शहाणपण कधी शिकणार?

कराची, दि. ६,

 

सलमान रश्दीचा हवाला देणे, येथे फारसे उचित ठरणार नाही. परंतु अलीकडेच 'दि न्यूयॉर्क टाईम्स', मध्ये लिहिलेल्या लेखात रश्दी यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तो प्रश्न असा आहे की, इस्लामी जगतात सातत्याने घडणाऱ्या घटनांबद्दल मुस्लिम विचारवंत अधिक टीका का करीत नाहीत?

 

जहालमतवादी, इस्लामी क्रांतिकारक विचारक हासेम आगाझरी याला तेहरानमधील मुल्लांनी मृत्युदंड दिला, तेव्हा इस्तंबूलपासून इस्लामाबादपर्यंत निषेधाची प्रचंड लाट का उठली नाही? घटस्फोटित नायजेरियन महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून गर्भ राहिल्याबद्दल देहदंड ठोठावण्यात आला, तेव्हा जगभरातील नायजेरियाच्या राजदूतावासांपुढे मुसलमानांनी निदर्शने का केली नाहीत? नायजेरियातच, एका बाष्फळ लेखामुळे खवळलेल्या मुसलमानांनी शेकडो निरपराध ख्रिस्ती लोकांची कत्तल केली, तेव्हा मुस्लिम विचारवंत मूग गिळून गप्प का बसले होते? तसेच तो लेख लिहिणारा पत्रकार इझीओमा डॅनियल याला जीव बचावण्यासाठी देश सोडून परागंदा का व्हावे लागले?

 

रश्दींच्या प्रश्नांना उत्तर असे आहे की, या भीषण घटना आपल्या दाराशी दररोज घडत असल्यामुळे आपल्याला त्याचे काही वाटेनासे होते. पाकिस्तानात काही महिन्यांपूर्वी एका डॉक्टरला धर्मनिंदेबद्दल मृत्यूची शिक्षा देण्यात आली. त्याचा गुन्हा एवढाच होता की, त्याने वैद्यकीय महाविद्यालयातील त्याच्या विद्यार्थ्यांना असे सांगितले की, प्रेषित मोहम्मद आणि त्याचे कुटुंब हे आरोग्यविषयक इस्लामी संहिता पाळत नव्हते. अर्थात त्याचे कारण उघड होते. ते म्हणजे प्रेषितापूर्वी इस्लामी संहिता कशी अस्तित्वात असणार? या डॉक्टरने आपल्या शिक्षेविरुद्ध अपील केले; परंतु त्याला तुरुंगातील एका कैद्याने पिस्तुलाची गोळी घालून ठार मारले. त्या कैद्याला पिस्तूल कसे मिळाले, असा प्रश्न विचारायचा नसतो. कारण असे 'चमत्कार' इस्लामी देशात वारंवार घडत असतात.

 

या पार्श्वभूमीवर असे वाटते की, मुसलमानांचा संताप हा ज्या घटनांमध्ये पाश्चिमात्य जग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या गुंतलेले असते, त्या घटनांसाठीच राखीव असतो. उदाहरणार्थ, बोस्नियामध्ये सर्बांनी मुसलमानांची कत्तल केली, रशियाने चेचन्यात लष्करी कारवाई केली की, आमचे पित्त खवळले. परंतु बोस्निया आणि कोसोवोमध्ये, अमेरिकेने असंख्य मुस्लिम बांधवांचे प्राण वाचविण्यासाठी कारवाई केली, तेव्हा एकही मशिदीतून अमेरिकेचे अभिनंदन करण्यात आले नाही.

 

मानवी हक्कांच्या संदर्भात मुसलमानांची भूमिका दुटप्पी असते, याचे कारण म्हणजे आपण असहिष्णू लोक आहोत आणि मतभिन्नता सहन करण्याची आपल्याला सवय नाही. इस्लामी समाजात इतर धर्मांच्या शिकवणीचा उच्चार करण्यासही मनाई असते. परदेशात इस्लामचा प्रचार करणे पाकिस्तान्यांना उचित वाटते; परंतु तेच स्वातंत्र्य परदेशी लोकांना पाकिस्तानात देणे त्यांना उचित वाटत नाही. हा दुट्टपीपणा आहे.

 

मुस्लिम संस्था आणि समूह हे पाश्चिमात्य जगतात दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उपभोग तर घेतातच, पण चक्क सर्रास दुरुपयोग करतात. असे असूनही मुसलमान त्यांना हे दुरुपयोगाचेही स्वातंत्र्य देणाऱ्या संस्कृतीचा आणि समाजाचा द्वेष करतात. एखाद्या मुस्लिम विचारवंताचे भाषण ऐकले तर त्यात पाश्चिमात्य जगाच्य भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील 'पापांचा' पाढा वाचला जातो. परंतु त्याला तुझा मुलगा कोणत्या विद्यापीठात जाणार, असा प्रश्न विचारला असतो तो अमेरिकेतील प्रसिद्ध विद्यापीठांची यादी धडाधड म्हणून दाखवितो.

 

एखादा मुसलमान जर आपल्या देशात सुस्थितीत असेल तर तो आपल्या मुलाला अमेरिकेतील कॉलेजात प्रवेश आणि व्हिसा मिळावा म्हणून आकाशपाताळ एक करील. तो दिवाळखोरी जाहीर करून आपली मालमत्ता मुलाच्या नावावर करील. पाकिस्तानमधील धार्मिक पुराणमतवादी राजकीय पक्षांच्या उच्च नेत्यांपैकी काहींची मुले अमेरिकेत शिकत आहेत. परंतु ते नेते मोठ्या दांभिकपणे पाकिस्तानात मात्र अशी गर्जना करतात की, ते अमेरिकेला पाकिस्तानात अल कायदाचे हस्तक शोधू देणार नाहीत.

 

हा उघड दांभिकपणा पाश्चिमात्य जगाला बोचू लागला आहे. तेथील अधिकाधिक लोक असे प्रश्न विचारू लागले आहेत की, स्वातंत्र्याचे शत्रू असलेल्यांना आमच्या देशात का ठार दिला जात आहे? ११ सप्टेंबरचा उत्पात घडविणारे अतिरेकी हे अमेरिकेत स्टुडंड व्हिसावर गेले होते. त्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य जगतात संतापाची लाट उसळत आहे.

 

मात्र येथे नमूद करणे आवश्यक आहे की, पाश्चिमात्य देशांमध्ये राहणाऱ्या मुसलमानांपैकी बहुसंख्य मुसलमान सभ्य, शांतताप्रिय आणि दीर्घोद्योगी नागरिक आहेत. त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत सुखासमाधानाने जगायचे आहे. त्यापैकी अधिकांश लोक भाविक असले तरी धर्मवेडे नाहीत. त्यांची गणना ओसामा बिन लादेन आणि त्याचे गणंग साथीदार यांच्यामध्ये केली तर त्यांना स्वाभाविकपणे राग येतो. परंतु दुर्दैव असे आहे की, लोक हे परकीयांकडे आपल्या पूर्वग्रहाच्या लोलकातून पाहतात. त्या संदर्भात अमेरिकन आणि युरोपीय लोकं जेवढे दोषी आहेत, तेवढ्याच प्रमाणात मुसलमानही दोषी आहे. इस्लामी पुराणमतवादी अतिरेकाच्या सध्याच्या लाटेमुळे पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या सर्व मुसलमानांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर मुसलमानांविरुद्ध भेदभाव सुरु केला जाईल.

 

मुसलमान आणि पाश्चिमात्य संस्कृतीतील सर्वात मोठा फरक हा त्या संस्कृती महिलांना देत असलेल्या वागणुकीमध्ये आहे. मुल्ला-मौलवी काहीही म्हणत असले तरी पाश्चिमात्य देशातील फारच थोड्या लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसेल की, मुसलमान स्त्रियांना बुरखा आवडतो, त्यांना स्वयंपाकघराबाहेर पडावयास आवडत नाही आणि लग्न ठरविताना आपला विचार घेतला जावा, असे त्यांना वाटत नाही.

 

मुसलमान नेते पाश्चिमात्यांच्या टीकेला असे उत्तर देतात की, त्यांच्या समाजाला त्याच्या 'सांस्कृतिक मूल्यांनुसार' वागण्याचे स्वातंत्र्य आहे. त्या मूल्यांमध्ये महिलांवर दडपशाही, अल्पसंख्यांकांचा छळ आणि मध्ययुगातील क्रूर शिक्षा यांचा समावेश आहे. प्रत्येक युगाची मूल्ये वेगळी असतात. आधुनिक युगाची मूल्ये वेगळी आहेत आणि मुसलमान देश आणि मुसलमान समाज पाळत असलेल्या मूल्यांच्या ती अगदी विरुद्ध आहेत.

 

आणखीन एक वस्तुस्थिती अशी आहे की, जगातील आजचा सत्तेचा समतोल असा आहे की, मुसलमान आपली मते जगावर लाडू शकणार नाहीत. उलट त्यांना जगाच्या आचारविचारांशी मिळतेजुळते घ्यावे लागेल.

 

१८ व्या शतकापर्यंत तुर्की साम्राज्य ही एक महासत्ता होती. त्यावेळी फार थोडे मुसलमान पाश्चिमात्य देशात प्रवास करीत असत. पाश्चिमात्य देशात गेल्यामुळे आपण धर्मभ्रष्ट होऊ अशी भीती त्यांना वाटत असे. या उलट त्याच काळात अनेक पाश्चिमात्य विचारवंतांनी इस्लामचा आणि मुसलमान समाजाचा सखोल अभ्यास केला. तीन शतकांनंतर परिस्थिती पालटली आहे. कोट्यवधी मुसलमान हे पाश्चिमात्य देशात स्थायिक झाले आहेत; परंतु त्यापैकी फारच थोड्या जणांनी आपल्या यजमान समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांचा अभ्यास करून ती स्वीकारली आहेत. मुसलमान समाजाची ही नकारात्मक भूमिका बदलल्याखेरीज मुसलमान देश आणि समाज कायम मागासलेलाच राहील.

 

@ इरफान हुसेन

 

(हा लेख "इरफान हुसेन" यांनी 'दि डॉन, कराची' या वर्तमानपत्रात लिहिला होता. त्याचे मराठी शब्दांकन "मिलिंद गाडगीळ" यांनी केले जे 'जळगाव तरुण भारत' या वृत्तपत्रात दिनांक ७ मार्च २००३ रोजी प्रसिद्ध झाले होते. मुसलमान समाजाने अजूनही विचार करावा अशी माझी इच्छा असल्यामुळे तो लेख मी कॉपी करत आहे ज्यायोगे तो सरमिसळच्या वाचकांसमोर येईल)

 

मला दुर्दैवाने मूळ लेख इंटरनेटवर मिळाला नाही. परंतु जळगाव तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाची प्रत माझ्याकडे आहे.

Leave a comment



Rajendra Phadke

2 years ago

उत्तम विचार !

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS