|| सुखी भव ||

सर्वसाधारणपणे जेव्हा आपण सुखी भव हे शब्द ऐकतो तेव्हा पहिल्यांदा मनात काय विचार येतो? कुणीतरी आपल्या पेक्षा लहान व्यक्तीला आशीर्वाद दिला.

माझी आई लहानपणी नेहमी सांगायची की चांगले जेवण झाले की "अन्नदाता, पाककर्ता, सदाभोक्ता सुखी भव" अशी प्रार्थना करावी. सुरुवातीला वाटायचे की अन्नदाता तर तो जगनियंता आहे तेव्हा त्याच्या सुखाची प्रार्थना करणारे आपण कोण? आईला हा प्रश्न विचारला तेव्हा ती सुद्धा फार समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही, म्हणाली - माझ्या आईने मला शिकवले, जे तुम्हा मुलांना शिकवत आहे. कालांतराने असे वाटले की तो अन्नदाता आपला शेतकरी तर नसेल? आणि जर असेल तर तो सुखी राहणे आपल्या हिताचेच नाही का? आता पाककर्ता म्हणजे आपली आई, बहीण, बायको किंवा समृद्ध घरातील स्वैपाकीण; या सर्व बायका सुखी राहिल्या तर आपले संसार आपोआप सुखी होतील. अखेरीस सदाभोक्ता म्हणजे आपण स्वतः आणि जर प्रत्येक भोक्ता असा सुखी राहिला तर हा समाजच आनंद आणि खुशहाल होईल. या एका पंचाक्षरी प्रार्थनेत किती गहन अर्थ दडलेला आहे याची जाणीव झाली.

आता हा असा आशीर्वाद म्हणा, प्रार्थना म्हणा कोणासाठी असावी असा प्रश्न लगेच मनात येतो. माझ्या कुटुंबासाठी? नातेवाईकांसाठी? मित्रांसाठी? समाजासाठी?

संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली. परंतु आपण सर्व जण सामान्य जन आहोत त्यामुळे आपले जग म्हणजे आपला परीघ, मग तो गावातील पाडा असेल, शहरातील एखादा भाग असेल अथवा वैयक्तिक ओळखीचे वर्तुळ असेल.

असे म्हणतात, की जगातील कितीही मोठा माणूस असो, त्याला वैयक्तिक ओळखणारे पाच हजार लोकांपेक्षा जास्त असत नाहीत कारण आपण ओळखणाऱ्या लोकांच्या परिघाबद्दल बोलतो आहोत. अहो, मी अमिताभ बच्चन यांना ओळखतो असे म्हटले तरी ते मला ओळखतात का? माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा लोकांचा परीघ तर ५००० पेक्षाही कमी असेल. त्यात परत काही आवडणारे, काही न आवडणारे, काहींच्या बाबतीत तटस्थ किंवा उदासीन. आपल्या नातेवाईकांत किंवा कुटुंबात सुद्धा सगळे जण आवडतात असे होत नाही. त्यात देखील काही जणांच्या बाबतीत मनात राग असतो. आपण खूप जणांच्या बाबत असे म्हणतो की त्या व्यक्तीला माझा राग आहे, असूया किंवा हेवा आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. परंतु नीट विचार केला तर याच सर्व भावना आपल्याला देखील बऱ्याच जणांबद्दल असतात. तो समजतो कोण स्वतःला?, मी त्याला चांगली अद्दल घडविणार आहे अशी वाक्ये आपण किती वेळा बोलतो याचा आपणच विचार करावा.

आता मला सांगा, की सुखी भव ही प्रार्थना मी कोणासाठी करेन? माझ्या आवडत्या लोकांसाठी? की वर नमूद केलेल्या सर्व लोकांसाठी? तर साहजिकच उत्तर येईल की आवडत्या लोकांसाठी. पण एक गोष्टीचा विचार करायला हवा की ज्या व्यक्ती मला आवडतात असे मी म्हणतो, त्यांच्याबद्दल मी छातीठोकपणे दावा करू शकतो का की त्याही व्यक्तींना मी आवडतो? कठीण आहे. कारण कशावरून त्यांना तसेच वाटत असेल? त्यामुळे जरी अशा आवडत्या व्यक्तींच्या सुखाची कामना करणे किंवा प्रार्थना करणे सहजगत्या शक्य वाटत असेल तरी देखील जरूर करावी. जर काही त्यांच्या मनात काही किल्मिष असेल तर त्यांच्या सुखी आणि आनंदी होण्याने ते विरघळून जाणे शक्य होऊ शकेल.

आपण ज्यांच्याबद्दल उदासीन अथवा तटस्थ आहोत, त्यांच्याबाबत तरी आपण ही प्रार्थना कशी करावी? या संदर्भात मला एक ऐकलेली परदेशी गोष्ट आठवते.

एक शेतकरी होता जो दरवर्षी उत्कृष्ट प्रतीचा मका पिकवण्याचा पुरस्कार मिळवत असे. एका वर्षी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली तेव्हा त्याला एक अभूतपूर्व गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे तो शेतकरी आपल्या मक्याची बीजे आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना फुकट वाटत असे. तो पत्रकार थक्क झाला आणि त्या शेतकऱ्याला म्हणाला, की ते तुम्ही हे करूच कसे शकता? ते इतर शेतकरी देखील मग त्या स्पर्धेत भाग घेऊन तुमचे प्रतिस्पर्धी होतील याची तुम्हांला भीती वाटत नाही? शेतकरी हसून म्हणाला, “तुम्हाला माहिती नाहीये की वाऱ्यामुळे पिकणार्‍या मक्यामधून परागकण आजूबाजूच्या सर्व शेतात स्थिरावतात. जर माझ्या शेजार्‍यांनी निकृष्ट दर्जाचा मका पिकवला तर cross pollination मुळे माझ्या मक्याची गुणवत्ता पण हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे जर मला चांगले धान्य पिकवायचे असेल तर मी माझ्या शेजार्‍यांना चांगली धान्य पिकवण्यासाठी मदत केली पाहिजे.”

त्यामुळे कळीचा प्रश्न म्हणजे आपण आपल्या स्पर्धकांसाठी अथवा नावडत्या व्यक्तींसाठी अशी प्रार्थना करू शकू का? एक विचार करा की जी व्यक्ती आपल्याला अत्यंत नावडती आहे की जिचा आपण मनापासून द्वेष करतो, त्यामुळे साहजिकच तिलाही आपल्याबद्दल अशाच भावना असणार. राग, असूया, हेवा, मत्सर, द्वेष या भावना, दुसऱ्याकडे आहे पण माझ्याकडे नाही, या विचारातून उगम पावतात. आता ती व्यक्ती जर सुखी आणि समाधानी असेल तर काय होईल? कदाचित त्यांच्या या भावना गळून पडायला मदत होईल.

आता आपण आपल्या सगळ्यांच्या मनात असलेली एक गोष्ट घेऊया. आज भारताचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? याचे सर्वानुमते उत्तर पाकिस्तान असेच येईल. त्यांच्या नजरेतून विचार केला तर वर नमूद केलेल्या सर्व भावना त्यांना भारताबद्दल आहेत कारण त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड आहे. परंतु सामान्य भारतीयांची काय भावना असते? त्या पाकिस्तानची वाट लावा, त्यांना संपवून टाका, हा प्रश्न कायमचा निकाली काढा. बोलण्याइतके इतके ते सोपे आहे का? त्यापेक्षा आपण सर्व भारतीयांनी अशी प्रार्थना केली की आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान अत्यंत सबल होवो आणि त्यांचे सगळे चांगले होवो आणि ती प्रार्थना जर खरंच फळाला आली तर आपल्या दोन्ही देशातील वितुष्ट संपुष्टात येईल? कदाचित नाही येणार कारण आर्थिक सुबत्तेबरोबरच त्यांची मानसिकता पण बदलण्याची गरज आहे. श्रीमंत देश म्हणजे आनंद आणि शांतता असे होत नाही. आज आखाती देशात आर्थिक सुबत्ता असली तरी त्यांच्याकडे देखील प्रचंड अशांतता आणि असंतोष आहे. आता प्रार्थनेने मानसिकता कशी बदलणार? तेव्हा लक्षात येतं की संत ज्ञानेश्वर "जे खळांची व्यंकटी सांडो तयां सत्कर्मीं रती वाढो भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचें" असं का म्हणाले असतील कारण त्यांना माहित होतं की या भूतलावरून दुष्ट नाहीसे होणार नाही म्हणून त्यांनी दुष्टांमधील दुष्टपणा नाहीसा होवो असे साकडे घातले.

आज पाकिस्तानकडे काही नाही म्हणून ते अतिरेकींना पाठींबा देत असतील पण त्यांनाही याची कल्पना असेलच की अतिरेकी हे दुधारी शस्त्र आहे आणि ते त्यांच्याच वर उलटू शकते. आपण एवढीच इच्छा करू शकतो की जर त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर आजची परिस्थिती निवळायला मदत होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानचे भले होण्यातच आपल्या देशाचे भले आहे. आपल्या शत्रूच्या सुखाची प्रार्थना करणे यात दूरगामी आपलाच स्वार्थ आहे; तो परमार्थ अजिबात नाही.

नीट विचार केला तर जगातील कुठचीच गोष्ट परमार्थ नाही, सुप्त असेल पण अशा प्रत्येक गोष्टीत कोणाचा तरी काहीतरी स्वार्थ हा दडलेलाच असतो.

हे सर्व झाले तर इतरांबद्दल प्रार्थना करण्यामुळे त्यांच्या आचार आणि विचारात फरक पडेल. पण आपल्यातील बदल घडण्यासाठी आपण दुसऱ्या कोणी आपल्यासाठी प्रार्थना करण्याची वाट बघणार की स्वतःच तो बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार?

ज्यांना अर्थपूर्ण आणि चांगले जीवन जगायचे आहे त्यांनी इतरांचे जीवन समृद्ध करण्यास मदत केली पाहिजे, कारण एखाद्या जीवनाचे मूल्य आपण किती लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकलो या द्वारे मोजले जाते. तसेच ज्यांनी आनंदी होणे निवडले आहे त्यांनी इतरांना आनंद शोधण्यास मदत केली पाहिजे कारण प्रत्येकाच्या कल्याणानेच समाज समृद्ध होईल आणि त्यातच भले आहे.

सुखी भव

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Prayer #Pakistan #सुख #आशीर्वाद #प्रार्थना

Leave a comment



Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS