पानी कम चाय 

प्रत्येक काळरात्रीला म्हणे पहाटेची झालर असते. मला नाही ते तितकेसे पटत. आपल्या आठवणीतील अनेक गोष्टी कालौघात वाहून जातात आणि आपण फक्त हळहळत बसतो.

आता हेच बघा ना !

आपल्या मुंबईच्या संस्कृतीची जडणघडण होण्यात भारतीय लोकांप्रमाणेच अनेक परदेशी लोकांचा देखील महत्वाचा वाटा आहे यात काही दुमत असूच शकत नाही. यात ब्रिटिश, डच, पोर्तुगीज याच्यांसह आपल्या सर्वांचे सुपरिचित बावा आणि इराणी नागरिकांचा समावेश आहे. अग्नीचे उपासक पारशी आणि अल्लाला मानणारे मुसलमान इराणी. या इराणी स्थलांतरांनी त्यावेळच्या हिंदुस्थानात येऊन इथल्या संस्कृतीत स्वतःला सामावून घेताना ते दुधात साखर विरघळावी तसे एकरूप झाले. 

सुमारे दोन वर्षांपूर्वी कनोसा शाळेच्या गल्लीत कॅफे इराणी चाय नावाचे नवे इराणी हॉटेल सुरू झाले तेव्हा आमच्या पिढीला प्रेमाचे भरते आले. गेले अनेक वर्षे अशी इराणी हॉटेल बंद पडत असताना हे नवे इराणी रेस्टॉरंट सुरु करण्याचे धाडस दाखविले त्याबद्दल त्याचे युवा मालक मोहम्मद हुसेन यांना सलाम, कारण मुंबईत या आधी जे शेवटचे नवे इराणी रेस्टॉरंट उघडले त्या घटनेला 51 वर्षे उलटून गेली होती.
 
आम्ही मित्रांनी कॅफे इराणी चाय इथे जायचे ठरवले आणि तेव्हाच माझ्या नजरेसमोर गेल्या पन्नास वर्षांचा चलतचित्रपट तरळून गेला आणि मी भूतकाळात हरवलो. 
 

‘क्या चाहिए?’
‘क्या है खानेमे?’
‘ऑम्लेट-पाव, भुर्जी, खिमा, चिकन-मटण पॅटिस, मावा केक, ब्रुन मस्का, बन मस्का, खारी...!!!’ एवढे हजार वेळा सांगूनही न दमणारा वेटर इराण्याचाच असणार.

ऐकणारा देखील वर न बघता नेहमीची ऑर्डर देतो, ‘एक पानी कम चाय... ब्रून मस्का भी लाना’.

पूर्वी आठवड्यातले सातही दिवस सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत साधारण हाच संवाद तिथे ऐकायला मिळायचा. थकले-भागले, टाइमपास करू इच्छिणारे, शांतता शोधणारे अशा सर्वांचे एकच हक्काचे ठिकाण असायचे आणि ते म्हणजे कोपऱ्यावरचा इराणी.

 
 
इराणी हॉटेलचे नाव काढले की, आमच्या पिढीतील प्रत्येकाच्या स्मृती टक्क जाग्या होतात. पक्का मुंबईकर तर कुलाबा कॉजवेवरील लिओपोल्ड या इराणी हॉटेलपासूनच मनातल्या मनात भ्रमंती करायला लागतो. फोर्टमधील याझदानी बेकरी, कयानी अँड कंपनी, धोबी तलाव येथील सासानियन रेस्टॉरंट, ब्रेबॉर्न स्टेडियमसमोरचे स्टेडियम रेस्टॉरंट येथे त्याचे मन काही काळ भूतकाळात हरवते. नंतर ग्रँट रोड स्टेशनसमोरच असलेला मेरवान इराणी याची आठवण काढत काढत मुंबईकर सरळ उडी मारतो तो दादर पूर्वेच्या हिंदू कॉलनी रेस्टॉरंट, माटुंग्याच्या किंग्ज सर्कलच्या कुलर अँड कंपनी रेस्टॉरंटकडे. दादर आणि माहीम पश्चिमेला सुद्धा बरीच इराणी हॉटेल्स होती. आजच्या स्टेटसच्या जागीचा कॅफे, दिलीप गुप्ते रोड (शिवाजी पार्क) च्या कॉर्नरला असलेले मुन व्ह्यू, हरी निवासचे कॅफे गोल्डन, सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळ असलेले लाईट ऑफ भारत, सेना भवन समोरचे कॅफे आझाद, पॅरेडाईज सिनेमा जवळची पॅरामाऊंट कॅफे, कॅफे कॅडेल आणि कॅफे ग्रीन्स. तसेच गोखले रोडवर अजून काही इराणी होते.

त्यामुळे नीट बघितलं तर लक्षात येतं की इराणी हॉटेल्स मुंबईच्या माहीम-सायन याच्या पलीकडे फारशी गेलीच नाहीत. वांद्र्यात इराणी हॉटेलच्या खाणाखुणा आढळतात, पण अगदी तुरळक. अंधेरीत किंवा आणखी थोडे पुढे कुठे तरी एखादे इराणी हॉटेल आढळेलही; ते आपले नुसतंच अस्तित्व दाखवायला.

पण आले कुठून हे इराणी? आणि इथेच का विसावले?

इराणमध्ये कजार राजवटीच्या काळात (सन 1794 ते 1925) याज्द, केरमन प्रांतातील इराणी झोरोस्ट्रियन नागरिकांचा धार्मिक छळ होत होता. त्याला कंटाळून इराणी झोरोस्ट्रियन आपल्या देशातून पलायन करून दुसर्‍या देशांत स्थायिक होत होते. त्यापैकी अनेक जणांचे पाय भारताकडे वळले. इराणी झोरोस्ट्रियनना भारतात अधिक भावली ती म्हणजे मुंबई. भारतात इंग्रजी राजवट स्थिरावल्यानंतर इराणी झोरोस्ट्रियनांमधील मुळातच असलेल्या उद्यमशीलतेला अधिकच बहर आला. हे लोक पहिल्यापासूनच कामसू. पारश्यांनी बँकिंग, व्यापार, उद्योगांत आपले बस्तान बसवले; तर इराणी झोरोस्ट्रियनांनी बेकिंग आणि मॉडर्न कॅफे रेस्टॉरंट सुरू करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वेगळ्या अर्थाने त्यांनी इराणची चायखाना संस्कृती मुंबईमध्ये रुजवली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या चार वर्षांनंतरची आकडेमोड बघितली तर त्या वेळी मुंबईतील नाक्यानाक्यांवर उघडल्या गेलेल्या इराणी हॉटेलची संख्या होती तब्बल साडेतीनशे ! मात्र, सध्या मुंबईमध्ये अस्सल इराणी हॉटेलांची संख्या उरली आहे उणीपुरी पंचवीस ! आता ही हॉटेल्स हेरिटेज वास्तू म्हणून मिरवायला मोकळी झाली, इतकी मॅच्युअर झालीत.

 
 
 
इराण्याच्या हॉटेलात पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे आरसेच आरसे लावलेले. त्या आरशांवर पानाफुलांची वेलबुट्टी रंगवलेली. ह्या मोठ्या आरश्यांमुळे आहे त्यापेक्षा जागा मोठी वाटायची. गोल आकाराची सागवानी लाकडाची टेबले. संगमरवरी दगडाचा पांढरा पृष्ठभाग असलेल्या प्रत्येक टेबलाभोवती मांडलेल्या, गोल आकाराची बैठक असलेल्या व काळे पॉलिश चढवलेल्या सागवानी लाकडापासून बनवलेल्या चार खुर्च्या. काउंटरवर मोठ्या मोठ्या काचेच्या बरण्या ज्यायोगे त्यात काय आहे हे समजावं. हा इराणी कधी एकदम हाऊसफुल्ल दिसेल, तर कधी एकेका टेबलावर दोन-तीन माणसे किंवा कधी कोणी एकटाच बसलेला दिसेल. खाण्याचेही पदार्थ असेच अबरचबर सदरात मोडणारे. चाय, पानी कम चाय, खारी, बन किंवा ब्रून मस्का, आमलेट, खिमा बस्स. इराण्याचा चहा बकरीच्या दुधापासून बनवायचे म्हणे. खरं की खोटं माहित नाही पण चहाची तशी चव दुसरीकडे कुठेही नसे हे मात्र खरे. पुष्कळ जुन्या लोकांनी लिहून ठेवलेय, की इराण्याच्या हॉटेलमध्ये एक चहा घेऊन तुम्ही काही तास सहज बसू शकता. परंतु एकट्याने किंवा ग्रुप मध्ये कितीही वेळ बसण्याची जागा असली तरी ऑर्डर दिली की डोक्यावरचा पंखा चालू पण खाऊन पिऊन संपले की पंखा बंद. इराणी मालकही इतका सहिष्णू, की तो ‘कामाशिवाय बसू नये’ अशी पाटी लावण्याच्या विरोधातच असावा. 'कामाशिवायही मनसोक्त बसावे’ ही फक्त इराणी हॉटेलांची खासियत होती. इराणी लोकांनी उडप्यांसारखा धंदा कधीच केला नाही. कदाचित त्यांनी "उदर भरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म" हे अंगीकारून आपण काहीतरी पवित्र कार्य करण्यासाठी या क्षेत्रात आलो आहोत आणि आपले काम श्रद्धेने आणि मन लावून करायचे आहे अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती. "साब, और क्या चाहिये?" असे चुकून सुद्धा इराण्याकडे विचारले जात नसे. सगळ्या विचारधारेच्या लोकांना हे इराणी हॉटेल समभावाने सामावून घेत असे. असा माहोल असेल तर गप्पिष्ट, टाइमपासवाले यांना इराणी हॉटेल म्हणजे महापर्वणी वाटली नसती तरच नवल.
 
