प्यादी फक्त मरण्यासाठीच असतात का ??
काही वर्षांपूर्वी मी "झेंडा" नावाचा सिनेमा बघितला होता. सिनेमा काही फार ग्रेट वगैरे नव्हता. त्यावेळी ज्वलंत असलेली ठाकरे कुटुंबातील दुही हा विषय घेऊन निर्मात्याने आपली पोळी भाजून घेण्याचा केलेला तो एक प्रयत्न होता. परंतु त्यातील मुख्य मुद्दा मात्र मला एकदम भावला होता. आपल्या साहेबांच्या मागून धावताना सर्वसाधारण कार्यकर्त्याची होणारी ससेहोलपट विषण्ण करणारी होती. सिनेमातील "विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती" ती द्विधा मनस्थिती दर्शविणारे चपखल गाणे होते.
माझ्या सामाजिक कार्यामुळे मला बऱ्याच गावांमधून फिरण्याची संधी मिळते. गावातील युवा पिढी ही अत्यंत आळशी, उनाडटप्पू, व्यसनाधीन अशीच निदर्शनास येते. एखाद्या राजकारण्याची शेपटी पकडायची, मग टगेबाजी, खंडणी गोळा करणे, मोटर सायकल बेफाम वेगात पळविणे हा लाडका छंद. आपल्या साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फ्लेक्सवर पन्नास नावांमध्ये आपले न दिसणारे नाव आणि फोटो यावा हीच आयुष्याची इतिकर्तव्यता. काय हे लाजिरवाणे जिणे!! पण दुर्दैवाने त्यांना तसे वाटत नाही. पुढेमागे सक्रिय राजकारणात येऊन खूप पैसे कमविणे हेच आयुष्यातील एकमेव ध्येय आणि स्वप्न. पण त्या हजारो, लाखो युवकातून एखादाच त्या मार्गावर पुढे सरकतो आणि बाकीच्यांच्या माथी मात्र फक्त अपेक्षाभंग आणि वैफल्य!
हे सर्व बघितल्यापासून डोक्यात असलेला प्रश्न आहे की बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात ?
उभा आडवा मारा करू शकणारे हत्ती, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेणारे उंट, उलटसुलट अडीच घरे जाऊन हल्ला चढवणारी घोडी, सर्वशक्तिमान वजीर, आणि महामहीम बादशहा.. एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत, आणि तोफेच्या तोंडी कोण?
स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी!
हा म्हणजे झाडाने सावलीत बसावं असा प्रकार झाला !
बरं,
सारी मातब्बर मंडळी प्रकरण अंगाशी आले तर, मागे फिरु शकतात, प्याद्यांना ती मुभा नाही.
एवढंच काय जीवाच्या आकांताने, एखाद्या प्याद्याने शत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून, अंतिम रेषा गाठलीच तरी..
पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार.. तसा रिवाजच आहे !
थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात, ती फक्त बळी जाण्यासाठीच..
प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच.. का?
ते विचारायची परवानगी नाही; कारण प्याद्यांना दुसरा पर्यायच नसतो!
सरपटत फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार पण स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार. इतिहासाची पानेही डामडौल्यांचीच नोंद घेणार; उदोउदोही मानकऱ्यांचाच होणार..
कारण.. हे राजकारण आहे आणि इथे तशीच पद्धत असते.
कार्यकर्त्यांनो समजून घ्या !
प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि अखेरीस देशात हे असेच चित्र दिसते; तेव्हा विचार करा आणि सावध व्हा.
आणि जर उपरती झाली, तर राजकारणातून बाजूला होऊन व्यवसायाकडे वळा; स्वतःकडे, स्वतःच्या कुटूंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या..
@ यशवंत मराठे