पाणलोट क्षेत्र विकास नावाचा एक मोठा कार्यक्रम अनेक दशके दुष्काळग्रस्त आणि दुष्काळप्रवण भागांमध्ये, म्हणजे जिथे हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो तिथे, चालू आहे. पण सरकारच्या मते, कमी पावसाच्या प्रदेशातच दुष्काळ आणि पाणी टंचाई असते. कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो. तिथे अनेक डोंगरी भागांमध्ये दर वर्षी चार चार महिने अती-तीव्र पाणी टंचाई असते आणि त्यावर तेवढ्याच गांभीर्याने उपाय करायला हवेत. प्रत्यक्षात मात्र असे घडताना दिसत नाही. एका मोठ्या पाणलोट क्षेत्र विकास संबंधित संस्थेतील मोठ्या अधिकाऱ्यांनी मागे बोलताना असे सांगितले होते की कोकणात खूप पाऊस पडतो. पण तिथले लोक आळशी आहेत, त्यामुळे तिथे त्यांना पाणी अडवता येत नाही. आम्ही पहा, पडणारा पावसाचा थेंब अन् थेंब डोंगरांमध्ये मुरवतो. हे सगळे करण्याची पद्धत म्हणजे पाणलोट विकास. "पाणी अडवा पाणी जिरवा" किंवा "माती अडवा पाणी जिरवा" अशी त्यांची स्लोगन्स आहेत. पण त्याचा प्रत्येक ठिकाणी फायदा होतो याची खात्री आहे? खरं तर हा उपाय बरोबर नाही सुद्धा आणि हो सुद्धा.. आता कसे ठरवायचे कधी नाही आणि कधी हो?
जास्त पावसाच्या प्रदेशातील ओढ्या नद्यांमधील पाणी पाऊस काळात अडवा हे चुकीचंच आहे. त्या काळात नदी ओढे हे जैविक आणि रासायनिक हायवे असतात. त्या हायवे वरून माशांच्या गर्भार आया समुद्रातून नदीत, नद्यांतून उपनदीत, उपनद्यांतून ओढ्यात, ओढ्यांतून शेतांत त्यांच्या त्यांच्या 'माहेरी' बाळंतपणासाठी येत असतात. अशा वेळेस पाण्याचा वेग अती वाढवणे किंवा प्रवाहात त्या गर्भारशी आयांना ओलांडता येणार नाहीत असे अडथळे निर्माण करणे चूक आहे, अपराध आहे, पाप आहे.
कोकणासारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात, कोणीही कुठेही कितीही शिकलेल्या इंजिनिअरांनी कितीही पैसे आणि सामुग्री खर्चली आणि अगदी भगीरथ प्रयत्न केला तरी सगळ्या शेतांमधील सगळेच पाणी शेतात अडवूच शकतच नाही. तसे केले तर शेते ही शेते न राहता तलाव बनतील. अन् त्या उतरत्या खेकड्यांनी भरलेल्या डोंगरभागात असे तलाव टिकणे केवळ अशक्य. अशा वेळेला निदान आपल्या शेतातील माती वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी हे जमले तरी उत्तम.
कमी पावसाच्या प्रदेशात, शेतात भरून वाहून बाहेर ओढ्यात नदीत जाणारे पाणी जर शक्य असेल तर, जरूर अडवा. त्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही मोसमातील पिकांना फायदा होतो. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही ज्याला पर्जन्य छायेत किंवा दुष्काळी भाग म्हणतो, फक्त तिथलीच पावसाळ्यातील घोषणा आणि कृती असली पाहिजे. जास्त पावसाच्या डोंगर भागात, ती घोषणा आणि त्याप्रमाणे वर्तन फक्त नोव्हेंबर ते मे पर्यंतच ठेवावे. मे महिन्याच्या मध्यातच सर्व नदी-नाले ओढे यांच्यातील मानव निर्मित अडथळे दूर करावे.
