इतरत्र मुस्लिम असे नाहीत

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) हा प्रकल्प आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय हित ध्यानात घेता, इतर सर्व परदेशी नागरिकांपेक्षा, चिनी नागरिक पाकिस्तानात सर्वात जास्त सुरक्षित असून त्यांना खास वागणूक दिली जाते. विशेष सैन्यदलाच्या आणि  विविध स्तरातील पोलिसांच्या तुकड्या त्यांचे संरक्षण करीत असतात. शिवाय, त्यांना स्थानिक जनतेत न मिसळण्याचा व त्यांच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो, मग ते इस्लामाबाद, कराची किंवा बलुचिस्तानमध्ये कुठेही असले तरी.

 

 

परंतु, या आठवड्यातील घडामोडी पाहता, ही सावधगिरी बाळगून देखील चिनी लोकांना धर्मांध, माथेफिरु जमावापासून वाचवता आले नाही.

 

 

दासू जलविद्युत प्रकल्पावर काम करणार्‍या एका सूपरवायझरने, कामाचा खोळंबा करून दीर्घकाळ केल्या जाणार्‍या प्रार्थनांवर आक्षेप घेतल्यामुळे कामगारांनी काम थांबवले. तिथल्या स्थानिक पाकिस्तान्यांच्या दृष्टीने, हा देवाचा अपमान किंवा ईशनिंदा होती. लागलीच उचलबांगडी करून हेलिकॉप्टरने अबोटाबादमधील लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेला हा माणूस, प्रियंता कुमारा ह्या सियालकोटच्या एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या श्रीलंकन नागरिकपेक्षा भाग्यवान म्हटला पाहिजे कारण ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून, त्याच्या कामगारांनी त्याचा छळ करून त्याला ठार मारुन प्रेत जाळून टाकले होते.

 

अफगाणिस्तान वगळता, इतर मुस्लिम-बहुल राष्ट्रांमध्ये असे मध्ययुगीन क्रौर्य दिसून येत नाही. किंवा इतरत्र ईश निंदा ही राष्ट्रीयत्त्वाची अस्मिता डागाळत नाही. ज्या देशातील जनता अगदी क्षुल्लक चिथावणीने पेटून उठायला तयार आहे अशा देशात ध्येयासक्त/ झपाटलेल्या गिर्यारोहकांशिवाय कोणा शहाण्याला सुट्टी घालवायला आवडेल?

 

इतरत्र, सर्व देशाच्या आणि धर्मांच्या पर्यटकांचे पायघड्या घालून स्वागत केले जाते. मोरोक्को आणि इजिप्तमधील बाजार हे अमेरिकन, युरोपियन, रशियन आणि इस्रायली पर्यटकांनी गजबजलेले असतात, तर इंडोनेशिया आणि मलेशिया ही ऑस्ट्रेलियन पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. औपचारिकरित्या UAE मध्ये शरिया जरी असला तरी, दुबईत शिथिल करण्यात आलेल्या सामाजिक रूढींमुळे सगळे पर्यटक दुबईतील पर्यटनाचा पुरेपूर आनंद उपभोगतात.

 

पाकिस्तानची गोष्ट वेगळी आहे. क्वचितच एखादा परदेशी – गोरा, चिनी किंवा आफ्रिकी – रस्त्यावर किंवा बाजारांमध्ये दिसतो. आमच्या विद्यापीठांमध्ये येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जवळपास शून्य आहे. प्रचंड खर्च करून बांधलेले पाकिस्तानमधील प्रमुख विमानतळ पुरेशी रहदारी नसल्याने आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहेत. येथून दररोज मोजकीच आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात ज्यात बहुतेक प्रवासी पाकिस्तानी कामगार किंवा पाकिस्तानात कामासाठी आलेले परदेशी नागरिक असतात.

 

पाकिस्तान, हा एक धोकादायक देश आहे ह्या धारणेला पुष्टी देत या आठवड्याच्या सुरुवातीला स्वीडनने आपला दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली. त्याच्यापासून जवळच असेलेल्या डेन्मार्कच्या दूतावासात, 2008 मध्ये कारमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. दोन इतर युरोपियन दूतावासांनी देखील त्यांचे कामकाज शांतपणे बंद केले किंवा आवरते घेतले असे समजते. सामान्य काळातही, इस्लामाबादमधील आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय मुत्सद्दी मुख्यत्वे रेड झोनमध्येच राहतात, केवळ सुट्ट्या घालवण्यासाठी उत्तरेकडच्या स्थळांकडे अधूनमधून जाण्याचे धाडस करतात.

 

इतर बाबतीतही आम्ही अपवादात्मक आहोत. हे विसरता कामा नये की ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात केवळ आश्रयच मिळाला नाही तर तो प्रचंड लोकप्रियही झाला होता. 2006 च्या PEW ग्लोबल सर्व्हेनुसार, बिन लादेनकडे जागतिक नेता म्हणून पाहणाऱ्या पाकिस्तानींची टक्केवारी 2003 मध्ये 45 टक्क्यांवरून 2005 मध्ये 51 टक्क्यांपर्यंत वाढली. याउलट, मोरोक्को, तुर्कस्तान आणि लेबनॉनमध्ये विचारल्या गेलेल्या समान प्रश्नावलीनुसार त्याची लोकप्रियता 20 अंकांनी कमी झाल्याचे दिसून आले.

 

अशी कोणती गोष्ट आहे जी पाकिस्तानला इतर मुस्लिम देशांपेक्षा वेगळे ठरवते ? याबाबतील माझ्या निरीक्षणातील तीन मुद्दे असे आहेत.

 

 

पहिला, पाकिस्तानातील सत्ताधीश असे मानत आले आहेत की केवळ धर्मच पाकिस्तानच्या विविध प्रदेशांना एकत्र बांधून ठेवू शकतो. त्यामुळे ह्या चिकटवून ठेवणार्‍या ‘गोंदाची’ मात्रा शक्य तितक्या ठिकाणी, विशेषतः शिक्षणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात टोचणे आवश्यक आहे. हा गोंद पुरेसा मजबूत नव्हता हे 1971 साली झालेल्या विभाजनामुळे जरी सिद्ध झाले, तरीही त्यांनी अगदी उलट निष्कर्ष  निवडला. उदाहरणादाखल, जनरल झिया उल हक ह्यांनी 1981 साली केलेले विधान असे आहे की “इस्रायलमधून यहुदी धर्म बाहेर काढा आणि ते पत्त्याच्या घरासारखे पडेल. पाकिस्तानमधून धर्म काढून टाका आणि त्याला धर्मनिरपेक्ष राज्य बनवा, ते कोसळेल". 

इतरत्र अशी खिन्नता दिसत नाही. तुर्की, इजिप्त, इराण, इंडोनेशिया, मोरोक्को या सर्व देशांची राष्ट्रीयत्वाच्या आधारे निर्मिती झालेली असल्याने, इस्लामिक धर्मभावना तेथे जाचक नाही आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंताही नाही. इतिहासातील तथ्य समजून घेऊन, समाज जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यानुसार करत असलेली वाटचाल ह्यामुळे ही राष्ट्रे, भविष्यात काही विनाशकारी घडेल का ह्या चिंतेपासून मुक्त आहेत.

 

दुसरे म्हणजे, 1980 च्या दशकापासून पाकिस्तानचे सेनापती आणि मौलवी काश्मीर जिहादच्या माध्यमातून सोयिस्कररित्या एकमेकांशी जोडले गेले. त्यांच्या तथाकथित लष्करी-मुल्ला युतीने (MMA) मदरसे निर्माण केले जे जिहादी घडवण्याचे कारखाने बनले. सरते शेवटी ते बेकाबू झाले. 2007 साली लाल मशीदीत झालेल्या बंडाने शेकडो लोकांचा बळी घेत इस्लामाबादला रणभूमी बनवले. राष्ट्र, त्यानेच पोसलेल्या शक्तींना तोंड देता देता किती नपुंसक बनले हे यातून दिसून आले.

आजही ती नपुंसकता स्पष्टपणे दिसून येते. इस्लामाबादमध्ये कडक पोलीस बंदोबस्त असतानाही, तीन पैकी किमान दोन मशिदी किंवा मदरसे हे अतिक्रमण केलेल्या जमिनीवर बांधले गेले आहेत असा अंदाज आहे. या अराजकापुढे नागरी अधिकारी हतबल आहेत, झपाट्याने बांधल्या गेलेल्या ह्या वास्तू पाडण्यात असमर्थ आहेत. प्रार्थनेची वेळ इस्लामाबादमधील सर्व मशिदींमध्ये एकच असावी यासाठीही सरकारने केलेले प्रयत्न सफल झाले नाहीत. मदरशांमध्ये सुधारणा घडून येणे आता केवळ अशक्य आहे. त्याऐवजी, नेहमीच्या शाळांचे मदरशांमध्ये रूपांतर होऊन आता एकच राष्ट्रीय अभ्यासक्रम सर्वत्र लागू होत आहे.

