विज्ञानाने मानवाला दिलेला शोक संदेश
भौतिक आणि वैज्ञानिक विकासाने मानवाला निसर्गापासून तोडून एकटे पाडून विनाशाकडे ढकलले आहे का? हा प्रश्न जगात सगळ्यांना भेडसावतोय. भारतासारख्या विकसनशील देशातही मोठ्या शहरातील लोकांना निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी कष्ट होत आहेत. शुद्ध हवा, शुद्ध अन्न आणि शुद्ध पाणी अशा पुर्वी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आज मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागताहेत ह्याच प्रश्नाच्या भीषणतेची जाणीव आपल्याला ख्रिस्तोफर नोलनचा नवा चित्रपट Oppenheimer अजून खोलवर करुन देतो.
प्रेक्षकांची विचारक्षमता आणि आकलनशक्तीला आव्हान देणारा नोलन या सिनेमाच्या रुपात मानव जातीच्या विध्वंसाच्या संशोधनाची गोष्ट सांगतोय. इंटरस्टेलार, इन्सेप्शन, द डार्क नाईट सारख्या सिनेमांमधून नोलनने स्वतःचं एक विश्व तयार केलंय. त्यात विज्ञान केंद्रस्थानी असून त्याच्या भवती निर्माण होणारी मानवी विचारांची आणि बदलत्या परिस्थितीची झुंज रचण्यात तो कायमचं यशस्वी झाला आहे.
अणुबॉम्ब शोधाच्या पलीकडची अमानवी विश्वाची शोकांतिका
सिनेमा अणूबॉम्बचे जनक रॉबर्ट जे. ओपनहायमर यांचा चरित्रपट आहे असं असलं तरी Oppenheimer नेहमीच्या बायोपिक चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा आहे. जरी चित्रपट अणुबॉम्ब, दुसरे महायुध्द ह्याच्या भोवती फिरतो तरी नोलनने जाणीवपूर्वक कुठेही ड्रामा, हिंसा किंवा रक्तपात दाखवला नाहीये. जे नोलनच्या सायंटिफिक फॅन्टसीचे चाहते आहे, त्यांच्यासाठी लॉस अलामोस आणि ट्रिनिटी प्रॉजेक्टचं मेकिंग म्हणजे पर्वणी आहे. आता ज्या मंडळींना पॉलिटिकल ड्रामा पसंतीस पडतो, त्यांच्यासाठी ऑपनहायमर आणि लुईस स्ट्रॉस यांच्या जागतिक वर्चस्वाच्या लढाईची अत्यंत मार्मिक मार्गाने रचलेली कथा नक्कीच आवडणारी आहे. त्याचसोबत मध्यंतरानंतर मात्र विश्व युद्धाच्या अंताकडे होणारी अमेरिकेची पॉलिटिकल सेटिंग visually कमाल जमून आली आहे. ज्या प्रेक्षकांची आवड ही मानवी नातेसंबंध आणि त्याचे काळानुरूप होणारे बदल ही असेल तर त्यांच्यासाठी ही बाजू खरोखर बघण्यासारखी आहे. जर्मन, सोव्हिएत, अमेरिका, जपान यांचे विश्वयुध्दाच्या दरम्यान असणारे कॉन्फ्लिक्ट आणि डायनॅमिक माहीत असतील तर आपण जास्त जोडले जातो तसेच नील बोहर, नाबी, आइन्स्टाईन, हायजेनबर्ग, हेन्स बेथ अशी नावं कमीतकमी कानावर गेलेली असली तरी पुरेसं समजायला मदत होईल.
पहिल्या अणुबॉम्ब चाचणीचे चित्रण झपाटून टाकणारे आहे कारण पडद्यावरचा भयानक स्फोट ज्वाळांनी वेढलेला असला तरी गूढ मौनात आहे आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत त्याला एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवते. ट्रिनिटी टेस्टचे detonation हा संपूर्ण narrative चा एक सर्वोच्च पॉइंट आहे. CGI चा वापर न करता ती दृश्ये उभी करणे हे ही एक नोलनच्या प्रतिभेचे उदाहरण आहे. हे उत्कृष्ट दृश्य नोलानचा मूलभूत संदेश अधोरेखित करते, की सर्वात लक्षणीय हिंसा मानवी मनातून शांतपणे बाहेर पडते. हा चित्रपट मर्मभेदक पद्धतीने प्रेक्षकाला जाणीव करून देतो की जगाचे स्वरूप आपल्या अंतस्थ अशांततेशी मिळतेजुळते असले तरी देखील आत्मनिरीक्षण आणि आत्म-जागरूकतेचे सामर्थ्य किती महत्वाचे आहे याची मार्मिकपणे आठवण करून देतो.
