आपण टीव्ही वरती एका सुगंधी बॉडी स्प्रे ची जाहिरात बघतो की एक तरुण युवक बॉडी स्प्रे मारून जात असतो आणि अनेक तरुणी त्याला धावून धावून मिठ्या मारत असतात. आपल्या मनात विचार येतो, "क्या कमाल की चीज है"; अनुभव घेतला पाहिजे असे वाटू लागतं. आपण मारे ऐटीत सर्वांगावर स्प्रे ची उधळण करून रस्त्यावरून गेल्यावर लक्षात येते की उपयोग शून्य. बायकोच्या आजूबाजूला घोटाळलो तरी सुद्धा ती जवळ येत नाही. बरं, रागावून कंपनीवर केस करायचा विचार केला तर बाटली वरती बारीक अक्षरात काय लिहिलेले असते - "जाहिरात ही प्रॉडक्ट विकण्यासाठी आहे, तिचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही." म्हणजे काय तर बोलती बंद, पुरता पचका.
पूर्वी महाभारत काळात एका सुंदर नावाडी युवतीने "मत्स्यगंधा" नामक एक बॉडी स्प्रे मारून पुरुषांना दूर ठेवण्याचा एक प्रयत्न करून बघितला. परंतु तिच्या दुर्दैवाने किंवा सुदैवाने (तुम्हीच काय ते ठरवा) पराशर नामक गौड सारस्वत ऋषी त्या माशाच्या वासानेच आकर्षित होऊन तिच्या नावेत बसला आणि काहीतरी गौडबंगाल करून भानगड केलीच; म्हणजे परत बॉडी स्प्रे चा उपयोग शून्य. तो पराशर ऋषी पक्का लबाड, त्याने जाता जाता त्या युवतींकडे असलेला "मत्स्यगंधा" बॉडी स्प्रे लंपास केला आणि त्याच्या बदल्यात तिला "योजनागंध" हा एकदम नवीनतम बॉडी स्प्रे देऊन "महर्षी व्यास" नामक हुशार मुलगा सुद्धा दिला. म्हणजेच बॉडी स्प्रे बरोबर मुलगा फ्री. कालांतराने शंतनू राजा या गंधाच्या प्रेमात पडला आणि त्या युवतीला शंतनू बरोबर लग्न केल्यामुळे परत एक भीष्म नावाचा मुलगा फ्री मिळाला. बघा किती या गंधाचे महत्व.
गेल्या १० ते १५ वर्षात सुगंधाचे महत्व अतोनात वाढले आहे. आपले शरीर, कपडे, भांडी, टॉयलेट सह आपले घर सुगंधाने भरून जावे या हेतूने अनेक देशी व विदेशी कंपन्या जोरदारपणे कामाला लागल्या आहेत. गमंत म्हणजे डास आणि झुरळ मारण्याची औषधे सुद्धा सुगंधित झाली आहेत; बहुतेक त्यांच्या मरणयातना कमी करण्यासाठी.
कोणी एका शहाण्या माणसाने म्हटले आहे की, श्वास हा शरीर आणि मनाला जोडणारा पूल आहे. सुगंध हा ह्या पुलावरून जाणारा जादूगार आहे. तो प्रचंड उकाड्यात मोगरा, जाई, जुई अशा जादूच्या कांड्या फिरवून शरीराचे आणि मनाचे क्लेष कमी करतो; कृत्रिम थंडावा निर्माण करतो. सूर्योदयाच्या प्रसन्न वेळी प्राजक्ताच्या फुलांच्या मंद सुगंधाने तो मनाला आणखीन प्रसन्न करतो. पौर्णिमेचे टिपूर चांदणे रातराणी, रजनीगंधाच्या सुगंधाने आणखीनच खुलते. पहिल्या पावसाच्या शिडकाव्यानंतर येणारा मृदगंध धुंद करतो.
सूर आणि गंध एकाच जातकुळीचे. त्यांची जात सुखवाहक; हवेवर स्वार होऊन येतात आणि काळजात घुसतात पण ही घुसखोरी नाही. दुधात साखर विरघळते तसे हे काळजात विरघळतात, जीवनाची गोडी वाढवितात आणि छान वातावरण निर्माण करतात. चाफा उबदार तर मोगरा थंडगार, केशराजवळ उबदार श्रीमंती तर वाळ्याजवळ थंडगार पाण्याची समृद्धी. काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे केवळ अस्तित्व प्रसंगात रंग भरते, पचोलीचा गंध याच जातीचा. तो सुगंध खुलवतो. अनेक अत्तरात त्याचे अस्तित्व असते पण ते कळत नाही.
सुगंधाचे सुद्धा स्वभाव असतात. हिरवा चाफा, सोनचाफा, केवडा ह्यांचे उग्र स्वभाव; लांबूनच हाय हॅलो केलेले बरे. मोगरा अगदी शांत स्वभावाचा; हातात बांधा, डोक्यात घाला हा अगदी शांत, त्याच्या सुगंधाचा त्रास म्हणून नाही. चमेली मात्र मादक आणि चावट; बाईच्या केसातील चमेलीचा गजरा जाता जाता दुसऱ्याला डोळा मारेल, प्राजक्त साधा सरळ सात्विक स्वभावाचा, देव्हाऱ्यात रहायला आवडते.
संगीत व सुगंध यांचे एक मजेशीर नाते आहे. हीना, मज्मुआ, फ़िरदोस म्हणजे बडा ख्याल. या अत्तरांचा फाया कानात ठेवला की तासनतास त्यांचा सुगंध दरवळत रहातो. चमेली, रातराणी, निशिगंध म्हणजे प्रेमगीते; गुणगुणत रहावी आणि शांतपणे मजा लुटावी. चंदन, उद, धूप अगर म्हणजे भक्तिगीते, भजने. धुपाच्या सुगंधात टाळ, मृदंगाचा आवाज खूप छान वाटतो.
फुलांच्या सुगंधांच्या सुद्धा वेळा ठरलेल्या असतात. चमेली, मोगरा ही फुले पहाटे ४ ते ५ या सुमारास सर्वात जास्त सुगंधी असतात. सोनचाफा, प्राजक्त यांची वेळ सूर्योदयाची. रातराणी, निशिगंध, आंब्याचा मोहोर यांचा मादक सुगंध रात्री ९ नंतर दरवळण्यास सुरुवात होते. कामिनीच्या फुलांचे झाड १५ ते २० दिवसांनी एकदाच फुलते आणि संपूर्ण झाड टपोऱ्या पांढऱ्या फुलांनी अगदी भरून जाते आणि रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत सारा आसमंत सुगंधीत करते. रात्रीच्या मंद प्रकाशात ही फुले चमकून उठतात; जणू चांदण्याच झाडावरती उतरल्या आहेत.
स्पायडर लिलीचे फुल बरोबर दुपारी ४ वाजता उमलते आणि त्याचा मंद वास संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत दरवळत रहातो. उद आणि धुपाचा वास तिन्हीसांजेच्या वेळी छान वाटतो. देशी गुलाबाचा सुगंध काही औरच. सुगंधाचा बादशहाच जणू. मुघल सम्राट (चित्रात तरी) नेहमी गुलाबाचे फुल का हुंगत असतात ते ओंजळभर देशी गुलाबांचा वास घेतल्याशिवाय कळणार नाही.
काही गंध, सुगंध या सदरात मोडत नाहीत परंतु ते वास आवडतात. उदा. थंडीच्या दिवसात सूर्योदयाच्या थोडे आधी माळरानात किंवा जंगलात गेलात तर दवाने गच्च भिजलेल्या गवताचा किंवा मातीचा एक मंद वास येत असतो आणि पक्षांच्या किलबिलाटात तो कमालीचा आनंददायी असतो. ऑक्टोबर महिन्यात पिकलेल्या भाताच्या शेताजवळून संध्याकाळी गेलात तर मंद गोडसर वास मनाला सुगीची चाहूल देतो. परंतु असे सुगंधरहित गंध घेण्यास आपले मन शांत व तरल असल्याशिवाय अशा गंधांची मजा लुटता येत नाही.
बऱ्याच जणांना गाई म्हशींच्या गोठ्यातील शेण, मूत्र आणि कच्च्या दुधाचा वास देखील आवडतो. गाई म्हशींचे दूध काढताना होणारा चुरचुर आवाज, गाईंचे मद्र सप्तकातील हंबरणे, गाई आंबोण खाताना होणारा आवाज व वास या गोष्टी समृद्धी दाखविणाऱ्या वातावरणात घेऊन जातात. तिन्हीसांजेच्या वेळी भूक लागलेली असताना रस्त्यावरून जाताना रोटी अथवा मक्याची कणसे भाजल्याचा वास किती आवडतो हा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी घेतला असेल.
काही वास असे आहेत की, ते काही लोकांना खूप आवडतात तर काही लोकांचे त्या वासाने डोके दुखायला लागते. उदा. फणस किंवा मडक्यात शिजवलेल्या अन्नाला येणारा करपट व धुरकट वास. कोकणातील जवळजवळ सर्वच फळांचे वास या सदरात मोडतील, उदा. आंबा, काजू, फणस आणि अननस. (आंबा थोडाफार अपवाद) या फळांचे वास कधीच लपून राहत नाहीत आणि हे गंध कोंकणी माणसांप्रमाणेच तीक्ष्ण. सुगंधाची खासियत अशी आहे की, तुम्ही जो सुगंध प्रथम ज्या वातावरणात घेता त्याची आठवण तो सुगंध परत घेतल्यावर आयुष्यभर येत रहाते; म्हणूनच सुगंधाला जादूगार म्हणता येईल.
ही आहे अस्सल नैसर्गिक ग्रामीण गंधांची दुनिया. नवीन पिढीला या गंधांचा अनुभव घेणेही दुरापास्त होत चालले आहे. या पिढीला "गंध" या शब्दाचा सुद्धा गंध नाही. अत्तराचा खूषबू गझल शौकीनांच्या खिशात बंद झालाय असं दिसतंय. कालाय तस्मै नमः!
नवीन पिढीला बॉडी स्प्रे, परफ्युम कळतो. या कृत्रिम पर्फ्युमची सुद्धा एक अजब दुनिया आहे, शास्त्र आहे. या सुगंधाला नाके मुरडण्यात काही अर्थ नाही कारण सुगंध हा सुगंधच राहणार, तो कधी मन प्रसन्न करणार, कधी विव्हळ करणार, कधी असोशी वाढवणार.
कस्तुरीचा सुगंध हा एक असा आहे की त्याचा खरोखरच कोणी अनुभव घेतला असेल का या विषयी शंकाच आहे परंतु त्याचा किर्ती सुगंध मात्र अनेक वर्षे दरवळून राहिला आहे यात दुमत नाही.
मदनाचे किंवा कामदेवाचे जे पाच बाण आहेत ते मादक सुगंधी फुलांचे आणि काम भावना प्रक्षुब्ध करणारे आहेत.
१. नीलकमल
२. सीता अशोक - सीता लंकेत ज्या अशोकाच्या झाडाखाली बसली होती तो अशोक; रावणाने मुद्दामच तिला अशोकवनात ठेवली होती जेणेकरून, अशोकाच्या फुलांच्या वासाने तिच्या शृंगारिक भावना उद्दीप्त होऊन ती त्याला वश व्हावी.
३. मदनबाण - मोगऱ्याच्या कुळातील एक फुल
४. आंब्याचा मोहोर - रात्रीच्या वेळी हा दरवळ अनुभवून पहा.
५. शिरीष कुसुम
त्यामुळे मग लग्नाचे मुहूर्त मोगरा फुलणाऱ्या थंडीत किंवा आंब्याचा मोहोर फुलणाऱ्या उन्हाळ्यात का असतात हे कोडे तुम्हाला उलगडेल.
।।इति रामकृष्ण उवाचे गंधपुराणस्य प्रथमोध्याय समाप्त ।।
(विशेष सूचना - संस्कृत व्याकरणाच्या गहन अरण्यात शिरू नका)
यशवंत मराठे
सुधीर दांडेकर
yeshwant.marathe@gmail.com