काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती: एका १२ वर्षाच्या मुलाची, त्याच्या सायकलचे एका लग्नाच्या वरातीतील गाडीने नुकसान केले. जेव्हा त्याने आपले चाक दुरुस्त करण्यासाठी भरपाई मागितली तेव्हा काय झालं? वरातीतील लोकांना तो त्यांचा अपमान वाटला, त्याला मारहाण केली आणि जवळच असलेल्या शेतात त्याला जाळून ठार मारले. ही कहाणी तेथील प्रादेशिक वर्तमानपत्रात फक्त उल्लेखण्यात आली पण सार्वजनिक उद्रेक अजिबात दिसला नाही. त्यानंतर काही दिवसांनंतर, बोअरवेलमध्ये अडकलेल्या एका दोन वर्षाच्या मुलाची एक कहाणी जी सर्वांनी अगदी अति महत्वाच्या घटनेप्रमाणे उचलून धरली. आणि आपला मीडिया तर काय विचारावा - बचावाच्या प्रयत्नांचा मिनिट-मिनिट अहवाल पुरवत होता. या दोन घटनांबद्दल मला आश्चर्य वाटले आणि मी एक अस्वस्थ निष्कर्षापर्यंत पोहोचलो की आपण भारतीय हे ढोंगी आणि पाखंडी लोक आहोत. बहुतेक समाजांमध्ये दांभिकता हा एक मोठा मुद्दा आहे, परंतु तो भारतातील ती एक समस्या आहे.
आपल्या देशाच्या व्यक्तिमत्वातच शतकानुशतकांचे दुभंगलेपण आहे. आपल्या देशाला तीन नावे - भारत, इंडिया आणि हिंदुस्थान, दोन राष्ट्रगीते - जन गण मन आणि वंदे मातरम, दोन झेंडे - तिरंगा आणि भगवा त्याशिवाय भाषा, धर्म हे तर अजून आहेतच. हे दुभंगलेपण आपल्या समाजात आणि आपल्या वैयक्तिक माणसात इतके खोलवर रुजले आहे की आपल्या आयुष्याचा मार्गच झाले आहे.
आपल्या भारतीयांचा असा ठाम विश्वास आहे की "ममता" ही एक पवित्र भावना आहे, पण तरी देखील आम्ही आमच्या स्त्रियांना न भिता त्रास देतो. आम्ही लाच घेतो आणि मग आपल्या देवळांच्या दान पेटीत लाखो रुपये दान करून आपली पापं धुवून टाकण्याची आशा करतो. आम्ही करुणेबद्दल बोलतो, परंतु आमच्या घरात काम करणाऱ्या नोकरांना गुरासारखे राबवून घेतो. आम्ही नागरिकता आणि नागरीकत्व याबद्दल फक्त शिकतो पण स्वतःच्या कुटुंबाच्या बाहेर विचार आमचा जातच नाही. आमची घरे आम्ही स्वच्छ ठेवणार पण रस्त्यांवर घाण करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे वागणार.
दररोज, या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात - व्यवसाय, राजकारण, सामाजिक कार्य किंवा क्रीडा, करोडो भारतीय दांभिक कृत्ये करत असतात आणि त्यामुळे ह्या गोष्टीला आता साथीच्या रोगाचे स्वरूप आले आहे.
ही दांभिकता कुठेकुठे आणि कशी आहे हे बघायचा प्रयत्न करूया.
धार्मिक दांभिकता:
हिंदु धर्म सरस्वतीला बुद्धीची आणि ज्ञानाची देवी म्हणून संबोधतो. २०१८ च्या जाट दंगलीत, दंगलखोरांनी शाळेला आग लावण्यापूर्वी सर्वप्रथम देवी सरस्वतीचा पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवला. हसावं का रडावं तेच लक्षात येत नाही. गोवंशाच्या सुरक्षितेच्या नावाखाली सध्याचे हिंदू कार्यकर्ते गोमांस खाणे आणि गोहत्येचा निषेध करतात. परंतु जर एखाद्याने प्राचीन हिंदू ग्रंथांचा अभ्यास केला तर असे असंख्य उल्लेख आहेत जे अन्यथा सांगतात. ब्राह्मणस या इ.स. पूर्व ९०० मध्ये लिहिलेल्या प्राचीन विधी ग्रंथांनुसार, एखाद्या बैलाला वा गाईला ठार मारून तिचे मांस पाहुण्याच्या आगमनाच्या सन्मानार्थ खावे. पवित्र कुराण असे नमूद करते की “धर्मात कोणतीही सक्ती होणार नाही” आणि तरीही अतिरेकींनी कुराणचे शब्द आपल्या स्वत:च्या हेतूसाठी हवे तसे वळवले. “जिहाद” हा एक अरबी शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ प्रशंसनीय हेतूसाठी संघर्ष करणे असा होता परंतु सध्याच्या काळात हा शब्द इस्लामच्या नावाखाली हिंसाचार म्हणून वापरला जातो.
