अनादी काळापासून संपूर्ण जगात आणि खास करून भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. सर्व सामाजिक नियम पुरुषांनी बनविलेले असल्यामुळे त्यात कुठे स्त्रीचा विचार केला आहे असे दिसत नाही. स्त्रीवर धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक अशी सगळ्या प्रकारची बंधने लादण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आली पण स्त्री मात्र अजून मानसिक पारतंत्र्यातच आहे असे जाणवते.
आज प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोने अधून मधून माहेरी जावे अशी इच्छा असते ज्यायोगे आपल्याला बॅचलर आयुष्य जगता येईल. बॅचलर म्हटले की पहिले मनात काय येते? मज्जानु लाईफ. मित्रांबरोबर पार्ट्या हा त्यातील मुख्य भाग असतो. रात्री उशीरा झोपावं, सकाळी आरामात उठावं, वॉकला जाण्याची कटकट नाही, टीव्ही वर मनसोक्त स्पोर्ट्स आणि सिनेमे बघावे असा सर्वसाधारण पुरुषांचा कार्यक्रम असतो.
परंतु भारतीय पुरुषाला बालपणीपासून आई आणि नंतर बायको यांची इतकी सवय झालेली असते की त्याला एकटेपणा खायला उठतो. एका वयानंतर त्याला बायकोनेही आईसारखी काळजी घ्यावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे अमर्याद स्वातंत्र्य देखील काही दिवसांनी कंटाळवाणे वाटू लागते. जनरली पुरुष फार काळ एकटे राहू शकत नाहीत. पण पुरुष असा विचार कधी करतो का की त्याच्या पत्नीला देखील स्वातंत्र्य हवे असेल? आपलं आयुष्य आपल्यासाठी, आपल्या मनासारखं, जगावं असे तिला कधी वाटत नसेल?
तो असा विचार करूच शकत नाही कारण त्याच्या दृष्टीने त्याने बायकोला शक्य असतील तेवढया सुखसोयी दिलेल्या असतात. तो काही तिला डांबून ठेवतोय, मारतोय, झोडतोय असे काहीही नाही आणि तिला कुठे काय कमी केलंय की तिने असा विचार करावा?
परंतु फक्त हीच कारणे हवीत का स्वतंत्र आयुष्य जगायला?
आज बहुतेक काम करणाऱ्या बायकांच्या बाबतीत होते काय? तर रात्री झोपताना सकाळी डबा काय करायचा अन सकाळी डबा करताना आता नाश्ता काय करायचा, ऑफिसला जायची लगबग आणि ट्रेन मध्ये डोक्यात ऑफिसची पेंडिंग कामे, घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करु, मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी, नवऱ्याची चिडचिड, त्याचं काम, घरातल्या सगळ्यांची आजारपणे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, यात ती पार हरवून जाते. फार विरळा पुरुष बायकोला घरच्या कामात मदत करतात. बहुतेक पुरुष बायकोशी कामाव्यतिरिक्त चार शब्द तरी बोलतात का असे शंकास्पद वातावरण असते त्यामुळे आपली बायको सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी काय करत असते याची त्याला गंधवार्ता देखील नसते.
आज नोकरदार माणूस असेल अथवा बिझनेसमन असेल, त्याच्या दृष्टीने घर चालविण्याएवढे पैसे दिले की काम झाले. त्यांच्या ऑफिसमध्ये सगळीच कामे ते करतात का? हाताखाली माणसे असतातच ना? अगदी प्यून, ड्रायव्हर पासून मोठा लवाजमा असतो. पण आपले घर ही सुद्धा एक प्रकारची मोठी इंडस्ट्रीच आहे आणि ती सुरळीत चालण्यासाठी घरच्या बाईला देखील मदतनीस लागतात. परंतु बऱ्याच वेळेला पुरुषाचा विचार असतो की त्याची गरज काय? तसेच बाई वर सुद्धा सामाजिक विचारांचे जोखड असते. तिची आई, मावशी, आत्या, काकू या सर्वांना तिने सगळ्या गोष्टी स्वतःच करताना बघितलेल्या असतात त्यामुळे मला देखील करायलाच पाहिजे अशी तिची मानसिकता होऊन जाते.
पुरुष ऑफिसमधून घरी आल्यावर दमलो म्हणून कायम स्वतःची स्पेस घेतो. रिटायर झाल्यावर तर आपल्या वेळेला झोपायचे, आपल्या वेळेला उठायचे. पण बायकोला रिटायरमेंट मात्र अजिबात नाही. जर तो त्याला हवं तसं आयुष्य जगण्यासाठी धडपड करतो मग जरा तिलाही तिच्या मनासारखं जगण्याचा अधिकार का नाही? नवरा त्याच्या मित्रांबरोबर पार्टी करायला जातो, रात्री उशीरा घरी येतो आणि ते बायकोने ते आनंदाने मान्य करावे अशी आशा करतो. पण जर कधी तिने मैत्रिणींबरोबर रात्री पार्टीला जाण्याचे नुसते म्हटले तरी त्याला टेन्शन येते की आता घरातील सगळ्या गोष्टी त्याला मॅनेज कराव्या लागतील म्हणून मग तो रात्री बाहेर जाण्याबद्दल त्याला तिची कशी काळजी वाटते असे सांगून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो.
मला तर असं वाटतं की नवरा बायको या दोघांनी वर्षातून निदान काही काळ तरी मॅरीड बॅचलर लाईफ जगायला हवे. पण असा विचार मांडला तर बहुतेक जण, लोक काय म्हणतील, या विचाराने गर्भगळीत होतील.
लोकं? ती कधी काय नाही म्हणत? त्यांचं कामच आहे बोलायचं. आपण नाही का उठसुठ लोकांना नावे ठेवत? ते पण त्यांना करायचं तेच करतात. नुसते घरातच नाही तर जगात सुद्धा असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याची पर्वा असते. समोरचा माणूस जास्त सुखात दिसला की त्यांना प्रश्न पडतो हा एवढा कसा सुखी आणि जास्त दुःखात दिसला तरी प्रश्न पडतो इतकं असूनही हा इतका कसा दुःखी? लोक काय म्हणतील हे निव्वळ थोतांड आहे.
बाई सुद्धा पाहिजे तेव्हा झोपेल, पाहिजे तेव्हा उठेल, कधीही काहीही बनवून खाईल, कधी वाटलं की छान आवडीचे कपडे घालून एखादा मूव्ही बघायचा तर जाऊन बघेल, मॉलमध्ये जाऊन विंडो शॉपिंग करेल, कधी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन पहाटेचा उगवता सूर्य पाहील तर कधी क्षितिजावर मावळती संध्याकाळ डोळ्यात साठवेल, बाहेर पाऊस पडत असेल तर मुद्दाम छत्री न घेता चिंब भिजून येईल, तासनतास शांत, निवांत एखाद्या देवळाच्या पायरीवर बसेल, कधी समुद्राला डोळ्यात साठवून घेईल तर कधी फुलांचा सुगंध हृदयात भरेल, आवडत्या लोकांना भेटेल, मित्रमैत्रिणींशी भरपूर गप्पा मारेल.
पुरुष लगेच म्हणतील की मी कुठे आडकाठी केलीय? तिला हवं तसं ती माझ्या सोबतही राहूनही करू शकते.
खरंच शक्य आहे? अर्ध आयुष्य संपल्यावर? जे एवढ्या आयुष्यात नाही घडलं ते चार दिवसात घडेल? आजपर्यंत तिला कधी स्वातंत्र्य मिळालंय? तिचे छंद जोपासायला कधी प्रोत्साहन दिलंय? तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने कधी प्रयत्न केला आहे? मला दुसरं सांगा की किती मुलं कमावती झाल्यानंतर आपल्या आईला तिला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करतात? नुसते पैसे दिले की आपली जबाबदारी संपली अशी भावना असेल तर काय उपयोग? तिला प्रोत्साहन देणे ही खऱ्या अर्थाने प्रेम दर्शविण्याची गोष्ट असेल. आपण नेहमी ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. परंतु सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यात तिचा त्याग किती मोठा आहे याचा कोणी फारसा विचार करत नाही. किती भारतीय पुरुष एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील? आज बहुतेक मराठी मध्यमवर्गीय घरात होते काय तर बाई लग्न होऊन सासरी गेल्यावर नवरा आणि सासू सासऱ्यांची सेवा करायची आणि मग वयाच्या साठीनंतर काही करावं असा मनात विचार येतो त्याच वेळी नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर येते. ती स्वतःसाठी जगते कधी? आणि जगणार कधी? हात पाय चालणे बंद झाल्यावर?
पुरुषाला नेमकं काय हवं असतं बाईकडून? या प्रश्नाला ८५ टक्के स्त्रिया ‘शरीर’ हेच उत्तर देतात.
पण मग बाईला नेमकं काय हवं असतं पुरुषाकडून, या प्रश्नाचं उत्तर अगदी अनेक बायकांनाही कळत नसतं. खरं तर स्त्रियांना त्यांना पंख देणारा, ते समजून घेणारा पुरुष हवा असतो. बाईला पुरुषाकडून पंख हवे असतात. कुणी देतो का तिला असा पंख देण्याचा अनुभव? तिला कधी येतो का असा पंख मिळाल्याचा अनुभव? होय… तिच्या लहानपणी तिला अनुभव आलेला असतो पंखांचा. प्रत्येक स्त्रीच्या मनात आदर्श पुरुष म्हणून बापाची प्रतिमा असते ती यासाठीच, की लहानपणापासून बाप तिची काळजी घेत असतो. तिला जोजवत असतो. पण ही परिस्थिती कायम राहात नाही, कारण मुलगी तरुण झाल्यावर अनेक वेळा या परिस्थितीत अचानक बदल घडतो. कालपर्यंत काळजी करणारा तिचा बाप तिच्या जाण्यायेण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण आणू पाहातो. फुटू फुटू पाहणारे तिचे पंख तो कापू लागतो. यामागे बापाला बाहेरील पुरुषसत्ताक जगापासून मुलीला वाचवण्याच्या काळजीबरोबरच भीती असते ती समाजाची. नवरा बायकोला बेड्या नसेल घालत पण उडण्यासाठी पंखात बळ मात्र देत नाही हे ही तितकेच खरे. या गोष्टीला सन्माननीय अपवाद नक्कीच असतील.
हे बळ जेव्हा स्त्रीला मिळेल तेव्हाच खरा Womens Day साजरा होईल.
आणि हो, मी आजच्या मिलेनियल पिढीबद्दल हे बोलत नाहीये. त्यांनी ह्या बाबतीत खूप सकारात्मक बदल केला आहे आणि जे भविष्यासाठी अत्यंत आश्वासक आहे.
बघा पटतं का.
@ यशवंत मराठे