आणखीन एक खूपच महत्त्वाची बाब. नैसर्गिक सुदृढ जमिनी, त्यांच्यावर पडलेले आवश्यक तेवढे पावसाचे पाणी पिऊ शकतात. पण आजारी, अशक्त, मुर्छित जमिनी, त्यांच्यावर पडलेले पाणी पिऊ शकत नाहीत. तो जमिनींचा क्षय रोग आहे आणि ही सगळ्यात मोठ्ठी समस्या आहे. दुर्दैव हे की या समस्येच्या अस्तित्वाची जाण ही बहुसंख्य तथाकथित शेती आणि पाणी तज्ञांना नाही.
दुसरे काही लोकं म्हणतात की नदीत जास्त पाणीच जाऊ देऊ नका म्हणजे पूर येणार नाहीत. हा उपाय खात्रीलायक आहे? तर त्याचे उत्तर - हो आणि नाही सुद्धा.. मग कसे ठरवायचे कधी हो आणि कधी नाही ते ?
कमी पावसाच्या प्रदेशात होता होईल तेवढे पाणी साध्या सोप्या सिमेंट न वापरलेल्या उपायांनी डोंगरांमध्ये किंवा शेतांमध्ये अडवावे, जिरवावे, मुरवावे आणि जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये असे काही करण्याचा विचारही करू नये कारण ते केवळ अशक्य आहे.
डोंगर-माथ्याकडून पायथ्याकडे पाणलोट उपचार करणे हा त्यांचा मंत्र आहे; आणि खालील तंत्रे ते वापरतात. डोंगरांवर कंटूर ट्रेंचेस बनवणे CCT, nala bund, gully plugs हे त्यांचे आवडते उपचार. हे उपचार दुष्काळग्रस्त भागात काम करताना दिसतात. त्यामुळे ते तसेच कोकणातही करावेत अशी सक्ती बऱ्याच ठिकाणी शासकीय अधिकारी आणि गैर शासकीय संस्था यांच्याकडूनही केली जाते. जी 100% चुकीची आहे. CCT (Continuous Contour Trenches) डोंगरांवर कंटूर ट्रेंचेस म्हणजे समपातळीतील चर बनवणे हे चर उताराला लंब (perpendicular) असतात. यामुळे वरील उतारावरून वाहणारे पाणी या चरांमधे येऊन डोंगर जमिनीत मुरते. कुठे? जिथे डोंगराची जमीन किंवा दगड सच्छिद्र असतो तिथे. आणि पाणी पिण्याची त्याची क्षमता असेल तिथे.. म्हणजे कुठे? तर पर्जन्य छायेच्या कुठल्याही भागात, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर, औरंगाबाद, सातारा, पुणे, सोलापूर व नाशिकच्या दुष्काळग्रस्त भागात. कोकणात काय परिस्थिती? उत्तर कोकणामध्ये सगळीकडे एकदम खडकखडीत काळा कातळ आहे. ज्याच्या पोटामध्ये भेगा नाहीत आणि त्यामुळे पाणी पिण्याची त्याची क्षमताच नाही. दक्षिण कोकणामध्ये काहीसा सच्छिद्र असा जांभा आहे परंतु तिथेही जांभ्याच्या खाली काळ्या कातळाचाच थर आहे. दोन्हीकडच्या डोंगरांवर मातीचा थर खूपच पातळ आहे. आणि कोकणाच्या या दोन्ही भागांमध्ये पडणारा पाऊस एवढा आहे की मातीला पाण्याचे अजीर्ण होते. अशा ठिकाणी हे सिसीटी आणि इतर छोटे-मोठे उपाय उपाय न ठरता अपाय ठरतात. अतिरिक्त पाणी त्यांच्या आतून वरच्या भागातून पटकन खाली जाते. तेथे काळा कुळकुळीत पाणी न पिणारा दगडाचा थर असतो. या थरावरून ते पाणी उताराच्या हिशोबाने कमीअधिक वेगात जमिनीखालून धावू लागते. जिथे मऊ व साधारण विद्राव्य थर असतात ते सरबरीत होतात म्हणजेच फ्लुइडाइज्ड होतात आणि वरच्या भागातील थरांना, झाडा-झुडपांना व वृक्षांना घेऊन खाली सरकू लागतात. मड स्लाईड होते. भूस्खलन होते. डोंगरांवर पावसाचे पाणी वाहून, माती धुपून, घळी पडतात. त्यातून वाहताना पाण्याचा वेग वाढतो. धूप आणखी जास्त होते. अशा छोट्या घळींना सुट्यासुट्या दगडांचा बांध रचून घालणे याला Gulley Plugging म्हणतात. ओढ्यांना सुट्यासुट्या दगडांचा बांध घालणे याला Nalla Bunding म्हणतात. देशावर कमी पावसाच्या प्रदेशात असे उपचार केले जातात. या सर्वांचा उद्देश डोंगरांवर वनस्पती वाढीसाठी आवश्यक आर्द्रता टिकावी हा असतो. तसा उद्देश चांगला आहे परंतु वरील सर्व करूनही मुख्य कार्यभाग.. जो डोंगरांवर वृक्ष वाढवणे किंवा जंगल वाढणे हे काही होताना बहुसंख्य ठिकाणी दिसत नाही.
कारण?
बकऱ्या आणि गुरांचे मोकाट चरणे. आणि माणसांचे कुऱ्हाडी आणि काडेपेट्या चालवणे थांबत नाही.
पहिल्या दुसऱ्या स्तराच्या नाल्यांना सुद्धा टिकून राहण्यासाठी Gabion लागतात.. परंतु त्यांची मंजुरी मिळत नाही कारण क्लासिकल पाणलोट क्षेत्र विकासाच्या पुस्तकांमध्ये पहिल्या-दुसऱ्या स्तराच्या नाल्यांना गॅबियन घालू नयेत. त्यांची गरज नसते. असे लिहिलेले असते. ते जसेच्या तसे पर्जन्यछायेच्या प्रदेशातून आणून, अति पावसाच्या कोकणात वापरण्याचा हट्ट बरेच जण करतात आणि त्यामुळे कमी खर्चाची तरतूद करतात. कोकणामध्ये जलसंधारण अशा कमी खर्चाच्या तरतुदीने शक्य नाही कारण इथे मोठ्या प्रवाहांना आणि तीव्र उतारांना तोंड द्यायचे असते.
पाया 'मजबूत' होण्यासाठी सुरुंग लावलेले व लाकडी किंवा लोखंडी दारे असलेले KT Weirs किंवा अजिबात दारे नसलेले गोटे वाळूने भरलेले बांध हजारोंच्या संख्येने निरुपयोगी झालेले पहायला मिळतात. म्हणून बांध बांधताना सुरुंगाचा वापर नको. कातळ स्वच्छ करून घण सुटकीने किंवा फारतर ब्रेकरने. कठीण खडकापर्यंत जावे. प्रवाह मोठा असलेल्या ठिकाणी.. दगडात ड्रील करून शिगा बसवून बांध घालावा. बांधात योग्य प्रमाणात योग्य आकाराच्या फ्लँज बसवाव्या. परंतु हे क्लासिकल पाणलोट क्षेत्र विकासाच्या नियमावलीमध्ये लिहिले नसल्यामुळे त्याला विरोध होतो. आणि पुस्तकात लिहिल्याप्रमाणे उपचार करण्याचा हट्ट धरला जातो.. कारण ते उपचार वैज्ञानिक आहेत असे समजले जाते. याला वैज्ञानिक अंधश्रद्धा किंवा स्युडो सायन्स असे म्हणता येईल.
योग्य वेळ
पावसाळ्यात अतीप्रवाहामुळे काम होऊ शकत नाही. उन्हाळ्यात क्युअरींग करता पाणी नसते. यशस्वी काम करायचे असेल तर नाला नदीच्या मगदुराप्रमाणे वर्षभरात फक्त दोन किंवा तीन महिन्यांत काम पूर्ण करायला हवे.
किनारी भागात खारेपणा आत येऊ नये या साठी मजबूत बांधबंदिस्ती करावी लागते.. पूर पाणी पातळी, भरती पातळी.. खाडी समुद्रातून वर पोहून येणारे मासे व इतर समुद्री जीव यांची ये जा सुकर होईल हे पाहिले पाहिजे.
खेकडे व लाटा यांना यशस्वी तोंड देण्यासाठी अति मजबूत काम करावे लागते वा योग्य उपाय योजना व वारंवार दुरुस्ती करावी लागते याची जाण ठेवावी व वाढवावी.
स्थानिकांचे पिढ्यानपिढ्यांचे ज्ञान त्यांच्या परंपरांमधून दिसते. त्या परंपरांचा आदरपूर्वक विचार करून त्यातून योग्य आणि अयोग्य याची निवड करण्याचे सोडून अर्ध-विज्ञानवादी लोक त्यातील बऱ्याच गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून त्या परंपरा संपवण्याचा प्रयत्न करतात.
त्या परंपरांऐवजी योग्य असे सहज सोपे उपाय अशा 'विकासवाद्यांना' देता येत नाहीत.. मग स्थानिकांची स्थिती.. न घर का न घाट का अशी होते. आणखीन एक गोष्ट, बहुधा अशा परंपरा सोप्या स्वस्त आणि पैशांच्या 'मार्केट इकॉनोमी' ला आधार न देणाऱ्या असतात. त्यामुळे आधुनिक मेडिकल रिसर्च किंवा आधुनिक ऍग्रिकल्चरल रिसर्च आणि जीडीपी अशा दृष्टीने त्या परंपरांना आर्थिक प्रलोभने जोडता येत नाहीत.. स्वाभाविकच मार्केट इकॉनोमीला त्या परंपरा तोडून त्यांच्याऐवजी जाहिराती, प्रलोभने, कमिशने अशा पद्धतीच्या व्यापारी रिसर्च मधून निर्माण होणाऱ्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस थोप्याव्याशा वाटतात. मग स्युडो-सायन्स सुरू होते.. त्याला वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणायला हवे.
बायलॉजीमध्ये एखाद्या जीवाचे नाव जीनस आणि स्पीसीज या रूपात लिहिले जाते. मानवाला होमो सपिएन्स म्हणजे मॅन द वाईज असे म्हटले जाते. चिमणीला पॅसर डोमेस्टिकस म्हटले जाते. वनस्पती आणि प्राण्यांच्या जातींच्या अंतर्गत अनेक समूह आढळतात. जसे, कुत्र्यामधील डॉबरमन अल्सेशियन किंवा पॉमेरियन ब्रीड यांना उपजात/व्हरायटी म्हटले जाते. व्हरायटी मध्ये देखील आणखी विभाग पडु शकतात त्यांना सब व्हरायटी म्हटले जाते. तर, मानवाला 'होमो सेपिएन्स' म्हणजे "मॅन द वाईज" असे म्हटले जाते परंतु गेल्या साधारण शंभर-सव्वाशे वर्षांमध्ये 'मॅन द वाइज' पेक्षा 'मॅन द इकॉनॉमिकल' म्हणणे जास्त योग्य राहील. कारण जे इकॉनॉमिकली त्याला आवडत नाही, ते तो करत नाही; जरी ते योग्य असले तरी सुद्धा. आणि बहुतेक वेळेला ही इकॉनॉमी अतिशय ह्रस्व दृष्टी आणि अल्पकालिक; शॉर्ट साईटेड आणि शॉर्ट टर्म असते. दोन पाच दशकांच्या काळात त्या इकॉनॉमीचे दुष्परिणाम समोर येतातच. अशा वेळेला 'टेक्नॉलॉजी' आणखीन डेव्हलप झाली की या प्रश्नांवर उत्तर मिळेल असे तो समजतो. दुर्दैवाने डेव्हलप झालेली नवीन टेक्नॉलॉजी जास्त मोठा अनर्थ समोर आणून ठेवते. आपापसात भांडणे करून, कोर्ट कज्जे करून, युद्धे करून मूर्खासारखे स्वतःलाच नाशाला कारणीभूत होण्याचे उपद्व्याप आधुनिक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिकल मानव करत आहे.
त्यामुळेच आजच्या आधुनिक मानवाला होमो सेपियन असं न म्हणता त्याला होमो इकॉनॉमिक्स; व्हरायटी टेक्नो-लिगॅलस; सब व्हरायटी इडियॉटिकस् असे म्हणावे लागते.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
Thanks to Dr Ajit Gokhale for his inputs.