शिवाजी पार्कच्या गप्पा
आमची १० वी एसएससी ची दुसरी बॅच आणि त्यावेळी कॉलेज मध्ये ११ वी ची सोयच नव्हती त्यामुळे आमची ११ वी शाळेतच झाली.. बदल एवढाच घडला की हाफ पॅन्टच्या ऐवजी फुल पॅन्ट झाली आणि आम्हाला इंग्रजी माध्यमातून शिकवण्यात येणार होते.. टिपिकल मराठी माध्यमातील शिक्षक अचानकपणे इंग्रजीत शिकवणार आणि आम्हांला ते कळणार? सगळाच आनंदी आनंद.. पण एक गोष्ट घडली की आम्हाला अचानक मोठं झाल्याचा आभास निर्माण झाला..
त्यामुळे अधूनमधून शाळेतून बुट्टी मारून सिनेमाला जाणे हे मुर्दुमकीचे लक्षण वाटू लागले.. शिवाजी पार्क परिसरात मुख्यत्वे करून नऊ सिनेमा थिएटर्स होती.. बादल, बिजली, बरखा, रिव्होली, सिटीलाईट, पॅराडाईज, प्लाझा, कोहिनूर आणि श्री सिनेमा.. यातील रिव्होली मध्ये बऱ्याच वेळेला साऊथ इंडियन सिनेमे लागत असत त्यामुळे आमच्या लिस्ट मधून ते बाद फार लवकर झाले.. सिटीलाईट आणि पॅराडाईज तशी एक प्रकारे टुकार सिनेमा घरे त्यामुळे ती देखील आमच्या लिस्ट मधून वगळण्यात आली.. प्लाझा आणि कोहिनूर म्हणजे मराठी चित्रपटांची थिएटर्स ज्यात आम्हाला कोणालाच फारसा इंटरेस्ट नव्हता त्यामुळे त्यावरही फुल्ली.. त्यामुळे आमचा सगळा संचार उरलेल्या ४ थिएटर्स मधेच होता..
काही सिनेमे किती वेळा बघितले याला काही हिशेबच नाही.. जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, बॉबी, शोले ही वानगीदाखल काही नावे.. या सिनेमांमधील सीन आणि सीन पाठ असायचा पण एकत्र ग्रुप मध्ये जाण्याची नुसती धमाल.. एकदा आठवतंय की तिसरी मंझिल सिनेमात प्रेमनाथची एंट्री झाल्या झाल्या आमच्यातील एक जण ओरडला "हाच खुनी आहे".. तेव्हा सिनेमा पहिल्यांदाच बघायला आलेला एक सरदारजी इतका चिडला की त्याने आमच्या मित्राच्या कानाखाली एक मस्त आवाज काढला आणि तो थिएटर मधून निघून गेला.. बरखा थिएटर तसे पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर असल्यासारखे होते.. तिथे गेलेले असता मध्यंतरात आमच्या मित्राचे वडील हॉलच्या बाहेर उभे दिसले पण त्याच्या थोडंसच आधी आमचा मित्र टॉयलेट मध्ये गेला होता; तिथे त्याला इतरांनी बाहेरचा धोका सांगितला.. तो इतका घाबरला की त्याने टॉयलेटच्या खिडकीतून पाईपच्या सहाय्याने खाली उतरून धूम ठोकली आणि बापाच्या मारापासून वाचला..
पण आमचं सगळ्यात आवडतं थिएटर म्हणजे श्री सिनेमा.. तेव्हा स्टॉलचे तिकीट रु. १.७५ आणि बाल्कनी रु. २.५०.. आमच्या एका मित्राच्या मित्राचा मामा तिथे डोअरकीपर होता.. आम्हीही त्याला अर्चनमामा म्हणायला सुरुवात केली.. त्याला एक रुपया द्यायचा आणि सरळ बाल्कनीत जाऊन बसायचं.. कधी कधी तो सांगायचा की आज बरीच गर्दी आहे, तेव्हा खालीच बसा.. बरं त्या थिएटरची दुसरी खासियत म्हणजे प्रोजेक्टर रूम मधील माणसाच्या मूडवर सिनेमाची लांबी ठरायची.. मधलं एखादं रीळ लागायचेच नाही.. तिथे कुठलाही सिनेमा दीड तासापेक्षा जास्त चालत नसे.. त्यामुळे ६-६.३० चा पिक्चर बघायला गेलो तरी ८ वाजता जेवायला घरी त्यामुळे घरच्यांना कधी शंका यायला जागाच नसे.. तिथली एक अविस्मरणीय गम्मत म्हणजे तिथे दर काही आठवडयांनी "ब्लो हॉट ब्लो कोल्ड" नावाचा सिनेमा लागायचा आणि त्याची पोस्टर खूप उन्मादक असायची आणि आम्ही उत्सुकतेने दर वेळी जायचो.. सिनेमातील इंग्रजी एकही शब्द कळायचा नाही आणि थिएटरच्या कृपेने "ते" सीन्सही दिसायचे नाहीत तरी आम्ही त्या पिक्चरचा नाद काही सोडायला तयार नव्हतो.. काही कारणाने ते थिएटरच काही वर्षांपूर्वी बंद झाले आणि आम्हाला अगदी जवळचं कोणीतरी जावे इतके वाईट वाटले..
मी बारावीत कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि एक वेगळेच स्वातंत्र्य मिळाल्याची एक नशा चढली.. खरं सांगायचं तर तशी घरून कसलीच सक्ती नव्हती पण उगाचच डोक्यातली हवा; दुसरं काय.. आणि मग हातात सिगारेट हे भूषण वाटू लागले.. तेव्हापासून ती जी हातात घुसली ती आज ४० वर्षे झाली तरी सुटली नाही.. पण तेव्हा सिगारेट कुठे ओढायची हा एक मोठा प्रश्न होता आणि तो परिसरातील इराणी कॅफेंनी सोडवला.. त्यामुळे आता पुढची झलक इराण्यांची व्हायलाच हवी, नाही का?
यशवंत मराठे
#shivajipark #reminiscence #memories #theatres #films