आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील पुरुष पार्श्वगायकांचा विचार केला तर जुनी पिढी पंकज मलिक, कुंदनलाल सैगल किंवा जी एम दुराणी यांच्याबद्दल खूप बोलू शकते. पण मला नेहमीच वाटतं की माझी पिढी खूप भाग्यवान आहे की आम्ही अशा काळात जन्माला आलो जेव्हा तलत मेहमूद, मुकेश, हेमंत कुमार, मन्ना डे, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांसारखे दिग्गज आपआपल्या शिखरावर विराजमान होते. मात्र, सध्याच्या पिढीला आमच्या काळातील गीत, संगीत आणि गायकांच्या दर्जाचे कौतुक नाही याचे खूप वाईट वाटते. असे म्हणतात की "तभी मन डोलता था, आज तन डोलता है"; किती खरं आहे नाही? लता मंगेशकर यांनीही एकदा भाष्य केले होते की, त्या काळात गायकाला थोडा दम घेण्यासाठी साथीदार संगीत वाजवत असत; आज मात्र गायक संगीतकारांना मोकळा श्वास देण्यासाठी गातो.
परंतु माझ्या मते तलत मेहमूद, मुकेश, मन्ना डे आणि हेमंत कुमार यांना काही मर्यादा होत्या. बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकांचा विचार करायचा असेल तर मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही. या लेखाचा उद्देश गायकांची तुलना करण्याचा अजिबात नाही कारण तेवढी माझी प्रगल्भता नाही.
ज्या क्षणी मी मोहम्मद रफी हे नाव ऐकतो तेव्हा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे दस्तुरखुद्द देवाचा आवाज. अविश्वसनीय प्रतिभा; देवलोकीचा गंधर्व. मला नेहमीच असे वाटते की इतर कोणत्याही रेकॉर्ड केलेल्या आवाजाच्या तुलनेत रफीची अभिव्यक्ती गळ्यातून नव्हे तर आत्म्यातून येते. संगीत हे कानांना स्वर्गीय आनंद देते आणि त्यातून ते जर रफी याच्या मधुर स्वरातील गीत असेल तर तो खरोखरच दैवी अनुभव असतो.
हिंदी पार्श्वगायनात अभिजात दर्जा म्हणून बघायचे असेल तर एकच नाव - मोहम्मद रफी. त्याच्या बोलण्याच्या आणि गाण्याच्या आवाजात जमीन अस्मानाचा फरक होता. संभाषणही आवाज अत्यंत नाजूक पण गाताना तोच गळा बुलंद आवाजाने पडदा असा काही दुमदुमून टाकायचा की थक्क व्हायला होत असे.
एखाद्या गाण्यात 'आय लव्ह यू' म्हणण्याचे जर अनेक मार्ग असतील तर ते सर्व रफीला माहीत होते. नवथर तारुण्याचे प्रेम, किशोरवयीन प्रणयाचा अविष्कार, एकतर्फी प्रेमाचे अथवा विरहाचे किंवा प्रेमभंगाचे दुःख - तो त्याच उत्कटतेने प्रत्येक भावना आपल्या गाण्यातून दर्शविण्याची त्याची प्रतिभा होती.
पण फक्त प्रेमच कशाला, ताना व सरगमयुक्त रागदारी किंवा दर्दभरी गाणी, विनोदी गीतं, क्रीडागीतं, भक्तिगीतं, गझल, कव्वाली आणि भजने अशा सर्व प्रकारची गाणी आणि ती देखील सर्व सप्तकात सहजतेने गाण्याची रफीची प्रतिभा विस्मयचकित करणारी होती. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर शम्मी कपूरच्या इच्छेनुसार एका दमात "दिल के झरोंके में" च्या सुरुवातीच्या ओळी. त्यानंतर रफीने संगीतकार शंकर जयकिशन यांना हसत हसत सांगितले की अशी दहा गाणी गायलो तर माझे हृदय बंद पडेल.
त्याचा आवाज जीवनातील सर्व नवरस टिपू शकत असे मग एखाद्या अयशस्वी कवीचे दु:ख अथवा एखाद्या ज्वलंत कामगार नेत्याची तडफ किंवा एखाद्या कर्जबाजारी शेतकऱ्याची निराशा असो. ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची हातोटी रफीकडे होती. तसेच चित्रपटातील पात्रांच्या भूमिकेनुसार गाणं गाण्याची अभूतपूर्व कला रफीकडे होती; नायकापासून साधू, फकीर, फिरत विक्रेता, तेलमालीशवाला, खेळणीवाला, भिकारी अशा अनेक पात्रांचा आवाज एकच - रफी.
शम्मी कपूर यांनी त्यांच्या मुलाखतीत एकदा म्हटले होते: "एकदा मी परदेशात गेलो होतो, आणि रफी साबांनी माझ्या अनुपस्थितीत एक रेकॉर्ड केले होते. मी परत आलो आणि ते ऐकले; मी थक्क झालो. त्यांनी माझी अदा, माझा अंदाज, माझी ऊर्जा पकडली होती. मी त्यांना विचारले तेव्हा रफी साब हसत हसत म्हणाले: 'शम्मी कसा उडी मारेल किंवा अदा करेल किंवा हात उचलेल किंवा पाय किंवा डोके हलवेल आणि त्यानुसार गाणे गाईल अशी मी कल्पना केली होती' आणि म्हणूनच मी ते गाणे नेमके सादर करू शकलो. ते अभूतपूर्व होते पण हो, तो रफी होता.
भजन असे म्हटले की मला एकच मुख्यत्वे आठवते. "हरि ओम.... हरि ओम.... मन तरपत हरी दर्शन को आज" हे आजपर्यंत ध्वनिमुद्रित केले गेलेले हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम भजन आहे. ह्या उत्कृष्ट भक्तीगीतातील मोहम्मद रफीचा अद्वितीय स्वर, हा परमेश्वराप्रती, ओढ, प्रेमभावना आणि उत्कट भक्तीने ओथंबलेला होता. या गीताबद्दल संगीतकार नौशाद म्हणतात, "यात मी विशेष काही केले नाही. ही तर रफीसाहेबांची कमाल आहे. "रफी म्हणतात की, यामध्ये मी विशेष असे काही केलेले नसून ही राग मालकंसची कमाल आहे. हे सगळे एवढे महान कलाकार आहेत की स्वतःकडे मोठेपणा घ्यायला नाही.
रफीच्या भक्तीगीतांतील अजुन एक अनमोल रत्न, "दुनिया न भाये, मोहे अब तू बुला ले तेरे चरणों में" आणि त्यातील रफीच्या स्वरात व्यक्त झालेला भक्तिभाव केवळ अप्रतिम. फार थोड्या इतर गायकांची भक्तीगीते रफीच्या गाण्यांशी बरोबरी करू शकतात. लता मंगेशकर हा एक ठळक अपवाद. रफी खर्या आयुष्यात साईबाबांचा परमभक्त होता.
कोहिनुर चित्रपटातील "मधुबन मे राधिका नाचे रे" हे गीत गाण्यास कठीण आणि त्यातील शास्त्रीय संगीतामुळे लोकांना कितपत आवडेल अशी चित्रपट निर्मात्याला शंका होती. रफींनी त्यांना विनंती केली की मला हे गीत गाऊ द्या. हे गीत लोकप्रिय झाले तर मी माझे मानधन घेईन. रफींनी हे गीत गायले आणि प्रचंड गाजले. या गीताच्या लोकप्रियतेबद्दल त्याचे श्रेय घेण्यास ना संगीतकार नौशाद तयार होते ना रफी. इतकी ही मंडळी महान होती. निर्मात्यांनी रफींना त्यांची फी विचारली तर ते म्हणाली की, मला माझी फी मिळाली आहे. लोकांनी हे गाणे पसंत केले हीच माझी फी आहे. असे होते हे महान कलाकार. त्यांच्या कलेत धर्म कुठेही आडवा आला नाही आणि धर्मात कला आडवी आली नाही. मानवता, कला हाच त्यांचा धर्म होता.
