मी काही तसा पुस्तक खाणारा माणूस नव्हे. पुस्तके आवडायची पण त्यांचे वेड काही नव्हते. त्यामुळे माझे काही प्रचंड वगैरे वाचन अजिबातच नव्हते. माझी आवड तशी सरळ, बाळबोध; चाकोरीबाहेरील पुस्तके मी फार कमी वाचली. पण मी जे वाचन लहानपणी केले, तेच वाचणारे पण बरेच असतील त्यामुळे आम्हां सर्वांच्याच आठवणींना उजाळा देण्याचा हा एक प्रयत्न.
अगदी सुरूवातीला वाचलेली पुस्तकं म्हणजे बहुधा ज्योत्स्ना प्रकाशन अथवा ढवळे प्रकाशनाची लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं. राजाराणी, राक्षस, त्याचा पोपटात असलेला जीव वगैरेंची. वेगळ्याच एका अद्भुत दुनियेत घेऊन जाणारी. मग रात्री स्वप्नातही तेच दिसायचं. अर्थात तेव्हा राजकन्या वगैरे पेक्षा तो राक्षस, पोपट आणि त्याच्या राजपुत्राशी होणार्या लढायाच जास्त दिसायच्या स्वप्नात. पण एकंदरीत मजा यायची. जसजसा थोडा मोठा झालो तसतसं मग क्षितिज विस्तारले. बाबा आठवड्यातून एखाद्या दिवशी कुठले तरी मासिक आणायचे. इंग्रजी असले तरी त्यातली रंगीत चित्रं बघायला मजा यायची. आणि तेव्हाच ओळख झाली 'फँटम'ची.
फँटम, त्याची लेडी डायना, त्याचे डेंकाली जंगल, मधून मधून त्या फँटमचा होणारा मि. वॉकर, फँटमचा पूर्वज जो पहिल्यांदा फँटम झाला त्याने कवटी हातात घेऊन घेतलेली शप्पथ, फँटमची मुलं, म्हातारा गुर्रन हे सगळं मला अगदी अजूनही खरं वाटतं. आता, हे सगळं काल्पनिक आहे असं माहिती आहे, पण वाटतच नाही अजूनही. अजून थोडा मोठा झाल्यावर भेटली, इंद्रजाल कॉमिक्स. त्यात प्रामुख्याने मँड्रेक आणि त्याचा पैलवान सहाय्यक लोथार यांचे कारनामे असत. जादूचे कॉलेज, तिथला प्रिन्सिपॉल थेरॉन आणि ते मनाच्या शक्तीचे प्रयोग इत्यादी हे केवळ अद्भुत. माझा आजही प्रयत्न आहे की जुन्या फँटमच्या कॉमिकचा पूर्ण सेट मिळाला तर विकत घ्यायचा.
त्याच वेळेस आणि त्याच बरोबरीने वेड लावले होते ते अनंत पै यांच्या अमर चित्रकथांनी. माझ्या मते अगदी अजूनही 'कॉमिक्स' या प्रकारातली ही सगळ्यात छान अशी मालिका होती. या चित्रकथांनी माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकणार्या मुलाला भारतीय संस्कृतीतल्या गोष्टींचा प्रचंड खजिना खुला केला. रामायण, महाभारत वगैरे तर होतेच पण राजपुतान्यातल्या राणा संगा, राणा प्रताप, राणी पद्मिनी सारख्या थोर आणि शूर व्यक्तींचा परिचय मला झाला. फँटम कॉमिक प्रमाणेच मला अमरचित्रकथांचा संपूर्ण संग्रह विकत घ्यायची इच्छा आहे. अमर चित्रकथांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर रेखाटनं, साधी सरळ भाषा आणि बघत रहावी अशी रंगसंगती. अमर चित्रकथांना माझ्या मनात एक अगदी वेगळेच स्थान आहे. नेहमीच राहील.
चांदोबा आणि किशोर मासिकं तर अगदी नववीत वगैरे जाईपर्यंत दर महिन्याला घरी येत असत. आमच्याकडे अधूनमधून ‘ललित' मासिक येत असे. त्यातील 'ठणठणपाळ' तर एकदम हिट्ट होता. अजूनही ते मिशाळ ठणठणपाळाचे सरवट्यांनी काढलेले व्यंगचित्र डोळ्यासमोर आहे. त्याचप्रमाणे सोबतीला भा रा भागवतांचा फास्टर फेणे होताच.
नंतर मग पुल आणि वपु यांनी थोड्याफार प्रमाणात झपाटलं. त्यांच्या पुस्तकांची किती पारायणे केली याला काही हिशोबच नाही. तसेच रणजित देसाई, शिवाजी सावंत आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या कांदबऱ्यांनी तर जीवनच पालटून टाकलं. छावा, मृत्युंजय, राधेय, श्रीमान योगी, स्वामी, राजा शिवछत्रपती यांनी वाचन पार व्यापून टाकलं.
नंतर खऱ्या अर्थाने वेड लावलं ते म्हणजे रहस्य कथांनी. चंद्रकांत सखाराम चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक. बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार ना सी फडके यांच्या कादंबर्यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबर्या चोरून वाचल्या. ज्या काळात साने गुरुजी आणि वि.स. खांडेकर यांचे आणि ऐतिहासिक चरित्रांचे वाचन हेच शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य समजले जात होते त्या काळात मुखपृष्ठावर पाठीत सुरा खुपसलेला मृतदेह आणि किंचाळणारी स्त्री असली चित्रे असलेली बाबूरावांची पुस्तके चोरूनच वाचली जात. अर्नाळकरांनंतर मग सुहास शिरवळकर ज्यांनी बॅ. अमर विश्वास, फिरोज ईराणी, मंदार पटवर्धन आणि दारा बुलंद अशी नायक पात्रे अस्तित्वात आणली. पण माझे खरे लाडके रहस्यकथाकार म्हणजे गुरुनाथ नाईक. त्यांच्या नायक पात्रांनी म्हणजे गोलंदाज (उदयसिंह राठोड), शिलेदार (कॅप्टन दीप), शब्दवेधी (सुरज), गरुड (मेजर अविनाश भोसले), रातराणी (रजनी काटकर), बहिर्जी (बहिर्जी नाईक) आणि सागर (जीवन सावरकर) आयुष्यच बदलून टाकले. हल्लीच गुरुनाथ नाईक यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे असे वाचून खूप वाईट वाटले.
आता कोणाला वाटेल की मी फक्त मराठीच वाचन केले की काय? पण ते बऱ्याच अंशी खरं आहे. आम्हाला पाचवीपासून इंग्रजी सुरू झाले. त्यामुळे इंग्रजी ज्ञान यथातथाच त्यामुळे साहजिकच इंग्रजी वाचन अगदीच नावाला. ते वाचन कॉलेज नंतर सुरुवात झाले. पण तिथे देखील path breaking किंवा out of box असे वाचन कमीच; आणि थ्रिलर्सची आवड जास्त.
ह्या सगळ्यात मी कुठेही शृंगारिक वाङ्मयाचा उल्लेख केला नाही म्हणजे त्याची आवड नव्हती असा निष्कर्ष कृपया कोणी काढू नये. तो एक आयुष्यातील मोठा पण आता हास्यास्पद टप्पा आहे.
आम्ही शाळेत असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील, चावट लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची शामा कादंबरी बरीच गाजली होती. त्या कादंबरी मधे काय होतं असं?? थोडं रोमान्सचं वर्णन. नायकाने नायिकेला जवळ घेतलं, तिचं चुंबन घेतलं; टर्रेबाज, घाटदार असे शब्द वाचले की आमच्या अंगावर शहारा यायचा. त्याकाळी पिवळ्या पारदर्शक प्लास्टिक आवरणात असलेली कुंती आणि इतर काही नामक पुस्तके मिळायची. त्यातली भाषा आज जरी आठवली (दांडगा मठ वगैरे) तरी हसायला येते. पण त्यावेळी आम्ही वर्गातील काही मुले पैसे गोळा करून ती विकत घ्यायचो आणि मग अगदी हुशार मुलापासून ढ मुलापर्यंत सगळे आळीपाळीने वर्गात क्लास चालू असताना वाचायचे; नाहीतर वाचणार कधी? बरं, दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ही पुस्तके ठेवायची कुठे? शाळेच्या बॅगेत ठेऊन घरी कशी नेणार? आमच्या वर्गातील एका मुलाने मात्र हा आमचा प्रॉब्लेम सोडवला; तो म्हणाला काळजी करू नका; मी सांभाळून ठेवीन. आमचा त्याच्याबद्दलचा आदर शंभर पटींनी वाढला.
पण खरंच नीट विचार केला तर त्याच्यात काय होते? आज नेटवर इतके जास्त व्हिडिओ, अश्लील फोटो आणि लेख उपलब्ध आहेत की काकोडकर आणि ह्या सगळ्या गोष्टी पार फिक्या पडतील.
आज मागे वळून बघताना या सर्व गोष्टी आठवल्या आणि मन एकदम १९७० च्या दशकात गेलं. Those were the days!!
यशवंत मराठे
#IndrajalComics #AmarChitraKatha #Phantom #Mandrake #वेताळ #इंद्रजालकॉमिक्स #अमरचित्रकथा #रहस्यकथा #वाचन #लहानपण #मँड्रेक #Childhood #Reading