ज्या क्षणी आपण "Philanthropy" हा शब्द ऐकतो, त्या क्षणी आपल्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे अमेरिका.
अमेरिकेत एकूण देणगी संख्या पार अचंबित करणारी आहे; कारण त्यांनी $400 अब्जाहून अधिक दान केले आहे. त्याहून आश्चर्यकारक म्हणजे फक्त 45 लाख अमेरिकन (लोकसंख्येच्या 1.5%) लोकांचा वाटा, $350 अब्ज, म्हणजेच 88% आहे.
असे अनेक अमेरिकन उद्योजक आहेत ज्यांनी त्यांची जवळजवळ संपूर्ण संपत्ती धर्मादाय किंवा परोपकारासाठी दान केली आहे. गेट्स, बफेट, झुकेरबर्ग, सॅम वॉल्टन यापैकी काहींची नावे घ्यायची असली तरी एकूणच अमेरिकन लोकांनी केलेले परोपकार सुन्न करणारे आहे. एवढ्या प्रचंड संपत्ती धर्मादायासाठी दान करण्याची इच्छा येते कशी? आणि कशामुळे?
खुल्या आणि भांडवलशाही समाजात कोणाला किती पुरेसे आहे हे इतर कोणीही ठरवू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वत: ठरवावे लागते की त्याच्या/तिच्या कुटुंबासाठी किती पुरेसे आहे आणि किती दान करावे. परंतु एक निरीक्षण असेही आहे की उधळपट्टी करणारे श्रीमंत लोक जास्त देणगी देत नाहीत, अर्थात त्यालाही काही अपवाद असू शकतात.
संपूर्ण जगात, शांततेच्या काळात, आपण कला आणि संगीत इ. आणि सामान्य कल्याणासाठी दान केलेले पाहतो. परंतु युद्धकाळात देशवासियांसाठी आणि राष्ट्रासाठी दानधर्म होताना पाहतो. मला वाटते की ही संस्कृती कमी-अधिक प्रमाणात जगभर टिकून आहे, अगदी कोणताही देश असो.
पाश्चिमात्य जगातील लोक कुठल्यातरी कार्यासाठी पैसे द्यायला पटकन तयार असतात. त्याचे एक उदाहरण सांगतो - काही वर्षांपूर्वी युद्धातील अनुभवी कॅप्टन टॉम मूर या 99 वर्षांच्या माणसाने इंग्लडमधील NHS साठी £1000 उभारण्याचे ध्येय ठेवले. त्याने निधी उभारणीचे असे घोषित केले की तो त्याच्या 82 फूट लांबीच्या बागेत 100 वेळा त्याच्या वॉकरचा आधार घेऊन चकरा मारेल. त्याच्या फंड रेझिंग पेजद्वारे त्याने £1000 च्या लक्ष्याविरुद्ध किती रक्कम जमा केली? विश्वास बसणे अशक्य आहे पण ती रक्कम होती - $33 दशलक्ष !!!
सर्व पाश्चात्य जगात आणि विशेषतः युरोपमध्ये चर्च ही अत्यंत शक्तिशाली संस्था होती आणि आहे. खरं तर, मला असे वाटते की व्हॅटिकन काही देश सहज विकत घेऊ शकते आणि तरी देखील काही पैसे शिल्लक असतील. चर्चने देखील सामान्यतः धर्मांतराद्वारे त्याचा संदेश पसरविण्यासाठी खूप दानधर्म केला. अमेरिका थोडी वेगळी आहे. हे एक राष्ट्र म्हणून तसे नवीन आणि त्यामुळे बहुतेक लोकांना त्यांच्या जन्मभूमीत किंवा येथे कोणतीही ओळख नव्हती. त्यामुळेच जेव्हा ते श्रीमंत झाले तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला मदत केली. तथापि, हे देखील लक्षात घेतले पाहिजे की वारसा कर (inheritance tax) खूप जास्त असल्याने अमेरिकन लोक अधिक देणगी देण्यास तयार होतात.