"मुझे दुनिया वाले शराबी ना समझो" (चित्रपट: लीडर, 1964) मध्ये निर्व्यसनी रफीने असे काही काही पेश केले की खरंच एखादा दारुडा गातो आहे असे वाटावे. "दिन ढल जाये" ही गाईड मधील एसडी बर्मन यांची रचना ऐका आणि रफी गाण्यात देव आनंदच्या व्यक्तिरेखेचा मूड कसा तयार करतो ते अनुभवा. या गाण्याच्या शेवटी ऐसे में किस को "कौन" मनाये यासाठी रफीने जवळपास पंधरा ते वीस रिटेक घेतले. दादा बर्मन म्हणाले देखील की काय झालं? सगळं मस्त झालंय पण रफीला तो "कौन" शब्द हवा तसा होत नव्हता. परिपूर्णतेचा किती तो ध्यास - अदभूत हा एकच शब्द.
थोडक्यात सांगायचं तर रफी हा बॉलीवूडने पाहिलेला सर्वात अष्टपैलू पुरुष गायक होता. रफी गाऊ शकणार नाही असे गाणेच तयार झाले नाही.
एका भारतीय पार्श्वगायकाने जास्तीत जास्त भाषांमध्ये गाण्याचा गौरव मोहम्मद रफी यांच्याकडे जातो. आपल्या मनमोहक आवाजाने त्यांनी चौदा भारतीय आणि सहा परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. परंतु गंमत म्हणजे त्यांनी या इतर भाषांमध्ये फक्त 162 गाणी गायली आहेत आणि उर्वरित सर्व गाणी हिंदीत होती.
रफीला पद्मश्रीपेक्षा अधिक महत्त्वाचा पुरस्कार कधीच दिला गेला नाही, याचे मला नेहमीच खूप आश्चर्य वाटते आणि खेद होतो. पण कदाचित गाण्याला इबादत मानणाऱ्या रफीला अशा बाह्य पुरस्कारांची भूक कधीच नव्हती. त्याला लाभलेला आवाज तो "खुदा की देन" मानत आला होता. फक्त एक चांगला गायक म्हणून ओळख न राहता रफीची इच्छा असेल की त्याला रसिकांनी एक परिपूर्ण माणूस म्हणून स्मरणात ठेवावे आणि म्हणूनच त्याला मोठे पुरस्कार मिळाले नसावेत. रफीने कायमच तरुण गायक आणि संगीत दिग्दर्शकांना मदत केली, कधीही पुरस्कारासाठी लॉबिंग केले नाही आणि कधीही पैशाचा पाठलाग केला नाही.
रफी कलाकार म्हणून जेवढा श्रेष्ठ होता तेवढाच एक माणूस म्हणूनही महान होता. कोणाचाही राग, द्वेष करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. त्याला लाभलेल्या निर्मळ सुरांप्रमाणेच अत्यंत निर्मळ हृदयाचा हा माणूस होता. आपल्या मदतीची आणि दानाची जाहिरात करण्याच्या काळात अनेक गरजूना त्याने कोणतीही जाहिरात न करता मदत केली आणि स्वतः नामानिराळे राहिला.
महेंद्र कपूर यांनी रफीच्या नम्रतेचा एक किस्सा सांगितला होता. एकदा रफीने रात्रीच्या आकाशाकडे बोट दाखवून त्याला म्हणाले, "जेव्हा हे सर्व घडवण्याचे श्रेय देव घेत नाही, तेव्हा "मी हे केले?" असे म्हणणारे आपण कोण मोठे लागून गेलो?
रफीच्या चेहऱ्यावर नेहमीच एक छान हसू असायचं आणि ते एका प्रकारे ते किती आनंदी आणि समाधानी होते हे दिसून येतं. एक मजेदार किस्सा आहे: एचएमव्हीने मोहम्मद रफीच्या दु:खी गाण्यांचा संग्रह प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी, त्यांना रफीचा खिन्न चेहऱ्याचा फोटो हवा होता, आणि त्यांनी त्यांची संपूर्ण लायब्ररी शोधली, पण त्यांना रफीचा उदास मनस्थितीचा फोटो सापडला नाही. शेवटी, त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला आणि अल्बमच्या मुखपृष्ठावर हसणाऱ्या रफीसह संग्रह प्रदर्शित झाला.
अन्वर, शब्बीर कुमार, मोहम्मद अझीझ, जसपाल सिंग आणि अर्थातच सोनू निगम या सर्व गायकांनी रफीचा आवाज आणि शैली कॉपी करण्याचा प्रयत्न करून स्वतःचे करिअर घडवले.
1969 मध्ये आराधना चित्रपटाद्वारे किशोर कुमार नावाच्या त्सुनामीने बॉलीवूडला धडक दिली आणि रफीला सात वर्षांसाठी विस्मरणात जायला लावले परंतु त्याने लैला मजनू (1976) आणि हम किसी से कम नहीं (1977) मधून केलेले पुनरागमन तितकेच आश्चर्यकारक होते. संगीत समीक्षकांमध्ये नेहमीच चर्चेचा मुद्दा असणाऱ्या रफी आणि किशोर यांच्यात निकोप स्पर्धा असल्यामुळे दोघे शेवटपर्यंत चांगले मित्र राहिले. 31 जुलै 1980 रोजी रफी केवळ 56 वर्षांचा असताना त्याच्या स्वर्गीय निवासासाठी निघून गेला तेव्हा किशोर कुमार त्याच्या पार्थिवाच्या शेजारी बसून तासनतास रडत असल्याचे बघून सर्वांचेच मन हेलावून गेले.
त्याच्या अकाली मृत्यूमुळे रफीने आपल्या पुढील आयुष्यात काय मिळवले असते याची आपण कल्पना करू शकत नाही, परंतु एक गोष्ट नक्की की आपल्याला मिळू शकणारी गाण्यांची रत्ने आपण हरवून बसलो. परंतु मला असेही वाटते की हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील बदल त्याच्या पचनी पडले नसते. कारण आता मेलडीच हरवून गेली आहे.
असो; असा दुसरा रफी पुन्हा होणे नाही कारण त्याच्यासारखी माणसे सहस्त्राब्दात एकदाच जन्माला येतात आणि ती दैवी देणगी असते. देवी सरस्वतीने त्याला काही खास वरदान दिले असेल. नौशादने बर्याच वेळा उल्लेख केला होता की रफीच्या चेहर्यावर नेहमीच एक मधुर स्मितहास्य विलसत असे. सर्वसामान्य माणसांसाठी ती पातळी गाठणे शक्य नाही. आपण भाग्यवान आहोत की आपण त्याची गाणी ऐकता ऐकता मोठे झालो आणि त्याच्या स्वर्गवासानंतर त्रेचाळीस वर्षांनंतरही आपण त्याच्या गीतांचा आस्वाद घेत आहोत. आजही भारतातले लाखो लोक आहेत की ज्यांचा दिवस रफीच्या आवाजाने सुरु होतो आणि रात्रही त्यांच्याच आवाजाने.
चित्रपट संगीताचे खरे प्रेमी रफी यांना त्यांच्या आयुष्यात कधीही विसरु शकणार नाहीत. रफीने स्वतः त्यांच्या एका गाण्यात म्हटले आहे - तुम मुझे यूं भुला न पाओगे, जब कभी भी सुनगे गीत मेरे.
रफीची खालील पंचवीस गाणी माझी खास आवडती आहेत. (alphabetical order)
01. छु लेने दो नाजुक, 02. चौधवी का चांद हो, 03. देखी जमाने की यारी, 04. दिल का भंवर करे, 05. दिल के झरोखे में, 06. दिन ढल जाए, 07. दुनिया ना एहसान, 08. तेरा होगा, 09. हम बेखुदी में तुमको, 10. कभी खुद पे कभी, 11. खोया खोया चांद, 12. मधुबन में राधिका, 13. मैं जिंदगी का साथ, 14. मन रे तू कहे ना, 15. मन तरपत हरी , 16. नाचे मन मोरा, 17. ओ दुनिया के रखवाले, 18. पुकारता चला हूं मै, 19. रंग और नूर की बारात, 20. सुहानी रात ढल चुकी, 21. तेरी आँखों के शिव, 22. तुम्हे मुझे 23. याहू, चाहे कोई मुझे, 24. ये दुनिया अगर मिल भी, 25. जिंदगी भर नही भुलेगी
रफी साब; आपको शतशः नमन!!
@ Yeshwant Marathe
yeshwant.marathe@gmail.com