मर्दानी सौंदर्य

हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले दिसणारे हिरो काही खूप नाहीत. तरी देखील त्याबाबतीत आपण दाक्षिणात्य सिनेमा बघणाऱ्या लोकांपेक्षा नशीबवान आहोत. गेल्या ४०-५० वर्षांचा विचार केला तर देव आनंद, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर वगैरे हिरो असले तरी हे सगळे चॉकलेट हिरो. तसेच यशस्वी झाले तरी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राज कपूर, दिलीप कुमार, जितेंद्र, संजीव कुमार,, सद्य काळातील सर्व खान मंडळी, अनिल कपूर, अक्षय कुमार, अजय देवगण यांना काही देखणा पुरुष असे बिरुद लावण्याचे धाडस होणार नाही. पण पूर्वीपासून बघितले तर १९४०-५० मध्ये पृथ्वीराज कपूर, प्रेमनाथ आणि सद्य काळातील हृतिक रोशन, अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम हे या श्रेणीत थोड्याफार प्रमाणात मोडतात. परंतु "चोटी के बादान" पर फक्त दोनच हिरो असू शकतात आणि ते म्हणजे धर्मेंद्र आणि विनोद खन्ना. पण माझ्या वैयक्तिक आवडीचा विचार केला तर या बाबतीत विनोद खन्ना खास आवडता म्हणून हा लेख त्याच्यावर लिहिण्याचा प्रपंच.


पुरुषी देखणेपण आणि अमिताभच्या खालोखाल खर्जातील आवाज असून देखील विनोद खन्ना काही रातोरात स्टार झाला नाही. सुनील दत्तने या हिऱ्याला शोधला खरा पण स्वतःचा भाऊ सोम दत्त याला लॉंच करायचे असल्याने विनोद खन्नाला खलनायकाची भूमिका मिळाली. खरं तर तो कुठल्याच अँगलने खलनायक वाटायचा नाही परंतु त्याचे सुरुवातीचे सगळे सिनेमे, मन का मीत, मेरे अपने, आन मिलो सजना यात तो खलनायकच होता. त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती मेरा गाव मेरा देश या सिनेमातील जब्बार सिंग या डाकूच्या भूमिकेमुळे. त्याला त्या भूमिकेत बघणे हा एक अदभूत आणि थरारक अनुभव होता. सिनेमाचा हिरो जरी धर्मेंद्र असला तरी भाव खाऊन गेला तो विनोद खन्नाच. असे म्हणतात की शोले सिनेमातील अमजद खानच्या गब्बर सिंग या पात्राचे मूळ बीज विनोद खन्नाच्या जब्बार सिंग या भूमिकेत आहे. याच वर्षी (१९७१) आलेल्या मेरे अपने मध्ये पण त्याची लक्षवेधी भूमिका होती. १९६८ साली त्याची कारकीर्द जरी सुरु झाली तरी पहिली अनेक वर्षे म्हणजे १९७६ पर्यंत जवळजवळ पन्नास चित्रपटात तो दिसला तरी लक्षात राहण्यासारखा फार कमी सिनेमात होता पण जिथे होता तिथे प्रमुख हिरोला पण पार खाऊन टाकले. उदा. मेरा गाव मेरा देश (धर्मेंद्र), हाथ की सफाई (रणधीर कपूर), जमीर (जिथे तर अमिताभ हिरो होता). याच काळात त्याने अचानक, इम्तिहान आणि शक सारखे थोडे ऑफ बीट सिनेमे केले. व्हिलन ते हिरो असे प्रवास करणारे फारच कमी त्यातले विनोद खन्ना हे प्रमुख उदाहरण, दुसरा असा नट म्हणजे शत्रुघ्न सिन्हा.


अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना कामाच्या शोधात असताना अजंता आर्टच्या ऑफिस मध्ये भेटले. त्याकाळी ते जेवण शेअर करायचे; कधीतरी थोडे पैसे असले तर चोरून डिस्कोला जायचे. तिथे ते दोघे मित्र झाले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ती मैत्री टिकली. या दोघांची मैत्री दुर्मिळ आणि अनोखी होती; ज्यात असंख्य चढउतार, प्रसिद्धी आणि अपयश असून देखील टिकून राहिली. १९७५ नंतर राजेश खन्नाला बाजूला सारून अमिताभ जेव्हा सुपर स्टार झाला त्याचा प्रचंड फायदा विनोद खन्नाला पण झाला. त्या दोघांनी एकत्र केलेले सिनेमे आठवून पहा. जमीर, हेरा फेरी, परवरीश, अमर अकबर अँथनी, खून पसीना, आणि मुकद्दर का सिकंदर. या सर्व सिनेमात जरी अमिताभ मुख्य भूमिकेत असला तरी विनोद खन्नाने त्याची छाप सोडलीच. विनोद खन्नाची शरीरयष्टी आणि त्याचा पडद्यावरचा presence या गोष्टींमुळेच अमर अकबर अँथनी मध्ये त्याने अमिताभला ठोकून काढले हे प्रेक्षकांनी सहजगत्या accept केले. या कालावधीत विनोद खन्ना हा नंबर दोन असे सर्वसामान्य मत होते परंतु या गोष्टीमुळे दोघांच्या मैत्रीत बाधा आली नाही.


परंतु नियतीचीच त्याला दृष्ट लागली. अमिताभ बच्चन त्याच्या ABCL कंपनीमुळे डबघाईला आला आणि विनोद खन्नाला पैसा, कीर्ती आणि ग्लॅमर असताना देखील नैराश्येने ग्रासले आणि १९८२ साली चित्रपट सृष्टीचा त्याग करून तो आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचा शिष्य झाला. त्यांच्याबरोबर तो त्यांच्या अमेरिकेतील आश्रमात जाऊन राहिला. तिथे म्हणे तो माळ्याचे काम करायचा. त्यावेळी त्याला The Monk Who Sold his Mercedes असेही संबोधण्यात आले. त्याने जर हा संन्यास घेतला नसता तर त्याचे आणि अमिताभ बच्चनच्या नशिबाचे फासे काय पडले असते हे तो भगवंतच जाणे. परंतु एक गोष्ट नमूद करायला हवी की विनोद खन्नातील ही विमनस्कता, मर्दानगी, राग आणि भिडस्त प्रेम याची उत्कृष्ट सांगड घालून विनोद खन्नाला मेरे अपने मधील श्यामची भूमिका गुलजार यांनी दिली होती. दिग्दर्शक म्हणून असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट पण त्यातील राजकीय आशय आजदेखील तितकाच प्रभावी आणि समर्पक आहे.


विनोद खन्नाला जी मानसिक शांती हवी होती ती मिळाली की नाही याची कल्पना नाही पण ५-६ वर्षांनंतर त्याने चित्रपट सृष्टीत पुनःपदार्पण केले. आणि प्रेक्षकांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले. त्याचे म्हणणे असे की त्याने नेहमीच त्याच्या मनातील आवाजाला प्राधान्य दिले आणि त्याच प्रमाणे तो वागत आला. त्याचा भावनिक आणि दिलदार स्वभाव सर्वश्रुत होता. त्याच्या या पुढील कालखंडात त्याने जवळजवळ ६० सिनेमात काम केले. त्यातील महत्वाचे काही सिनेमे म्हणजे दयावान, चांदनी, लेकिन आणि गेल्या २-४ वर्षातील दभंग वगैरे.


विनोद खन्ना असे म्हटले की डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी रहाते - अत्यंत सामर्थ्यवान, प्रभावी आणि सळसळणारे चैतन्य असलेली व्यक्ती पण तरी देखील एक मोहक, हळवे आणि प्रेमळ व्यक्तिमत्व. त्याचा करिष्मा इतका जबरदस्त होता की पडद्यावरही नुसता त्याचा वावर प्रेक्षकांवर मोहिनी घालत असे. उत्कटता प्रकट करणारे डोळे आणि लीलया होणारी संवादफेक हे त्याचे महत्वाचे गुण. एखाद्या ग्रीक देवतेप्रमाणे असलेले अत्यंत देखणे रूप; यामुळे स्त्रिया त्याच्यावर भाळल्या नसत्या तरच नवल. त्याच्या हनवटीवर असलेला एक प्रकारचा छेद त्याच्या रूपात आणखी भरच घालत असे. पण जरी त्याचे रूप एवढे आकर्षक असले तरी कुठेतरी भावना खदखदत असाव्या असे वाटणारे त्याचे व्यक्तिमत्व होते त्यामुळे टिपिकल बॉलिवूड हिरोपेक्षा मला नेहमीच तो खलनायकाच्या भूमिकेत जास्त आवडायचा.


नंतर त्याने राजकारणात देखील उडी मारली आणि गुरुदासपूर या पंजाब मधील लोकसभा निवडणूक क्षेत्रातून तो चार वेळा निवडून आला आणि खासदार झाला. बॉलिवूडमधील दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्याला हे जमू शकलेले नाही. दोनदा तो केंद्र सरकारमध्ये तो मंत्री देखील झाला.


२०१७ मध्ये त्याला कॅन्सरने ग्रासले. काही महिन्यातच त्याची प्रकृती इतकी खालावली की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याचे हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा त्याचा फोटो बघून अत्यंत त्रास झाला. असे वाटले - काय होतास तू, काय झालास तू.

परंतु त्याचा कॅन्सर इतक्या ऍडव्हान्स स्टेजचा होता की २७ एप्रिलला, बॉलिवूडचा खलनायक, एक सुपरस्टार, एक संन्यासी (स्वामी विनोद भारती), राजकारणी याची जीवनज्योत मालवली. २०१८ साली त्याला मरणोत्तर दादासाहेब फाळके अवॉर्ड देण्यात आले.


या अविस्मरणीय नायकाचा आज जन्मदिन. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.


यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Bollywood #Vinod_Khanna

Leave a comment



Nitin

5 years ago

An excellent tribute to a great actor of the Indian Screen. He was simply great in movies like AAA, Qurbani and Hera Pheri

Pushkaraj Chavan

5 years ago

सुंदर, फार छान लिहिलंय. आवडलं.

Sadhana Sathaye

5 years ago

I too appreciated Vinod Khanna. I always felt had he been around; it would have been a tough fight for Amitabh Bachchan to the top. Such an handsome persona he was... so sad to see his pic after his illness! Very well written Yashwant

Prafulla Agnihotri

2 years ago

Good article, as usual.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS