मुंबईचा एक शिल्पकार

आज मुंबई भारतातील सर्वात अत्याधुनिक शहर आहे. मुंबईचे शिल्पकार कोण असा प्रश्न विचारला तर साहजिकच काही ब्रिटिश अधिकारी, आर्किटेक्टस यांची नावे प्रथम घेतली जातात. परंतु त्यांच्याबरोबरच काही भारतीय देखील होते ज्यांचा दूरदृष्टीपणा आणि दानशूरपणा मुंबईला मोठं करून गेला. जमशेदजी जिजिबॉय, डेव्हिड ससून, जगन्नाथ शंकरशेठ, कावसजी जहांगीर, दोराबजी टाटा, जमशेदजी टाटा, भाऊ दाजी ही त्यातील काही वानगीदाखल नावे.
 
परंतु यांच्याएवढी प्रसिद्ध नसलेली एक व्यक्ती म्हणजे फ्रामजी कावसजी बानजी.
 
आज मुंबईत हिरवळ दिसणे आणि ती टिकून राहणे हेच दुरापास्त झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मुंबईतील बहुतेक ठिकाणी जंगले होती असे सांगितले तर पटकन विश्वास बसणार नाही.
 
 
 
 
आज मुंबईमध्ये आयटी इंडस्ट्रीची राजधानी कुठली विचारली तर हमखास पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल. अतिशय पॉश आणि चकाचक एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्याचे मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख आणखी पक्की झाली आहे. परंतु एकेकाळी हे देखील संपूर्ण जंगल होते.
 
गोष्ट आहे 1799 ची जेव्हा ब्रिटीश तेव्हा मुंबईत स्थिरावले होते. त्यांनी रस्ते बांधले, बाजारपेठ उभी केली. कुलाबा ते परळ हा भाग शहर म्हणून ओळख जाऊ लागला. मात्र परळच्या पुढे सायन पर्यन्तचा माग मागासलेला होता कारण सर्वत्र जंगलवजा खेडी होती. हा भाग विकसित करण्यासाठी ब्रिटिशांनी एक पद्धत शोधुन काढली होती आणि ती म्हणजे गावे आणि आसपासची जंगले लीजवर द्यायची.
 
त्यांनी पवई आणि त्याच्याजवळचा भाग स्कॉट नावाच्या ब्रिटीश डॉक्टरला भाड्याने दिला होता. वार्षिक भाडं होत 3200 रुपये. डॉक्टर एकदम साधेसुधे होते; खूप महत्वाकांक्षी नव्हते. पवईच्या जंगलातून मिळेल तेवढे उत्पन्न काढायचं एवढच त्यांचं ध्येय. आजारी पडल्यावर ते इंग्लंडला गेले. त्यांच्यानंतर या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही या जागेवर दावा केला नाही. अनेक वर्ष ही जागा पडीक राहिली. अखेर 1829 मध्ये पवईचे नशीब फिरले. फ्रामजी कावसजी बानजी नावाच्या पारसी माणसाने सरकारकडे अर्ज केला की पवई आणि परिसर लीजवर मिळावा.
 
तेंव्हाचा मुबईचा कलेक्टर जॉर्ज गिल्बर हा खूप धूर्त होता. त्याने सरकारला पवई भाडेतत्त्वावर देण्याची गरज नसल्याचे दाखवत फ्रामजी कडून लीजची रक्कम वाढवून घेतली आणि काही अटी घातल्या. त्या अटी देखील काहीशा जाचक होत्या. दहा वर्षाच्या अवधीसाठी पवई भाड्याने मिळेल पण या काळात तिथे विहिरी, तलाव, पिण्याचे पाणी याची सोय करायची. तिथे दारू बनवली तर लोकल लोकांनाच विकायची. जंगल साफ करून शेती योग्य बनवायची वगैरे.
 
फ्रामजी कावसजी या सगळ्या अटीसाठी एका पायावर तयार झाले आणि लवकरच ते पवईचे मालक बनले.
 
त्यांनी खतं वापरून जमीन कसायला सुरवात केली. दरवर्षी एक याप्रमाणे 10 विहिरी बांधल्या. गावात धर्मशाळा उभारली, तलाव दुरुस्त केले. थोड्याच दिवसात त्याने इंग्रज सरकारकडून आणखी आसपासची गावे मागून घेतली. ब्रिटिशांनी फ्रामजीला ज्या अटी घातल्या होत्या त्यामुळे त्यांना जमिनीचा पैसा तर मिळतच होता शिवाय गावाचा विकास होऊन तिथल्या जनतेचा आशीर्वाद देखील मिळत होता. त्यामुळे याचा विचार करून त्यांनी फ्रामजीचा अर्ज मंजूर केला. 
 
 
आज लोक मुंबईत स्क्वेअरफुटात घरे घेतात पण मुंबईची वाढती लोकसंख्या बघता काही काळानंतर स्क्वेअर सेंटीमीटरवर पण घरं घ्यायची वेळ येईल. अशा या मुंबईत 1835 च्या आसपास फ्रामजी हा पवई ते साकीनका, चांदिवली, विक्रोळी अशा महाप्रचंड भागाचा एकुलता एक मालक होता. फ्रामजी अतिशय धूर्त आणि धोरणी होता. त्याला माहित होते की जर जास्त मेहनत केली नाही तर पवईची मालकी त्याला परवडणार नाही. म्हणून मग त्याने एक शक्कल लढवली.
 
पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमी रोपे लावली. अवघ्या तीन वर्षात ही रोपे बहरून आली. त्याला आंबे लगडू लागले. बॉम्बे मँगो या नावाने ते ब्रिटीश अधिकाऱ्यांच्यात फेमस देखील झाले. फ्रामजी कावसजीने तुफान पैसा छापला. इंग्रज पवईच्या आंब्यासाठी वेडे झाले होते. त्याच्या आंब्याची चर्चा इंग्लंडपर्यंत पोचली होती. फ्रामजीकडे व्यापारी डोकं सुद्धा होतं. आपले आंबे देशातून बाहेर गेले तर जास्त पैसे कमवता येईल याची खुणगाठ त्याने बांधली होती, पण असे आंबे परदेशात विकणे सोपे नव्हते. भारत पारतंत्र्यात होता आणि कोणतीही गोष्ट करायची झाली तर शेकडो नियम पार करावे लागायचे. फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात ती करंडी नेऊन ठेवली. ते आंबे जगातील सर्वात मोठया साम्राज्याच्या व्हिक्टोरिया राणी करता होते.
 
 
 
 
18 मे 1838 रोजी भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले. असं म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागलीच होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली. व्हिक्टोरिया राणीमुळे भारतीय आंब्याला परदेशी मार्केट खुले झाले. आजही कोकणचे हापूस आंबे जगावर राज्य करतात याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बानजी !
 
फ्रामजी कावसजी फक्त आंब्यावर थांबला नाही. आज जिथे सिमेंटची जंगले आहेत त्या पवईमध्ये फ्रामजीने उसापासून ते सफरचंदापर्यंत अनेक गोष्टीचं उत्पादन घेतलं. त्याने पवईमध्ये मलबेरीची झाडे लावली, तिथे रेशीम उत्पादन सुरु केले, ऊस लावला. त्या उसापासून साखर निर्मितीसाठी छोटा कारखाना देखील सुरु केला. उसाच्या मळीपासून दारू देखील गाळली जाऊ लागली.
 
पुढे वय वाढलं तशी फ्रामजीला विरक्ती वृत्ती आली. पैसा कमवण्यापेक्षा मुंबईतील लोकांचं जगणं कसं सुसह्य होईल याचा तो विचार करू लागला. त्यानेच मुंबईमध्ये पहिली पाईपलाईन टाकली. फ्रामजीने मुगभाटवाडीमध्ये एका मैदानात तीन मोठ्या विहिरी बनवल्या, त्यातून पाणी खेचण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा पंप लावला. शिवाय बैलांना ओढण्यासाठी चारचाकी गाडीही कामाला लावली.
 
गिरगावला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले. तोपर्यंत मुंबईकरांना पाईपलाईन हा शब्दही माहित नव्हता. इंग्रजांना जे जमलं नव्हतं ते फ्रामजीने केलं. त्याला तब्बल 30000 रुपये खर्च आला. आजच्या काळात त्याची किंमत काढली तर कोट्यवधी रुपये होतील. पण फ्रामजीने मागेपुढे पाहिलं नाही. त्यानेच मुंबईमध्ये गॅस बत्तीची सोय केली.
 
त्याच्या या कार्याच्या स्मरणार्थ मुंबईतील धोबीतलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव देण्यात आले.

अशा या मुंबईच्या शिल्पकाराला आणि त्याच्या दूरदृष्टीला सलाम!

 
 
@ यशवंत मराठे
 
 
प्रेरणा: बाबा कदम यांचा लेख

Leave a comment



राजीव नाईक

3 years ago

रोचक माहिती. निरंजन हिरानंदानींना यावरून काही बोध घेतील का?

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS