गेल्या काही वर्षांमध्ये अनियमित व अति तीव्रतेने पडणारा पाऊस तसेच आसपासच्या परिसरातील गावकरी व शेतकरी यांनी केलेल्या अनियंत्रित बोअरवेल यामुळे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई गावोगावी जाणवू लागली आहे.
बऱ्याच गावांमध्ये ओढे असतात आणि वेगवेगळ्या उंचीवर साखळी (series) बंधारे करण्याची संकल्पना जुनीच आहे. परंतु डॉ. अजित गोखले यांनी removable बंधाऱ्याचे डिझाईन बनवले ज्यायोगे हे बंधारे पूर्णपणे काढून ठेवता येतील. या बंधाऱ्याला खांब (pillars) सुद्धा नाहीत त्यामुळे पावसाळा चालू असताना ओढ्यातून पाणी वाहण्यास कोणताही अडथळा येत नाही. याचा महत्वाचा फायदा असा की ओढ्यात वाळू/माती साठणे किंवा दोन्ही बाजुच्या शेतातील माती वाहून गेली असे होणार नाही. पावसाळा संपला की दिवाळीच्या आसपास हा बंधारा उभारला जाईल ज्यायोगे ओढ्याचे पाणी काही जास्त काळापर्यंत ओढ्याच्या पात्रात ठेवल्यामुळे जमिनीतील भूजलाचे पुनर्भरण व्हायला मदत होईल. ज्याचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि पर्यायाने गावाला सुद्धा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा होईल.
आणि या बांधाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा बांध माशांच्या प्रजनन काळातील हालचालीला अजिबात अडथळा आणत नाही. बऱ्याच माशांची प्रसूतिगृहे ही डोंगरांमधील छोट्या ओढ्यामध्ये आणि शेतांमध्ये असतात. मासे पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्यातून उताराच्या विरुद्ध बाजूस वर चढतात.. वर चढणारे.. वर-गणीचे.. वलगणीचे मासे तेथे खाडीतून नदीत आणि नदीतून ओढा मार्गे पोचतात. सर्व साधारण चेक डॅम किंवा कोल्हापूर पद्धतीच्या बांधांमुळे या मार्गात अडथळे येतात किंवा पाण्याचा वेग एवढा वाढतो की माशांना वर चढायला त्रासदायक ठरतात त्यामुळे एकंदरीतच माशांची संख्या कमी होत जाते. जागतिक मत्स्य दुष्काळाला साधे बांध आणि धरणे हे मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. या बंधाऱ्याच्या डिझाईनमुळे ही माशांची संख्या वाढवण्याचा उपाय सापडू शकेल.
पावसाळ्यात माशांच्या पैदाशीचा काळ असतो. त्यामुळे खारफुटीत काही माशांची पैदास वाढते. सुरुवातीच्या पावसाळ्यातील भरतीत ही मासळी खाडीच्या मुखापर्यंत पोहोचते. जोरदार पावसामुळे वलगणीची शिवडा, वाम, मल्याचे मासे, कटला, मुरे, डाकूमासे ही मासळी शेतकऱ्यांच्या शेतातही दाखल होते. रायगड आणि कोकण किनारपट्टीवर वलगण आढळते. ही मासळी साधारण आर्दा व पुनर्वसू नक्षत्रात डोंगरातील छोट्या ओढ्यांच्या पात्रात व त्या जवळपासच्या शेतांमधे पिले देते. शेतांमधल्या अनेक किडींचा ही पिलावळ नाश करते. अनेक अन्नसाखळ्यांचा भाग होते. थोडी मोठी झाल्यानंतर उत्तरा नक्षत्रात पाऊस कमी व्हायच्या काळात उतारावरून वाहून नद्या खाड्या यांच्या भागात व काही तर खोल मोठ्या समुद्रात निघून जाते.
यातील एक महत्त्वाची जात म्हणजे चिवनी/चिवणी ही मच्छी सुरवातीचा जोरदार पाउस पडून जेंव्हा पाणी वाहू लागतं तेंव्हा येते. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असते. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठी ही वर आलेली असतात. म्हणून ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातुन वाहत खाडीत, विर्यात (झऱ्यात) शेतात जातात. त्यामुळे खाडीकिनाऱ्यावरील मच्छीमार चिवणी पकडतात. त्यांची मासळी बाजारात विक्री करतात.
वर्षातून केवळ एकच वेळ म्हणजे सुरुवातीच्या पावसातच वलगण सापडते. त्यानंतर वलगण दुर्मिळ होते. वलगणीचे मासे चवदार असल्याने खवय्ये मोठी किंमत मोजूनही त्याची खरेदी करतात.
या माशांच्या येण्याजाण्याच्या मार्गात चुकीच्या पद्धतीने बांधलेले बंधारे व मोठमोठी धरणे अडथळा आणतात.
तसेच वरच्या भागातील दगड गोटे वाळू व रेवसा (रेवसा म्हणजे भरड दगड गोटे, जे वाळूपेक्षा मोठे असतात; मातीमिश्रित असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरांमधून खाली येत असतात) पुढे जात राहण्यास मदत होईल. पर्यावरणावर कुठला आहे वाईट ठसा न सोडता बांध अनेक दशके उपयोगी राहील.
कर्मधर्मसंयोगाने कृषी भूषण श्री. राजेंद्र भट आमच्या संपर्कात आले. त्यांना त्याच्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्याचा फायदा घेऊन भूगर्भातील पाणी वाढवावे अशी आत्यंतिक इच्छा होती. त्यांचे म्हणणे असे होते की जर आपण भूगर्भातून पाणी काढून वापरतो तेव्हा त्याचे पुनर्भरण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांनी स्वतः गेल्या काही वर्षात दोन बंधारे पूर्ण केले होते आणि त्या साखळीतील तिसरा आणि सगळ्यात मोठा बंधारा या नवीन डिझाईनचा करावा असा त्यांचा मानस होता.
आमच्या नीरजा संस्थेच्या विद्यमाने कालच हा बंधारा पूर्ण झाला. त्याचे काही फोटो देखील पोस्ट करतो आहे. हा बंधारा जेव्हा पूर्ण भरेल तेव्हा जवळपास 38 लाख लिटर पाणी जमा होईल आणि पूर्ण ओढ्यात (तीनही बंधाऱ्यांमुळे) अंदाजे 70 ते 75 लाख लिटर पाणी जमा होऊ शकेल. आता हे जमलेले पाणी जमिनीतून झिरपून आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणी वाढवायला मदत करेल. पाणी अडवा, पाणी जिरवा याचे हे एक आदर्श उदाहरण होईल. याच पद्धतीने पुढील काही महिन्यात मोखाडा आणि पालघर जवळील माहीम येथे कामे करण्याचा विचार आहे.
या बंधाऱ्याच्या कामात डॉ अजित गोखले आणि त्यांचे सहकारी अविनाश, अक्षय, रोहित या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.
यशवंत मराठे, सुधीर दांडेकर, श्रीकांत भिडे, वसंत मराठे, सुरेश वैद्य, अदिती मराठे