तंत्रज्ञानाच्या युगात नोलनने कुठेही व्हीएफएक्स चा वापर न करताही अनेक दृश्य फक्त पार्श्वसंगीत व कलाकारांमुळे अंगावर काटा आणतात. हे ख्रिस्तोफर नोलनचे मोठेपण आहे. रोबोट्स आणि AI च्या युगात, नोलनने असा एक चित्रपट तयार केला की जो तुम्हाला तुमच्या आत्म्याचा शोध घेण्यास भाग पाडतो.
सिनेमाचं चित्रीकरण आणि कमीतकमी ग्राफिक्चा वापर करून तयार केलेले सीन म्हणजे पर्वणीच आहे. ट्रिनिटी प्रोजेक्टची स्टेप बाय स्टेप आखणी हा सिनेमाचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. प्रत्येक घटना बारकाईने लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर पुढे काय होणार? याची उत्सुकता टिकून राहते आणि हळू हळू प्रेक्षक गोष्टीमध्ये गुंतत जातो. इथे खरा कस लागतो तुमच्या एकाग्रतेचा आणि भावनांचा. माहिती, प्रसंग आणि भावना यांची जबरदस्त गुंफण नोलनने काही प्रसंगात केली आहे.
अनुभव म्हणून Oppenheimer आवर्जून बघायलाच हवा. तीन तास काहीतरी प्रगल्भ पाहिल्याचं समाधान मिळतं. सकस, आशयघन, बुध्दीला चालना देणारा सिनेमा आहे. हा चित्रपट म्हणजे अनेक पात्रांमधील अंतहीन चर्चांची मालिका आहे आणि ती तुम्हाला पडद्यावर कठोरपणे लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडते. काही लोकांना Oppenheimer च्या चौकशीचा भाग बोरिंग वाटू शकतो पण त्या प्रत्येक फ्रेम मध्ये कीलियन मर्फीच्या चेहऱ्यावरचे सतत बदलणारे हावभाव त्याची व्यक्तिरेखेवरची पकड आणि अभिनय कौशल्य खिळवून ठेवणारे आहे. Subtitles मुळे ते समजणे थोडे सोपं होतं हे आपले नशीब.
चित्रपटातील अल्बर्ट आइनस्टाईन आणि रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्यातील संवाद हे खिळवून ठेवणारे आणि बौद्धिक उत्तेजना देणारे क्षण आहेत. हे दोन अलौकिक प्रतिभावंत जरी वेगवेगळ्या कालखंडातून आलेले असले तरी त्यांच्या मार्गदर्शकाच्या वाटेवरील अहंकार आणि संशय याचे ते साक्षीदार आहेत. अणुबॉम्ब तयार करण्यासाठी भौतिकशास्त्रातील वैज्ञानिक प्रगती वापरण्याचा ओपेनहाइमरच्या प्रयत्नांना आईनस्टाईन मदत करण्यास साफ नकार देतो. निवडींचा हा गुंतागुंतीचा परस्परसंवाद या दोन्ही शास्त्रज्ञांना आकार देतो. त्यांच्यातील हा संवाद खूप अर्थपूर्ण आणि बोलका आहे. दोन महान शास्त्रज्ञ जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात घडणारा असा संवाद पाहणं हीच खूप विलक्षण गोष्ट आहे.
जेव्हा हिरोशिमावर बॉम्ब टाकला गेला त्यानंतर Oppenheimer ने जे भाषण केले तो प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणतो, त्याला एक प्रकारचा सायकॉलॉजीकल हॉरर म्हणता येईल इतका traumatic आहे. इथे मर्फीच्या अभिनय कौशल्याची आणि नोलनच्या दिग्दर्शनाच्या कौशल्याची कमाल आहे. भाषणाच्या वेळेस फ्रेम बाय फ्रेम केलेलं डिटेलिंग भयंकर अंगावर येणारं आहे. अणुबॉंबच्या विध्वंसाचे एकही दृश्य न दाखवता, त्याची दाहकता दाखवणे म्हणजे कमाल आहे, ब्रावो नोलन!
