एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात रोमान्स हे एक प्रकारे पाप मानले जाऊ लागले आणि तो नंतर तर पार हरवून गेला. रोमँटिक म्हणजे अश्लील आणि धर्मविरोधी अशी सर्वसाधारण समजूत झाली आहे. आणि गंमत म्हणजे अगदी सहज जरी कोणाशी विषय काढला तरी त्यांना बोलायला लाज वाटते आणि आपण चारित्र्यहीन असल्याची भावना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसू लागते. हे अत्यंत चुकीचे आहे पण समाजाची मनोधारणाच तशी झाली आहे. याचे कारण म्हणजे रोमँटिक वाङ्मय हे अश्लील आणि लैंगिक आहे आणि त्याचे दमन करायला हवे अशी शिकवण गेल्या काही शतकांमध्ये मनावर बिंबवण्यात आली. परंतु माझ्या मते यामुळे अनेक पिढ्यांचे अपरिमित नुकसान झाले.
आज ना. सी. फडक्यांच्या कथा वाचल्या तर त्यात अश्लील काय असा प्रश्न पडतो परंतु ५०-६० वर्षांपूर्वी टीकाकारांनी त्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला म्हणजेच लैंगिकतेला प्राधान्य देणार्या असतात असे आक्षेप घेत त्यांच्यावर कोर्टात दावे दाखल केले. बालिशपणाचा कहर!!
मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची शामा कादंबरी बरीच गाजली होती. त्या कादंबरी मधे काय होतं असं?? थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात आमच्या सारखी मुलं चोरुन वाचायची. नुसतं नायकाने नायिकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकंच त्यात जरी असलं तरी ते समाजाला मान्य नव्हतं. पण त्यावेळी हे वाचताना अंग शहारुन यायचं कारण बाकी काही उपलब्धच नव्हतं. आज नेटवर इतके व्हिडिओ, अश्लील फोटो आणि लेख उपलब्ध आहेत की काकोडकर एकदम पिळपिळीत वाटतात.
तसेच तेव्हा दिवाळी मधे फराळासोबत मनाला, गुदगुल्या करणारा, थोडा वात्रट, थोडा चावट असलेला आवाजचा अंक असल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटायचंच नाही. चावट वार्षिक आवाज!! चावटपणा, वात्रटपणा आणि अश्लीलपणा यामध्ये एक लहानशी अस्पष्टं रेषा असते ती त्याकाळी तरी आवाजच्या अंकामधे ती रेषा कधीही ओलांडली गेली नव्हती. आवाजचा चावटपणा, वात्रटपणा हवा हवासा वाटायचा. आवाजच्या ’खिडक्या’, ज्या पाहताना थोडी हुर हुर वाटायची - की काय असेल आतमधे?? पण त्यावेळी आवाज चोरूनच बघावा लागे. आज आठवलं तर हास्यास्पद वाटतं.
आमच्या तारुण्यात मुली चावट मेले किंवा वात्रट मेले हे शब्द सर्रास वापरायच्या. लग्नाआधी, जेव्हा लग्न ठरलं असतं किंवा ठरण्याच्या बेतात असतं, तेव्हा आपण काहीही करायचा प्रयत्न केला, किंवा थोडा पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला की, “चल, उग्गीच चावटपणा करु नकोस” असं म्हणणारी, जेव्हा ह्या चावट शब्दावरुन, आता बस्स!! वात्रटपणा पुरे.. अशा वाक्यावर घसरते तेव्हा लग्नाला काही वर्षं झाली असे समजायला हरकत नसे. म्हणजे बघा, लग्नापूर्वी जो चावट असतो तो लग्नानंतर वात्रट होतो. गम्मत आहे की नाही??
बरं, दुसरी गम्मत अशी की ह्या दोन्ही शब्दांचे डिक्शनरीत दिलेले अर्थ सहज म्हणुन पाहिले तर काय असावेत?
चावट = Indecent, Obscene, Vulgar, Rude, Crude, Dirty, Gross, Improper असे आहेत आणि वात्रट = Mischievous.
चावट हा इतका रोमॅंटिक शब्द आणि त्याचे अर्थ असे असावेत?? इथेच समाजाची मनोधारणा लक्षात येते.
लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक १९६० सालापर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं. या पुस्तकावर Obscene Publication Act (1857) खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तकामधे होतं तरी काय?? मी वाचलंय. अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही मला. प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं. प्रेम हे शेवटी शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे. हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं. डीएच लॉरेन्सचं पुस्तक असल्यामुळे पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे!! हे पुस्तक म्हणजे श्रृंगारिक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे.
तसेच भारतात आचार्य रजनीश उर्फ ओशो हे काळाच्या फार पुढे असलेले एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. ते आयुष्यभर मानवाच्या या सहज गुणधर्मावर बोलत राहिले आणि लोकांच्या मनातील जळमटे साफ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहिले. सेक्स आणि लैंगिकता या विषयावरील सर्वांगसुंदर पुस्तक म्हणजे संभोगातून समाधीकडे. पण या माणसाला भारतात जनसामान्यांची कायम हेटाळणी आणि कुत्सित टोमणे सहन करावे लागले. खोटं कशाला बोलू, पण जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले तेव्हा मी शाळेत होतो आणि कुजबुजत का होईना पण सुरुवातीला मी देखील टीकाच केली. त्यांच्या शिकवणीचे महत्व कालांतराने लक्षात आले.
आपण एक गोष्ट मान्यच करत नाही की लैंगिकता हा मानवाचा मुख्य आणि सहज गुणधर्म आहे. त्याचे दमन करायला सांगणे चुकीचे आहे. आणि याचे कारण जी गोष्ट माणसाला सांगण्यात येते की ही तू करू नकोस तेव्हा त्याने ती करण्याची शक्यता काही पटींनी वाढते. तसाच समाजातील एक वेडेपणा म्हणजे वेश्या व्यवसाय अनैतिक मानणे. मला तर असे वाटते की सिव्हिल इंजिनिअरिंग आणि वेश्या व्यवसाय हे या जगातील सगळ्यात आधीपासून असलेले व्यवसाय असतील. या वेश्यांचे आपल्या समाजातील स्त्रियांवर अनंत उपकार आहेत की त्या आहेत म्हणून बऱ्याच अंशी या सुरक्षित आहेत. नाहीतर रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली बलात्कार झाले असते; आजच्या कितीतरी पटींनी जास्त.
खरं तर स्त्री पुरुष संबंधाची उघडपणे केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. परंतु वात्सायनाचे कामसुत्र म्हटलं की लोकांना फक्त ती आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे का? कामसुत्रामध्ये त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आपली मतं बनवतो - कामसुत्र म्हणजे लैंगिक आसनं इतकंच आपण समजतो, पण तसं नाहीये. हे अतिशय सुंदर रितीने त्या काळातल्या वातावरणात वैवाहीक जीवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये आदर्श वैवाहीक जीवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे. स्त्रीला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणून पाहिलं जातं. हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं.
तीच गोष्ट खजुराहोच्या शिल्पांच्या बाबतीतही खरी आहे. त्या शिल्पांच्या मागची कथा अशी की त्या काळी बुद्ध धर्माचा प्रसार खूप जोरात झाल्याने तरुण पिढी संसाराला न लागता सर्वसंगपरित्याग करून मोक्षप्राप्तीसाठी ध्यानधारणेला लागली. मग प्रजा वाढणार कशी या विचाराने त्या वेळच्या राजाने सेक्सचे शिक्षण तरुण पिढीला व्हावे म्हणून ती शिल्प बनवली आणि ती देखील देवळांच्या दर्शनी भागात. परंतु आज त्यांच्याकडे कला किंवा अभ्यास म्हणून न बघता त्याला प्रसिद्धी काय तर ती लैंगिक शिल्प आहेत. खेदजनक आहे.
दुर्दैवाची घटना म्हणजे जो भारत या गोष्टींमध्ये १५०० वर्षांपूर्वी एवढा पुढारलेला होता त्याच भारतात पुढे इतका बुरसटपणा ठासून भरला गेला. पण माझ्या दृष्टीने खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आणि धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरता असला खुळचटपणा सामान्य जनतेच्या डोक्यात घुसवला पण स्वतःला हवे तेच केले. या दांभिकपणाची फळे आपण अजूनही भोगतो आहोत. या विषयात जेवढा जास्तीत जास्त मोकळेपणा येईल तितकी समाजातील विकृती कमी होईल.
पण हे करणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? ही स्वार्थी मंडळी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी असले काही करतील? माझा पुढचा जन्म येईल पण या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे.
यशवंत मराठे
#sex #sexuality #romance #romantic #obscene #अश्लील #चावट #वात्रट