कुठल्याही माणसाचा अथवा स्त्रिच्या आयुष्याचा उद्देश काय असतो? आजच्या जगात पैशाला इतके महत्व आले आहे की पैसा मिळवला म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे मिळविण्याकरिता शिक्षण सगळ्यात महत्वाचे आहे असे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येते. गेले काही वर्षे शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा चालला आहे तो आपण सगळे बघतोच आहोत. काहीही करून मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याची धडपड. आता तर काय म्हणे इंजिनियरिंगला मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय बंधनकारक असणार नाहीत. अरे मग शिक्षणाच्या दर्जाचे काय?
पण शिक्षणाचा उद्देश फक्त त्या ज्ञानाचा वापर करून पोट भरणे, चरितार्थ चालवणे आणि भरपूर पैसे कमावणे हाच आहे का? तसे असेल तर मग मला एक सांगा की पूर्वी आपल्या गावगाड्यातील बारा बलुतेदार मंडळींच्या पैकी कोण पैसे कमावत नव्हता? त्यांच्यापैकी कोणी भिकारी झाला होता असे ऐकले आहे??? नाही ना? शक्यच नाही.
बारा बलुतेदारी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रोजगार हमी योजना होती. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होणार. शेतीचे पारंपारिक ज्ञान तो आपल्या वडिलांकडून घेणार आणि बाप आपल्या स्वानुभवाला अजून चार गोष्टी जोडून तो आपल्या मुलाला देणार; यात पोटापाण्याची चिंता मिटलेली असे. सुताराचा मुलगा हा लहान असतानाच वडील बाजूला काम करता करता तो सुद्धा हातात लाकडाचा तुकडा घेऊन वडिलांचे बघून आपोआप शिकत असे. त्यामुळे तो ज्यावेळी २० वर्षाचा होई त्यावेळी तो पूर्ण कुशल सुतार झालेला असायचा.
आई वडिलांचे गुण लहान मुलांच्यामध्ये उतरतात. मग त्याच गुणांना पोषण देणारे वातावरण असेल तर ती मुले आई वडिलांपेक्षा त्या क्षेत्रात अधिक प्रगती करतात. हे जेनेटिक्स अर्थात वंशशास्त्राच्या अभ्यासकांनी सुद्धा सिद्ध केले आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हजारात फार विरळा मुले अद्वितीय किंवा लोकोत्तर गुण घेऊन जन्माला येतात; बाकी सर्व मुले सामान्य असतात.
जुन्या काळी सामान्य लोक आपल्या आई वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवत असत; यात पिढीजात कौशल्य अंगी असे. याशिवाय त्यांच्या हाताखाली लहानपणापासून काम केल्याने तारुण्यात पदार्पण करेपर्यंत ते कौशल्य सर्वार्थाने विकसित झालेले असे. त्या तरुणाला त्याची उपजीविका चालवता येईल इतके त्याच्या क्षेत्रातील ज्ञान वीस वर्षाचा असताना प्राप्त झालेले असे. हजारातील सर्वसामान्य लोकांसाठी ही पद्धती उत्तम होती. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्नच कधी निर्माण होत नसे. आता जे हजारातील विरळे असतील, ते त्यांना आवडेल ती वाट चोखाळतील आणि त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ माणूस गाठतील आणि शिकतील. हे करताना जे त्रास होतील ते सहन करतील पण तो मार्ग ते चोखाळण्याची सामाजिक चौकटीत याची मुभा होती; यात काहीही गैर मानले जात नसे.
आपल्या प्राचीन ऋषी मुनींच्या मते कोणतेही ज्ञान, कोणतीही विद्या संपूर्ण शिकायला 12 वर्षे लागतात. त्यामुळे आठव्या वर्षी मुंज झाली की त्यानंतर त्यातील कौशल्य पाहून त्याने त्या विषयाचा अभ्यास सुरु केला की वीस वर्षाचा होईपर्यंत तो पूर्ण ज्ञानी होईल. मग शिल्पकला असेल, नृत्य असेल, पारंपारिक बारा बलुतेदारी असेल किंवा राजा, अधिकारी बनवणारे गुरुकुलातील शिक्षण असेल; वयाच्या विसाव्या वर्षी ते निपुण झालेले असत आणि त्यांच्या कौशल्याची परीक्षा होऊन त्यांना रोजगार मिळत असे.
जो नृत्य, संगीत शिकणार असेल तो त्या गुरूकडे १२ वर्ष फक्त तेच आणि तितकेच शिकेल. त्या जोडीला या जगात गरजेचे प्राथमिक व्यावहारिक शिक्षण त्याला त्याच्या घरी तो आठ वर्षाचा होईस्तोवर मिळालेले असे.
याने आपल्या देशाचे काय वाईट झाले? आपल्याकडील लोक सर्वोत्कृष्ट दर्जाची उत्पादने बनवत होती. आपण जगाच्या व्यापारात २३% हिस्सा बाळगून होतो आणि तो फक्त मसाल्याचा नव्हता. त्यात उत्कृष्ट दर्जाचे कापड, अत्युत्कृष्ट दर्जाच्या शोभेच्या वस्तू होत्या. दगड, लाकूड, धातू, वस्त्र या सगळ्यांवर केले जाणारे नक्षीकाम संपूर्ण जगात आपल्या तोडीचे कुठेही होत नव्हते. जगाला कितीतरी धातू शेकडो वर्षे पुरवठा करणारा एकमेव देश हा आपला बहुमान होता यापैकी मुख्य धातू म्हणजे जस्त आहे. शुद्ध जस्त ओतून काढणे हे कितीतरी शे वर्ष जगाला ज्ञात नव्हते; ते तंत्रज्ञान फक्त आपल्याकडे होते.
आपल्याकडील हजारो वर्ष टिकतील अशी मंदिरे, त्यावरील शिल्पकला हे सगळे या विश्वसनीय यंत्रणेचे यश होते. आपली आर्थिक समृद्धी आपल्या शिल्पींच्या सर्व क्षेत्रातील या उत्कृष्ट लोकांच्या उत्तम कर्तृत्वाचे ते यश होते. लोहार असेल, सुतार असेल, चांभार असेल तरी खाऊन पिऊन सुखी. कौशल्य असेल तर त्या क्षेत्रातील शिल्पी होऊन संपत्ती कमावत असे. हे व्यवसाय म्हणजे त्या त्या लोकांची जात होती.
मी ऐकलेले एक उदाहरण सांगतो:-
अलेक्झांडर उर्फ सिकंदर आपल्या देशावर हल्ला करायला का आला माहिती आहे ?? - भारतात एक तगर नावाचे गाव होते. तेथील कापडाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की तगरचे कापड वापरणे हे सिकंदराच्या राज्यात श्रीमंतीचे, ऐश्वर्याचे लक्षण मानले जाई. तगरच्या कापडाची इतकी मागणी वाढली की तेथील स्थानिक कापड उद्योग बंद पडायची वेळ आली. मग सिकंदराने तगर येथील कापडावर अतिरिक्त कर बसवला. तरीही त्या कापडाची विक्री कमी झाली नाही. खुश्कीच्या मार्गाने तगर कापड खैबरखिंडीतुन जगभरातील बाजारपेठेमध्ये जात होते.
आता हे तगर गाव कोणते आहे माहिती आहे का ?? तगर म्हणजे तर. उस्मानाबाद / धाराशिव जवळचे तेर नावाचे गाव. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ. आज जाऊन पहा. कापडातील क सुद्धा तिथे दिसणार नाही. ते सगळे तंत्रज्ञान समूळ नष्ट झाले आहे.
ब्रिटिश आले आणि त्यांनी या संपूर्ण यंत्रणेला सुरुंग लावून उध्वस्त केले.आपल्या जुन्या बारा बलुतेदारी या संकल्पनेला आपण ब्रिटीशांच्या कृपेने आणि मॅकालेच्या शिक्षणाने संपवून टाकून त्यांना भिकेला आपण लावले आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात न्यूनगंड पेरला आणि आपली सामाजिक आर्थिक चौकट पूर्ण उध्वस्त केली. हा गोंधळ सार्वत्रिक पातळीवर आपल्या समाजाला उध्वस्त करतो आहे हे समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज आपली मंदिरे, हलाखीत जगणारे काष्ठ शिल्पी आणि विणकर मंडळी या त्या गतवैभवाच्या भग्न खुणा आहेत.
आज तथाकथित समानता आली आहे. यामुळे काय झाले ? बारा बलुतेदारीतील प्रत्येक बलुतेदार, शेतकरी, ब्राह्मण सगळेच्या सगळे आपल्या मुलांना एकाच शैक्षणिक चरकात घालतात. भारत सरकार सुद्धा सर्व शिक्षण अभियान या योजने अंतर्गत सर्व नागरिकांना शिक्षण देण्याची संकल्पना मांडते. पण शिक्षण म्हणजे काय याचा विचार आपण केला आहे का? लिहिता वाचते येणे म्हणजे शिक्षण म्हणायचे का? आजच्या जमान्यात शिक्षण सुरु होते तीन वर्षाचे असताना. आणि आपण ज्याला बेसिक शिक्षण म्हणू ते पूर्ण होते 15 वर्षाचे असताना; म्हणजे दहावीमध्ये. या 12 वर्षात ते मुल काय शिकले ? देशाचा आणि जगाचा इतिहास, भाषा, गणित, विज्ञान. आनंद आहे; पण यापैकी कोणते ज्ञान वापरून त्याला दोन वेळेस खायला काही मिळू शकते ?? कोणतेच नाही कारण त्याच्यासारखे दहा लाख विद्यार्थी हेच ज्ञान घेऊन उभे आहेत.
