कमीतकमी भांडणे होऊन समाज आनंदी राहावा या संकल्पनेतून बऱ्याच रूढी निर्माण झाल्या.
रात्री मीठ, तुरटी, खडीसाखर विकू नये; विकत घेऊ नये.
पूर्वी अंधारी दुकाने; कंदीलाचा किंवा टुकटुकीचा (एक छोटी बाटली, त्याच्या बुचाला भोक, त्यातून नाडी आणि बाटलीत तेल किंवा रॉकेल) प्रकाश. त्यातून काय नीट दिसणार? परत तुरटी आणि खडीसाखर किंवा खडे मीठ आणि साखर अंधारात दिसायला सारखेच. मुख्य मुद्दा काय? वाद टाळा.
सूरी, कात्री, विळी, कोयता दुसऱ्याच्या हातात देऊ नये.
या सर्व धारदार वस्तू; देताना शिंक आली, खोकला आला अथवा हात थरथरला तर दुसऱ्याला लागू शकते. तू मुद्दामून केलेस असे भांडण व्हायलाच नको. म्हणून मग उपाय काय तर तू तुझ्या हाताने घे.
रात्री झाडांना हात लावू नये.
केवड्यासारखे झाड असेल तर पाणथळ आणि चिखल. त्यामुळे इतर जीव, उंदीर, बेडूक आणि मग साप. जीवावर बेतू शकते.
त्यावरून एक आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची एक गोष्ट आठवली. कळलावी म्हणून एक झाड आहे त्याची फांदी देखील कुठे टाकू नये अशी ताकीद. याचे कारण काय तर कळलावी म्हणजे भांडण घडवणारी. खरं म्हणजे ती अति विषारी असल्यामुळे दुसऱ्याच्या घरात अनर्थ ओढवू शकतो म्हणजे वादाला आमंत्रण. परंतु त्याचबरोबरीने ती औषधी देखील आहे त्यामुळे पूर्ण दुर्लक्षित होऊनही चालणार नाही. त्याच्यावर मार्ग काय तर गौरीच्या दिवशी देवीला त्याच झाडाच्या फुलांचा हार घालावा अशी रूढी. आता त्यामुळे लोकं ते झाड लावतील पण तरी देखील दुसऱ्यांना त्रास होणार नाही.
चिचुंद्रीला मारू नये, अपमृत्यु येतो.
चिचुंद्री दिसते उंदरासारखी त्यामुळे सहज मारली जाण्याची शक्यता. परंतु ती माणसाला कधी चावत नाही आणि विंचू मात्र खाते. खेडेगावातील माणसांच्या दृष्टीने एकदम मित्र. तिला मंदोदरी म्हणजेच लक्ष्मी म्हणतात. तिलाच मारले तर विंचू कोण खाणार? आणि विंचू आसपास असले तर मृत्यू संभवतो.
रात्री चिंचेखाली झोपू नये, भूतबाधा होते.
चिंच हे एक Allelopathic झाड आहे म्हणजेच जे प्रकारचे केमिकल स्त्राव करते की ज्यायोगे त्याच्या खाली दुसरं झाड उगवू शकत नाही. या केमिकलचा माणसाला देखील खूप त्रास होऊ शकतो. तसेच या झाडावर मोठे पक्षी उदा. हिरवे कबुतर बसतात आणि त्यांची विष्ठा झाडाखाली पडलेली असते ज्यायोगे तापासारखे रोग होऊ शकतात.
अनुभवातून पूर्वीच्या बायकांना देखील सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) कसे नीट माहित होते याची एक मजेदार कथा:- एका नवीन लग्न झालेल्या जोडप्यातील नवऱ्याला कामानिमित्त चार ते सहा महिने बाहेरगावी जावे लागणार होते. साहजिकच पत्नी दुःखी. तिला घरातील स्त्रियांनी असा सल्ला दिला की नवऱ्याला सांग की जाताना चिंचेच्या झाडाखाली झोपत जा आणि परत येताना कडुलिंबाच्या झाडाखाली झोप. चिंचेच्या गुणधर्मामुळे त्याला महिन्या दीड महिन्यात अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्याने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. आता कडुलिंबाच्या झाडामध्ये चिंचेच्या बरोब्बर विरुद्ध गुण असल्यामुळे घरी पोहोचताना ठणठणीत बरा. सहा महिन्याच्या ऐवजी पती दोन-तीन महिन्यात परत; पत्नी खुश.
मांजर आडवे गेले तर अपशकून.
हे तर आपण आजही ऐकतो. सिनेमात पण दाखवण्यात येते. मांजराचे भक्ष काय तर उंदीर आणि तो कडेकडेनेच फिरत असतो. त्यामुळे मांजराची नैसर्गिक प्रवृत्ती सुद्धा तीच असते. आता त्या विरुद्ध ती वागू लागली म्हणजे काहीतरी गोंधळ किंवा गोची आहे. त्यामुळे सांगण्यात यायचे की थांबा, पाच पावले मागे जा आणि आजूबाजूला बघा कारण कदाचित बिबट्या, अस्वल किंवा साप असू शकेल. मांजर आडवे जाणे ही एक प्रकारे धोक्याची घंटा होती. हल्ली आपल्या आजूबाजूला असे धोके फारच दुर्मिळ असल्यामुळे ती काळजी नाही. परंतु हे सांगण्यामागची कारणमीमांसा लक्षात घ्या.
कालवलेला दहीभात शेतात पसरवावा.
आदल्या दिवशी कालवलेला मूठभर दहीभात सूर्योदयापूर्वी शेतात पसरवावा आणि शेतावर जाताना कोणाशीही बोलायचे नाही. आता बोलायचे का नाही तर वेळ वाया जाईल आणि सूर्योदयाची वेळ टळेल. सूर्योदयापूर्वीच का? तर त्या सुमारास पक्षी येतात आणि असा भात अळ्यांसारखा दिसतो. आणि मूठभरच का? तर पक्षी आपली उरलेली भूक भागवायला शेतातील इतर कीटक खातील. नैसर्गिक कीटकनाशनाची किती कल्पक योजना!
देवराई राखावी.
जगातील सर्व जुन्या वस्त्या, आदिवासी पाडे, वाड्या यांनी परिसरातील एका भागाचे देवराई म्हणून संरक्षण करावे. देवराई (sacred groves) म्हणजे माणसांचा वावर नाही, नांगर चालवायचा नाही ज्यायोगे तेथील जैवविविधता (biodiversity) टिकून राहते. सर्वसाधारणपणे तिथे पाण्याचे जिवंत झरे असतात जे पाणीसाठ्यासारखे उपयोगाला येतात. त्याचप्रमाणे जरा मोठे शेत असेल तर तिथे देखील अशी एखादी जागा ठरवण्यात येते जिला पूर्वजांची, देवाची किंवा भुताची जागा म्हणून राखली जाते. तिचा मुख्य उद्देश देखील तोच; जैवविविधता आणि जिवंत झरे.
त्यावर एक गोष्ट आठवली. उत्तर पूर्व राज्यात प्रचंड प्रमाणात धर्म परिवर्तन होऊन लोकं ख्रिश्चन झाले. त्यामुळे त्यांना वाटलं की आता देवराईची गरज नाही कारण ही हिंदू धर्मातील रूढी आहे. कालांतराने जेव्हा लोक आजारी पडू लागले तेव्हा संशोधनानंतर असे लक्षात आले की त्या भूमीवर किरणोत्सर्ग करणारे पर्वत आहेत ज्यांचा प्रभाव या देवराईंमुळे अगदी नगण्य होत असे. वरील स्वानुभव हा चेरापुंजी, मेघालय मधील संगमा नावाच्या एका सरकारी माणसाने कथन केलेला आहे. (आता ह्याच्यात धर्माचा काही संबंध आहे? ही रूढी समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी पाळावी अशी आपल्या पूर्वजांची अपेक्षा.)
अमावस्या अशुभ असते:
या गोष्टीला तसा काहीही तार्किक आधार शोधता आला नाही. कारण हीच अमावस्या दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी शुभ मानली जाते. रात्री चंद्रप्रकाश देखील नसतो हे प्रवास टाळावा याला कारण असू शकते.
जेष्ठ महिन्यात घरातील जेष्ठ सुनेने सासरी राहू नये, कुटुंब टिकत नाही.
आपल्याला वाटेल की हा काय वेडेपणा आहे? त्याच्यामागील तर्कशास्त्र समजून घेतलेत तर आपल्या पूर्वजांच्या अभ्यासाला दाद द्याल. सून जर सासरी राहिली तर त्या महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेष्ठात गर्भधारणा झालेल्या मुलाचा जन्म साधारणपणे मार्च, एप्रिल महिन्यात होतो. त्या महिन्यांच्या ग्रहदशेनुसार होणारे मूल बऱ्याच वेळेला स्वार्थी अथवा आपमतलबी निपजू शकते. आता घरातील जेष्ठ मुलगाच असा निपजला तर पुढे भविष्यात कुटुंब टिकून राहण्याची शक्यता कमी. म्हणून मार्ग काय, सूनच घरात नको. गर्भधारणा होईलच कशी? What a brilliant counter strategy!! ही प्रथा उत्तर हिंदुस्थानातील गढवाल प्रांत, राजस्थान, कोकणी मुसलमान ते अगदी केरळी ख्रिश्चन यांच्यामध्ये आज सुद्धा आढळून येते.
प्रथांचे अवडंबर ब्राह्मणांनी माजवले आणि कालांतराने इतर प्रथांबरोबर ही रूढी मोडण्यात अग्रेसर कोण? तर ब्राह्मण समाजच. त्यामुळे आज ब्राह्मण समाजात एकत्र कुटुंब पद्धती जवळपास नामशेष झाली आहे. परंतु अब्राह्मण समाजात ती अजून देखील बऱ्यापैकी टिकून आहे.
त्यामुळे ज्या रूढी कालबाह्य झाल्या असतील त्या झुगारून टाका पण त्यामागील अर्थ नीट समजून घ्या म्हणजे तुम्ही त्याची टवाळी होऊ देणार नाही.
आता पुढील लेखात जन्म, मृत्यू आणि त्याच्या पश्चात असणाऱ्या रूढींचा मागोवा घेऊया.
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#History #Culture #Tradition #Social #Hindu