सामाजिक दांभिकता:
आपण सर्व जण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, काहीतरी वेगळंच बोलतो, काहीतरी वेगळंच करतो आणि दुसर्याकडून काहीतरी वेगळं करण्याची अपेक्षा करतो. सामाजिक दांभिकता अशीच जन्माला येते. बरं, समाज म्हणजे काय आणि तो कशामुळे बनतो? आपल्यासारखे लोकच समाज बनवतात. जेव्हा आपण वैयक्तिक बाबींचा विचार करतो तेव्हा आपण सर्व जण उदारमतवादी असतो परंतु समाजात मात्र पारंपारिक मूल्ये आणि श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वैयक्तिक सोयीनुसार आपण सर्व निर्णय घेण्याचा आपला कल असतो. प्रत्येकजण लोकांसमोर आपले मत व्यक्त करताना अगदी मोकळेपणाने आणि तथाकथित "आधुनिक विचारसरणी" ठेवतो परंतु जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा त्याच आपला सर्व “समाज अपेक्षित” करण्याकडे कल असतो आणि इतरांकडूनही तशाच वागण्याची अपेक्षा करतो.
अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिले तेव्हा जनसामान्य त्यांच्या पाठीशी उभे होते. पहिल्यांदाच सर्वसामान्यांनी भ्रष्टाचार विरोधात तीव्र असंतोष व आंदोलन उघडपणे दर्शविले. दुर्दैवाने तीच आम जनता जेव्हा वाहतुकीचा कायदा मोडत असताना पकडली जाते तेव्हा मात्र अधिकाऱ्यांना लाच घेण्यास उद्युक्त करते. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की जे भारतीय लोकांमधील ढोंगीपणाशिवाय काहीच दर्शवित नाही.
फिल्म सेन्सॉर बोर्डने सिनेमाच्या पडद्यावर धुम्रपान करण्यास बंदी घातली आहे आणि त्यामागील कारण म्हणजे ते मुलांमध्ये धूम्रपान करण्यास प्रवृत्त करते. जर एखाद्या नायकाने सिगारेट ओढल्यामुळे मुले धूम्रपान करण्यास प्रवृत्त होत असतील तर मग चोरी, अपहरण, खून किंवा बलात्कार करणार्या नटामुळे हे तरुण अत्याचारी गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाहीत? मग ‘पाप’ मुक्त सिनेमासाठी या सर्व गुन्ह्यांवरही बंदी का घालू नये? एखाद्या मुलाला आपला आवडता हिरो ऑन स्क्रीन फुंकताना दिसला नाही, तरीही तो आजूबाजूच्या लोकांना धूम्रपान करताना बघून त्या व्यसनाला बळी पडू शकतो म्हणून मग जे लोकं धूम्रपान करतात त्यांच्यावर कारवाई करणार का? चित्रपटात बंदी घालून ही प्राणघातक सवय कमी करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत हे सरकारला फक्त दाखवायचे होते पण प्रत्यक्षात ते फक्त ढोंगीच आहेत. लैंगिक गोष्टींबद्दल बोलणे तर आपल्या देशात महान पाप. परंतु ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि खरं म्हणजे मुलांबरोबर त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे जेणेकरून त्यांना त्याबद्दल पुरेसे आणि योग्य ज्ञान असेल.
व्हॅलेंटाईन आठवड्यात सक्रिय होणारे नैतिक पोलिस, पार्क्समध्ये बसलेल्या जोडप्यांना मारहाण करतात कारण आमच्या संस्कृतीत नसल्याचा त्यांचा दावा असतो. आपली संस्कृती प्रेमाच्या विरोधात आहे का? नग्न स्त्रिया किंवा समलैंगिकांना रंगवणाऱ्या चित्रकारांच्या अनेक प्रदर्शनांवर या नैतिक पोलिसांनी हल्ला देखील केला आहे. या कलेचे प्रकार प्रदर्शित करणे गुन्हा आहे काय? या लोकांच्या मते ते आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. येथे लक्षात ठेवायला हवे की ‘कामसूत्र’ मूळ भारतातून आला आहे आणि तो आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे. मग या कला आपल्या संस्कृतीच्या विरोधात कशा असतील? जरा डोळे उघडून खजुराहो आणि अशा अनेक देवळांवर नजर टाका, तिथे देखील हीच तथाकथित नग्नता आणि समलैंगिकता दिसेल. हे नैतिक पोलीस आपल्या दांभिकतेचेच एक ज्वलंत उदाहरण आहे कारण हे दांभिक ज्याला विरोध करतात अशा प्रत्येक गोष्टीचा आनंद स्वतः मात्र लुटत असतात परंतु लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ही सर्व नाटके असतात.
विवाह संस्था:
आपल्या देशातील विवाह व्यवस्था हे ढोंगीपणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. हे वैवाहिक संबंध बनविण्यापासून सुरू होते आणि मृत जोडीदाराच्या बाबतीत पुरुष आणि स्त्रियांशी कसे वागले जाते इथपर्यंत पोहोचते. आपण सगळे फक्त बोलतो की आम्ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत आणि जिथे जातीच्या आधारे भेदभाव होऊ नये. तथापि विवाहबंधन करण्याचा विचार केला तर आपण सर्वजण एकाच जातीतील भागीदार शोधतो. जेव्हा घरच्या मुलींचा विचार केला जातो तेव्हा तिला स्वतःला शिक्षण आणि करिअर करण्याचे सर्व स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आई-वडील तिच्यासाठी स्थळ शोधताना सासरच्या लोकांचे मन कसे मोकळे आणि उदारमतवादी हवे असे मत मांडतील परंतु हेच दांभिक आपल्या घरात सून आणताना मात्र ती घर सांभाळणारी, नोकरी न करणारी असेल तर चांगलं अशा विचारांचे असतात. ही दांभिकता नाही तर काय? लग्न करण्याचा विचार करताना प्रत्येक कुटुंब असे दर्शवितो की वर पक्ष आणि वधू पक्ष समान आहेत पण प्रत्यक्षात वराची बाजू नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणून मागणी करते. हा “हुंडा” नाही असे म्हणायचं परंतु वराची बाजू असल्याच्या त्यांच्या अपेक्षा आणि अभिमान कधीच संपुष्टात येत नाही.
विधवा किंवा विधुर पुनर्विवाह: जर विधुर असेल तर समाज त्याच्याबद्दल सहानुभूती दर्शवेल आणि त्याला वाटू लागते की दुसरी पत्नी करणे हा त्याचा हक्कच आहे. एखाद्या विधवेच्या बाबतीतही असेच घडले तर लगेच काय बोलले जाते की हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. ती तिच्या पतीच्या मृत्यूचा आदर करत नाही. अगदी त्या बाईची तरुण मुलगा किंवा मुलगी सुद्धा असा विचार करत नाही की आपल्या आईची देखील ही गरज असू शकते तेव्हा मग समाजाकडून काय अपेक्षा ठेवायच्या? ते तर तिच्या वागणुकीवर सर्व प्रकारच्या टिप्पण्या करतात ज्याच्यामुळे तिला तथाकथित “समाज”चा भाग असण्यास अपात्र वाटायला लागेल.
स्त्री आणि पुरुष:
भारतात मुलींच्या बलात्कार आणि छळ यासाठी त्यांच्या कपडे कमी घालण्याला जबाबदार धरले जाते. जर असे कपडे घातल्यामुळे बलात्कार होत असतील जगभरातील महिलांवर बलात्कार झाला पाहिजे. सत्य हे आहे की प्रत्येक पुरुष त्याच्या घरात तथाकथित "सभ्य" पेहरावाचा उपदेश करतो तर बाह्य जगात त्याच मनुष्याला असे कपडे "सेक्सी" वाटतात. आपण सर्वजण म्हणतो की आम्ही मुलांवर प्रेम करतो; मुलगा आणि मुलगी असा फरक करत नाही. तरीही आपल्या अंतःकरणात आपला वंश पुढे चालविण्यासाठी मुलगा हवाच असतो. काही लोक असेही आहेत की ज्यांना त्यांच्या मुलाला पण मुलगाच व्हायला हवा असतो पण मग त्याची दुसरी भयाण बाजू काय? तर मुलींची भ्रूण हत्या.
पुरुषाच्या स्वतःला बेबंद राहायचं असतं, परंतु त्याच्या मालकीच्या स्त्रियांनी मात्र बंधनातच राहावं असं त्याला वाटतं. विचित्र गोष्ट म्हणजे ‘आई’ ही त्याच्या लेखी ‘आदर्श स्त्री’ असते. तिचा त्याग, तिनं स्वतःवर घालून घेतलेले निर्बंध, ती करत असलेली कर्तव्यं यांची तो पूजा करतो. त्याच वेळेस इतर स्त्रियांनी मात्र त्याच्याशी मोकळेपणानं वागावं, त्यानं स्वतःही त्यांच्याशी मोकळेपणानं वागावं असं त्याला वाटतं. सर्वच क्षेत्रांत त्याचा पुरुषी अहंकार फणा काढून उभा असतो आणि इतरांच्या वागण्यावर पाळत ठेवून त्यांच्याशी वाद घालतो; इतरांवर हुकूमशाही गाजवू लागतो. नीतिमत्तेच्या नावाखाली दुटप्पी वर्तन करू लागतो. पुरुषांसाठी वेगळा आणि स्त्रियांसाठी वेगळा न्याय लावू लागतो. म्हणूनच ‘खाप पंचायत’ सारख्या यंत्रणा हिंसक आणि क्रूर बनतात. अशा वेळेस मग हिंसाचाराचा हैदोस आणि शरीरसुखाचा उत्कट बिंदू हे जणू भावनिकरीत्या समान पातळीवर येतात. दंगलींच्या कुठलीही हिंसक घटना पाहिली की, तिचं अंतिम पर्यवसान बलात्कारात होणं, ही त्या हिंसेची गरज असल्यासारखंच दिसतं. जणू बलात्कार हा मर्दानगीचा आणि आपल्याला कोण हात लावणार, या बेदरकारीचा ट्रेडमार्कच बनतो. बलात्काराशिवाय भारतीय पुरुषी अहंकार खरोखरच अपूर्ण ठरतो.
एकेकाळी उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानातील, सती प्रथेमध्ये नाही का, नवऱ्याच्या धडधडत्या चितेत त्याच्या जित्याजागत्या बायकोला फेकलं जायचं आणि मग ‘सती गेली’ म्हणत नंतर तिचे देव्हारे माजवायचे, असा प्रकार होता. १८२९ मध्ये लॉर्ड बेंटिंकने सती प्रथा बंद करेपर्यंत भारतात जिवंत स्त्रियांना सर्रास नवऱ्याच्या चितेत ढकललं जात होतं. काही स्वखुशीने जात होत्या, कारण त्यांना नवऱ्यानंतर मागे राहिलेल्या बाईचं काय होतं, याची जाणीव होती, म्हणून त्या नवऱ्याच्या चितेला जवळ करत. जिवंत बाईला जाळायचं आणि नंतर तिच्या व्रताची सतीचं वाण म्हणून तारीफ करायची, ही दांभिकता खास भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे.
सुरक्षिततेनंतरची दुसरी हास्यास्पद कल्पना म्हणजे ‘इज्जत’ किंवा ‘अब्रू.’ इज्जत याचा अर्थ मोठेपणा किंवा आत्मसन्मान नव्हे. तर स्त्रीवर मालकी हक्क दाखवणारी, घराण्याची स्वामीत्व भावनायुक्त इभ्रत असते ती. स्त्रीने मर्यादा ओलांडली तर तिला त्या कृत्याची किंमत चुकवावीच लागते. ‘ऑनर किलिंग’ हा जणू पुरुषाची अब्रू जपण्याचा विधीच आहे. पुरुषाची इज्जतच काय ती महत्त्वाची असते. पुरुषांच्या दृष्टीनं स्त्रीदेह हे कुरण आहे, त्यांच्या मालकीचा प्रदेश आहे. सांस्कृतिक मूल्यांचं प्रतीक म्हणूनही ते स्त्रीदेहाकडे पाहतात आणि स्त्रियांनीही ते मान्य करावं असा आग्रह धरतात. या ठिकाणी असलेला दुहेरीपणा आपण समजून घ्यायला हवा. बहीण किंवा पत्नी म्हणून स्त्रीला मान असला तरी बाकीच्या स्त्रियांना प्रतीकात्मक मूल्यही नसतं. अन्य स्त्रिया या तिरस्करणीय वस्तू असतात, केवळ वापरासाठी असतात. बलात्कारित स्त्री ही तर ‘काचेचं फुटकं भांडं’ असते, ही केवढी दुर्दैवी बाब आहे. तिच्याशी नातं निघालं तर त्यामुळे कुटुंबाच्या इज्जतीला धक्का पोचतो. बलात्काराभोवती रचलेल्या कहाणीत त्या स्त्रीलाच दोषी धरलं जातं. सामूहिक बलात्कार झालेल्या स्त्रीला तर पार वाळीतच टाकलं जातं.
हेही सांगितलं पाहिजे की, वैवाहिक जीवनातील अत्यंत कंटाळवाणेपण हे त्यात भरच घालत असतं. पतीपत्नींना एकमेकांशी बोलण्यासारखं फारसं काही नसतं. आनंददायी संभाषण ही संकल्पना तर कुणाला सुचतही नाही. हॉटेलात बसलेल्या भारतीय कुटुंबाचं निरीक्षण केलं तर दिसतं की, पुरुष एकटाच मोठ्या ऐटीत जेवतो आहे, तर स्त्री मात्र मुलांवर लक्ष ठेवण्यात गुंतली आहे. तिथं कोमलतेला थारा नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा नाहीत, काहीच नाही. जणू कर्तव्यपालन, त्याग आणि भोग यांच्यामधल्या अवस्थेत ते कुटुंब लोंबकळत आहे. चाळीशीनंतर तर प्रियाराधनाची उरलीसुरली हौस आणि त्यातील काव्य सारचं ओसरून जातं.
आज स्त्रीवर एखादा ऍसिडचा हल्ला होतो, तेव्हा तिला यातना-अपमानांना सामोरं जावं लागतं. प्रसारमाध्यमांना वाटणारी कणव म्हणून त्या घटनेचा फोटो छापणं एवढ्यानं काही होत नाही. त्यातून तो पुरुष समाजकंटक आहे किंवा कामविकृत आहे एवढं कळून येतं. पत्नीला जाळून मारणारा रॉकेलप्रेमी पती आणि हा ऍसिड हल्ला करणारा पुरुष - दोघांनाही वाळीत टाकलं पाहिजे आणि माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या नेहमीच्या बातम्यांतून हा बहिष्कार प्रतिबिंबित झाला पाहिजे. संपूर्ण समाजाने त्याचा धिक्कार केला आहे, असं दिसलं पाहिजे. नुकत्याच झालेल्या एका वेगळ्या बाबतीत समाजाने आपला प्रतिसाद खरमरीतपणे कसा व्यक्त केला त्याचे हे उदाहरण.
आपल्या देशाला एक खूप मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे आणि आपला जन्म या देशात झाला हे आपले भाग्य आहे. पण हे ही तितकेच खरं आहे की ह्या दर क्षणी वेगात बदलणाऱ्या या जगाशी जुळवून घ्यायचे असेल तर भविष्यासाठी अत्यावश्यक असे आधुनिकीकरण करणे क्रमपाप्त आहे. परंतु ते करताना आपल्या संस्कारांची नाळ न तोडता आपल्याला आपल्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील आणि या दांभिकतेचा त्याग करावाच लागेल. अन्यथा आपल्या देशाची प्रगती आणि विकास होणे कठीण आहे आणि आपण फक्त आपल्या गौरवशाली इतिहासाला कुरवाळत आणि गोंजारत बसू आणि जग कुठल्या कुठे निघून जाईल. उठा, भारतीयांनो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही.
ह्यात एक आशेचा किरण म्हणजे सध्याची नवीन पिढी; जी आमच्या आणि त्या आधीच्या पिढ्यांपेक्षा खूपच जागरूक आहे. त्यांचा जुन्या चालीरीती मोडून काढण्यास अजिबात विरोध नाहीये ही अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु त्यांनीही एक लक्षात ठेवायला हवे की तो विरोध फक्त विरोधासाठी नसावा. आपल्या समाजातील ज्या प्रथा कालबाह्य झाल्या आहेत त्यांना तिलांजली द्यायलाच हवी या मताचा मी आहे. समाज म्हणजे आपणच आहोत त्यामुळे जेव्हा ही नवीन पिढी स्वतःमध्ये बदल घडवून आणेल तेव्हा तो ही हळूहळू बदलू लागेल.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Hypocrisy #India #दांभिकता #भारत