मग पुढे तीन शाखा; कला, वाणिज्य आणि शास्त्र. अजून दोन वर्ष शिका म्हणजे बारावी व्हाल. त्यातून काही रोजगारासाठी मिळाले का? नाही; मग पदवी मिळवा. बेसिक पदवी मिळणार साधारण विसाव्या वर्षी म्हणजे शिक्षण घेतले 17 वर्षे. या बेसिक पदवीच्या शिक्षणावर तो कोणती नोकरी मिळवू शकतो ? कारकून, चपराशी, सेल्समन, डिलिव्हरी बॉय, हॉटेल मधील वेटर?? आणि हेच काम करू शकणारे 10 लाख स्पर्धक त्याच्या समोर उभे आहेत; आणि ते सुद्धा फक्त राज्य पातळीवर. संपूर्ण देशाचा विचार केला तर दोन कोटी निश्चित असतील.
जर हुशार (?) असेल आणि जर बारावीनंतर इंजिनियरिंगला गेला तर मेकॅनिकल मध्ये त्याला पहिल्या वर्षी काय शिकवतात ? फाईल्स आणि त्यांचा वापर करण्याचे ज्ञान. हे ज्ञान पारंपारिक लोहार आपल्या मुलाला गम्मत म्हणून 8 वर्षाचा असताना शिकवत असे परंतु आधुनिक जगात त्या मुलाला त्याच्या 18 व्या वर्षी शिकवले जाते. पूर्वी लेथ चालवायला शिकवायचे आज सगळीकडे CNC मशीन्स आल्या आहेत. पारंपारिक मशीन्सचा वापर वेगाने कमी झाला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तो या शिक्षणासाठी काही लाख रुपये मोजतो आहे. बरं, ठीक आहे पण फायलिंग शिकून तो मुलगा त्याचा काही उपयोग पुढच्या आयुष्यात करतो आहे का? उत्तर - अजिबात नाही. फायलिंग करणे ही कला आज फक्त डायमेकर सारख्या मंडळींसाठी उरली आहे; बाकी कोणीही याचा वापर करत नाही.
परंतु चार वर्षाच्या अभियांत्रिकी कोर्स मध्ये मुलांना हे शिकवणे त्यांना भाग आहे कारण त्यांना बेसिक माहिती नसेल तर पुढे त्याचे आकलन कसे होईल ? आणि हो, जर बेसिक 18 व्या वर्षी शिकला तर तो पूर्ण कुशल अभियंता कधी होईल ? 30 वर्षाचा झाल्यावर??
यापेक्षा भयानक स्थिती वैद्यकीय क्षेत्राची आहे. पाच वर्षाची पदवी, मग पुढे तीन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम; नंतर कुठेतरी उमेदवारी आणि मग खऱ्या अर्थाने चांगली नोकरी अथवा वैद्यकीय व्यवसाय. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थाने पायावर कधी उभे राहणार? 35 वर्षाचे झाले की? या मुलामुलींची लग्न कधी होणार?
समानतेच्या नावाखाली सगळ्या लोकांना जातीचा अभिमान शिकवला गेला पण जातीचा पारंपारिक व्यवसाय हा गौण आहे हे मेंदूत भरवले गेले. परिणाम काय ? जातीचे कौशल्य संपूर्ण संपले आणि उरला आहे पोकळ अभिमान आणि समानतेच्या गोंडस चरकात चिरडून जाणारी आयुष्ये.
आज प्रत्येकाला आपल्या जातीचा फक्त कट्टर अभिमान उरला आहे पण त्याचे जात वैशिष्ट्यानुसार असणारे कौशल्य संपून गेले आहे. याची त्याला खंत तर अजिबात नाहीच पण समानता देणाऱ्या राज्यघटनेत त्याला जातीनिहाय आरक्षण मात्र हवे आहे. कारण काय तर ज्यायोगे त्याच्या पुढच्या पिढ्यांना मॅकालेच्या शिक्षण पद्धतीत पोट भरण्याची संधी शोधता येईल. जुन्याची नाळ नुसतीच तोडली नाही तर तिच्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण केला गेला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे नवीन म्हणून आहे त्यात भवितव्यच दिसत नाही म्हणून मग आरक्षणाची भीक मागायची वेळ आली आहे.