आपण अमेरिकन संस्कृती आणि जीवनशैली पाहिल्यास, पैसे देणे हा त्यांचा एक अविभाज्य भाग झाला आहे. वेटर्स, न्हावी, टॅक्सी ड्रायव्हर्स किंवा अशा कोणत्याही सेवा घ्या, अमेरिकन लोक त्यांना देय असलेल्या एकूण रकमेच्या सुमारे 15% टीप देतात. मला आठवते की मी एकदा न्यूयॉर्क शहराच्या बाहेरील भागात असलेल्या वॉटरफ्रंट रेस्टॉरंटमध्ये माझ्या एका मित्रासोबत गेलो होतो. आमचे जेवण झाल्यावर माझ्या मित्राने बिल भरले आणि 10% टीप दिली. आम्ही बाहेर पडत असताना, वेट्रेस आमच्या मागे धावत आली कारण तिला हे जाणून घ्यायचे होते की तिने अशी काय चूक केली की ज्यामुळे तिला 5% कमी टीप मिळत होती.
थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेत धर्मादाय किंवा कोणत्याही सेवेसाठी पैसे देण्याची संस्कृती आहे. आता आपल्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की आपली भारतीयांची काय मानसिकता आहे? भारतीय स्वभावाने दानशूर आहेत की स्वार्थी? आपला इतिहास आणि संस्कृती काय दर्शविते?
भारतीय दृष्टिकोन
അത്താഴ പഷ്ണിക്കാരുണ്ടോ
Athaazha Pazhnikaarundo
🗣️🗣️🗣️
रात्रीच्या जेवणाशिवाय कोणी शिल्लक आहे का?
केरळमधील प्रत्येक कुटुंब रोज रात्री जेवायला बसण्यापूर्वी आणि मुख्य गेट बंद करण्याआधी ही हाक मारत असे.
माझ्या मते, परोपकार आणि दानशूरपणा हा नेहमीच भारतीय परंपरेत दिसतो. व्यक्ती आणि धार्मिक संस्था प्राचीन काळापासून गरिबांच्या कल्याणासाठी योगदान देत आहेत. भिक्षा देणे, अन्न अर्पण करणे आणि जकात देणे (मुस्लिम धर्माची परंपरा) हे भारतीय धर्म प्रेरित असलेले दानाचे काही प्रकार आहेत. मात्र, समाज म्हणून आपण दानशूर नाही असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अझीम प्रेमजी, रतन टाटा इत्यादी उल्लेखनीय अपवाद सोडले तर पुढील पिढीसाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी आपण ओळखले जातो. त्यामुळे भारतीय इतिहासाचा शोध घेणे आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

अमेरिकेसारखी उदात्त उदाहरणे भारतात फारशी दिसत नाहीत. मग भारतीय संस्कृती आत्मकेंद्रित आहे का? दानशूरपणा आपल्या रक्तातच नाही का?
वैदिक काळापासून, भारतीयांनी "वसुधैव कुटुंबकम" या तत्त्वांचे पालन केले; याचा गर्भित अर्थ असा आहे की, जी काही संसाधने उपलब्ध आहेत, ती प्रत्येकाला मिळाली पाहिजेत. वैदिक साहित्यात असे भरपूर पुरावे आहेत जे यावर भर देतात की मानव जातीने पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राणी जतन करणे आवश्यक आहे. सनातन धर्मात, लोक पृथ्वी मातेची तसेच पाणी, प्राणी आणि वनस्पती यांची पूजा करतात, कारण प्रत्येक गोष्ट ईश्वराने निर्माण केली आहे आणि तो सर्वव्यापी आहे.
वैदिकोत्तर कालखंड (500 BCE ते 500 CE) हा बुद्ध आणि बौद्ध धर्माच्या त्यांच्या शिकवणींचा प्रमुख काळ होता. अनावश्यक साठा करू नका किंवा आवश्यक नसलेल्या गोष्टी जमा करू नका असे त्यांनी शिकवले. आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास, ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांना ते दिले जावे. या काळातील अनेक राजे आहेत, उदा. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार इत्यादी, ज्यांनी मंदिरे, विश्रामगृहे बांधली आणि जगभर बंधुतेचा संदेश दिला.

त्या काळात भारताला भेट देणारे चिनी यात्रेकरू झुआनझांग (ह्युएन त्सांग) यांनी लिहिले आहे की हर्षवर्धनने नालंदा विद्यापीठाला खूप मोठी रक्कम दान केली होती. ह्युएन त्सांग यांनी नमूद केले की "प्रवासी, गरीब, आजारी यांच्या हितासाठी परोपकारी संस्था हर्षच्या संपूर्ण साम्राज्यात स्थापन करण्यात आल्या होत्या. शहरे आणि ग्रामीण भागात धर्मशाळा बांधण्यात आल्या आणि तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था, तसेच डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात आली होती ज्यायोगे गरजूंना औषधे मिळू शकतील.
परंतु नवव्या किंवा दहाव्या शतकापर्यंत आपला देश परकीय शक्तींच्या लुटीपासून किंवा आक्रमणामुळे असुरक्षित होता हेही आपण समजून घेतले पाहिजे. तसेच, जे आज आपण पाहतो तसे एक देश म्हणून आपले भौगोलिक अस्तित्व कधीच नव्हते. या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे राजे होते तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की सांस्कृतिकदृष्ट्या ते सर्व एका समान धाग्यात बांधले गेले होते.
पूर्वी दोन राजांमधील युद्धांमध्ये, मंदिराची संपत्ती किंवा सामान्य व्यक्तीच्या घराची कधीही लुट होत नसे. पण मुस्लिम आक्रमणांनी हे सर्व बदलून गेले. यामुळे आपल्या पूर्वजांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि म्हणूनच पुढील पिढीसाठी साठवणूक आणि बचत करण्यास त्यांनी सुरुवात केली. सोने हे बचतीचे एक प्रमुख साधन होते आणि नंतर जमीन हे दुसरे बनले.
१८ व्या शतकात युरोपियन, प्रामुख्याने ब्रिटीश, राजवट सुरू झाली आणि भारतीय संस्कृतीवर त्याचा खोलवर परिणाम झाला. भारतीयांच्या व्यवसायाची जागा युरोपियन लोकांनी घेतली आणि भारतीय व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडू लागले. परंतु असे काही व्यापारी होते, ज्यांनी खूप प्रगती केली आणि परोपकारी कार्यात स्वतःला गुंतवले. भारतीय कॉर्पोरेट परोपकारी उपक्रम (CSR) हा वीरजी व्होरा यांच्यापासून सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो. त्यांनी १८५० च्या दशकात मुंबईतील कापसाच्या व्यापारात प्रचंड नफा कमावला आणि त्या कमाईचा काही भाग शहराच्या सुधारणेसाठी वापरला आणि रुग्णालये, ग्रंथालये आणि उच्च शिक्षण संस्था यांसारख्या सार्वजनिक सुविधा उभारल्या.
जुन्या काळी व्यापार प्रामुख्याने जैन समाजाकडून होत असे. सर्व व्यापारी मार्गांवर राहण्याची, भोजन, पाणी इत्यादी सोयी होत्या. याला दान किंवा परोपकार म्हणायचा नाही का?
जमशेटजी जिजीभॉय आठवतात? त्यांनी JJ हॉस्पिटल, JJ स्कूल ऑफ आर्ट्ससह सुमारे 126 प्रसिद्ध सार्वजनिक संस्थांची स्थापना केली आणि त्याला निधी पुरवला. माहीम कॉजवे तसेच जेजे धर्मशाळा, (जिथे आज 150 वर्षांनंतरही वृद्ध आणि निराधार लोकांना मोफत अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधे दिली जातात) बांधण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. डेव्हिड ससून (बगदादी ज्यू), कावासजी जहांगीर आणि जमशेदजी टाटा हे जुन्या काळातील इतर उल्लेखनीय परोपकारी होते. शापूर पालोनजी, नंदन निलेकणी, सुधा मूर्ती, अनु आगा ही काही अलीकडची उदाहरणे आहेत.


