शतकानुशतके दख्खन प्रांतातील दर्या-खोर्या, खेडी पाडी यांना राज्यकर्त्यांच्या खेळातील प्यादी बनून राहण्याची सवय लागली होती. ह्या सत्ताधीशांच्या एकमेकांशी लढाया होत आणि तसतसे रयेतेचे राज्यकर्ते बदलत. जो कोणी त्यांच्यावर हुकमत/सत्ता गाजवत असेल, त्याला ते निमूटपणे कर देत.
कारण सुलतानांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणांशीच गाठ. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफोच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. या शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे हा शहाणपणा अशी मानसिकता समाजात होती. त्यामुळे ते प्रदीर्घ काळ निद्रिस्त राहिले. कधीकाळी आपल्या मुलांना, लढाई कशासाठी आहे हे माहीत नसताना स्वारीवर पाठवत. इतर वेळेस आपापसात भांडत. त्यांच्या परस्परात दुही माजलेली होती, ते गोंधळलेले होते आणि त्यांच्या भविष्याबद्दल त्यांना फारशी आशाही नव्हती. शिवरायांनी 1645 साली जेव्हा तोरणा सर करण्याची पहिली मोहीम आखली, त्यावेळची ही दक्षिणेतली परिस्थिती होती.
35 वर्षांनंतर त्यांच्या मृत्यूसमयी निद्रिस्त दख्खनच्या पठाराचे रूपांतर त्यांनी धगधगत्या ज्वालामुखीत केले.
अखेरीस एक असा पुरुष जन्माला आला ज्याने उराशी बाळगलेलं स्वराज्याचे स्वप्न, सर्वजनांनी आपल्या खांद्यावर झेललं. "राष्ट्र-राज्य" या आधुनिक संकल्पनेचे एक ठळक वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नाचे वेगळेपण अधोरेखित करणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते “एकसंघ” स्वराज्याचे स्वप्न होते.
शिवरायांचा दूरदृष्टीचा आवाका केवळ क्षत्रिय घराण्यातील शूर योद्ध्यांची फौज उभी करण्याइतकाच मर्यादित नव्हता. त्या फौजेत समाजाच्या सर्व थरातील लोकं, जे एकाच राजकीय संकल्पनेने भारलेले आणि त्यासाठी वाट्टेल ती किम्मत मोजण्यास तयार असलेले होते. शिवरायांनी सर्वसामान्यातून माणसे हेरून आपल्यासारखे कणखर योद्धे घडवले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे हे सर्व योद्धे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले होते. आणि महान नेत्याचे हे वैशिष्ट्य आजही मानले जाते.
हे लक्षात घ्यावे लागेल की शिवाजी महाराजांना कोणीही स्वराज्य स्थापण्यास सांगितले नव्हते. हे स्पष्ट होते की, मुस्लिम राज्यकर्ते रयतेवर करीत असलेल्या अत्याचाराने ते अत्यंत व्यथित होते. ह्या जुलूमाविरुद्ध त्यांनी लढले पाहिजे म्हणून जिजाऊने त्यांच्यात आत्मविश्वास रुजवला होता. ह्या जुलमी राजवटींचा समूळ नाश करायचा असेल तर आपल्यालाच राजा व्हावे लागेल हे त्यांच्या मनाने घेतले होते. शिवरायांचे मोठेपण यावरून दिसून येते की स्वराज्याची निर्मिती व्हायला हवी ह्याची जाणीव त्यांना झाली तेव्हा त्यांचे वय फक्त 14-15 वर्षाचे होते (आजच्या काळातील नवव्या इयत्तेतील मुलाएवढे) आणि त्यांचा मृत्यू 1680 मध्ये झाला तेव्हा त्यांचे वय केवळ 50 वर्षांचे होते.
त्यांनी केव्हाही हे राज्य मी स्थापन केले किंवा हे राज्य माझे आहे असे न म्हणता, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही परमेश्वराचीच इच्छा आहे आणि त्याच्या कृपाशीर्वादाने मी फक्त माझी कर्तव्ये पार पाडत आहे असे ते म्हणत. बर्याचदा लोकं मोठमोठ्या गोष्टी बोलतात पण त्यांचे वागणे मात्र अगदी उलट असते. शिवरायांनी मात्र, कोणत्याही गुन्हेगाराची गय न करता त्याला कठोर शिक्षा होऊन, रयेतला त्वरीत न्याय मिळेल अशी खात्री दिली. त्यांनी शेती व उद्योगास प्रोत्साहन दिले आणि त्यांची एकंदरीत करप्रणालीही रयेतसाठी जाचक नव्हती. त्यांनी केवळ रणनीतीच बनवली नाही तर रणांगणावरही ते नेहमी आघाडीवर राहिले.
