तुम्हाला कोणाला माहित आहे की जगात किती धर्म आहेत? अविश्वसनीय वाटेल पण काही हजार धर्म आहेत परंतु जगाची 84% लोकसंख्या ही मुख्यत्वे करून ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू, बुद्ध अशा धर्मात विभागली गेली आहे. दुर्दैवाने जगातील सर्वाधिक युद्धे आणि कत्तली कुठचा धर्म श्रेष्ठ यावरून झाल्या आहेत.
इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्याही आधीपासून ज्यू धर्म अस्तित्वात आहे. ज्यू वंशाचा मूळ पुरुष अब्राहम. अब्राहम आणि सारा या जोडप्याला मूलबाळ नव्हतं. साराला आपला वंश पुढे चालू राहायला हवा होता. म्हणून तिने हागार या आपल्या दासीला अब्राहमपासून मूल होऊ दिलं. त्याचं नाव इस्माईल. साराला पुढे उतारवयात मुलगा झाला. त्याचं नाव इसहाक. इस्माईल मोठा, त्याच्याकडे वारसा हक्काने कसलेही अधिकार जाऊ नयेत म्हणून साराने हागारला तिच्या मुलासह हाकलून देण्याचा प्रस्ताव अब्राहम समोर ठेवला. हागारला व इस्माईलला देशोधडीला लावण्यात ती यशस्वी झाली. इस्माईलपासून पुढे अरबी वंश तयार झाला. इसहाकचा वंश ज्यू म्हणून ओळखला गेला. आपल्या वंशाचा मूळ पुरुष देशोधडीला लागण्यास इसहाक हा ज्यू कारणीभूत आहे ह्या गोष्टीपासूनच अरबांच्या मनात असलेल्या ज्यूंविषयीच्या क्रोधाला सुरुवात होताना दिसते. म्हणजेच अब्राहमच्या दोन मुलांपासून ज्यू (यहुदी) आणि अरब हे दोन वंश निर्माण झाले. एकाच घरात हे दोन धर्म उदयाला आले. नुसते उदयालाच आले नाही तर एकमेकांचे कट्टर वैरी झाले आणि आजतागायत त्यांच्यातला संघर्ष संपलेला नाही.
तसे बघायला गेले तर बुद्ध, जैन अथवा शीख ह्या धर्माची सुरुवातच मुळी भारतातून झाली. पण तरी देखील भारतात सर्वात जास्ती भांडणे ही हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात होताना दिसतात.
आपला धर्म श्रेष्ठ अशी धारणा होण्यासाठी योग्य कारणे तुमच्याकडे असतील आणि ही धारणा तर्कशुद्ध मीमांसा, अंत:प्रेरणा आणि अनुभूतीवर आधारित असेल तर असे म्हणणे योग्य ठरेल व इतरांनीही ते समजून घ्यावे म्हणून प्रयत्न करण्यास हरकत राहणार नाही. अडचण अशी आहे की धर्म ही संज्ञा ज्या विचारप्रवाहाकरिता सर्वप्रथम वापरली गेली, ते इस्लाम आणि ख्रिश्चन, यांना तसे तार्किकतेचे अधिष्ठान नाही; आहे केवळ अंधश्रद्धा.
पृथ्वीवरील जीवांना पापापासुन मुक्ती देण्यासाठी आणि आकाशातील बापाकडे (देवाकडे) पोचण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणून ईश्वराने आपला पुत्र म्हणून जिझसला पृथ्वीवर पाठवला का हे कळण्यास मार्ग नाही. किंवा अल्लाह आपले संदेश गेब्रियल ह्या देवदुताकरवी प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांच्यापर्यन्त पोहचवित होता आणि मोहम्मद पैगम्बर हे शेवटचे प्रेषित असल्यामुळे त्यांच्या संदेशाचे पालन त्यांच्या अनुयायांनी केलेच पाहिजे असा जो दंडक घातला होता ह्याचा खरेखोटेपणा कसा काय तपासणार?
