श्रीकांत भिडे हा माझा साडू. माझं लग्न ठरवण्यासाठी आम्ही समस्त मराठे कुटुंबीय नागपूरला गेलो असता आम्हाला हा एअरपोर्टवर रिसिव्ह करायला आला होता. पहिला मनात विचार आला, च्यायला, काय हँडसम माणूस आहे.
त्याला काय संबोधायचं हा प्रश्नच होता कारण तो माझ्यापेक्षा जवळजवळ १० वर्षांनी मोठा. अदिती त्याला दादा म्हणते पण मी याला एकेरी नावाने हाक मारायला कारणीभूत झाली ती आमची १९८७ मधील नागपूर रोड ट्रिप. आमच्या सासऱ्यांनी त्यावेळची सुपर लक्झरी कार, प्रीमियर 118 NE, थोडे ज्यादा पैसे देऊन विकत घेतली. त्यावेळी मी, श्रीकांत, माझा दुसरा साडू सुधीर दांडेकर आणि अदितीचा चुलत भाऊ प्रसन्न चितळे अशा चौघांनी संध्याकाळी चार वाजता शोरुम मधून गाडी पिक-अप केली आणि सरळ नागपूरला जायला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नागपूरला पोहोचेपर्यंत मी या तिन्ही सिनियर मंडळींना एकेरी नावाची महती पटवून दिली.
नागपूरच्या एका मराठी मिडियम मधील हुशार मुलगा ही त्याची पहिली ओळख. तो इंटर सायन्स होईपर्यंत त्याला आय.आय.टी म्हणजे काय माहीतच नव्हतं. त्याचे काका म्हणजे पद्मश्री विष्णू गणेश भिडे, जे १९८४ ते १९८८ या कालावधीत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी श्रीकांतला आय.आय.टी बद्दल सांगून परीक्षा देण्यास उद्युक्त केले. त्याच्याकडे काकांकडून आलेला हुशारीचा वारसा होताच त्यामुळे आय.आय.टी दिल्लीला प्रवेश मिळाला. आता नागपूरच्या आपल्या छोट्या घरकुलातून एकदम दिल्ली म्हणजे एखाद्या लहानशा प्रवाहाची समुद्राशी टक्कर. त्यात परत इंग्रजीची मारामार; म्हणजे दुष्काळात जणू चौदावा महिना. तो स्वतःबद्दल फारसं काही सांगत नाहीच म्हणा पण घरची परिस्थिती अगदी बेताची असल्यामुळे हॉस्टेल लाईफ एन्जॉय करणे शक्यच नव्हते. मी ऐकलेली एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा सायन्स बॉक्स हरवला किंवा चोरीला गेला. आता घरी मागण्याची सोय नाही त्यामुळे पुढची तीन वर्षे त्याने इथून तिथून बॉक्स उसना घेऊन काढली आणि मग पाचव्या वर्षी घरून बॉक्स साठी पैसे मागवले. या सगळ्या अग्निदिव्यातून जाऊन देखील त्याने प्रत्येक वर्षी पहिला किंवा दुसरा नंबर सोडला नाही आणि शेवटच्या वर्षी गोल्ड मेडल मिळवूनच बाहेर पडला.
तो मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून १९७२ साली हिंदुस्थान लिव्हरला जॉईन झाला तेव्हा त्याचा मासिक पगार रु. आठशे होता आणि १९७६ साली त्याचे लग्न झाले त्या वेळेला त्याचा महिना पगार रु १२०० होता. तो पुढची ३५ वर्षे त्याच कंपनीत मोठा होत गेला आणि त्याचा तो प्रवास थक्क करणारा आहे. आधी मुंबई, मग एकदम मध्य प्रदेश मधील छिंदवारा सारखे खेडं, नंतर कलकत्ता, मग लंडन, परत मुंबई आणि अखेरीस सिंगापूर. तो सिनियर व्हाईस प्रेसिडेंट असताना लवकर रिटायर झाला नाहीतर कदाचित तो हिंदुस्थान लिव्हरचा भारतातील चेअरमन पण होऊ शकला असता. (ऑफ कोर्स, हे माझे म्हणणे आहे, त्याने असे कधी दर्शविले सुद्धा नाही.)
Dedication, hard work and sincerity have been his virtues. पण तरी देखील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नशिबाच्या ग्यानबाची मेख नीट जागी बसावी लागते अन्यथा नियतीच्या फेऱ्यासमोर आपले काही चालत नाही. The lady luck has been kind to him as he was at the right place at the right time. शेअर्स असो, की लँड असो की रियल इस्टेट असो, तो जिथे हात लावेल तिथे फक्त सोनंच होतं (बहुदा त्याच्यामुळेच सोनं उगवत असेल). He is a completely self made man and I feel very proud that he has done so well in life. बरं एवढी कमावलेली संपत्ती असून देखील त्याच्यात गर्वाचा साधा लवलेश सुद्धा नाही. खरंच कमाल आहे.
हा खऱ्या अर्थाने सर्वगुणसंपन्न आहे. अतिशय मृदू आणि हळवा स्वभाव, निर्व्यसनी, लोकांना मदत करेल पण या कानाचं त्या कानाला कळू न देण्याची दक्षता घेतो. अदितीने स्वतःचा व्यवसाय चालू केला तेव्हा त्याने केलेली मदत आम्ही दोघेही विसरू शकत नाही. नागपूरमधील किती लोकांना त्यांचे बस्तान बसवायला ह्याने मदत केली असेल हे तो भगवंतच जाणे. परंतु म्हणतात ना की उजव्या हाताने केलेल्या मदतीची पुसटशी कल्पना डाव्या हाताला पण लागू नये, तो अगदी तसाच वागतो. महत्वाची गोष्ट म्हणजे समोरचा माणूस कसाही वागला तरी हा त्याचा मदत करण्याचा मूळ स्वभाव काही सोडत नाही आणि कसलीही अपेक्षा ठेवत नाही. असा निरपेक्ष स्वभाव खऱ्या आध्यात्मिक माणसाचाच असू शकतो. पण त्याच्या अशा गुणी स्वभावामुळे माझी ना जाम गोची होते. सासऱ्यांच्या नजरेत श्रीकांत आणि सुधीर म्हणजे आदर्श जावई; मला जवळपास पण पोहोचता येणार नाही कारण ते माउंट एव्हरेस्ट चढण्याएवढे कर्मकठीण काम आहे. त्यामुळे जावयात माझा नंबर कायम ढेक्काच राहणार. असो.
घरची फळं, किराणा आणि भाजीपाला विकत हाच आणतो. बायकोला न सांगता तिच्यासाठी आणि मुलींसाठी तो काय काय करतो ते सगळं लिहिणं पण कठीण आहे. मीनल खरंच सुदैवी आहे; हां, आता ती बायको म्हटल्यानंतर त्याच्यातील काहीतरी खामी सांगेल पण त्याला तसा अर्थ नाही.
बरं, हा सगळ्यांशी संपर्क ठेऊन असतो; त्याचे नातेवाईक, मीनलचे नातेवाईक. त्यांना अधूनमधून फोन करेल, भेटून येईल. मला नुसता असा विचार करणे सुद्धा कर्मकठीण काम आहे. एकच उदाहरण म्हणजे सुधीरचा पालघर मधील नोकर बारकू इथे मुंबईत KEM Hospital ला ऍडमिट असताना तो त्यालाही तिथे भेटून आला. Hats off to him.
त्याची मला नेहमी जाणवणारी गोष्ट म्हणजे जरी तो सगळ्यांशी connected असला तरी तो तसा मानसिक detached (तटस्थ) आहे. अध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आवश्यक असा हा गुण त्याच्यात उपजतच आहे. याला गेल्या काही वर्षात थोडा अपवाद निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे त्याचे दोन्ही नातू. अद्वैत आणि नील या दोघांच्या बाबतीत तो अतिशय हळवा आहे. त्याच्या खालोखाल सोनल आणि धनश्री. बहुदा त्याच्यानंतर मीनलचा नंबर लागेल (मीनल, रागावू नकोस). फिरतीची नोकरी असल्यामुळे तसे मित्र खूप नाहीत.
याची झोपेची वेळ झाली की हा मात्र हा जाम अस्वस्थ होतो. गप्पा मारत रात्री उशिरापर्यंत बसणे हे याला अशक्य आहे. शिवराळ भाषा आणि चावट जोक यांच्यापासून तसा तो लांबच असतो; त्याला ते बहुदा झेपतच नाही. पण त्याची एक गोष्ट मात्र मला नेहमी आश्चर्यचकित करते. मी गेल्या ३५ वर्षात याला खळखळून हसताना बघितलेले नाही. हसून हसून डोळ्यातून पाणी आले असं याच्या बाबतीत कधी घडलं आहे का हा संशोधनाचा विषय आहे.
रोल मॉडेल म्हणजे आदर्श व्यक्ती परंतु जेव्हा अशी व्यक्ती एका उत्तुंग पातळीवर जाते तेव्हा आपण स्वतःलाच खूप खुजे वाटू लागतो. तरी देखील आपल्या अगदी जवळची एखादी व्यक्ती त्या स्थानी पोहोचलेली दिसते तेव्हा आपल्याला सुद्धा आशेचा किरण दिसू लागतो आणि त्याच्या जवळपास जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. माझ्याचप्रमाणे श्रीकांत हा आणखीन किती लोकांचा आदर्श असेल हे सांगणे कठीण आहे.
आमच्यात जरी १० वर्षाचं अंतर असलं तरी आमचे साडू या नात्यापेक्षा मित्रत्वाचे संबंध जास्त आहेत. आणि त्याच्याच बळावर हा लेख लिहिण्याचे मी धाडस केले आहे. मला कल्पना आहे की त्याचे हे केलेलं कौतुक श्रीकांतला आवडणार नाही पण आता मी लिहिलंच म्हटल्यावर तो बिचारा काय करणार?
आम्ही सर्वच अतिशय नशीबवान आहोत की श्रीकांत सारखा माणूस आमच्या आयुष्यात आला. २०२१ मध्ये तो सत्तरीचा होणार तेव्हा उर्वरित आयुष्य निरोगी लाभावे हीच प्रार्थना. I am sure he will not expect anything more.
@ यशवंत मराठे