हिंदू धर्म अजून जिवंत कसा?

मध्य आशियाई देशांची काही उदाहरणे पाहिल्यास असे दिसते की, 100 वर्षापेक्षा कमी कलावधीत बर्‍याच राष्ट्रांचे इस्लामीकरण झाले. इराण हा मूळचा एक झोराष्ट्रीयन देश; त्याचप्रमाणे सुमारे 9 व्या शतकापर्यंत अफगाणिस्तानात बौद्ध आणि हिंदू राजांची राजवट होती परंतु लवकरच त्यांचा समूळ नाश झाला. ससॅनियन सल्तनतच्या काळात इस्लामच्या आक्रमणामुळे पर्शियात झोराष्ट्रियन धर्माचा ऱ्हास सतत सुरू होता. तेथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे घडून येण्याचे कारण तिथले अमीर आणि उमराव होते. जेव्हा अमीर उमरावांनी इस्लाम धर्म स्वीकारला, तेव्हा रयतसुद्धा आपसूकच त्या धर्माकडे वळली.

 

झोराष्ट्रियन हा धर्मग्रंथ प्रमाण मानणारा धर्म आहे. ग्रंथनिष्ठ धर्माची समस्या अशी असते की जर एखादा चांगला युक्तिवाद सादर केला गेला तर लोकं इतर ग्रंथाकडे आकर्षित होतात. ह्यामुळेच, मुस्लिम धर्मगुरूंना इतके यश मिळाले.

 

परंतु मला नेहमी एका गोष्टीचे आश्चर्य वाटत आले आहे आणि ते म्हणजे मुस्लिम आक्रमणकर्ते आणि त्यानंतर ब्रिटीश साम्राज्याने जवळजवळ 750 वर्ष राज्य करूनही भारत देश हिंदुबहुल कसा काय राहिला? या देशातील हिंदूंना ते मुसलमान अथवा ख्रिश्चन का बनवू शकले नाहीत? इतिहासाचा मागोवा घेतला तर असेही लक्षात येते की ख्रिस्तपूर्व 232 ते 268 या काळात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत, बौद्ध धर्म फोफावत असतानाही हिंदू धर्म टिकून राहिला. याचं रहस्य काय असावं ? काय कारणं असावीत? हिंदूंचे असे काय वेगळेपण होतं?

 

भौगोलिक परिस्थिती:

भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचे आगमन, व्यापार उदिमामुळे मलबारच्या किनारी प्रदेशात झाले. हे भूभाग काबीज करणे आणि त्यावर शासन करणे सोपे होते त्यामुळे अरब व्यापार्‍यांच्या संपर्कात आलेल्यांचे धर्मांतर होणे फार कठीण झाले नसावे. परंतु इतर भूप्रदेशांवर आक्रमण करणे आणि नंतर नियंत्रण ठेवणे खूप कठीण होते. म्हणूनच बहुसंख्य मुस्लिम आपल्याला भारतीय उपखंडाच्या मैदानी भागात आणि किनारपट्टीच्या प्रदेशात आढळतात.

 

सांस्कृतिक तफावत:

इस्लामच्या प्रसाराला भारतात खूप कमी यश मिळण्याचे कारण म्हणजे भारतीयांच्या हिंदू धर्माविषयीच्या खोलवर रुजलेल्या भावना. हिंदु कोणत्याही एका विशिष्ट ग्रंथास प्रमाण मानत नाहीत, त्यांची पोथ्या, पुराणे, ग्रंथ हे आदर्श जीवनपद्धती कशी असावी हे सांगतात. ईश्वर निंदा ही संकल्पना गुन्हा मानली जात नव्हती. त्यात फक्त निसर्गाविरूद्ध जाऊ नये म्हणून सावध केले आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मगुरुंना लक्षात आले की भारत ही श्रद्धा, भक्ती, ध्यान, वैराग्य ह्यांच्याकडे ओढा असलेली गुढरम्य भूमी आहे. त्यामुळेच कदाचित फक्त इस्लामिक सुफी पंथ हिंदूंना आकर्षित करू शकला आणि काही लोकांना इस्लामचा स्वीकार करविण्यास ते यशस्वी ठरले. इस्लामचा हा पंथ सर्वसमावेशक असल्याने, धर्मांतरितांना त्यांची हिंदू ओळख त्यागण्यास बळजबरी नव्हती. हिंदू आडनाव असणारे बरेच मुस्लिम संपूर्ण हिंदुस्थानात आजही आढळतात. बळजबरीने धर्मांतरे झाली नाहीत असे अजिबात नाही परंतु त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी होते.

 

कडवा प्रतिकार:

भारतीय राज्यकर्ते युद्धात जरी पराभूत झाले तरी प्राचीन हिंदू संस्कृतीमुळे इस्लामचा स्वीकार करणे मात्र त्यांनी कधीच मान्य केले नाही. क्वचितच कोणी भारतीय राजे असतील ज्यांनी इस्लामचा प्रतिकार अजिबात केला नाही. आपल्या राजाने गुडघे टेकले नाहीत, हे पाहून प्रजेनेही तोच कित्ता गिरवला. हिंदू धर्मात कर्मकांडाचे प्राबल्य आणि पगडा होता त्यामुळे जेव्हा त्यांना कोणी कर्मकांड सोडून देण्यास भाग पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंदू राजांना तो आपला अपमान वाटला. मुस्लिमाशी पाट लावण्यापेक्षा हिंदु स्त्रियांनी जोहार करणे पत्करले.

 

सांस्कृतिक वारसा:

मुसलमानांना हिंदूच्या देवाची संकल्पनेची नीट जाणीव नव्हती. त्यांना मूर्तीपूजेविषयी माहित होते, परंतु हिंदू केवळ मूर्तीचीच उपासना करत नव्हते तर, ते निसर्गातील विविध रूपांची, शक्तींची आराधना करत होते. जेव्हा मुर्त्या फोडल्या गेल्या तेव्हा हिंदूंनी झाडांची पुजा, प्रार्थना केली.

मुस्लिम किंवा ब्रिटीश राजवटीतही खाद्यपदार्थ, कपडे, सण, सांस्कृतिक उपक्रम हे पिढ्यानपिढ्या बदललेच नाहीत. तांदूळ, चपाती हे प्रमुख अन्न तसेच टिकून राहिले. तसेच संपूर्ण भारतात नवरात्र, गणेश चतुर्थी, दीपावली, संक्रांती, महाशिवरात्री, कृष्ण जन्माष्टमी सण दोन हजार वर्षांपूर्वी जसे साजरे केले जात त्यात कधीच बदल घडला नाही.

 

परकीय राजवटीत हिंदू धर्म टिकून राहिला त्यामागे इतरही काही घटकांचा समावेश होता:

 

मुस्लिम राजवट ही बहुतांश उत्तर भारतापुरती मर्यादित होती:

दिल्ली सल्तनत तसेच मुघल हे दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य करीत होते. राजधानी जवळ असलेल्या राज्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे होते परंतु बिहार व बंगाल सारख्या दूरवरच्या राज्यात नियंत्रण ठेवणे अवघड होते. मुस्लिम राज्यकर्त्यांना या राज्यांशी सततची युद्धे करावी लागली आणि ईशान्य पूर्वेकडील प्रदेश मुस्लिम राजवटीपासून लांबच राहिला. मुस्लिम राज्यकर्त्यांनी जेव्हा जेव्हा ईशान्य पूर्वेकडील प्रदेशांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा दारुण पराभव झाला. दक्षिण भारतात मुसलमानांचे वर्चस्व क्वचितच होते. दिल्ली सल्तनत उत्तरेत राज्य करीत असताना दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य भरभराटीला आले होते. दिल्लीच्या अगदी जवळ असल्यामुळे रजपुतांनी मुस्लिम राजवटीचे मांडलिकत्व पत्करले असेल पण आपला धार्मिक वारसा न सोडण्याकरिता धैर्याने प्रतिकार केला. माळवा आणि गुजरात प्रांतातूनही काही प्रमाणात प्रतिकार झाला. मराठा साम्राज्य ही तर मोगलांसाठी कायमची डोकेदुखी होती.