ह्या दोन्ही धर्मप्रणांलीनी अशी ग्वाही दिली की मौलवी अथवा चर्चने सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण केले तारा न्यायाच्या दिवशी शाश्वत सुखाच्या स्वर्गात तुमची पाठवणी केली जाईल. त्यामुळे फक्त ख्रिश्चन किंवा फक्त इस्लाम बरोबर आहे असा दावा करणे चुकीचे होईल कारण दोन्ही एकाच वेळी बरोबर असू शकत नाहीत. या दोन्ही धर्माची मुलतत्वे ही पालनकर्त्याच्या मनात धाक उत्पन्न करणारी आहेत. दोन्ही धर्मात अशी शिकवण दिली जाते की आपल्या धर्माचे कठोर पालन न करणाऱ्याला चिरंतर नरकात राहून यातना सहन कराव्या लागतील. असे जर असेल तर जगातील निम्मी जनता नरकात जाईल आणि हे निश्चितच खरे असू शकत नाही.
दुर्दैवाने, ख्रिश्चन व इस्लामचे अनुयायी आपापल्या धर्माचा प्रसार अतिशय कट्टरपणे करतात. "केवळ आमचाच धर्म श्रेष्ठ व इतर धर्म तुच्छ असून ते ईश्वरप्राप्तीच्या मार्गाकडे नेऊ शकत नाहीत” असा दावा करण्यात ते कधीच कचरत नाहीत. आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांना संपवून टाकण्याच्या एका आंधळ्या व अविवेकी कामगिरीवर हे लोक सतत असतात. यांच्या धारणेनुसार 'त्यांच्या देवाची' अशी इच्छा आहे की सर्वांनी फक्त येशू ख्रिस्त अथवा मोहम्मद पैगंबर यांचाच अनुनय करावा तरच जेव्हा, देवाच्या निवाड्याच्या दिवशी, पापपुण्याचा हिशोब केला जाईल, तेव्हा ते, ही परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वर्गात जातील.
प्रत्येक समाज बऱ्या-वाईट काळातून जात असतो. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माने, काळ्याकुट्ट मध्ययुगीन काळात लुटमार करून धर्माच्या नावे जो हलकल्लोळ माजवला त्याचे परिणाम आजही जगातील सर्व खंडातील देश भोगत आहेत. पण ह्या सगळ्याकडे कानाडोळा केला जातोय आणि शाळातून आम्हाला शिकवले जाते की ती धर्मयुद्धे होती किंवा मुक्तिसंग्राम होता. आणि हा असा लढा करणारे थोर होते कारण धर्माच्या रक्षणासाठी, धर्माला बळकट करण्यासाठी ते लढत होते. एक विशिष्ट ‘देव’ त्यात सामील असल्याने, अत्याचारांचे समर्थन केले जाते.
हिंदू धर्म हा लौकिक अर्थाने धर्माच्या व्याख्येत न बसणारा, परिवर्तनशील व तपासुन पाहता येणार्या विश्वास प्रणालीवर अधिष्ठित असणारा असला तरी “धर्म” म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित असलेला हा धर्म, सनातन धर्म किंवा हिंदू धर्म म्हणून ओळखला जातो व तो अंत:प्रेरणा व अनुभूती यावर आधारित आहे. वेदांचे तत्वज्ञान सांगते की विश्वाच्या अस्तित्वाला कारणीभूत असणारे जे सर्वोच्च अविनाशी परमतत्त्व आहे (ज्याला इंग्रजीमध्ये GOD असे संबोधतात) ते सर्वत्र सारखेच आहे; ते सर्वव्यापी असून आपल्यासकट सर्वांमध्ये आहे याची आपल्याला अनुभूतीही होते.
हिंदू धर्माचे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की विविध जीवांमध्ये आणि रूपांमध्ये एकच ईश्वरी तत्व वास करते आणि त्याला जाणून घेण्यातील आनंद म्हणजेच सच्चिदानंद. या जाणिवेमुळे एक प्रगल्भ मनोवृत्ती तयार होते कारण ईश्वर आपल्यामध्ये आहे या जाणीवेतून एक आंतरीक शक्ती मिळते. ही जाणीव माणसांना दयाळूही बनवते कारण त्यांना ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते, अगदी प्राणी-पक्ष्यांमध्ये, किड्यामुंग्यांध्ये म्हणजेच निसर्गात सर्व ठिकाणी. ही मनोवृत्ती सगळीकडे पसरून सर्वच जण असा विचार करू लागले तर या जगातील सर्व सीमारेषा नाहीशा होतील आणि जग एका कुटुंबाप्रमाणे नांदू लागेल.
पण हा आहे एक प्रकारे फक्त आशावाद कारण हिंदू धर्मातील काही अनिष्ट चालीरितींचा गांभीर्याने विचार केला जात नाही. या धर्मातील जाती व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेला उच्च नीच भाव हा त्याला सगळ्यात मारक आहे. पारंपरिक रूढींना चिकटून बसल्यामुळे निर्माण झालेली दांभिकता आणि समाजात होणाऱ्या बदलांना सामावून न घेण्याचा हेकटपणा हे देखील तितकेच घातक आहे. हिंदू धर्मातील छळामुळे धर्मांतर केलेले लोकं काही कमी नाहीत आणि तो विचार होणे गरजेचे आहे. दुसरा एक मोठा प्रश्न म्हणजे जर एखादा परधर्मीय माणूस हिंदू होऊ इच्छित असेल, मग ती घर वापसी असेल किंवा नसेल, तर त्याला हिंदू करून घेण्यातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्याची कुठल्या जातीत नोंद करायची?
विठ्ठलपंत कुलकर्ण्याच्या सूर्याहून तेजस्वी अशा चार निष्पाप पोरांना वाळीत टाकणारी, गंगेहून पावन अशा तीर्थस्वरूप चोखामेळ्याला देवळाच्या उंबरठ्याला स्पर्श करू न देणारी, तुकोबाची श्रुतितुल्य गाथा इंद्रायणीत विसर्जित करणारी दांभिक माणसे हिंदूच होती हे लक्षात घ्यायला हवे. हिंदूंच्या 'देव-देश-धर्म' वगैरेंना संपवायला कोणत्या अन्यधर्मीय जिहाद्याची / मिशनरीची काही आवश्यकताच नाही कारण जर बदलत्या काळानुरूप बदल केले नाहीत तर स्वतःच्या करणीने तेच त्याला कारणीभूत ठरतील. हिंदू धर्म बुडेल ही भीती बाळगणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हिंदूंच्या फक्त भारतातील 100 कोटींसमोर अत्यंत नगण्य असे ज्यू किंवा पारसी धर्म सुद्धा अजून संपलेले नाहीत. आज संपूर्ण भारतात फक्त 58000 पारसी लोकं आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व असुरक्षिततांची आणि धर्मलोपाची भीती पूर्णपणे अनाठायी आहे असे मला वाटते. त्याचप्रमाणे देशात आणि हिंदू धर्मात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टींचे पातक इतर धर्मियांच्या डोक्यावर फोडणे हा मूर्खपणा आहे.
आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की Hinduism is not a religion but a way of life म्हणजेच ती एक जीवनशैली आहे. परंतु आपल्या देशात दंतकथा, पुराणकथा, इतिहास, देव आणि धर्म याचे जे काही अभूतपूर्व मिश्रण केले गेले आहे की ज्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या डोक्याचा पार भुगा होऊन जातो.
आजच्या ध्रुवीय वातावरणात जरा काही हिंदू धर्माबद्दल वाकडे लिहिले की लगेच बरेच लोक प्रश्न विचारतात की मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मातील वाईट गोष्टींवर लिहिण्याची हिंमत आहे का तुझ्यात? अरे बाबांनो, मी ज्या धर्मात जन्माला आलो, त्याच्यातील वाईट प्रथांबद्दल माझ्याकडून लिहिले जाणे नैसर्गिक नाही का? आणि मला एक सांगा, आपण आधी आपल्या घरातील घाण साफ करतो की दुसऱ्याच्या घरातील? आपले घर घाणेरडे ठेवून दुसऱ्याच्या घरात झाडू घेऊन आपण जाऊ का?
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Hindu #Christian #Islam #Religion #हिंदू #इस्लाम #ख्रिश्चन #धर्म
(या लेखातील मधले काही परिच्छेद हे जर्मन लेखिका मारिआ विर्थ यांच्या ब्लॉग पोस्ट मधून अनुवादित स्वरूपात घेण्यात आले आहेत)