याचा भयानक परिणाम काय झाला याची तुम्हाला कल्पना आहे? आज सरकारी शिपायाच्या नोकरीसाठी कोण अर्ज करतात याचा तुम्ही विचार करू शकता? अगदी PhD पासून सगळ्यांचे लाखांनी अर्ज येतात. मिळेल ती नोकरी स्वीकारण्याची तयारी असलेला आणि मानसिकरीत्या त्रिशंकू झालेला संपूर्ण समाज असे भयानक चित्र आज दिसते.
आपल्या पूर्वजांनी सुखी समाधानी तृप्त आणि ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगले हे संपूर्ण थोतांड होते तसेच त्यांचे समाजाने शोषण केले असे आपल्याला पटवून देण्यासाठी ब्रिटीश आणि ब्रिटीश धार्जिणे समाजसुधारक उच्चारवाने सांगणारे सांगत राहिले. आणि त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज संपूर्ण समाजाची शोचनीय अवस्था झाली आहे.
माझा कुठेही उच्च शिक्षण किंवा उत्कृष्ट काही करण्याची आस असलेल्या लोकांना प्रवृत्त करण्याचा अथवा घाबरविण्याचा उद्देश नाही. मुख्य मुद्दा असा आहे की जे सामान्य आहेत त्यांना अशीच शिक्षण व्यवस्था असावी जी त्यांना विसाव्या वर्षी स्वयंपूर्ण करू शकेल. आणि महत्वाचे म्हणजे आपले पारंपारिक कौशल्याचे जे व्यवसाय आहेत त्यांचे पुनरुज्जीवन होणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला माहित आहेच की आज सुद्धा handmade उत्पादने वाट्टेल त्या दराने विकली जातात; पैठणी कोणत्याही यंत्रमाग साडीच्या काही पट महाग विकली जाते. शिक्षण धोरण दोन्ही विचारांना समजून असावे जे सामान्य जनतेचा विचार करणारे आणि काही विरळ्या मुलांना संधी देणारे असावे.
सुदैवाने आज भारत सरकार या गोष्टीचा विचार करते आहे असे निदान वाटते तरी आहे. स्किल इंडिया, मेक इन इंडिया ह्या अत्यंत धोरणात्मक बाबी आहेत परंतु तरुणांना त्यांच्या गावी राहायचेच नाही. त्यांचे स्वप्न काय तर शहरात जाऊन नोकरी करायची; मग ती काहीही असो आणि त्याच्यासाठी कसलीही तडजोड करायला ही मुले तयार असतात. पदवीधर कशाला व्हायचे तर जी मिळेल ती नोकरी करायला अशी दारुण परिस्थिती आहे. याचे प्रमुख कारण शेतकऱ्याचा मुलगा असे म्हटले तर त्याची लग्नाच्या बाजारातील किंमत शून्य असते. आज शहरात असेही दिसून येते की न्हावी, सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशिअन, मसाज करणारा, ऍमेझॉन किंवा स्वीगी सारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय, ओला किंवा उबर टॅक्सी चालक किंवा अगदी कुत्र्यांना फिरवून आणणारा यांचे उत्पन्न बरेच जास्त असले तरी त्यांच्या कामाचा दर्जा हीन समजला जातो.
अमेरिका किंवा पश्चिम युरोप सारख्या देशात कुठल्याही कामाला कमी लेखले जात नाही कारण तिथे dignity of labour आहे. परंतु जे आपल्याकडे अस्तित्वातच नाही. आपल्या देशाबाबत मी एक धाडसी विधान करतो की – Employment is inversely proportional to education. जेवढे तुम्ही जास्त शिकता तेव्हढे रोजगाराचे आणि मिळकतीचे मार्ग कमीकमी होऊ लागतात कारण कुठलाही जॉब करायला स्वतःलाच लाज वाटू लागते. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले - शिक्षणाच्या आईचा घो!!
आज समानतेचे नाव घेत आपण संपूर्ण राष्ट्राची, राज्याची आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याची सुद्धा वीण उसवत चाललो आहोत परंतु त्याचे भान कोणालाही नाही. गांभीर्याने विचार नाही केला तर भविष्यकाळ काही फार आशादायक दिसत नाही.
मला कल्पना आहे की ज्या पद्धतीने बारा बलुतेदार पूर्वी अस्तित्वात होते त्यानुसार आज ते नाही राहू शकणार. त्याच्यात बदल करावाच लागेल. परंतु त्या प्रणाली अथवा समूहाकडे एका वेगळ्या नजरेने बघायची नक्कीच गरज आहे.
@ यशवंत मराठे
प्रेरणा: समीर गुप्ते यांचा वाचनात आलेला लेख.