 

विकेंद्रित राजवट:

मुस्लिम राज्यकर्ते असोत वा ब्रिटीश, त्यांच्यापैकी कोणीही भारतावर थेट अमंल गाजवू शकले नाहीत. राज्यकारभार हा मुस्लिम शासकांच्या अंकित मांडलिक राजांकडुन केला जाई, जे बहुतांश हिंदू होते. त्यावेळच्या मर्यादित सोयी सुविधा, दळणवळणाची अपुरी साधने यामुळे हे करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे प्रजेवर थेट मोगल किंवा ब्रिटिशांचा अंमल नव्हता. मुस्लिम राज्यकर्ते तसेच ब्रिटिश साम्राज्य यांना येथे राज्य करुन संपत्ती मिळवण्यात जास्त रस होता. जिंकलेली बहुतेक राज्ये अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणली गेली. याचा अर्थ असा होता की राज्यकारभार तिथला स्थानिक राजाच पाही, परंतु त्याला दिल्लीच्या पातशाहला वार्षिक खंडणी द्यावी लागत असे व गरज पडेल तेव्हा सैन्यबळ पुरवावे लागे. प्रजेच्या कल्याणाची जबाबदारी पूर्णपणे स्थानिक सत्ताधार्‍यांवर सोपवली गेली. यामुळे हिंदूंना आपले जीवन पूर्वीप्रमाणे जगता आले.

 

धर्म आणि राजकारण यांचे विलगीकरण:

प्रारंभीचे मुस्लिम आक्रमणकर्ते हे कट्टर धर्मांध होते आणि त्यांनी स्थानिक प्रजेचे सक्तीने किंवा बळजबरीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांच्या लक्षात आले की या विशाल भूमीत वेगवेगळ्या जमाती असल्या तरी त्यांच्यातील हिंदू संस्कृती समान सूत्रात बांधली गेली आहे. म्हणूनच दिल्ली सल्तनत तसेच मुघल साम्राज्य या दोघांनाही भारत हे प्रामुख्याने हिंदू राज्य आहे या गोष्टीचा स्वीकार करावा लागला आणि त्यामुळे राजकारण आणि धर्म ह्यांची सरमिसळ करणे हे कालांतराने धोकादायक ठरू शकते याची जाणीव झाली. त्यांच्या हेही लक्षात आले की जरी सर्वसामान्य लोक अशिक्षित असले तरी एकंदरीत भारतीय समाज मध्य आशियाई देशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुसंस्कृत होता. आपण भारतातील जाती व्यवस्थेबद्दल खूप दुराग्रहाने बोलतो, आणि जे काही अंशी बरोबर देखील आहे परंतु सामूहिक धर्मांतरण न घडण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलेला घटक म्हणजे भारतात प्रचलित असलेली जाती व्यवस्था.

जिझिया (स्वधर्माचे पालन करण्यासाठी हिंदूंना द्यावा लागणारा कर) आणि तीर्थयात्रा करणार्‍यांवर लादला जाणारा कर हे जरी जुलमी असले तरी हिंदूंचे अस्तित्व पुसून टाकण्याऐवढी ताकद त्यांच्यात नव्हती. बर्‍याच राज्यकर्त्यांनी जरी नवीन मंदिरे बांधण्यास बंदी घातली, तरी जुन्या मंदिरांचे अस्तित्व राखण्यास व जीर्णोद्धार करण्यास आडकाठी केली गेली नाही. सक्तीची धर्मांतरे निश्चितपणे झाली पण युद्धाच्या वेळी. राजकारणात धर्माची पाळेमुळे खोलवर रुजवणारा औरंगजेब हा पहिला मुघल शासक होता आणि मुघल साम्राज्याच्या ऱ्हासास ते एक प्रमुख कारण होते.

 

भक्ती चळवळ:

हिंदू धर्म टिकवून ठेवण्यात सर्व प्रदेशातील संतांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्यापासून आक्रमणाचा कोणताही धोका नसल्यामुळे राज्यकर्त्यांनीही त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळेच हिंदूंना भक्ती मार्गाकडे वळवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ते बजावू शकले. भक्ती चळवळ दडपली जाऊ शकली नाही आणि कालांतराने सुफी संतही हिंदू भजने गाऊ लागले. वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण आणि महाभारताच्या कथा अनेक प्रदेश, संस्कृती, भाषा यातून तरल्या. संगीत हे हिंदूच्या भ‍क्तीमार्गाचे एक प्रमुख अंग बनले होते. जेव्हा जेव्हा हिंदू धर्माची हानी झाली तेव्हा तेव्हा जयदेवच्या गीत गोविंद आणि मीराबाई ह्यांच्या भजनांनी हिंदू धर्माला नवसंजीवनी प्राप्त झाली.

भक्ती चळवळीचा उदय सातव्या शतकात दक्षिण भारतात झाला आणि तेथून तिचा प्रसार उत्तरेकडे झाला. 15 व्या शतकानंतर तिचे लोण पूर्व आणि उत्तर भारतात पसरले आणि 17 व्या शतकात ती परमोच्च स्थानी पोहोचली. आणि तोच भारतातील मुस्लिम राजवटीच्या उन्नतीचा काळ होता.

 

या चळवळीतील काही प्रमुख नावे:

    जयदेव (जन्म, ईसवी सन 1170) – ‘गीत गोविंद’ ह्या महाकाव्याची निर्मिती.
    पुरंदरदास (1484–1564) - कर्नाटक संगीताचा पितामह म्हणून सार्वत्रिक उल्लेख केला जातो.
    मीराबाई (1498-1546) – भक्ती मार्गातील संत कवयित्री म्हणून मोठा लौकिक प्राप्त.
    कबीर (15 वे शतक) – निर्माण केलेल्या भक्ती रचनांचा, भक्ती चळवळीवर मोठा प्रभाव.
    तुलसीदास (1532-11623) – ‘रामचरितमानस’ या महाकाव्याचे लेखक.
    सूरदास (16 वे शतक) - अंध कवी आणि गायक, कृष्ण स्तुतीपर लिहिलेली भक्ती गीते.
    क्षेत्रय्या(1600–1680) – बहुप्रसव तेलुगु कवी आणि कर्नाटक संगीताचे रचनाकार.
    कांचर्ला गोपन्ना (1620 –1680) - भक्त रामदासू म्हणून लोकप्रिय.
    बाम्मेरा पोथन्ना (1450-1515) - भागवत पुराणाचे  तेलुगूत भाषांतर केले.

पाचव्या ते दहाव्या शतकापर्यंत नयनार आणि अलवार ह्या तामिळ संतकवींच्या गटांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. नयनार हे शिवभक्त तर अलवार हे विष्णुभक्त. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व जाती जमातींचे लोक या गटांमध्ये सहभागी होते.

 

 

महाराष्ट्राला तर संत ज्ञानेश्वरांपासून (1275-1296) थोर संतांची परंपरा लाभली होती. संत नामदेव (1270-1350), संत एकनाथ (1533-1599), संत तुकाराम (17 वे शतक), रामदास स्वामी (1608-1681) हे त्या परंपरेतील काही थोर संत. तुकारामांनी त्यांच्या अभंग आणि कीर्तनाद्वारे वारकरी परंपरेच्या माध्यमातून भक्ती चळवळीचे रूपांतर समाजाभिमुख उपासनेत केले.

 

 

भक्ती चळवळीने बहुतेक मुस्लिमशासित प्रदेशात हिंदु धर्माला बळकटी देण्याची महत्त्वाची भूमिका निभावली.

 

रामायण आणि महाभारत:

ही इतर कोणत्याही महाकाव्यांपेक्षा सर्वात दीर्घ आणि महान काव्ये आहेत. जिथे मुसलमानांचा फारसा प्रभाव नव्हता आणि ब्रिटिशांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, अशा भारतभरातील हजारो गावात, ती अभ्यासली आणि चर्चिली गेली. बहुतेक खेड्यांमध्ये शिव आणि विष्णू मंदिरं आहेत, हिंदू धर्माचे अधिष्ठान अशा अनेक दुर्गम ठिकाणी आहे. महाभारत, रामायण ह्या महाकाव्यांची विविध भाषेत केली गेलेली रुपांतरे हिंदू धर्म टिकवून ठेवण्यात खूप परिणामकारक ठरली.

आदिकवी पंपांनी 10 व्या शतकात कन्नडमध्ये महाभारताचा अनुवाद केला. अतुकुरी मोल्ला (1440–1530) ह्या तेलुगु कवीने तेलुगु भाषेत रामायणाची रचना केली. तुलसीदास यांनी अवधी मध्ये रामायण लिहिले. रामायण भारताबाहेर बर्मा, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलीपिन्स, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम आणि चीन या अनेक आशियाई देशांमध्ये पोहोचले. मूळ वाल्मिकींनी लिहिलेल्या संहितेत अनेक फेरफार केले गेले तसेच वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये ती अनुवादीत केली गेली, ज्यात बहुतेक वेळा विषयनिष्ठ साजेसे बदल तसेच अनपेक्षित वळण देणार्‍या प्रसंगांचा अंतर्भाव केला गेला आहे. मूळ रामायण कथेच्या केल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या रूपांतरांमध्ये 12 व्या शतकातील तमिळ भाषेतील रामावताराम, 14 व्या शतकातील तेलगू भाषेतील श्री रंगनाथ रामायणम, कंबोडियातील ख्मेर रॅमकर, पुरातन जावा मधील काकाविन रामायण, थाई रामाकियन, लाओ फ्रा लक फ्रा लाम, बर्मी यमा झटदाव यांचा समावेश आहे.

 

संख्याबळ:

आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक मुस्लिम व्यक्तीच्या मागे हिंदूंची संख्या शंभराहून अधिक होती. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात फारसे बदल घडले नव्हते. दक्षिण भारताच्या वाट्याला एक दोन अपवाद वगळता मुस्लिम राजांच्या अत्याचारांनी भरडले जाण्याची वेळ आली नाही आणि जेव्हा आली तेव्हा ते लवकरच सावरुन पूर्ववतही झाले.

 


वर्चस्व झुगारुन दिलेला लढा
:

विजयनगर साम्राज्य: हे हिंदू साम्राज्य कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील आपली अधिसत्ता 400 वर्ष टिकवून मोठ्या धैर्याने असे उभे राहिले की 16 व्या शतकापर्यंत या हिंदू साम्राज्याला टक्कर देण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. 1336 मध्ये हरिहरने विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. त्याचे अवशेष कर्नाटकमधील आजच्या हम्पीच्या परिसरात आहेत. विजयनगर साम्राज्याने दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये एक युग निर्माण केले ज्याने हिंदू धर्माच्या उद्धारासाठी प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून सर्व हिंदूंना एका छ्त्राखाली आणले.

मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड मराठा साम्राज्याची म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापना केली. सर जे.एन. सरकार शिवरायांचे वर्णन करताना म्हणतात की "शिवराय हे राष्ट्र निर्माणाचे विधायक कार्य करणारे, हिंदू वंशांत जन्माला आलेले शेवटचे महान लोकोत्तर पुरुष होत". मराठ्यांनी 1660 च्या दशकात एक सक्षम आरमार विकसित केले आणि बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांवरही नाविक तळ स्थापन केला. ब्रिटीश, पोर्तुगीज, डच आणि सिद्दी यांच्या जहाजांवर हल्ले करून त्यांच्या सागरी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या आकांक्षांना वेसण घातले. सुमारे 1730 च्या दशकापर्यंत मराठा आरमाराचे वर्चस्व राहिले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्य विस्ताराचा परमावधी गाठला गेला असला तरी, त्याच्याच कारकिर्दीत, मराठ्यांनी चिवटपणे लढा चालूच ठेवल्याने त्याला अखेरची घरघर लागली. इतिहासकार सर. जे.एन. सरकार लिहितात, "औरंगजेबाने आता सर्व काही मिळवले असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात सर्व काही गमावले होते." पुढील काळात, 1737 मध्ये मराठा साम्राज्याच्या बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर चाल करुन लूट केली. मराठी साम्राज्य उत्कर्षाच्या शिखरावर असताना दक्षिणेस तामिळनाडू पासून ते पेशावरपर्यंत (आताच्या काळातील खैबर पख्तूनख्वा), उत्तरेकडील पाकिस्तान आणि पूर्वेस बंगाल पर्यंत पसरले होते.

शीख साम्राज्य: भारतीय उपखंडाच्या उत्तर-पश्चिम प्रांतावर शिखांचे राज्य होते. पंजाब प्रदेशाच्या सभोवती वसलेले हे साम्राज्य 1799 to 1849 पर्यंत अस्तित्त्वात होते. महाराजा रणजितसिंग (1780–1839) च्या नेतृत्वाखाली खालसाच्या सिद्धांतावर आधारित शीख साम्राज्याची स्थापना केली गेली. त्यांनी आपले शीख खालसा सैन्य उभे करून त्यांना युरोपियन लष्करी तंत्रामध्ये प्रशिक्षित करून आधुनिक सैनिकी तंत्रज्ञानासह सज्ज केले. रणजित सिंगने आपण स्वत: एक कुशल रणनीतिकार असल्याचे सिद्ध केले होते पण त्याचबरोबर आपल्या सैन्यासाठी कुशल सेनापती पारखून घेतले. त्याने अफगाण सैन्यांला सतत पराभूत करून, अफगाण - शीख युद्धाला यशस्वीरित्या विराम दिला. 19 व्या शतकात यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य पश्चिमेकडील काबुल, खैबर खिंडीपासून उत्तरेला काश्मीरपर्यंत, दक्षिणेत सिंधपर्यंत आणि पूर्वेस सतलज नदीच्या किनारी हिमाचलपर्यंत विस्तारले होते.

 


ब्रिटिश अंमल:

ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ असा उल्लेख केला जाणार्‍या धोरणाचा वापर येथील विविध संस्थाने तसेच सामाजिक आणि धार्मिक गटांमधील वैमनस्य वाढवण्यासाठी केला जात असे. तथापि, त्यांच्या नीतीचा सर्वसामान्य हिंदू धर्मियांवर काहीच परिणाम झाला नाही. ब्रिटीश राज्यसत्तेने, भारतातील बहुतांश प्रांतांमधील कारभार आपल्या हाती घेतला आणि आपले अप्रत्यक्ष प्रभुत्व भारतावर स्थापन केले ज्यात स्थानिक राजघराणी चालवत असलेल्या संस्थानांचा समावेश होता. 1857 नंतर, ब्रिटीश वसाहती राजवटीचे दृढिकरण झाले आणि न्यायालयीन प्रणाली, कायदेशीर प्रक्रिया आणि कायद्यांद्वारे आपल्या पायाभूत घटकांचा विस्तार केला. भारतीय दंड संहिता अस्तित्वात आली. अशा प्रकारे ब्रिटीश राज्यकर्ते संस्थांनांच्या द्वारे भारताचा अफाट भूभाग ताब्यात ठेवून राज्यकारभार करण्यात व्यस्त होते.

 

हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन:

आठव्या शतकात हिंदू धर्मातील सर्वोच्च मानले गेलेले आचार्य आद्य शंकराचार्य यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यावर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली. पुढील काळात संत परंपरेने आणि 19 व्या आणि 20 व्या शतकात सनातन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीने जोर धरल्याने हिंदू धर्म टिकून राहिला.

राजा राममोहन रॉय हे "हिंदू पुनरुज्जीवनाचे जनक" म्हणून ओळखले जातात. याच बरोबर रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, जगदीशचंद्र बोस, सत्येंद्र नाथ बोस, लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, महर्षी कर्वे आणि इतर बरीच महत्त्वाची नावे आहेत.

 

हिंदू धर्माचे भवितव्य:

आज जगात ख्रिश्चन हा सगळ्यात मोठा धर्म असून सुमारे 240 कोटी आणि पंधरा देश त्याला आपला अधिकृत धर्म मानतात. जगातील एक तृतीयांश लोकसंख्या या धर्माची आहे.

 

Christian World

 

इस्लाम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे आणि ज्याची लोकसंख्या 200 कोटी असून सत्तावीस देशात तो अधिकृत धर्म आहे.

Muslim World

 

हिंदू हा जरी 120 कोटींमुळे तिसऱ्या क्रमांकाचा धर्म असला तरी तो फक्त भारत आणि नेपाळ येथेच आहे.

 

Hindu World

 

त्यात परत भारत सर्वधर्मसमभाव मानत असल्यामुळे आजही भारत हे अधिकृत हिंदू राष्ट्र नाही. एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळचाच उल्लेख करावा लागतो. हिंदू धर्म गेल्या दोन हजार वर्षातील घडामोडींना पुरून उरला परंतु आज संपूर्ण जग धार्मिक ज्वालामुखीच्या तोंडावर धुमसत आहे. भविष्यात नक्की काय घडेल याचे भाकीत करणे फार कठीण आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांनी निदान हा धर्म जीवित राहावा एवढा विचार जरी केला तरी या धर्मावर त्यांचे उपकार होतील.

 

Akhand Bharat

 

 

कालाय तस्मै नमः!!

 

© यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Zankar Kulkarni

2 years ago

मुघल पूर्व काळात मुस्लिम नव्हते आणि ते गेल्यावर मुसलमान परत स्वधर्मात का आणले गेले नाहीत, जे हिंदू धर्मात असताना भित्रे होते ते मुस्लिम आचरण करू लागल्यावर इतके कट्टर कसे झाले आणि यावर मार्ग काय?
यावर तुमचे विश्लेषण वाचायला निश्चित आवडेल.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS