प्रत्येक काळरात्रीला म्हणे पहाटेची झालर असते. मला नाही ते तितकेसे पटत. आपल्या आठवणीतील अनेक गोष्टी कालौघात वाहून जातात आणि आपण फक्त हळहळत बसतो.
आता हेच बघा ना !
आपल्या मुंबईच्या संस्कृतीची जडणघडण होण्यात भारतीय लोकांप्रमाणेच अनेक परदेशी लोकांचा देखील महत्वाचा वाटा आहे यात काही दुमत असूच शकत नाही. यात ब्रिटिश, डच, पोर्तुगीज याच्यांसह आपल्या सर्वांचे सुपरिचित बावा आणि इराणी नागरिकांचा समावेश आहे. अग्नीचे उपासक पारशी आणि अल्लाला मानणारे मुसलमान इराणी. या इराणी स्थलांतरांनी त्यावेळच्या हिंदुस्थानात येऊन इथल्या संस्कृतीत स्वतःला सामावून घेताना ते दुधात साखर विरघळावी तसे एकरूप झाले.
‘क्या चाहिए?’
‘क्या है खानेमे?’
‘ऑम्लेट-पाव, भुर्जी, खिमा, चिकन-मटण पॅटिस, मावा केक, ब्रुन मस्का, बन मस्का, खारी...!!!’ एवढे हजार वेळा सांगूनही न दमणारा वेटर इराण्याचाच असणार.
ऐकणारा देखील वर न बघता नेहमीची ऑर्डर देतो, ‘एक पानी कम चाय... ब्रून मस्का भी लाना’.
पूर्वी आठवड्यातले सातही दिवस सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत साधारण हाच संवाद तिथे ऐकायला मिळायचा. थकले-भागले, टाइमपास करू इच्छिणारे, शांतता शोधणारे अशा सर्वांचे एकच हक्काचे ठिकाण असायचे आणि ते म्हणजे कोपऱ्यावरचा इराणी.
त्यामुळे नीट बघितलं तर लक्षात येतं की इराणी हॉटेल्स मुंबईच्या माहीम-सायन याच्या पलीकडे फारशी गेलीच नाहीत. वांद्र्यात इराणी हॉटेलच्या खाणाखुणा आढळतात, पण अगदी तुरळक. अंधेरीत किंवा आणखी थोडे पुढे कुठे तरी एखादे इराणी हॉटेल आढळेलही; ते आपले नुसतंच अस्तित्व दाखवायला.
पण आले कुठून हे इराणी? आणि इथेच का विसावले?
इराणमध्ये कजार राजवटीच्या काळात (सन 1794 ते 1925) याज्द, केरमन प्रांतातील इराणी झोरोस्ट्रियन नागरिकांचा धार्मिक छळ होत होता. त्याला कंटाळून इराणी झोरोस्ट्रियन आपल्या देशातून पलायन करून दुसर्या देशांत स्थायिक होत होते. त्यापैकी अनेक जणांचे पाय भारताकडे वळले. इराणी झोरोस्ट्रियनना भारतात अधिक भावली ती म्हणजे मुंबई. भारतात इंग्रजी राजवट स्थिरावल्यानंतर इराणी झोरोस्ट्रियनांमधील मुळातच असलेल्या उद्यमशीलतेला अधिकच बहर आला. हे लोक पहिल्यापासूनच कामसू. पारश्यांनी बँकिंग, व्यापार, उद्योगांत आपले बस्तान बसवले; तर इराणी झोरोस्ट्रियनांनी बेकिंग आणि मॉडर्न कॅफे रेस्टॉरंट सुरू करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वेगळ्या अर्थाने त्यांनी इराणची चायखाना संस्कृती मुंबईमध्ये रुजवली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या चार वर्षांनंतरची आकडेमोड बघितली तर त्या वेळी मुंबईतील नाक्यानाक्यांवर उघडल्या गेलेल्या इराणी हॉटेलची संख्या होती तब्बल साडेतीनशे ! मात्र, सध्या मुंबईमध्ये अस्सल इराणी हॉटेलांची संख्या उरली आहे उणीपुरी पंचवीस ! आता ही हॉटेल्स हेरिटेज वास्तू म्हणून मिरवायला मोकळी झाली, इतकी मॅच्युअर झालीत.
त्या वेळी इराणी हॉटेलात सिग्रेटी विकत मिळत. सिगारेटचे झुरके मारत चहाचा घुटका घेत या चर्चा खूप रंगायच्या. कोपऱ्यात बसायचं आणि चहा पीत पीत सिगारेट ओढणे म्हणजे जन्नत. या हॉटेलांमध्ये ‘सोस्यो’ हे शीतपेयही हमखास मिळे, जे इतर हॉटेलांत पटकन नजरेत भरत नसे. पूर्वी ज्युक बॉक्स असायचे इराणी हॉटेलांमध्ये. त्यात ठरावीक नाणे टाकून आपले आवडते गाणे ऐकण्याचा शौक अनेक लोक पुरा करताना दिसायचे.
मात्र हळूहळू काळ बदलत गेला तसतसा इराणी हॉटेलमधील माहोलही बदलत गेला. काळाने संघर्ष इतका तीव्र केला की, या हॉटेलांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला.
त्यामुळे माझ्यासारख्या मुंबईकराची नजर काहीतरी शोधत राहते की कुठे गेले ते खाण्यापिण्याचे साम्राज्य पसरवणारे पण आता आपले राज्य गमावून बसलेले नाक्यानाक्यावरचे इराणी बादशाह? आमच्या पिढीतील आजही खूप लोक आवर्जून शोधत शोधत इराणी हॉटेलमध्ये जातात. तिथला ब्रुन, बन मस्का व पानी कम चाय यांचा आस्वाद घेत इराणी साम्राज्याच्या गतकालीन वैभवाच्या आठवणी काढतात.
इराणी हॉटेलांमध्ये चहा व ब्रुन मस्का, ऑम्लेट पाव मागवून काही तास बसण्याची जी चंगळ होती, तिला तरुण पिढीतील इराणी हॉटेल मालकांच्या हिशेबी वृत्तीने चाप बसला. मुंबईत जागोजागी उगवलेल्या उडुपी रेस्टॉरंटच्या स्पर्धेत टिकून राहणे इराणी हॉटेल व्यावसायिकांना दिवसेंदिवस अडचणीचे ठरू लागले. त्यातूनच सुरू झाला इराणी हॉटेल बंद करून ती जागा एक तर बियर बार म्हणून कन्व्हर्ट करणे किंवा अन्य व्यावसायिकांना विकण्याचा सिलसिला सुरु झाला. इराणी हॉटेल मालकांच्या आजच्या युवा पिढीला हॉटेल धंद्याचे अजिबात आकर्षण नसावे. त्यातील अनेक युवा-युवती उच्च शिक्षण घेऊन एक तर परदेशात गेले आहेत, किंवा भारतात राहून अन्य उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे आपल्या मालकीच्या इराणी हॉटेलांमधील भव्य जागा हीच त्यांच्या मनाला भावणारी एकमेव गोष्ट. ती विकून किंवा तिचा अन्य उद्योगधंद्यांसाठी वापर करून अधिक पैसा कसा कमावता येईल, याकडे या युवा पिढीचे लक्ष लागले आहे.
सध्याचे व्यावहारिक जग लक्षात घेता, या तरुण पिढीचा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे, असेही म्हणवत नाही. जग त्याच्या वेगाने बदलत असते. या बदलाच्या वादळात मुंबईतील कशीबशी तग धरून असलेली पंचवीसहून अधिक इराणी हॉटेल्स अजून किती तग धरू शकतील ही शंकाच आहे. कदाचित आमची शेवटची पिढी असेल की ज्यांनी हे इराणी कॅफे कल्चर अनुभवले असेल.
‘इथे एक इराणी होता'.