कुंदनलाल सैगल हे नाव जरी उच्चारले की दोन टोकाच्या, सर्वस्वी भिन्न प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. माझ्या आधीच्या पिढीतील लोक त्याच्याबद्दल इतके भरभरून बोलतात की विचारता सोय नाही. त्यांच्या मते सैगल हा हिंदी चित्रपटसृष्टीचा खऱ्या अर्थांने पहिला सुपरस्टार. परंतु माझ्या पिढीतील अत्यंत विरळा लोकांना तो भावतो. किती रडका आवाज, काय ही गाण्याची विचित्र शैली वगैरे वगैरे शेरे मारून त्याला पार झिडकारून टाकण्यात येते. आजच्या तरुण पिढीच्या तर तो खिजगणतीत देखील नाही.
मला ही सुरुवातीला तो फारसा आवडत नसे. आम्ही रफी आणि किशोर यांच्या गाण्यावर मोठे झालो. हां, आता अधूनमधून तलत, मन्नाडे, मुकेश, हेमंत कुमार यांची काही मोजकी गाणी आवडायची पण तिथे गाडी अडकून राहायची. आवडणारा गायक म्हणून काही त्यांना कधी बढती मिळाली नाही. परंतु अगदी लहानपणापासून सैगलचे कौतुक काका-मामा मंडळींमुळे कानी यायचे त्यामुळे या व्यक्तीचे मला एक गूढ आकर्षण होते. याचे प्रमुख कारण म्हणजे रफी, किशोर आणि अगदी लता सुद्धा आम्हाला सैगलसारखे गाता येत नाही अशी खंत व्यक्त करताना मी वाचायचो. मला आश्चर्य वाटायचं की या माणसात असे काय आहे की ज्याचे गारुड अशा भल्याभल्यांच्या मनावर आहे? त्यामुळे मग त्याची माहिती गोळा करू लागलो आणि अधूनमधून त्याची गाणी ऐकण्याचा प्रयत्न करायचो. आणि जसजशी मी त्याची गाणी ऐकत गेलो, तसतसा मी त्याच्या प्रेमात पडलो.
त्याच्या बालपणी, म्हणजे सुमारे 110 वर्षांपूर्वी संगीताचे औपचारिक शिक्षण मिळणे तसे दुरापास्तच होते. त्यात पुन्हा जाती, गरिबी याचे चटके सैगलला बसत होतेच. परंतु संगीताची ओढ इतकी होती की शिकण्यासाठी वाटेल ते करायची मानसिक तयारी होती. सुफी संत सलामत हुसेन यांच्या संगीताचा त्याच्यावर सुरुवातीला खूप प्रभाव होता. असेही सांगण्यात येते की तरुण सैगल चांगले संगीत ऐकायला मिळेल या आशेने एका कोठ्याच्या आसपास देखील घुटमळत असे. परंतु नुसत्या संगीताने काही पोट भरणार नव्हते त्यामुळे पैसे कमविणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे मग जे जमेल अथवा मिळेल ते काम करायला त्याने का कू केली नाही. रेल्वे टाईमकींपर, टाईपरायटर सेल्समन, हॉटेल मॅनेजर असे आणि बरेच काही. पण हे करत असताना जेव्हा संधी मिळेल तेव्हा मैफिलीत गाणे म्हणण्याचा त्याने झपाटा लावला.
1930-31 साली हिंदी चित्रपटात क्रांती घडत होती; मूकपट ते बोलपट अशी. त्यामुळे चित्रपट निर्मिती कंपन्या गायक नटांसाठी आटोकाट प्रयत्न करत होत्या. तेव्हा पार्श्वगायन काही सुरु झाले नव्हते त्यामुळे नट अथवा नटी यांनाच गाणी गायला लागायची. इथे मात्र सैगलला त्याने आधी म्हटलेल्या गैर फिल्मी गाण्यांचा फायदा झाला असावा. न्यू थिएटर्सने त्याला महिना रुपये 200 (आजचे किमान दहा लाख रुपये) पगाराची चित्रपटात काम करण्याची नोकरी दिली. त्याचे पहिले काही चित्रपट जरी 1932 साली प्रदर्शित झाले तरी त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती 1934 च्या चंडिदास या सिनेमाने. आणि मग त्याचा सुपरस्टार होण्यास कारणीभूत झालेला 1935 चा देवदास.
या चित्रपटाने त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले. तो पहिला गैर बंगाली गायक होता की ज्याला गुरुदेव रबिन्द्रनाथ टागोर यांनी आपल्या कविता गायची परवानगी दिली. 1941-42 च्या आसपास चित्रपट सृष्टी मुंबईत जास्ती रुजू लागली होती त्यामुळे 1942 च्या अखेरीस सैगल कलकत्त्याहून मुंबईला आला आणि त्याने इथे भक्त सूरदास, तानसेन, कुरुक्षेत्र, उमर खय्याम, तदबीर, शहाजहान आणि परवाना असे यशस्वी चित्रपट केले. परंतु दुर्दैवाने याच कालावधीत दारूने त्याचा कब्जा घेतला. ते व्यसन इतके वाढले की आपण दारू प्यायल्याशिवाय आपण गाऊ शकू असा त्याचा आत्मविश्वासच राहिला नाही.
त्याचा हा दारू पिऊन गाण्याचा गैरसमज दूर करण्याकरिता संगीतकार नौशाद यांनी मात्र एकदा एक अनोखा प्रयोग केला. शाहजहान चित्रपटचे एक गाणे होते.. “जब दिल हि टूट गया, अब जी के क्या करेंगे”.. या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी सैगल स्टुडिओत वेळेवर आले होतता. रेकॉर्डिंगची आवश्यक सर्व तयारी नौशाद यांनी केली होती. सैगल गाण्यापुर्वी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या काली तीन पांच असा विचित्र नांवाच्या ब्रांडची दारू पीत असे. गाण्याचे रिहर्सल म्हणून सुरुवात करा असे नौशाद यांनी सांगताच सैगल आपल्या ड्रायव्हरला म्हणाले, 'अब्बास.. गाडीमेंसे वो मेरी काली तीन पांच तो ला देना.. परंतु लागलीच नौशाद यांनी त्यांना थांबविले आणि सौम्य शब्दात सैगल यांना विनंती केली, नही, सैगलसाब, आज आप पिये बगैरही यह गाना गायेंगे.. और मुझे यकीन है आज का गाना आप और भी बेहतरीन गायेंगे. सैगल अवाक झाले. आश्चर्याने म्हणाले.. 'नौशादजी, यह आप क्या कर रहे है ? मै शराब पिये बिना गाना गा ही नही सकता.. और मे नही चाहता की आपका गाना खराब हो. नौशाद फक्त हसले आणि म्हणाले की पिता उत्तम गाणे गाऊ शकता हे मी जाणतो आणि आज मला तेच सिद्ध करायचे आहे. परंतु सैगल संभ्रमात पडले कारण त्यांना तो आत्मविश्वासच नव्हता. शेवटी असे ठरले की सैगल प्रथम हे गाणे न पिता गातील आणि नंतर पिऊन परत तेच गाणे गातील. दोन्हीपैकी जे गाणे सैगल यांच्या पसंतीस उतरेल तेच गाणे सिनेमात ठेवले जाईल. अखेरीस सैगल कबूल झाले.. नंतर ती दोन्ही रेकॉर्ड केलेली गाणी सैगल यांनी लक्षपूर्वक ऐकली आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी न पिता रेकॉर्ड केलेले गाणे अगदी उत्तम झाले होते. हे कबूल करीत प्रेमभराने सैगल यांनी नौशादना मिठी मारली आणि म्हणाले, नौशादजी आप इतने साल तक कहा थे? मुझे आप कितनी देर के बाद क्यू मिले? अगर पहिले मिलते तो मेरी जिंदगी सवर जाती.. लेकिन खैर.. अब तो बहुत देर हो चुकी है.. पुढे शाहजहान चित्रपटाचे हे गाणे 'जब दिल ही टूट गया, अब जी के क्या करेंगे' चित्रपटातले सर्वाधिक लोकप्रिय गाणे ठरले होते.
अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनीही सैगल यांना दारूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा एका मैफिलीत गाण्यांची चर्चा होत असताना सैगलच्या दारू पिऊन गाणे रिकॉर्डिंग या विषयावर आली. पृथ्वीराज यांनी दारू पिणे किती वाईट आणि जीवनाला किती घातक असते यावर बरेच सुनावले. पण सैगल आपल्या मद्यप्राशन सवयीवर ठाम होते. पृथ्वीराज शांतपणे म्हणाले, सैगलसाब अगर आप शराबको बुरा नही मानते, तो मैं आपको शराब आपके शरीरको कितना नुकसान पहुंचा सकती है ये दिखाना चाहता हूँ. पृथ्वीराज यांनी दारूचा भरलेला ग्लास घेऊन त्यात चिकन कलेजी टाकली आणि म्हणाले, आता पहा, या दारूमध्ये बुडलेल्या कलेजीची काय हालत होते ते. काही मिनिटातच ती कलेजी विरघळायला लागून त्याचा आकार लहान होत शेवटी ती आकाराने टीचभर शिल्लक राहिली. पृथ्वीराज यांनी तो ग्लास सैगल यांच्या डोळ्यासमोर धरला आणि म्हणाले, 'देख रहे हो, ये हाल होता है.. कलेजे का शराब की वजहसे. आप तो समजही गये होंगे की मै आपको क्या समझाना चाहता हूँ. परंतु सैगल हाडाचे पिणारे होते. ते हसून पृथ्वीराज त्यांना म्हणाले, 'पृथ्वीराजजी बहुत अच्छा किया आपने मुझे ये दिखाया, मै आपका शुक्रगुजार हूँ. लेकिन एक बात है, जाम मे जो कलेजा है वो किसी मुर्गे का है, जो कभीभी गाना नही गा सकता था. लेकिन मेरा कलेजा कुंदनलाल सैगल का है, जो शराब पीये बीना गाना गा ही नही सकता है.. बस्स, इतना सा ही तो फर्क है.. बुरा मत माने.. लेकिन क्या करू? अब तो बहुत देर हो गई है.. बहुत देर..
सैगलची कारकीर्द तशी फारच छोटी, म्हणजे पंधरा वर्षांची. या कालावधीत त्याने सुमारे 36 चित्रपटात भूमिका केल्या आणि फक्त 200 गाणी म्हटली. आज कुठल्याही गायकाची हजारात गाणी असतात मग सैगल एवढ्या कमी गाण्यात असे काय करून गेला? त्याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मर्यादित शिक्षण असून देखील तो अत्यंत सहजतेने कठीण गाणी गात असे. त्याला मिळालेली ही प्रतिभा अतुलनीय असली तरी ती खरे सांगायचे तर देवदत्त देणगी होती. आणि त्यामुळेच तसे कौशल्य इतर कुठल्याही पार्श्वगायकाला गेल्या 75-80 वर्षात जमले नाही.
जर कधी शक्य झाले तर वेळ काढून सैगलची खालील गाणी एकदा ऐकून बघाच; अतुलनीय प्रतिभेची एक झलक दिसेल.
- बालम आये बसो मेरे - देवदास (1935)
- दुख के दिन अब बितत नाही - देवदास (1935)
- इक बंगला बने न्यारा - प्रेसिडेंट (1937)
- बाबुल मोरा नैहर - स्ट्रीट सिंगर (1938)
- मै क्या जानू क्या जादू है - जिंदगी (1940)
- दिया जलाओ - तानसेन (1943)
- दो नैना मतवाले - माय सिस्टर (1944)
- ऐ कातिल-ए-बेकरार - माय सिस्टर (1944)
- जब दिल ही टूट गया - शहाजहान (1946)
- गम दिये मुस्तकिल - शहाजहान (1946)
परंतु बऱ्याच कलावंतांना असलेला दारूचा शाप सैगलला भोवला. कालांतराने त्याला उपरती झाली होती परंतु त्याने स्वतःच म्हणल्याप्रमाणे खरंच त्या महान गायकासाठी बहुत देर झाली होती. वयाच्या फक्त 42 व्या वर्षी लिव्हर सिरॉसिस या आजाराने त्याला ओढून नेले पण त्याच्या चाहत्यांसाठी तो अमरत्वाचा पट्टाच घेऊन आला होता कारण तो त्यांच्या हृदयात अजून तसाच जिवंत आहे.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com