चित्रपटातील राजकारणाबद्दल बोलायचे झाल्यास तो एक संपूर्ण वेगळा विषय होईल अमेरिका का महाशक्ती आहे आणि ते किती धुर्त आहे हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. मोठ्या माणसांचा सत्कार होतो हा त्यांना मान देण्यासाठी होत नसतो, तर यातून सरकारला स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा असतो. व्यक्तीपेक्षा सिस्टीम किती मोठी असते, आणि हीच सिस्टीम त्यांच्यावर शेकलं की हात वर करून कशी नामानिराळी राहते, ही गोष्ट ओपनहायमर दाखवतो.
सिनेमा तसा पहिल्या अणुबॉम्बची निर्मिती व त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या राजकारणाबद्दल आहे .परंतु नोलनने ज्या पद्धतीने oppenheimer चा प्रवास उलगडलाय ते आपल्याला थक्क करतं सुरुवातीला अणुबॉम्ब निर्मिती बद्दल बोलताना ओपनहायमर म्हणतो की 'They won't fear it until they understand it. And they won't understand it until they've used it.'
आणि ज्यावेळी अमेरिका जपान वर अणुबॉम्ब टाकते .आणि त्यानंतर जे राजकारण घडतं त्यावेळी आईन्स्टाईन सोबत हा संवाद घडतो.
Oppenheimer: When I came to you with those calculations, we thought we might start a chain reaction that would destroy the entire world.
Einstein: I remember it well. What of it?
Oppenheimer: I believe we did
Einstein: I remember it well. What of it?
Oppenheimer: I believe we did
कीलियन मर्फीने साकारलेला ऑपनहायमर हा माईलस्टोन ठरणार याची खात्री आहे. मर्फीने ह्या वन्स इन लाइफटाईम रोलचे अक्षरशः सोने केले आहे. कीलियन मर्फीने जर सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर जिंकले नाही तर तो मोठा अपसेट होईल. रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने लुईस स्ट्रॉस ही व्यक्तिरेखा रंगवताना अभिनयाची रेंज अभिनेता स्वतः ठरवत असतो हे दाखवून दिलं. मॅट डेमनचा जनरल ग्रोवजला सहायक भूमिकेत एक विशेष अशी ग्रे शेड आहे. दोन तीन सीनमध्ये टॉम काँटी 'अल्बर्ट आईन्स्टाईन' लुकमध्ये भन्नाट दिसला आहे. एक कुतूहल म्हणून सुरू झालेले अणुबाँबचे संशोधन पुढे मानवजातीच्या घाताचं कारण ठरला. ओपनहायमर सारखा शास्त्रज्ञ अनेक मॅगझिन आणि कालांतराने इतिहासाच्या पानांमध्ये अणुबॉंबचा जनक म्हणून कोरला गेला. पण हे सगळ सिनेमॅटिकली कितीही आकर्षक असलं तरीही ते अणुबॉम्ब तंत्र शोधाच्या पलीकडची अमानवी विश्वाची शोकांतिकाच आहे.
रॉबर्ट ओपनहायमर या माणसाचं अंतरंग उलगडून दाखवतानाच नोलानने संपूर्ण जगाच्या भविष्यावर नाजूक बोट ठेवलंय आणि ते जाणून घेणं आवश्यक आहे. चित्रपटाचा शेवट तुम्हाला एका वेगळ्याच भावनिक समुद्रात नेऊन सोडतो आणि आपलं मन सुन्न होतं.
नोलानच्या इतर सिनेमांप्रमाणे ओपनहायमरला रिपीट ऑडीयन्स मिळणार नाही हे बऱ्याच अंशी खरं आहे. पण नोलानने ओपनहायमर बनवून आगामी पिढीसाठी एक अभ्यासपूर्ण विषय पडद्यावर मांडलाय जो सिनेमाच्या archives मध्ये जतन केला जाईल.
हा चित्रपट नोलनच्या इतर चित्रपटांसारखाच चित्रपटगृहात समृद्ध अनुभव देऊन जाईल.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com