आमच्या "नीरजा" या संस्थेने गेल्या वर्षी १९ मे या तारखेला कुंर्झे गावातील झिरपी वाडी येथे बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली. जेसीबी वापरला की काम तसे झटपट होते. पण पण पण........
माशी शिंकायची ती शिंकलीच. बंधाऱ्याच्या वरच्या अंगाला (बाजूला) जवळजवळ ३००-४०० मीटर लांब राहणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याचे डोकं फिरलंच. त्याचं म्हणणं की बंधाऱ्याने माझ्या शेतात पाणी होईल तेव्हा मी म्हणतो तिथेच आणि तसाच बंधारा बांधलात तरच मी परवानगी देईन. दुसऱ्या लोकांचं चांगलं झालेलं पण बघवत नाही बऱ्याच जणांना. बरं तो म्हणतो तसा बंधाऱ्याच्या डिझाईन मध्ये बदल करायचा जरी आम्ही विचार केला असता तरी नवीन डिझाईन बनवून ते पावसाळ्याआधी पूर्ण होणे शक्यच नव्हते. पाऊस ५ जून नंतर कधीही येऊ शकतो. बरं तो अधिकारी असल्यामुळे पाड्यातील लोक त्याच्या विरुद्ध जायला घाबरत होते. आणि वरून सांगणं की साहेब, तुम्हीच काही मार्ग काढत असलात तर बघा; आम्ही काही करू शकत नाही.
त्यामुळे तेव्हा काहीही तोडगा निघाला नाही. खरं सांगायचं तर जेव्हा हे घडलं तेव्हा सुरुवातीला खूप त्रास झाला. Frustration आलं; वाटलं की आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतोय पण ज्यांना त्याचा फायदा होऊ शकेल त्यांचीच त्याला आडकाठी. पण नंतर असं वाटलं की हे आत्ता न होण्यातच परमेश्वराची इच्छा असेल. परंतु खालील गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या :-
• आदिवासी माणूस स्वतःच्या थोड्याश्या, तत्कालीन फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान करतो.
• आहे त्या कष्टप्रद परिस्थितीत त्याची रहाण्याची तयारी असते आणि तो ती परिस्थिती न कुरकुरता सहन करू शकतो.
• खेडेगावातील लोकांना एकत्रित, संघटित होऊन काही चांगले होऊ शकते ह्यावर विश्वासच राहिला नाहीये.
• सर्वच गोष्टी फुकट किंवा आयतं मिळण्याची वाईट सवय जडली आहे.
• आहे त्या परिस्थितीत बदल घडणे शक्य नाही अशी त्यांची धारणा झाली आहे.
त्यामुळे पावसाळ्यानंतर काही मार्ग निघतो का ते बघायचा विचार करून तोपर्यंत त्रास न करून घेता स्वस्थ बसायचे ठरवले.
दुर्दैवाने गेल्या वर्षी पाऊस कमी पडला आणि महिनाभर आधीच गुडूप झाला. त्याचा विपरीत परिणाम होणारच होता आणि तो झाला. ज्या अधिकाऱ्याने आडकाठी केली त्याचेच शेत पाण्याअभावी करपले तरी माणसाचा अहंकार जळत नाही ना? आपलं चुकलंय हे स्वीकारायला मन पण मोठं लागतं. असो.
परंतु गावकऱ्यांना बंधारा हवा आहे त्यामुळे त्यांनीच दुसरी पर्यायी जागा शोधून काढली. या वर्षी ३० मार्चला जाऊन आम्ही जागा बघून आलो आणि वाटलं अरे, ही तर पहिल्यापेक्षा जास्त चांगली जागा आहे.
त्या दिवशीही एक गमंत झाली. त्या जागेच्या दोन्ही बाजूला एकाच माणसाची शेती आहे त्यामुळे त्याला भेटलो तेव्हा तो म्हणाला माझी काहीच आडकाठी नाही पण एक बारीकशी अडचण आहे की माझ्या चुलत्याने पावसाळ्यात मासेमारीसाठी एक छोटा उंचवटा केला आहे. बंधारा झाला तर उंचवटा बुडून जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोला. त्याला विचारलं की तो अधिकृत आहे का? तर उत्तर मिळाले, छे असा प्रकार अधिकृत होऊच शकत नाही. पण माझं आणि माझ्या चुलत्याचं भांडण आहेच त्यातून अजून भर पडायला नको. मग त्या माणसाला भेटलो. त्याने सुरुवातीला ऐकून घ्यायला सुद्धा नकार दिला. पण जेव्हा त्याला असे जाणवून दिले की बंधारा झाला तरी देखील तो मासेमारी कशी करू शकेल तेव्हा तो शांत झाला आणि आमच्यावर उपकार केल्यागत, हां करा काय करायचे ते, असे वाक्य आमच्या तोंडावर फेकले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन काम करायचे नक्की केले. पण त्याचे डोकं दुसऱ्या दिवशी परत बदललं आणि काम करायला देणार नाही हा एकच घोशा.