तसेच शीख समाजाच्या परोपकाराकडे कोण दुर्लक्ष करू शकेल? जगभरातील गुरुद्वारा ज्या प्रकारे लंगर चालवतात ते अभूतपूर्व आहे.

समाजाच्या भल्यासाठी अथकपणे काम करणार्या RSS सह अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न, समर्पण याकडेही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जेव्हा जेव्हा पूर, दुष्काळ, भूकंप, वादळ, किंवा सध्याच्या कोरोना सारखी महामारी यांसारखी नैसर्गिक आपत्ती आली, तेव्हा आपण स्वयंसेवक संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तत्काळ बाहेर पडताना पाहतो. भारतभर असे अनेक समाजसुधारक आहेत ज्यांनी दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

केवळ महाराष्ट्रातून विनोबा भावे, महर्षी कर्वे, बाबा आमटे, नसिमा हुरझुक अशी नावे लगेच समोर येतात. पण दुर्दैवाने तरुण पिढी त्यांना फारशी ओळखत नाही. मग असे बरेच डॉक्टर आहेत, जे नियमितपणे ग्रामीण धर्मादाय रुग्णालयांना भेट देतात, जिथे ते आपला वेळ देतात, त्यांच्या वैद्यकीय कौशल्यांची विनामूल्य सेवा देतात. विचार करा की जर त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांनी बरेच जास्त पैसे कमावले असते. दुर्दैवाने या लोकांना कधीच ओळख मिळत नाही कारण मीडियाकडे टीआरपी नसलेल्या अशा मुद्द्यांसाठी वेळ नाही.

भारतात सामाजिक सुरक्षेचा अभाव ही देखील लोकांना त्यांची अतिरिक्त संपत्ती दान करण्यापासून रोखते कारण त्यांना देणगी देणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी बचत करण्याकडे कल आहे. आई-वडिलांना आपल्या मुलांना संपत्ती मिळावी असे वाटते कारण वृद्धापकाळात आपली काळजी घेतली जाईल अशी त्यांची आशा असते. ही गोष्ट पाश्चात्य जगात जवळपास अस्तित्वात नाही.
पण मग आपल्या मनात प्रश्न येतो की चॅरिटी आणि फिलांथ्रोपी यात काही फरक आहे की नुसतीच दोन वेगळी नावे आहेत? अमेरिकेत भारतापेक्षा खूपच जास्त सुबत्ता आणि श्रीमंती आहे त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा बराच व्यापक असतो. त्यांच्या फिलांथ्रोपीद्वारे दीर्घकालीन उपाय योजना आखता येतात तसेच त्यांचा कल सामाजिक बदल घडविण्याकडे असतो आणि ते सक्रिय प्रतिसादावर भर देतात. याच्या उलट भारतात आपला प्रतिसाद हा प्रतिक्रियाशील (reactive) आणि सर्वसाधारणपणे वैयक्तिक असतो. आपला भर समाज सेवेवर असल्यामुळे तो अल्पकालीन आणि आपत्कालीन (short term & emergency) असतो.
शेवटी, माझ्या मते, आपण पाश्चिमात्य जगाशी आणि विशेषतः अमेरिकेचे अनुकरण करण्याची इच्छा बाळगण्यात काही नुकसान नाही. परंतु महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली संस्कृती त्यांच्या 180 डिग्री विरुद्ध आहे. त्यामुळे आपल्या समाजात आणि संस्कृतीत जे चांगले आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. आपण पाश्चिमात्य जगाचे आंधळं अनुकरण करण्याची काहीच गरज नाही. आणि हे ही लक्षात ठेवा की पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपला देश खूप तरुण आहे.
@ यशवंत मराठे