बर्फाचा गोळा ते सागरी सेतू - ३

शिवाजी पार्कच्या गप्पा

माझा बालमोहन शाळेतील कालखंड हा जून १९६४ ते जून १९७७ असा होता.. सर्वसाधारणपणे १३ हा आकडा अशुभ मानला जातो पण आमच्या (हे स्वतःला बहुवचनी संबोधणे नसून ते सर्व शाळा मित्रांना गृहीत धरून लिहिलेला शब्द आहे) बाबतीत हे साफ चुकीचे असून ती आमच्या सर्वांच्या आयुष्यातील १३ सोनेरी पाने होती असे मी खात्रीपूर्वक विधान करू शकतो.. आमच्या वेळेस शाळेत मैत्रिणी असणे ह्या विचाराला देखील थारा नसायचा.. एकमेकांशी बोलण्याची सुद्धा बंदी.. शेवटची ८ वर्षे साईड प्लीज करत करत घालवली.. वर्गातील मुली गेल्या १०-१२ वर्षात मैत्रिणी झाल्या.. त्यामुळे माझ्या आधीच्या बहुवचनात ‘आता’ त्या सुद्धा अंतर्भूत आहेत; ‘तेव्हा’ मात्र नव्हत्या.. शाळेतल्या आठवणी ह्यावर अनेक पानेच पाने लिहिता येऊ शकतील पण तो आपला सद्य विषय नाही म्हणून इथेच आवरते घेणार होतो पण शाळेशी निगडित एक-दोन आठवणी सांगणे हे क्रमप्राप्त आहे; तेवढ्याच सांगतो..

बालमोहनाच्या कोपऱ्यावर लिमलेट, जिरागोळ्या, बोरं विकणारी एक टपरी होती.. ती ज्या माणसाची होती त्याची लांब शुभ्र दाढी होती आणि म्हणूनच बहुदा त्याला सर्वजण बुवा म्हणायचे.. त्याचे खरं नाव काय कोणालाही माहित नाही.. आमच्या मित्रांच्या मते आम्ही त्याला खूप त्रास द्यायचो पण माझ्या मते शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला तसे वाटत असले तरी त्या माणसाला त्याची सवय होती.. तो न चिडता अत्यंत शांत, निर्विकार बसलेला असे.. आम्ही त्याकडे डिसेक्शन बॉक्स, कोल्हापुरी साडी आणि असेच तद्दन काहीही मागायचो.. आमच्या वर्गातील एका मुलाने तर त्याला चिठ्ठी नेऊन दिली की आम्ही सीआयडी ची माणसं आहोत, दुकान ताबडतोब खाली कर.. त्या बुवाचं नंतर काय झालं, तो कुठे गेला काही माहित नाही; पण त्याचा चेहरा मला अजूनही स्पष्ट आठवतो..

मी पाचवी पर्यंत शाळेत स्कुल बसने जायचो-यायचो.. नंतर मग बिल्डिंगमधील काही सिनियर मुलांबरोबर चालत जायचो.. मला रोज १० पैसे मिळायचे की जर बेस्ट बसने यावंसं वाटलं तर.. ते मी ६ दिवस जमा करायचो, मग शनिवारी आईकडून १५-२० पैसे घ्यायचे आणि मग काय? पार्टी.. शनिवारी सकाळी शाळा सुटल्यावर २५ पैशात शाळेतील संजूच्या कँटीन मधील किंवा रवि वसईकरच्या स्टॉल वरील वडा पाव आणि ५० पैशाचा कोकाकोला.. बस्स, त्यावेळी ते स्वर्गसुख वाटायचं..

मुंबईत १९७२ साली टीव्ही चे पदार्पण झाले तरी पहिली अनेक वर्षे, आमची माती आमची माणसे, कामगार विश्व अशा तऱ्हेचे मुलांना न समजणारे कार्यक्रमच जास्त असायचे.. बरं बाकी मनोरंजनाची साधने कुठचीच उपलब्ध नव्हती त्यामुळे एकत्र भरपूर खेळणे हा एकच कार्यक्रम असायचा.. आणि सगळे खेळ ही कसे? तर बिना खर्चिक.. लगोरी, विटी दांडू, भोवरा, गोट्या, आबाधाबी, आईसपाईस, खराब टायरच्या रबरी रिंग्स, खांब खांब वगैरे वगैरे.. सगळे आठवत पण नाहीत आता.. बरं छंद कसले तर बसची तिकिटे, रिकाम्या काडेपेट्या, रिकामी सिगारेटची पाकिटे गोळा करणे आणि नंतर ती एकमेकांशी exchange करणे.. घरून थोडेफार पैसे मिळाले तर चांगल्या प्रतीचा मांजा आणून पतंग उडवणे..

दादर चौपाटी ही या परिसराची खरी शान होती.. अगदी हिंदुजा हॉस्पिटलच्या मागपासून ते पार अगदी स्मशानाच्या पलीकडे पर्यंत चालत जाणे हा एक मस्त अनुभव होता.. ओहोटीच्या वेळी तर पाणी इतके मागे जायचे की वाटायचं की चालत गेलो तर बांद्र्याच्या लँड्स ऐंडला असेच पोहोचू.. आता तर समुद्राचे पाणी इतकं वाढलं आहे की चौपाटी फक्त नावालाच राहिली आहे.. दादरच्या चौपाटीची भेळ ही अगदी गिरगाव एवढी नाही तर खूप प्रसिद्ध होती.. लहानपणी एका गोष्टीचं मात्र कायम हसायला यायचं ते म्हणजे भेळपुरीच्या गाडीचे नाव.. काय असावे तर "हुं सच्चा गांडा भेळपुरीवाला"..

त्यावेळी मेजवानी म्हणजे काय तर चौपाटीची भेळ, पाणीपुरी, शेवपुरी आणि नंतर एक तर मँगो - रास्बेरी ड्युएट आईसक्रीम किंवा हरी निवासाच्या कोपऱ्यावरील कुल्फी.. त्यातून कधी चुकूनमाकून शेटे अँड सन्स मधील मटण पॅटिस मिळाले तर मग काय परमानंद..

आणि एक गोष्ट कधीही विसरली जाऊ शकत नाही म्हणजे कलकत्ता कन्फेक्शरीचा फ्लॅग अल्बम.. त्यांच्या च्युईंग गम रॅपर्स मधून साधारणपणे १३२ देशांचे फ्लॅग जमा करायचे.. अल्बम पूर्ण झाला की तुमच्या नावाची व्हिसिटींग कार्ड्स आणि पुस्तकावर लावायची लेबल्स मिळायची.. ते फ्लॅग्स एकत्र करण्याची जी आम्ही धडपड करायचो ती आठवली की अजूनही हसायला येते.. वो भी क्या दिन थे!! लहानपण देगा देवा अशी कितीही आळवणी केली तरी ते दिवस कधीही परत येणार नाहीत..

शाळेच्या शेवटच्या १-२ वर्षात जी सिनेमाची आवड लागली तर आजपर्यंत टिकून आहे.. त्यामुळे आता पुढच्या लेखात या भागातील थिएटर्स बद्दल बोलणे भाग आहे..

थोडा सब्र करो; सब्र का फल मिठा होता है!

यशवंत मराठे

#shivajipark #memories #Balmohan #CalcuttaConfectionary

Leave a comment



Dilip Patwardhan

7 years ago

यशवंत सुरेख. “बर्फाचा गोळा ते सागरी सेतू” तिनही लेख अप्रतीम. माझे मुंबईत बालपण गेले नसले तरी शाळेतल्या आठवणी जागृत झाल्या. फार खर्चीक खेळ, आवडी निवडी नसल्या, तरी आपण सुखात होतो. छोट्या छोट्या गोष्टिंचे अप्रुप होते. चैन आणि गरज यांच्यातले अंतर खुप होते आणि सुख या दोन्ही पलिकडे होते.

राजन हाटे

7 years ago

मी दादरकर नसलो तरी परळकर आहे आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी दादर चौपाटीची निगडीत आहेत. माझी मुलगी शाळेत जाईपर्यंत दादरची चौपाटी शाबूत होती आता दादरचे चौपाटी पाहिल्यानंतर उद्विग्न व्हायला होते . तरीही तुझे लिखाण वाचून मी नॉस्टॅल्जिक झालो आहे त्याबद्दल धन्यवाद

सतीश धारप

7 years ago

Yashwant, superb. तुझा लेख वाचल्यावर एक गोष्ट परत प्रकर्षाने जाणवली.अत्यंत कमी पैशातही आपण किती सुखी व मजेत असायचो.लेख फारच सुंदर। सर्व जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या.

Shubhada jahagirdar

7 years ago

Yashwant !
👌👌👌 You are reminding me of our citizen days. Playing Holi by beach, Ganpati processions on the beach . Getting wet during high tide, Bal mohan school' s Bal din's celebration by going around shivaji park in row of three girls or boys. And return home with sugarcane stick. I remember nutan 's song " Bachpan ke din bhula na dena ........

Yeshwant Marathe

7 years ago

Planning to write a snippet about Citizen also.. Let’s see how it fans out..

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS