासून बनवायचे म्हणे. खरं की खोटं माहित नाही पण चहाची तशी चव दुसरीकडे कुठेही नसे हे मात्र खरे. एकट्याने किंवा ग्रुप मध्ये कितीही वेळ बसण्याची जागा पण ऑर्डर दिली की डोक्यावरचा पंखा चालू पण खाऊन पिऊन संपले की पंखा बंद. कोपऱ्यात बसायचं आणि चहा पीत पीत सिगारेट ओढणे म्हणजे जन्नत.
या एरियात सुद्धा बरीच इराणी हॉटेल्स होती. आजच्या स्टेटसच्या जागीचा कॅफे (नाव लक्षात येत नाही), अल्ट्राच्या कॉर्नरला असलेले मुन व्ह्यू, हरी निवासचे कॅफे गोल्डन (आताचे ट्रोफिमा), सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळ असलेले लाईट ऑफ भारत, सेना भवन समोरचे कॅफे आझाद, पॅरेडाईज सिनेमा जवळची क्राऊन बेकरी आणि पॅरामाऊंट कॅफे (पण हे कॅफे कमी, बेकरी जास्त होती), कॅफे कॅडेल आणि कॅफे ग्रीन्स. तसे गोखले रोडवर अजून १-२ इराणी होते पण आमचा तिथे फार संबंध आला नाही.
आमच्या मित्रांचे खास अड्डे म्हणजे मुन व्ह्यू, कॅफे गोल्डन, कॅफे कॅडेल आणि कॅफे ग्रीन्स.
आमचा मित्रांचा अड्डा एकदा मुन व्ह्यू मध्ये जमला की तास-दोन तास नुसती धम्माल चालायची. तिथला मालक अली आमच्यावर खूप चिडायचा. म्हणायचा "साला तुम लोगोंको कुछ कामधंदा नही, और हमारा टाईम खराब करते हो". पण आम्ही थोडेच ऐकायचो.. त्याने पंखा बंद केला तरी आम्ही आमची जागा काही सोडायचो नाही..एकदा तर अशी गम्मत झाली की आम्ही तिथे बसलेले असताना कोणीतरी येऊन काउंटर मधील कसले तरी लाडू विकत घेत होता तेव्हा माझा एक मित्र जोरात म्हणाला "च्यायला हे लाडू तर गेले महिनाभर असेच आहेत. तो माणूस विकत न घेता अक्षरशः पळून गेला. अली शेठ एवढा चिडला की आम्हाला शिव्यांची लाखोली घातली. तरी देखील पुढच्या वेळेला गेल्यावर हसून स्वागत. अली शेठ आणि त्याचा कोकणी मुसलमान मॅनेजर पारकर तसे प्रेमळच.
कालांतराने त्या इराण्यांची पुढची पिढी वडिलोपार्जित धंद्यात यायला कदाचित तयार नसावी, त्यामुळे धंद्याकडे दुर्लक्ष होऊन धंदा कमी होऊ लागला. काही इराण्यांनी त्यांच्या कॅफेचे बियर बार मध्ये रूपांतर केले आणि हळूहळू इराणी कॅफेंची रयाच जाऊ लागली. १९५० साली मुंबईत म्हणे असे ३५० कॅफे होते; आज त्यातले फक्त २५-३० शिल्लक राहिले आहेत.
कदाचित आमची शेवटची पिढी असेल की ज्यांनी हे इराणी कॅफे कल्चर अनुभवले असेल.
जेव्हा इराणी कॅफे बियर बार मध्ये रूपांतरित होऊ लागली, तेव्हा आमच्यात सुद्धा बदल आम्ही घडवून आणला आणि मग आम्ही असा उदात्त (?) हेतू ठरवला की आपण इराणी संस्कृती नामशेष होऊ नये म्हणून प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, बियर प्यायची म्हणून नाही बरं का, पण फक्त हेतू पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही जमेल तेव्हा इराणी बियर बारच्या चकरा मारू लागलो.
आमचा विचार अमंलात येण्यापूर्वीच ३-४ इराणी कॅफे बंद झाले आणि आमच्या प्रयोगासाठी मुखत्वे दोनच ठिकाणे उरली; कॅफे कॅडेल आणि कॅफे ग्रीन.