या असहायतेची तुलना सौदी अरेबिया, इजिप्त, इराण किंवा इतरत्र करा. ही राष्ट्रे मशिदी कुठे बांधल्या जाव्यात याचे काटेकोरपणे नियमन करतात. इतकेच काय तर त्याची रचना आणि स्थापत्य हे सौंदर्य दृष्ट्या परिपूर्ण असणे अनिवार्य आहे – असे स्पष्ट केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते शुक्रवारच्या प्रवचनात काय बोलले जावे किंवा काय बोलले जाऊ नये  हे अगोदरच समजावलेले असते. ह्यामुळे तेढ निर्माण करणार्‍या भाषणांना आळा बसतो. म्हणून, तेथे जमावाकडून होणार्‍या हत्या नाहीत आणि तेथे कुणाचा माशल खान किंवा प्रियंता कुमार झाला नाही. 

 

तिसरे, कडव्या धर्माधिष्ठित राष्ट्राचे दिवास्वप्न (विशेषत: झिया उल हकच्या निजाम-ए-मुस्तफा किंवा इम्रान खानच्या रियासत-ए-मदिनाचे) पाकिस्तानमध्ये अजूनही चांगलेच जिवंत आहे. लोकांच्या भावनांना हात घालून त्यांची दिशाभूल करणारे, त्यांना चिथावणारे नेते अशा घोषणांचा फायदेशीरपणे वापर का करू शकतात हे पाहणे सोपे आहे. खोलवर रुजलेला भ्रष्टाचार, सामाजिक दुही व आर्थिक  विषमतेने ग्रासलेल्या देशातील ह्या लोकांना पूर्वी ज्यावेळेस सगळं काही ठीक होतं, त्या (भूत)काळातील परिस्थिती पुन्हा कधी येईल ह्याची आस लागली आहे.

 

पण लक्षात ठेवा! सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्को किंवा तुर्कस्तान यांसारख्या निरंकुश आणि हुकूमशाही देशांचे नेते काही काल्पनिक भूतकाळाचा बाजार मांडत नाहीत. त्याऐवजी, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबिया सारख्या कट्टर राष्ट्राला मुक्त विचारसरणीच्या समाजात बदलण्याचे वचन दिले आहे ज्यामुळे  नागरिकांचे सबलीकरण होईल आणि गुंतवणूकदारही आकर्षित होतील. 1924 मध्ये अतातुर्कने संपुष्टात आणलेल्या खिलाफत  राजवटीच्या पुनर्स्थापनेसाठी रेसेप एर्दोगान खाजगीत जरी तळमळत  असला, तरी त्याच्या केवळ 8 टक्के समर्थकांना ती पुन्हा आलेली हवी आहे.

 

स्थैर्य आणि समृद्धीसाठी पाकिस्तानला आपल्या भ्रामक समजुती सोडून एक सामान्य देश बनावा लागेल. म्हणजेच असं की विविध पंथ आणि गटातील लोकांना, फतवे काढून नाही तर त्यांच्यातील सामायिक गरजा आणि परस्परावलंबित्व लक्षात घेऊन सहमतीने त्यांच्यात ऐक्य निर्माण केले गेले पाहिजे. राज्य संस्थांद्वारे कडव्या धार्मिकतेला दिले जाणारे उत्तेजन आणि आमच्या शाळांमधून दिले जाणारे विखारी शिक्षण यामुळे आमची कुठेही वाहवा होत नाही. त्याऐवजी पाशवी, बेताल समाज निर्माण होत आहे. आणि आता आमच्या मित्रांनाही आमचा धसका घेतला आहे.

 

 
 
(परवेझ अमीर अली हुदभाई हे पाकिस्तानी अणुवैज्ञानिक, पदार्थ वैज्ञानिक, गणितज्ञ तसेच विचारवंत आहेत. हुदभाई हे पाकिस्तानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि इहवादाच्या पुरस्काराच्या चळवळींतील कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या 22 एप्रिल 2023 डॉन वर्तमानपत्रातील लेखाचा हा स्वैर अनुवाद आहे)

 
त्या लेखाची लिंक इथे देत आहे - https://www.dawn.com/news/1748962
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 

Leave a comment



RAJENDRA MADHUSUDAN PHADKE

2 years ago

हे लिहिणारा माणूस आजही पाकिस्तानात जिवंत राहू शकतो, हेच मोठे आश्चर्य !

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS