तसेच रस्त्यांच्या दुर्दशेमुळे, रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघाती मृत्यू झालेल्या, जायबंदी झालेल्या सर्वसामान्य माणसांना आणि त्यांच्या माणसांच्या कुटुंबियांना आयुष्यभर केंद्र/राज्य सरकारं ते सांगतील तो दंड देणार आहेत का? तर छे! संबंध काय? गडकरी साहेब... जनतेवर नवनवीन कायदे लावण्याआधी राज्यातील रस्ते नीट करा. ८०% अपघात रस्त्यातील खड्ड्यामुळे होत आहेत. जनतेला नियम आहेत. प्रवाशांना नियम आहेत. वाहन चालकांना नियम आहेत. पण सरकारला कोणतेही नियम नाही. असे का? नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसुली हे ठीकच. परंतु असे एकतर्फी आदेश म्हणजे आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रकार आहे.
महामार्गांवर होणाऱ्या अपघातांना केवळ चालकांना जबाबदार ठरवणे कितपत बरोबर आहे? सदोष वळणे, नादुरूस्त रस्ते, रस्ता जिथे निमूळता होतो त्याआधी किमान 1 किमी / 500 मिटर्स त्या प्रकारचे फलक नसणे, असलेच तर खराब अवस्थेत असणे, रात्रीच्या वेळेस वाचता न येणे अशा नेहमीच निदर्शनास येणाऱ्या चुका. याखेरीज त्यांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांवर, रस्ते बांधणी कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवर कुणाचाच वचक राहिलेला नाही. त्यांच्यावर कधी कारवाई झालेली ऐकण्यात किंवा वाचनात आलेली नाही.
हे सर्व प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलपमेंटच्या नावाखाली चालू करायचे आणि सरकारकडून निधी काढायचा, त्यातील निम्मा आपण खायचा, थोडा काँट्रॅक्टरना खायला द्यायचा आणि उरलेल्यात निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवायचे. सरकारी निधी आणि त्याचा विनियोग हे एक मोठ्ठ अर्थकारण आहे. त्यामुळे खाबू सरकारी कर्मचारी, पुढारी, शासकीय अधिकारी यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी काहीतरी करा. जनतेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघतील यासाठी काहीतरी करा. न्यायालयात वर्षानुवर्षे वाहतूक खटले प्रलंबित राहतात म्हणून न्यायालयांना जाब विचारा. जनतेच्या गळ्याभोवती दंड वसुलीचे फास आवळणारी ही कुठली लोकशाही? जनतेला नियमांच्या कचाट्यात अडकविण्याऐवजी अगोदर तुमची यंत्रणा सुधारा.
सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनो... हे पतंग उडवणे बंद करा. तुमच्या राजकारणाच्या खेळात सर्वसामान्य माणसाचा जीव जातोय याचं किमानपक्षी भान ठेवा. आम्हाला हवेतल्या गाड्या, मेट्रो, बुलेट ट्रेन नसतील तरी एक वेळ चालेल पण आधी रस्ते नीट करा. जलद प्रवासाची आम्हाला ओढ नाही. सुरक्षित आणि नियोजित प्रवासाची अपेक्षा आहे.