आज जिथे येस बँक आहे तिथे शिवाजी पार्क रोड नं ५ च्या कोपऱ्यावर कॅफे कॅडेल होते ज्याचे मालक खुश्रू हे पारसी की इराणी की मुसलमान आम्हाला नक्की कधी कळले नाही पण तो माणूस अस्खलित मराठीत बोलायचा. त्याने कॅफेच्या अर्ध्या भागाचे बियर बार म्हणून रूपांतर केले. तिथे आमच्या बिल्डिंग मध्ये राहणारा एकजण, जो आमच्यापेक्षा किमान ८-१० वर्षाने मोठा होता, रोज जायचा. त्याला रोज बियर पिणे कसं परवडायचं याची आम्हाला काही कल्पना नव्हती. पण तो ७-८ बाटल्या बियर अगदी सहज रिचवायचा. आम्ही बऱ्याच वेळा तो कशी बियर पितो तेवढंच बघायला जायचो. एकदा एक गंमत अशी घडली की तिथे जवळपास असणाऱ्या एका वाडीच्या दादाला कोणीतरी सांगितलं की असा एक माणूस खूप बियर पितो. झालं, त्या दादाचा इगो दुखावला गेला कारण त्याच्या मते त्याच्या एवढी बियर कोणीच पिऊ शकत नाही. मग त्याने जिद्दीला पेटून अशी पैज लावली की जो बियर पिण्यात हरेल त्याने सर्व बील भरायचं. दिवस ठरला आणि त्या दोघांच्या आसपास आमच्यासारखे बरेच बघे जमा झाले. सकाळी १० वाजता सुरुवात झाली आणि अतिशयोक्ती वाटेल पण दोघांनी प्रत्येकी १२ बाटल्या बियर प्यायल्या. आमच्या मित्राने (बिल्डिंग मध्ये रहात असल्याने मित्र म्हणायची डेरिंग) तेरावी बाटली ऑर्डर केली आणि तो दादा अक्षरशः काकुळतीला आला आणि म्हणाला की आता बस्स, एक घोट पण शक्य नाही. त्या दिवशी तो आमचा मित्र आम्हाला सुपरस्टार वाटू लागला.
आम्ही अधूनमधून कॅफे कॅडेलला जायचो पण आमची एक तर एवढी क्षमता नव्हती ना त्या प्रमाणात पैसे होते.
काही कालावधी नंतर मग आमचा अड्डा हा कॅफे ग्रीन मध्ये होऊ लागला. तिथला मालक अमीन सेठ अतिशय खडूस आणि महा कडक. रात्री ९.५० ला सगळ्यांना हाताला धरून बाहेर काढायचा कारण रात्री १० ला बंद म्हणजे बंद. पण तोपर्यंत आम्ही जरा मोठेही झालो होतो आणि थोडाफार पॉकेट मनी सुद्धा मिळायचा. त्यामुळे बिअर प्यायचा उत्साह अमंळ जरा जास्तच. किती जण आहेत ह्यावर किती बाटल्यांचा पिरॅमिड करायचा हे आधी ठरवले जायचे..चारचा पिरॅमिड म्हणजे १० बाटल्या (४+३+२+१) असा त्याचा हिशेब. ग्रीन मध्ये जाण्याचा दुसरा आंबट शौक म्हणजे तिथे असणाऱ्या छोट्या छोट्या फॅमिली रूम्स. आतले दिसायचे काही नाही पण तिथे कुठली आणि कोण कपल्स येतात हे बघण्याची भयंकर हौस.
सगळ्यांकडे मिळून किती पैसे आहेत यावर बियर प्यायला कुठे जायचं याचा निर्णय व्हायचा. प्रथम कॅफे कॅडेल नंतर कॅफे ग्रीन. खिसा थोडा जास्त गरम असला तर सन्मान (जिथे आता ओपन हाऊस आहे) कारण तिथे खायला ही जरा वेगळे पदार्थ मिळायचे उदा. हॉट डॉग, बर्गर वगैरे. आणि मग जर कोणाला चुकूनमाकून खूप जास्त पैसे मिळाले किंवा काहीतरी अतिशय खास गोष्ट घडली तर मग बियर प्यायला कुठे जायचं तर कनोसा हायस्कुल समोरील कॅप्री रेस्तराँ. त्याचे खास आकर्षण म्हणजे सर्व्ह करायला पुरुषांऐवजी स्त्रिया वेटर. तिथे तसे काही अनैतिक होते असे नाही, निदान आम्हाला तरी काही लक्षात आले नाही आणि आता नीट विचार केला तर आकर्षण वाटण्यासारखे तिथे काहीच नव्हते पण तेव्हा कुठे काय समजत होतं? काहीही असले तरी कॅप्री मध्ये जायची काही फार वेळा जायची वेळ आली नाही.
खरं म्हणजे सन्मान काय किंवा कॅप्री काय, ही काही इराणी कॅफे नव्हेत पण बियर पिण्याचा विषय आला त्या ओघात त्यांचा उल्लेख केला, बस्स..
कालांतराने आम्हालाही शिंग फुटली. पदवीधर झालो आणि मग बियर ऐवजी आता दारू प्यायला हरकत नाही असे वाटू लागलं आणि मग काय, ह्या परिसरातील जिथे जिथे शक्य होते तिथे तिथे आम्ही हजेरी लावली.
आता आमच्या अपेयपानाचा अध्याय पुढच्या लेखात.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#shivajipark #memories #reminiscence #beer #iranicafe