खरं सांगायचे तर माझं डोकंच फिरलं आणि मी माझ्या साडूला म्हटलं, खड्यात जाऊ दे; हे काम नाही करायचं. श्री. विजय वेखंडे (त्या पंचक्रोशीतील पंचायत समिती सदस्य), जे आम्हाला या भागात मदत करतात ते खूपच ओशाळवाणे झाले. मला म्हणाले, साहेब ह्यातून एकच मार्ग या वर्षी निघू शकतो. त्या आसपासच्या परिसरात सरकारने बांधलेले कमीत कमी ८-१० बंधारे असे आहेत की जे खालून गळत असल्याने निकामी पडले आहेत. कुंर्झे गावातील धुमाड पाड्यात असा एक निकामी बंधारा आहे जो तुम्ही दुरुस्त करून द्या. मी गावकऱ्यांचा आणि पंचायत समितीचा विनंती अर्ज तुम्हाला देतो. आम्ही जाऊन बंधारा बघून आलो. नंतर आमचे तांत्रिक सल्लागार, डॉ अजित गोखले, यांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ काढण्याकरता अक्षरशः भरीस पाडले. ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर येऊन पाहणी करून गेले आणि तो बंधारा कसा दुरुस्त करावा याची रूपरेषा त्यांनी आखून दिली.
आता पुढची अडचण म्हणजे बंधाऱ्याचा आकार आधीपेक्षा बऱ्यापैकी मोठा (जवळजवळ ९० फूट लांब आणि ९ फूट उंच) आणि त्यात तो तळापर्यंत खणून काढायचा म्हणजे खर्च खूप वाढणार. आता त्याची व्यवस्था कशी लावायची याच्या विचारात असताना Xoriant Solutions Pvt Ltd या कंपनीतून फोन आला. (गेली दोन वर्षे ही कंपनी आमच्या संस्थेला मदत करतेच आहे). सांगण्यात आले की तुमचा चेक तयार आहे; तेव्हा माणूस पाठवा. अचंबित होऊन तोंडात बोट घालायची वेळ आली. ६ एप्रिलला गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गावातील महिला आणि मुलांच्या हस्ते नारळ फोडला पण मागील अनुभवावरून असे ठरवले की काम पूर्ण होईपर्यंत काहीच बोलायचे नाही.
लगेच आम्ही काम सुरु करण्याच्या दृष्टीने जुळवाजुळव चालू केली. तीन ते चार काँट्रॅक्टरांशी बोलून एक नक्की केला. आता फक्त विनंती अर्जाची वाट बघत होतो. पण दुसऱ्याच दिवशी कळले की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाली आहे त्यामुळे आता २४ मे पर्यंत ग्रामपंचायतीचा अर्ज मिळू शकत नाही. पाड्यातील लोकांचे सांगणे होते की तुम्ही काम सुरु करा; अर्ज नंतर मिळेल. पण आमची त्या गोष्टीसाठी तयारी नव्हती कारण काम चालू केले तर कदाचित ह्या असल्या कायदेशीर बाबी खूप त्रासदायक ठरू शकतात. अखेरीस २४ मे रोजी तो विनंती अर्ज मिळाला आणि मनाचा हिय्या करून २६ मे या दिवशी कामाला सुरुवात केली.
काम सुरुवात करायच्या आधी पाड्यातील जे पुरुष आम्ही ही मदत करू आणि असे सहकार्य करू असे मोठ्या तोंडाने सांगत होते ते सर्व काम चालू झाले आणि एका झटक्यात गायब झाले. एका संध्याकाळी काही मंडळी भेटली तेव्हा काम करायला का येत नाही अशी विचारणा करताच, आम्ही मेस्त्री आहोत, बिगारी नाही असे बाणेदार उत्तर मिळाले. आम्ही काम आमच्यासाठी किंवा आमच्या फायद्यासाठी करत नाही याची जाणीव तरी आहे की नाही असे शंकास्पद त्यांचे वागणे बोलणे होते. असो, परंतु महिलांनी मात्र जी मदत मागितली ती आनंदाने केली.
मे महिन्याची अखेर असल्याने जेसीबी मिळणे मोठ्या जिकिरीचे. मग अक्षरशः हातापाया पडून तो मिळवावा लागे. तसेच आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडे तुटपुंजं सामान त्यामुळे आहे त्या सामुग्रीत जमेल तसे काम पुढे ढकलायचे असा प्रकार चालू होता. त्याच बरोबरीने Ready Mix Concrete ची गाडी ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी येणे हे सुद्धा एक आव्हानच होते. त्यात परत हे सर्व काम पावसाळा सुरु व्हायच्या आधी पूर्ण होणे किती महत्वाचे हे सांगण्याची गरज नाहीच.
एवढं मोठं काम अंगावर घेतल्यामुळे आम्हाला खूपच टेन्शन आले होते. त्यामुळे रात्रीची झोप पण उडाली. म्हणून मग मी आणि खास करून सुधीर दांडेकर जवळजवळ दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत साईटवर ठिय्या मारून बसत होतो. पावसाळ्याच्या आधी दोन तीन आठवडे किती गरम आणि दमट हवामान असते याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच. रणरणते ऊन, फारशी कुठेही सावली नाही. जी काही थोडीफार सावली होती तिथे बसावं म्हटलं तर तिथे जमिनीवर मुंग्याच मुंग्या, गरम मातीचा उंचवटा शोधून बसायची बहुदा वेळ यायची पण तिथे सावली नाही. बरोबर नेलेले पाणी पण काही काळात कढत होऊन जायचे. असा उन्हाळा अनुभवायची सवय सुटलेली त्यामुळे खऱ्या अर्थाने सत्वपरीक्षाच होती म्हणा ना!
या लेखाचे शीर्षक अडथळ्याची शर्यत का असेल याचा तुम्हाला आता कदाचित थोडा अंदाज आला असेल.
अशा अनंत अडचणींतून मार्ग काढत काढत अखेरीस १० जून रोजी काम संपले आणि आम्ही एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला. तेथील पंचायत समितीला काहीतरी समारंभ करावा अशी इच्छा होती पण आमच्या दृष्टीने त्याला विशेष महत्व नव्हते कारण श्रेय मिळविण्यासाठी हे कार्य आम्ही केलेच नाही. परंतु त्यांचा खूपच आग्रह असल्यामुळे आम्ही हो म्हटले. तेथील BDO यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचे ठरवले आणि त्यांना आमंत्रण करायला गेलो तर म्हणाले, अहो, मला आजच बदलीचा आदेश आला आहे. चार पाच दिवस थांबा. दुसरा कोण अधिकारी येणार आणि कधीपासून ते तोपर्यंत कळेल. ३-४ दिवसांनी म्हणाले की मीच येईन तेव्हा २४ जून तारीख नक्की करा. सगळी तयारी सुरु केली आणि २१ तारखेला त्यांचा फोन आला की २४ तारखेलाच कम्युनिस्टांचा एक मोर्चा येणार आहे त्यामुळे अडचण आहे. मग त्या मोर्चाचे जे प्रमुख नेते होते त्यांना फोन केला आणि अशी विनंती केली की तुमचा मोर्चा दुपारी ठरवता येऊ शकेल का? सुदैवाने त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला. मग आम्ही त्यांनाच आमच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. नशीबाने ते हो म्हणाले.
पावसाळा सुरु न होण्याचा आम्हाला एक फायदा झाला आणि तो म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकला. सर्व सरकारी अधिकारी, BDO डोल्हारे साहेब तसेच पाटबंधारे विभाग प्रमुख, ग्रामसेवक, सरपंच वगैरे मंडळी आणि Xoriant Solutions Pvt Ltd या कंपनीचे पदाधिकारी अशी मंडळी वेळेवर पोहोचली. ३०-४० ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ छान पार पडला. आता भरपूर पाऊस पडावा हीच इच्छा.
आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश हा पाणी अडविणे, पाणी जिरवणे हाच आहे. त्याकरिता बंधारा हा या भागासाठी चांगला पर्याय आहे. बऱ्याच वेळा लोकं विचार न करता काहीही बोलतात आणि सूचना देतात. आज महाराष्ट्र सरकारची जलयुक्त शिवार योजना, नाम फाऊंडेशन, पानी फॉउंडेशन या सर्वांचे प्रामुख्याने काम मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती आणि डहाणू ते सिंधुदुर्ग येथील भौगोलिक परिस्थिती सर्वस्वी भिन्न आहे. हा संपूर्ण प्रदेश लाव्हा दगडाने व्यापलेला आहे. त्यामुळे एका भागात एक गोष्ट यशस्वी झाली म्हणजे दुसरीकडे होणारच असे गृहीत धरून चालत नाही.
आम्ही कार्यरत असलेल्या पंचक्रोशीत निकामी झालेले ८-१० बंधारे आहेत त्यामुळे ते दुरुस्त करण्याने खूप मोठे काम होऊ शकते. आम्हाला पुढची २-३ वर्षे काय काम करायचे याची जणू दिशाच मिळाली आहे. पण हो, ही संकल्पना आमच्या मनातील; त्यात भविष्यात काय अडचणी किंवा अडथळे येतील हे काय सांगावे? आपण निःस्वार्थ बुद्धीने आणि मनाने काम करत रहावे हेच योग्य ठरेल आणि बाकी गोष्टी त्या जगनियंत्याच्या हाती सोपवाव्या म्हणजे त्रास होणार नाही.
|| श्री स्वामी समर्थ ||
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
फोटो सौजन्य: अदिती मराठे