आपला साम्राज्यविस्तार महाराष्ट्रापलीकडे करण्याचे त्यांचे विशाल स्वप्न होते. परकीय आक्रमकांच्या जोखडातून सर्व प्रदेश मुक्त करून एकसंघ राष्ट्र निर्मितीचा त्यात अंतर्भाव होता. आपल्या सैन्याला संबोधित करतानाचे त्यांचे एक प्रसिद्ध वक्तव्य आहे-"सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो अवघा मुलुख आपला आणि तो मुक्त करावा असा मानस आहे." केवढे उदात्त स्वप्न आणि केवढी दूरदृष्टी !
सर्व हिंदू राजवटींना एकत्र आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. मिर्झाराजे जयसिंग यांनी औरंगजेबाचे मांडलिकत्त्व सोडून द्यावे हे त्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. विजयनगरच्या पदच्युत राजघराण्याविषयी त्यांना अतीव आदर होता, त्यांच्याशी सलोख्याचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले. आपापसांत झगडणार्या हिंदू राजवटींना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यांना प्रतिसादही अनुकूल मिळाला. कर्नाटकातील नायक, म्हैसूरचे राज्यकर्ते, विजयनगरचे राजघराणे यांनी शिवरायांना व नंतर मराठ्यांना मोलाची मदत केली. शिवरायांना संपूर्ण दक्षिण भारतातील विविध राजे व सामान्य लोकांकडून पाठिंबा मिळाला. एखाद्या राष्ट्राचा हरवलेला आत्मा परत मिळवण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते हे नक्की.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे बुदेलखंडाचा छत्रसाल. तो वयाच्या वीस-बाविसाव्या वर्षी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन त्यांच्या दरबारी नोकरी करण्याच्या उद्देशाने दाखल झाला पण महाराजांनी त्याला स्वतःचे राज्य स्थापन करण्यास उद्युक्त केले.
ते जरी हिंदूंसाठी आवाज उठवत असले तरी मुसलमानांचा छळ त्यांच्या राजवटीत कधीच झाला नाही. त्यांच्या दरबरात तसेच सैन्यदलात अनेक मुस्लिम उच्चपदे भुषवित होते. त्यांच्या आग्रा दौर्यात त्यांचा वैयक्तिक अंगरक्षक मुस्लिम होता. त्यांचा नौदल अधिकारी सिद्दी हिलाल मुस्लिम होता. अशा प्रकारे महाराजांची राजवट इस्लामला वैयक्तिक धर्म म्हणून आव्हान देणारी नव्हती तर ते इस्लामिक राजकारणाला दिलेले प्रत्युतर होते.
अखेरीस अजून एका गोष्टीचा आदराने उल्लेख होणे आवश्यक आहे. प्रत्येक राजकीय क्रांतीची बीजे एका आध्यात्मिक क्रांतीत रोवली गेलेली आढळतात. हे देखील त्याला अपवाद नव्हते. महाराष्ट्रातील "भक्ती मार्गाच्या" चळवळीची सुरुवात १२ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून झाली आणि त्याची धुरा संत तुकारामांनी (जे महाराजांचे समकालीन होते) सांभाळली. त्या चळवळीने ह्या क्रांतीसाठी उत्प्रेरकाची (catalyst) भूमिका निभावली आणि समाजातील विविध थरातील लोकांना एकत्र आणून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मराठ्यांच्या यशाची मुळे ही फक्त महाराष्ट्रात रुजली असा दावा करण्याचा मोह, महाराष्ट्रातील जनतेला होतो. मात्र, उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर असतांनाही, हिंदवी स्वराज्याचा फक्त २०% भाग महाराष्ट्राचा होता. मराठ्यांनी १८ व्या शतकात उत्तरेकडच्या मोहिमांना पेशव्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली तेव्हा ते प्रमाण त्याहुनही कमी होते.
शिवाजी महाराज भविष्यात शत्रूची संभाव्य रणनीती काय असेल ह्याबद्दल नेहमीच जागरूक असत आणि असे धोके कमी करण्यासाठी अगोदरच डावपेचांची आखणी करत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यभर केलेल्या अथक परिश्रमांची फलश्रुती सतराव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात दिसू लागली होती. अत्यंत खंबीरपणे, त्यांनी दक्षिणेत मराठ्यांचा अंमल प्रस्थापित केला. कोकण आणि सह्याद्री येथे त्यांनी शेकडो किल्ले बांधले आणि संरक्षणाचा कणा निर्माण केला. फार कमी हिंदू राजांनी शस्त्रागार आणि सशस्त्र सेना उभी केली; शिवाजी महाराज हा त्यातला एक ठळक अपवाद. तसेच आरमाराचे महत्व ओळखणारा भारतातील पहिला आणि बहुदा शेवटचा राजा! अत्यंत सामर्थ्यवान आरमाराची निर्मिती करून, भारतीय द्वीपकल्पाजवळील काही अपवाद वगळता, पश्चिम किनाऱ्यावर सर्व बंदरांवर ताबा मिळवला. अशा तर्हेने दक्खनची सल्तनत, ब्रिटीश, पोर्तुगीज आणि सिद्दी व्यापारी यांच्याकडून यूरोप मधून होणारी शस्त्रांची आणि अरबस्तानातून होणारी घोड्यांची आयात थोपवून व्यापार मार्गांवर आपली पकड घट्ट केली. ह्या सर्वांनी शिवाजीविरूद्ध अनेक मोहिमा राबवल्या, पण त्यांना रोखण्यात ते अयशस्वी झाले.
शिवाजी महाराज एक मराठा राजा होतेच पण त्यापेक्षा कितीतरी अधिक भारतीय राजा होते. आदर्श राजा कसा असावा ह्याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.
इतिहासकार जदुनाथ सरकार त्यांचे वर्णन करतात म्हणतात -
राज्ये भंग पावतात, साम्राज्ये कोसळतात, राजघराणी लयाला जातात पण राजा शिवाजी सारख्या खर्या नायकाची स्मृती संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक वारसा म्हणून अविनाशी राहिली आहे; लोकांच्या विश्वासाचा आधारस्तंभ; एक प्रकारे जगाच्या अभिलाषेचे केंद्र.
महाराजांची राजवट फक्त 25-30 वर्षांची होती, परंतु त्याचा वारसा पुढच्या 120 वर्षापर्यंत टिकला. याच्या बरोब्बर उलटे उदाहरण महाराजा रणजित सिंह (शेरे पंजाब) यांचे आपण अभ्यासू शकतो. सेनापती म्हणून रणजित सिंह यांची कारकीर्द अत्यंत दैदिप्यमान आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी, सन 1801 मध्ये शीख सत्ता स्थापन केली आणि जी लाहोरपासून काबूलपर्यंत होती. ती सत्ता त्यांच्या मरणापर्यंत, म्हणजे 1839 पर्यंत, अबाधित राहिली. परंतु त्यांच्या पश्चात भाऊबंदकी आणि राजकीय अंधाधुंद यामुळे पुढील दहा वर्षात रसातळाला गेली.
शिवाजी महाराजांनी आपला वारसा आपल्या पुढील पिढ्या आणि प्रजेत आत्मविश्वास असा काही बिंबवला आणि रुजवला की "हिंदवी स्वराज्य"च्या संरक्षणासाठी आपले प्राण देण्यासही ती तयार होती. त्यामुळेच पुढे ते एक असे महायुद्ध लढले ज्याने भारतीय उपखंडाचा चेहरामोहरा उल्लेखनीयरित्या बदलला. या महायुद्धाचा मागोवा आपण पुढील लेखात घेऊया.
आजच्या तरुण पिढीने हा इतिहास नीट समजावून घेतला तर शिवाजी महाराजांचे महत्व जास्ती अधोरेखित होईल.
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
(लेखात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला असेल तर तो लिखाणाच्या ओघात आहे. माझ्या मनात महाराजांबद्दल नितांत आदर आहे)