 
 
इराणी हॉटेलांमधील खाद्यपदार्थांचे दरही सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे होते. इराणी हॉटेलच्या मालकांच्या जुन्या पिढीतील लोकांना आपण धंद्यातून खूप नफा कमवावा, अशी असोशी नव्हतीच बहुदा. इराण्यांकडे मनाचा कद्रूपणा कधीच नव्हता. ते पोटापाण्यासाठी व्यवसाय करत होते पण ते कधीच लोभी, लालची नव्हते. प्रत्येक गिऱ्हाईकाशी त्याचे वागणे अत्यंत नम्र आणि त्यामुळे इराणी हा घरचाच वाटायचा.  

त्या वेळी इराणी हॉटेलात सिग्रेटी विकत मिळत. सिगारेटचे झुरके मारत चहाचा घुटका घेत या चर्चा खूप रंगायच्या. कोपऱ्यात बसायचं आणि चहा पीत पीत सिगारेट ओढणे म्हणजे जन्नत. या हॉटेलांमध्ये ‘सोस्यो’ हे शीतपेयही हमखास मिळे, जे इतर हॉटेलांत पटकन नजरेत भरत नसे. पूर्वी ज्युक बॉक्स असायचे इराणी हॉटेलांमध्ये. त्यात ठरावीक नाणे टाकून आपले आवडते गाणे ऐकण्याचा शौक अनेक लोक पुरा करताना दिसायचे.

मात्र हळूहळू काळ बदलत गेला तसतसा इराणी हॉटेलमधील माहोलही बदलत गेला. काळाने संघर्ष इतका तीव्र केला की, या हॉटेलांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला.

त्यामुळे माझ्यासारख्या मुंबईकराची नजर काहीतरी शोधत राहते की कुठे गेले ते खाण्यापिण्याचे साम्राज्य पसरवणारे पण आता आपले राज्य गमावून बसलेले नाक्यानाक्यावरचे इराणी बादशाह? आमच्या पिढीतील आजही खूप लोक आवर्जून शोधत शोधत इराणी हॉटेलमध्ये जातात. तिथला ब्रुन, बन मस्का व पानी कम चाय यांचा आस्वाद घेत इराणी साम्राज्याच्या गतकालीन वैभवाच्या आठवणी काढतात.

इराणी हॉटेलांमध्ये चहा व ब्रुन मस्का, ऑम्लेट पाव मागवून काही तास बसण्याची जी चंगळ होती, तिला तरुण पिढीतील इराणी हॉटेल मालकांच्या हिशेबी वृत्तीने चाप बसला. मुंबईत जागोजागी उगवलेल्या उडुपी रेस्टॉरंटच्या स्पर्धेत टिकून राहणे इराणी हॉटेल व्यावसायिकांना दिवसेंदिवस अडचणीचे ठरू लागले. त्यातूनच सुरू झाला इराणी हॉटेल बंद करून ती जागा एक तर बियर बार म्हणून कन्व्हर्ट करणे किंवा अन्य व्यावसायिकांना विकण्याचा सिलसिला सुरु झाला. इराणी हॉटेल मालकांच्या आजच्या युवा पिढीला हॉटेल धंद्याचे अजिबात आकर्षण नसावे. त्यातील अनेक युवा-युवती उच्च शिक्षण घेऊन एक तर परदेशात गेले आहेत, किंवा भारतात राहून अन्य उद्योगधंद्यांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे आपल्या मालकीच्या इराणी हॉटेलांमधील भव्य जागा हीच त्यांच्या मनाला भावणारी एकमेव गोष्ट. ती विकून किंवा तिचा अन्य उद्योगधंद्यांसाठी वापर करून अधिक पैसा कसा कमावता येईल, याकडे या युवा पिढीचे लक्ष लागले आहे.

सध्याचे व्यावहारिक जग लक्षात घेता, या तरुण पिढीचा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे, असेही म्हणवत नाही. जग त्याच्या वेगाने बदलत असते. या बदलाच्या वादळात मुंबईतील कशीबशी तग धरून असलेली पंचवीसहून अधिक इराणी हॉटेल्स अजून किती तग धरू शकतील ही शंकाच आहे. कदाचित आमची शेवटची पिढी असेल की ज्यांनी हे इराणी कॅफे कल्चर अनुभवले असेल.

पुढचा काळ कदाचित असा येईल, की मुंबईत नाक्यानाक्यांवर इराणी हॉटेल होती तिथे या हॉटेलांचा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांना सांगण्यासाठी फलक लावावे लागतील.
 
इथे एक इराणी होता'.
 
परंतु कॅफे इराणी चाय हा मला आशेचा किरण दिसतो. "बहारे फिर भी आयेंगी' असे खरंच होईल ? आमेन !! 
 
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

प्रेरणा: समीर परांजपे यांचा लेख.

Leave a commentSubscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS