आधुनिक गांधी

 
'द माँक हू सोल्ड हिज फेरारी' या रॉबीन शर्मा यांच्या प्रसिद्ध पुस्तकातील नायक ज्युलिअन मँटन सुखासीन जीवनाच्या बेगडी रंगात लुप्त झालेला जीवनातील परमानंद शोधत निसर्गाच्या सान्निध्यात येतो व त्याचे जीवन अत्युत्तम आनंदाने भरून जाते. पैसा आणि फकिरी या दोघांमधे लपलेल्या जीवनाच्या मूलभूत आनंदाची ही कथा !! 
 
दादागिरी ते गांधीगिरीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मुन्ना नामक एका शहरी गुंडाची कथा काही वर्षांपूर्वी चित्रपटात आपण पाहिली आणि राजू हिरानींचा ‘मुन्नाभाई’ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. अशा कथा वाचायला आणि पाहायला खऱ्या वाटतात.. परंतु खरोखरच ज्युलिअन आणि मुन्ना अशा व्यक्ती आजच्या ‘अर्थस्य पुरुषो दासः’ अशी स्थिती असलेल्या  जगात आढळू शकतात का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. 
 
रॉब ग्रिनफिल्ड हे नाव गेले काही वर्षे सोशल मिडियावर गाजत आहे. रॉब ज्युलिअन प्रमाणे भौतिक साधनांचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगण्याचा संदेश आपल्या कृतीतून जगाला देत आहे आणि अगदी त्याच वेळी महात्मा गांधींच्या विचारांचा एक अनुयायी म्हणून त्या वाटेवर चालत असताना अगदी स्वप्नात देखील मुन्नाप्रमाणे महात्म्याला भेटण्याची अनुभूती तो घेत आहे.
 
उत्तर अमेरिकेतील विस्कॉन्सिन या राज्यातील ऐशलँड या एका छोट्या नगरात रॉबचे बालपण गेले. बालवीर घडवणाऱ्या बॉय स्काउट्स संस्थेत रॉबने ‘इगल स्काऊट’ ही सर्वोच्च श्रेणी वयाच्या अठराव्या वर्षी मिळवली. पुढे विस्कॉन्सिनला क्रॉस विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी मिळवून त्याने 2011मध्ये सॅन डिएगो येथे स्वतःची ‘द ग्रिनफिल्ड ग्रुप’ नावाची मार्केटिंग कंपनी सुरू केली. 
 
रॉबचे बालपण तसे आर्थिकदृष्ट्या खूपच बेताचे असल्याने त्याला अधिकाधिक संपत्ती मिळवण्यात रस निर्माण झाला होता. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत आपण एक अरबपती व्हावे हे त्याचे उद्दिष्ट होते. हळूहळू त्याचे जीवन मद्यपान, स्त्रीसुख यांत गुरफटू लागले.. परंतु सुदैवाने वयाच्या चोविसाव्या वर्षी काही डॉक्युमेंटरीज्‌ पाहून रॉबचे परिवर्तन होऊ लागले व तो मानवाने विकासाच्या नावाखाली चालवलेल्या निसर्गाच्या अधःपतनावर विचारशील झाला. त्या विचारांना त्याने कृतीची जोड दिली. ‘मद्यपी युवक’ ते ‘समाजात सकारात्मक बदल घडवणारा युवक’ असा हा त्याच्या परिवर्तनाचा टप्पा होता. 
 
हळूहळू त्याने आपल्या जीवनशैलीत रासायनिक पदार्थांचा वापर टाळणे, अन्नपदार्थ पूर्णपणे सेवन करणे, स्थानिक वस्तूंचा वापर करणे, वस्तूंचा पूर्नवापर करणे असे छोटेछोटे बदल घडवायला सुरुवात केली. त्यानंतरची पायरी म्हणजे त्याने स्वतःची कार विकून टाकली, बँक अकाउंट्स बंद केले, पैशाचा वापर अगदीच नगण्य केला. 2014 मध्ये त्याने शेवटचे बील भरले आणि तेव्हापासून त्याने पैशाचे सर्वच व्यवहार बंद केले. आपली मार्केटिंग कंपनी बंद करून त्याने ‘हॅपी, हेल्दी अँड फ्री’ नावाची चळवळ स्थापन केली. 
 
 
कॅलिफोर्नियातील आपल्या 50 चौरस फुटांच्या घरात राहत त्याने सौर ऊर्जा, फक्त पावसाचे पाणी, सोनखत निर्मिती, शेती, मधुमक्षिका पालन असे प्रयोग राबवले. एक वर्ष सहज असे जगता येते हे सिद्ध झाल्यावर त्याने आपल्या या घराचा दहा हजार डॉलरला लिलाव करून त्या पैशातून सॅन डिएगो येथील निराश्रितांसाठी अशीच दहा छोटी घरं बांधून दिली. सध्या त्याचा निवास असलेले घर हे असेच केवळ 100 चौरस फुटांचे असून त्यासाठी केवळ वापर केलेल्या वस्तूच उपयोगात आणलेल्या आहेत. 
 
सतत पाच वर्षे आपल्या गरजा कमी करत त्याने फक्त आपल्या खांद्यावरील बॅगमध्ये सामावतील अशा 111 गोष्टींपुरत्या स्वतःच्या गरजा ठेवल्या (आता त्या वस्तूंची संख्या देखील 44 वर आलेली आहे) आणि साध्या जीवनाचा संदेश देत दोन वर्षे वेगवेगळ्या देशांत भटकंती केली. आजपर्यंत रॉबने सहा खंडांतील 45 देशांत खिशात एक छदाम देखील न ठेवता भ्रमंती केली आणि आजही या जगात तग धरून असलेले मानवतेचे भांडवल त्यासाठी त्याला साहाय्यभूत ठरले! स्वतः तयार केलेल्या बांबूच्या सायकलवर या निसर्गपुत्राने तब्बल तीन वेळेस पूर्ण संयुक्त राष्ट्रांमधून सवारी करत निसर्गाला पूरक जीवनशैलीचा संदेश दिलेला आहे.  

 
आजवर रॉबने केलेल्या या प्रवासाची दखल National Geographic, BBC, CBS This Morning, Discovery Channel, USA Today, LA Times, The Guardian, Huffington Post अशा वाहिन्यांनी घेतलेली आहे. या सर्व वाहिन्यांकडून मिळालेली नगद रॉबने निसर्ग बचावासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना दान केलेली आहे. 
 
2017 मध्ये रॉबने जनजागृतीसाठी एक अजब चळवळ केली. ही चळवळ त्याला ‘The Trash Man’ अशी ओळख देऊन गेली. या मोहिमेत प्रत्येक व्यक्ती आपल्या बेमुक्त संसाधनांच्या वापराने निसर्गात किती टाकाऊ पदार्थ निर्माण करत आहे हा विचार पटवून देण्यासाठी त्याने एक महिना अमेरिकन नागरिक सरासरी वापरतो त्या गोष्टी वापरल्या आणि त्यांच्या वापरानंतर प्रतिदिन निर्माण होणारा 4.5 पौंड टाकाऊ घटक स्वतःच्या शरीराला बांधून तो गल्लोगल्ली फिरला. यातून आपल्या गरजांना लगाम घालण्याचा संदेश त्याने जगाला दिला. 

 
रॉबच्या मतानुसार संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिवर्षी 165 अब्ज डॉलर इतका अन्नाचा अपव्यय होत असतो आणि अगदी त्याच वेळी देशात पन्नास दशलक्ष इतकी लोकसंख्या अन्नावाचून राहत असते. या देशात 30% वस्तू न वापरता अगदी आहेत तशाच अवस्थेत कचरापेटीत फेकण्यात येतात. या विरोधाभासाला आवर घालण्यासाठी रॉबने आपल्या दुसऱ्या सायकल सवारीच्या वेळी 'The Food Waste Fiasco' चळवळ सुरू केली. यानुसार रॉब कचरा पेटीत उतरून विनाकारण त्यात टाकण्यात आलेले पदार्थ जमा करत असतो व त्यांवर आपला गुजारा करून प्रत्येक नागरिकाला संसाधनांचा सुयोग्य वापर करण्याचा बोध तो देत असतो. त्याच्या या चळवळीत आता अधिकाधिक लोक सामील होऊन या पर्यावरणसंवर्धनाच्या कार्यास बळकटी देत आहेत.     

 
स्वतःला अपेक्षित असलेला बदल सर्वप्रथम स्वतःमध्ये करणारे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी रॉब ग्रिनफिल्डचे आदर्श आहेत. गांधींच्या कार्यावर रॉब इतका प्रभावित झालेला आहे की, मुन्नाप्रमाणे एकदा महात्मा गांधी रॉब ग्रिनफिल्डच्याही स्वप्नी आले होते. ते वर्ष होते 2019, महात्म्याच्या जयंतीचे 150 वे वर्ष! रॉब त्यांच्याकडे पुढील ध्येयदिशा ठरवण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून पाहत होता. त्यानंतर भारतात येऊन गांधींजींच्या मार्गाने चालण्याचा संकल्प त्याने व्यक्त केला. 
 
द्रव्याची हाव न ठेवता पशुपक्ष्यांप्रमाणे जीवन जगल्यावर कुणीही आपले जीवन सुखकर करू शकते आणि निसर्ग त्याला शरण आलेल्या प्रत्येकाच्या गरजा पुरवण्यास पूर्णपणे समर्थ आहे या जिझस आणि गांधी यांच्या विचारांचेच आधुनिक रूप रॉब हे नव्हे का? बायबलमध्ये जिझस आकाशातील पक्ष्यांचा दाखला देत वृथा संचय करण्याच्या प्रवृत्तीला आवर घालण्याची शिकवण देतात. रॉबच्या रूपातील हा संयुक्त राष्ट्रांतील आधुनिक गांधी आज तेच तत्त्वज्ञान आपल्या कृतीतून साकारत आहे.
 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@mail.com

 

Leave a comment



स्नेहा धारप

3 years ago

He is really great. Thank you for writing and sharing article .

Anita

3 years ago

V nice article Yeshwant! Rob is alone, I think! So it is perhaps easier to continue with this lifestyle. For commoners like us, we need to worry about our future, sickness if any, children, their upbringing, education etc.
We believe in his philosophy in general. Apply where we can like keeping personal needs to minimum, cooking fresh food every day, not wasting or throwing good consumable items , buy only what we need etc! But riding bike to work is impossible! Rob could do it in California, Wisconsin would have been another story! He is great but his philosophy is not all that practical for people like us!

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS