यशस्वी माणसाची व्याख्या काय? आजच्या व्यवहारी आणि व्यावसायिक जगात आर्थिक संपत्ती असणे ही यशस्वीपणाची प्रमुख खूण आहे. म्हणजे बाकीचे सगळे अयशस्वी म्हणायचे का? एकाद्या ज्ञानी, व्यासंगी आणि अफाट लोकसंग्रह असलेल्या माणसाला पैश्याच्या मागे लागत नाही म्हणून हिणवणार का? आणि खूप पैसे आणि धनसंपदा जरी असली तरी बाकीच्या गोष्टी काहीच नसतील तर काय उपयोग? माझ्या दृष्टीने आर्थिक आणि लौकिकार्थी सर्वच बाबतीत यशस्वी असलेल्या माणसाची मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे.
मी आजपर्यंत अनेक लोकांची शब्दचित्रे लिहिली त्यामुळे आम्हाला दोघांना ओळखणाऱ्या व्यक्तींना आश्चर्य वाटले असेल की मी अजून त्याच्यावर कसे काय नाही लिहिले? त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे तो माझ्यापेक्षा जास्त चांगले लिखाण करतो. त्यामुळे मी जरा कचरत होतो पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि म्हटलं, होऊन जाऊ दे. आता नमनाला खूप तेल झाले, नाही का? मुख्य मुद्द्याकडे वळू या. ती व्यक्ती म्हणजे माझा सिनियर मोस्ट साडू रामकृष्ण उर्फ सुधीर दांडेकर. या दांडेकर कुटुंबाची एक खासियत आहे की यांच्याकडे सर्व पुरुष मंडळींना दोन दोन नावे; का ते कळणे कठीण. असो.
पूर्वी पालघर म्हणजे दांडेकर अशी सर्वसामान्य ओळख होती. सर्वच दांडेकर हे जमीनदार कॅटेगरीमधील. आता परिस्थिती बदलली; पालघर खूप मोठे झाले, वस्ती वाढली पण तरी देखील दांडेकर या नावाचा महिमा अजूनही तसाच आहे. प.पू. कै. सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर याच पालघरातील. अजूनही अनेक वारकरी मंडळी ट्रेन मधून जाताना पालघरला गाडी उभी राहिली की उतरून मामासाहेबांचे गाव म्हणून प्लॅटफॉर्मला नमस्कार करतात. त्यांच्या भावाचा नातू म्हणजे सुधीर दांडेकर.
पहिल्यांदा सुधीरला मी जुलै १९८६ मध्ये भेटलो. खरं तर अदितीसाठी नवरा पसंत करायला सुधीर तिच्याबरोबर आला होता. म्हणजे त्यावेळी माझ्यावर पसंतीची मोहोर लावण्यात त्याचा थोडाफार तरी नक्कीच वाटा असणार त्यामुळे प्रथमतः मला त्याला धन्यवाद म्हणायला हवे. माझे लग्न झाले तेव्हा मला एक प्रकारे खूप दडपण आले होते कारण प्रत्येक बाबतीत माझी तुलना सुधीर अथवा श्रीकांत या जुळ्या (यांच्या बायका जुळ्या आहेत) साडूंशी नकळतपणे होत होती. आता हे दोघे किती गुणी आहेत हे सर्वश्रुत आहे त्यामुळे त्यांच्यासमोर मी म्हणजे... जाऊ दे... विषय बदलूया...
सुधीर हा रुईया कॉलेज नंतर COEP येथून First Class with Distinction मिळवून इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला. परंतु त्याला कुठल्याच विषयाचं कधीच वावडं नसतं. अध्यात्म, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, शेती, पर्यावरण, पाणी व्यवस्थापन, पक्षी निरीक्षण अशा अनेक विषयात त्याचे प्रचंड वाचन आणि अफाट ज्ञान आहे. त्याच्याकडील पुस्तकांचा संग्रह एखाद्या लायब्ररीला लाजवेल एवढा प्रचंड आहे. आणि पुस्तके देखील कोडिंग करून विषयानुसार व्यवस्थित ठेवली आहेत. गेली अनेक वर्षे तो वर्तमानपत्रातील त्याला महत्वाची वाटतात अशी कात्रणे कापून कागदावर चिकटवून त्यांच्या विषयानुसार फाईल केली जातात. अशा असंख्य बॉक्स फाईल सुधीरकडे आहेत. ह्या अभूतपूर्व व्यासंगाचे बाळकडू त्याला वडील कै. अप्पासाहेब आणि आई कै. सुमतीबाई यांच्याकडून वारसा हक्काने मिळाले असावे.
सुरुवातीपासून श्रीकांत हा तसा लांबच होता म्हणजे छिंदवाडा, कलकत्ता, लंडन, सिंगापूर वगैरे. त्यामुळे जास्त तुलना सुधीरशी होत असे. त्यावेळी मला कधी कधी खूप रागच यायचा. माणसाने एवढं चांगलं का असावं? माझ्यासारख्यांना न्यूनगंड द्यायला? परंतु नंतर काही वर्षांनी तो अधूनमधून मावा खावू लागला आणि एक प्रकारे मला बरं वाटलं. गंमत म्हणजे आमच्यातील अंतर थोडे कमी झाले. परंतु देवाने हा माझा आनंद फार काळ टिकू दिला नाही. २०१० साली त्याची बाय पास सर्जरी झाली आणि त्याचे मावा खाणे बंद झाले.
मला आठवते तेव्हापासूनच सुधीर अध्यात्मिक विचारसरणीचा आणि मी या गोष्टीपासून कोसो दूर. त्याला समाजकारणाची आवड आणि मला त्या गोष्टीची असलेली अनास्था. त्याचप्रमाणे सुधीरचा व्यावसायिक दृष्टिकोन तसा कमीच आणि मी आमच्या धंद्यात बुडलेला. आज मागे वळून बघताना जाणवते की त्याची संवेदना पहिल्यापासून जागृत होती पण मी मात्र पार बोथट होतो. अशा या सर्व फरकांमुळे पहिली अनेक वर्षे आमच्यात फारसा संवाद नव्हता. भांडण नव्हते (तसे सुधीरचे कोणाशी भांडण असू शकत नाही); परंतु एक प्रकारची दरी मात्र नक्कीच होती. काळाच्या ओघात ही दरी हळूहळू कमी होऊ लागली. गेल्या काही वर्षात मात्र आमच्यातील संवाद चांगलाच वाढला आहे आणि खूप प्रगल्भ देखील झाला आहे.
इतरांनी अनुकरण करावे असे अनेक गुण सुधीरमध्ये आहेत.
१. अध्यात्मिक आणि उच्च विचारसरणी
२. साधी राहणी
३. अफाट लोकसंग्रह
४. समाजकार्याची आवड
५. लोकांना मार्गदर्शन करण्याची तयारी
६. संशोधनाकडे असलेला कल
मी कदाचित सर्व गुण लिहू देखील शकणार नाही. त्याच्या वाचनाचा व्यासंग, संदर्भासहित बोलणं, अभ्यास, जनसंपर्क हे सगळे फार मोहून टाकणारे आहेत. तळागाळातील व्यक्तींपासून एखाद्या प्रतिथयश लेखकापर्यंतचा त्याचा असलेला संपर्क आश्चर्यजनक आहे. समाजातील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्याकडे सहज जेवायला येते... एखादा प्रसिद्ध लेखक माहेरपणासारखा दोन-चार दिवस राहायला येतो... कोणीतरी मोठा माणूस त्याच्या पत्रसंपर्कात असतो... या बाबी वरवर सहज वाटत असल्या तरी मला आतून थक्क करून सोडतात.
त्याचे वडील कै. अप्पासाहेब याच्या पुण्यतिथीनिमित्त तो वीस वर्षे व्याख्यानमाला चालवत होता. येणारा वक्ता तीन दिवस बोलत असे त्यामुळे साहजिकच मुक्काम त्याच्याच घरी. त्यामुळे मग नंतर देखील त्या सगळ्यांशी मैत्री. पुढील नावे वाचा म्हणजे ह्याचे महत्व लक्षात येईल... मिलिंद गाडगीळ, राम शेवाळकर, विद्याधर गोखले, डॉ. अशोक कामत, फिरोज रानडे, प्रतिभा रानडे, मुझ्झफर हुसेन, निनाद बेडेकर, डॉ. वि रा करंदीकर, ले. जनरल शेकटकर, अजित आपटे, द शं सोमण, स्नेहलता देशमुख, एम व्ही कामत, सदानंद मोरे, निळू दामले आणि अशी अनेक प्रतिथयश व्यक्तिमत्वे.
आम्ही दोघांनी काही वर्षांपूर्वी नीरजा फाउंडेशन या नावाने एक सामाजिक संस्था सुरु केली आणि त्या निमित्ताने मला अनेक ठिकाणी त्याच्याबरोबर फिरण्याची वेळ आली. तेव्हा मला जाणवलं की पालघरमध्ये असं एक देखील शेंबडं पोर नसेल जे सुधीर (दादा) दांडेकरांना ओळखत नाही. अशी प्रतिष्ठा कमविण्यासाठी माझ्यासारख्या माणसाला दहा जन्म देखील अपुरे पडतील. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रतिष्ठा त्याने स्वतः कमावलेली आहे.
रोटरी क्लब, पालघरचा तो प्रेसिडेंट तर होताच पण त्याशिवाय व्यंकटेश मंदिर, किसान प्रयोग परिवार, ढवळे हॉस्पिटल, अक्षरवेध पुस्तक आणि साहित्य मंडळ, सोनोपंत शिक्षण मंडळी, नूतन बाल शिक्षण संस्था (कोसबाड) अशा अनेकविध संस्थांच्या कार्यकारणीचा तो सदस्य आहे. पालघरात कुठलाही समारंभ, सण, मोर्चा हा सुधीरला बोलाविल्याशिवाय पूर्ण होणेच शक्य नाही. याचे सर्व क्षेत्रातील, सर्व राजकीय पक्षातील आणि सर्व धर्मीयांशी संबंध वाखाणण्यासारखे आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो, पालघरमधील एका मशिदीच्या आंतरिक वादात मध्यस्थ म्हणून कोण तर सुधीर दांडेकर. आणि दोन्ही बाजूची माणसे सांगतात की दादा, तुम्ही सांगाल तसे करू.
या त्याच्या सर्व उपक्रमात गेली ४६ वर्षे मंजुश्रीने अर्धांगिनी म्हणून त्याची फार सुरेख साथ दिली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे आदरातिथ्य कसे करावे याचे धडे तिच्याकडून शिकण्यासारखे आहेत. त्यांच्या घरी जाऊन आलेल्या माणसाचे वजन वाढले नाही असे होणे शक्यच नाही. बरं एवढं करून ती स्वतःचे वजन मात्र कायम मेंटेन्ड ठेवते.
गेल्याच महिन्यात सुधीरला ७२ वर्षे पूर्ण झाली. त्याच्याकडे नीट बघा... वार्धक्याची एक तरी खूण दिसते आहे का? तो मनाने किती तरुण आहे हे त्याला ओळखणाऱ्या लोकांना सांगायची गरज नाही पण इतरांना पुरावा हवा असेल तर त्याच्या मोबाईलची कॉलर ट्यून ऐका म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते पटकन लक्षात येईल. पण हो, हे म्हणताना त्याच्यात कुठलाही गर्भितार्थ नाही कारण सुधीरची बुद्धी भ्रष्ट होणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
सुधीरचा या वयातील उत्साह थक्क करून सोडतो. गेल्या काही वर्षात नीरजाची कामे करताना अनेक दिवस एक सलग उन्हातान्हात फिरताना बघून डोळे पांढरे होतात; भल्याभल्यांना लाजवेल तो. त्याला अजूनही लोकल गाडीच्या सेकंड क्लास मधून प्रवास करताना काही फरक पडत नाही. मीच त्याला अधूनमधून स्वतःची गाडी वापर असा अनाहूत सल्ला देत असतो.
त्याचे इतिहासाचे ज्ञान लक्षात घेऊन मी आणि अदितीने त्याला दोन वर्षांपूर्वी स्वतःचा युट्यूब चॅनेल चालू करायला उद्युक्त केले आणि त्यानेही उत्साहाने 'इतिहासावर बोलू काही' या चॅनेलची सुरुवात केली. पहिले काही एपिसोड लोकांना खूप आवडले पण त्याच वेळी त्याच्या काही वैयक्तिक कारणाने त्याने थोडा ब्रेक घ्यायचे ठरवले. दुर्दैवाने तो त्याचा ब्रेक संपतच नाहीये. मी त्याच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान असल्यामुळे त्याला चांगले फटके लगावतो असे म्हणण्याचे धाडस होत नाही. तो अतिशय सुंदर लिखाण करतो आणि त्याचे अनेक लेख मी माझ्या ब्लॉग माध्यमातून शेअर केले आहे. तो काही वर्षांपूर्वी पालघर मित्र या साप्ताहिकातून मसाला ठोसा नावाचे सदर लिहीत असे आणि त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. पुढे त्याच लेखांचे एकत्रित पुस्तक देखील प्रकाशित झाले. पण लिखाणात त्याचे हवे तसे अथवा अपेक्षित सातत्य नाही; कारण काय ते ही नीट समजत नाही. निदान या माझ्या लेखामुळे तरी तो आता काहीतरी विचार करेल आणि परत जोमाने सुरु करेल अशी भाबडी आशा.
इंग्रतीत साडू याला प्रतिशब्द को-ब्रदर असा आहे. खरं तर तो मला फारसा पटत नाही परंतु माझ्या आणि सुधीरच्या संबंधांनी साडू ते ब्रदर (को नव्हे) आणि आता फ्रेंड असा सुरेख रीतीने प्रवास केला आहे. आज आम्ही दोघे हक्काने एकमेकांशी वाटेल ते बोलतो. काही वर्षांपूर्वी मला मानसिक पोकळी छळत होती तेव्हा दुसऱ्या कोणाशी न बोलता सुधीरशी बोलावं असं वाटलं. त्याच्याकडे जाऊन मनमोकळेपणाने भडाभडा बोललो. त्याने त्याच्या स्वभावानुसार सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि मला हाही मार्ग सुचवलं. आज जाणवत की सुधीरचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत की ज्यायोगे माझ्या वैफल्यावर काही अंशी तरी मत करू शकलो. त्यामुळे एक प्रकारे सुधीर हा माझा पहिला गुरु आहे आणि त्याचा शिष्य म्हणून मी त्याला अभिवादन करत आहे.
मी ज्यांना 'यशस्वी' समजतो अशा काही मोजक्या लोकांमध्ये सुधीरची गणना नक्कीच होईल. सुधीरमधील गुण किती लोकांमध्ये असतात? भरपूर पैसे कमवून पैशाच्या गड्ड्या मोजत बसणे आणि अहंकारयुक्त वागणे यात काही फार मोठे यश दडलेले आहे असे निदान मला तरी वाटत नाही. याउलट सुधीर जे करतोय त्याला मी 'यश' मानतो.
अध्यात्म, वाचन, जनसंपर्क, समाजसेवा आणि हे सगळं सुरु असताना समांतरपणे चाललेला योगक्षेम ही अत्यंत कठीण बाब सुधीरला चांगल्यापैकी साधली आहे. त्याची यापुढील वाटचाल अशीच 'यशस्वी' राहो आणि उर्वरित आयुष्य निरामय राहो हीच ईश्वर आणि त्याचे सदगुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरणी प्रार्थना.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
Mob: 98200 44630