शिवाजी पार्कच्या गप्पा
माझ्या शिवाजी पार्कवरील पहिल्या लेखात बऱ्याच स्थानांचा अनुल्लेख बहुदा खूप लोकांना खटकला असेल.. महापौर बंगला, गांधी स्विमिंग पूल, परिसरात असलेली किमान १०-१५ मंदिरे, सेनापती बापट पुतळा, मोडकांचा उद्यम बंगला, सावरकर सदन, वसईकरचा वडा पाव स्टॉल, बादल-बिजली-बरखा, श्री, रिव्होली, प्लाझा आणि कोहिनूर सिनेमा वगैरे वगैरे.. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आधी उल्लेख केलेली स्थळे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आणि माझ्या घराजवळची होती.. आणि दुसरं कारण म्हणजे बऱ्याच इतर स्थळांचा पुढील काही लेखांमध्ये प्रामुख्याने संदर्भ येणार होता आणि आहेच.. सावरकर स्मारकाचा उल्लेख न करण्याचे कारण म्हणजे ते खूप नंतर, साधारणपणे १९९० साली उभे राहिले..
मी आधीच्या लेखात असे म्हटलं होतं की मी या झलकीत माझ्या शालेय जीवनातील काही गंमती सांगीन पण मग असा विचार आला की कुठल्याही कामाची सुरुवात करताना ती गणेश स्मरणाने करावी असे म्हणतात म्हणून हा थोडा बदल.. माझा स्वतःचा जर मी विचार केला तर मी देवभक्त आहे पण मंदिर भक्त नक्कीच नाही.. स्थान महिमा असतो असे म्हणतात, असेलही पण त्यावर भाष्य करण्याऐवढा माझा काही अधिकार नाही.. माझ्या मते भाव तेथे देव त्यामुळे मी माझ्या घरात बसून जर मनोभावे देवाला पुजलं तर ते त्याच्यापर्यंत पोहोचेल..
त्यामुळे तसे कुठच्याच मंदिराबद्दल बोलण्याची गरज नाही पण गणपती स्मरण म्हटले तर मग शिवाजी पार्कचा परिसरातील उद्यान गणेश आणि सिद्धिविनायक मंदिर याबाबत काहीतरी बोलणे क्रमप्राप्त आहे म्हणून हा लेख प्रपंच.. हे लिहिताना कोणाचेही मन दुखावण्याचा माझा अजिबात विचार सुद्धा नाही.. ज्याने त्याने आपापली श्रद्धा जशी असेल तशीच ठेवावी.. पण ते करताना माझेही हे स्वातंत्र्य मान्य करावे..
आता पहिला उद्यान गणेशाचा विचार केला तर १९७० साली स्थापन झालेले हे मंदिर अनधिकृत म्हणून महानगर पालिकेने ३-४ वेळा पाडले होते.. कालांतराने ते मंदिर नियमित करण्यात आले.. मी काही देवळात जातच नाही असे नाही किंवा जाणारच नाही अशी काही शपथ घेतलेली नाही पण मला अती गर्दी आणि बुजबुजाट याने गुदमरायला होतं त्यामुळे देवळात जाणे तसे मी टाळण्याचाच प्रयत्न करतो.. पण मग त्यातल्या त्यात मला हे देऊळ भावते कारण बाहेरच्या बाहेरून गणपतीचे दर्शन होते आणि नमस्कार करून पुढे सरकता येतं.. शिवाजी पार्क मध्ये चालणारी अनेक मंडळी चपला बूट न काढता बाहेरूनच नमस्कार करतात.. या देवस्थानाचे असे सर्वसमावेशक असणे हीच त्याची खासियत आहे..
सिद्धिविनायक मंदिर हे दादर आणि प्रभादेवी दोन्ही मध्ये आहे अशी स्थिती आहे कारण मंदिराच्या १० पावले आधी असलेला पेट्रोल पंप दादरमध्ये येतो.. असो..
१९८० च्या दशकाअखेर पर्यंत हे मंदिर एका झोपडीवजा वास्तूत होते.. माझे एक काका मंदिराच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहायचे आणि त्यांच्या गॅलरी मधून मूर्तीचे दर्शन घडत असे.. पण त्यानंतर त्या देवळाची महती वाढू लागली आणि त्याचीही टोलेजंग वास्तू उभी राहिली.. मग हळूहळू व्हीआयपी मंडळींच्या नवसाला पावणारा गणपती झाल्याने काही वर्षातच देशातील अतिश्रीमंत मंदिरात त्याची गणना होऊ लागली.. पण अति पैसा आला की जे साधारणपणे होते तेच घडले आणि एक प्रकारे दादागिरीच सुरु झाली.. काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या नावाखाली देवस्थानाने मंदिरासमोरील अर्धा रस्ता चक्क गिळंकृत केला आणि रस्त्याच्या मधोमध एक १०-१२ फुटी उंच भिंतच उभी करून टाकली.. ज्या मुंबईत ट्रॅफिक जॅमचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तिथे प्रशासनाने आणि न्यायसंस्थेने असे मूग गिळून ह्यावर कारवाई न करणे हे मला तरी अजिबात पटले नाही आणि पटणार नाही.. आता तर काय म्हणे, भक्तांना गर्दीचा किंवा ट्रॅफिकचा त्रास होऊ नये म्हणून दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या ट्रॅफिकला मंदिराच्या जवळ उजवीकडे वळायला बंदी.. पुढे जाऊन एका छोट्या गल्लीतून जायचे; म्हणजे इतरांच्या गैरसोयीचे कोणालाही सोयरसुतक नाही.. पण बोलणार कोण आणि कोणाला? आपलं ऐकणार कोण?
जाऊ दे, आपल्या तोंडाची वाफ दवडण्यात काहीच अर्थ नाही; त्यापेक्षा पुढच्या लेखात काय लिहावं याचा विचार सुरु करावा..
यशवंत मराठे
#shivajipark #memories #udyanganesh #sidhhivinayak