वसुधैव कुटुंबकम् ही विश्वबंधुत्वाची संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात मांडली. या पसायदानातील भावार्थ जाणून जर प्रत्येकानेच हे दान मागितले तर ही संकल्पना प्रत्यक्षात आकारताना आपल्याला दिसू शकेल की ज्यात धर्म, जात, पंथ, देश या सीमा ओलांडल्या असतील आणि मनाने एकरूप झालेल्या या विश्वात हिंसाचार, दहशतवाद, अराजकता, विध्वंस या कुप्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होऊन "हे विश्वची माझे घर" हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात नांदताना दिसेल. काय अफलातून संकल्पना आहे!!
आज 700-750 वर्षांनंतर जगाची सोडा पण भारताची काय परिस्थिती आहे? विश्वबंधुत्व वगैरे जरा बाजूला ठेवा पण आपले अगदी जवळच्या समाजात तरी सौदार्ह्याचे संबंध आहेत का? आज माणसाचा माणसावरच विश्वास राहिलेला नाही.
अगदी पाकिस्तानाचेच उदाहरण घेऊ. आपल्या दोन्ही देशांमधील परस्पर संबंध कधीच चांगले नव्हते; जर असते तर चार युद्धे झालीच नसती आणि पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया तर आज देखील चालूच आहेत. तरी देखील सर्वसाधारण समाजात, जेवढी आज दुही दिसते तेवढी, सामाजिक तेढ नव्हती. आपल्याकडे क्रिकेट आणि हिंदी सिनेमे हे धर्म, पंथ अथवा जात विसरायला लावून हे सगळ्या समाजाला जोडणारे अथवा बांधून ठेवणारे दुवे होते. तसेच कला, संगीत या क्षेत्रात देखील त्या कलाकाराच्या प्रतिभेकडे जास्त लक्ष दिले जायचे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत असे म्हटले तर बहुतांश कलाकार मुसलमान होते तसेच हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम भजने असे म्हटले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच नाव उभे राहते - मोहम्मद रफी. आपले नशीब आहे की आजच्या polarised जगात रफींना ही भजने म्हणायची वेळ आली नाही नाहीतर त्यांना हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मियांचे शिव्याशाप खावे लागले असते. मग मनात असा प्रश्न येतो की आपल्या समाजाचे इतक्या टोकाचे ध्रुवीकरण का झाले? याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रांची मक्तेदारी गेल्या काही वर्षात संपुष्टात आली आणि त्यामुळे लोकांच्या मनात दबलेली विचारधारा स्पष्टपणे बाहेर येऊ लागली. (अगदी माझाच विचार केला तर 15 वर्षांपूर्वी माझे हे विचार लोकांसमोर आणण्यासाठी कुठचे माध्यम माझ्या हाती होते?)
तसेच गेल्या काही वर्षातील भारतात घडलेला अजून एक मोठा बदल म्हणजे डाव्या आणि उजव्या विचारधारेतील वाढत चाललेली वैचारिक दरी. त्यामुळे मग कडवे डावे विरुद्ध कट्टर उजवे अशी जुंपली आहे. त्यामुळे कोणीच नि:पक्षपाती भूमिका घेऊ इच्छित नाही. ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो त्या प्रसार माध्यमांकडून देखील निःपक्षपाती असण्याची अपेक्षा आज फोल ठरते. कारण त्यांच्यात सुद्धा डावे आणि उजवे आणि त्यांचे ठरवलेले अजेन्डा. कुठची बातमी दिवसभर रेटायची आणि कुठची दाबून टाकायची हे त्यांच्या विचारधारेनुसार ठरत असतं.
कायद्यानुसार सर्व लोकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे असे फक्त म्हटले जाते. परंतु आपल्या मनाविरुद्ध कोणी फक्त काहीही बोलायची खोटी की लगेच झुंडशाहीने त्याचा पिच्छा पुरवून त्या व्यक्तीला हैराण करून सोडणे हे सध्या अगदी सहजगत्या घडते. या कृतीला इंग्रजीमध्ये trolling असे म्हटले जाते. आणि हे दोन्ही बाजूंनी होते. What I think is, in any democracy, having only freedom of expression is not enough. There should be guarantee of freedom after expression.
आपल्याकडील सामाजिक ध्रुवीकरणाची सुरुवात काही अंशी इस्लाम धर्मियांच्या कट्टरतेमुळे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू धर्मियांच्या प्रतिक्रियेमुळे झाली. इतकी वर्षे मुसलमानांचे लाड केलेत ना? आता आमचे राज्य आहे दाखवतोच काय करू शकतो ते, अशी एक भावना दिसते. त्यातून निष्पन्न काय? द्वेष, विखार आणि शत्रुत्व.
निरक्षरता हा गरीब वर्गाचा, मग तो कुठल्याही धर्माचा असो, एक मोठा प्रॉब्लेम आहे. शिक्षण नाही, मग नोकरी नाही, पैसे नाहीत तेव्हा असा तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळतो. मुसलमानांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त असल्याने गुन्हेगार त्या धर्माचे असतात पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुसलमान गुन्हेगार असतो. मला कल्पना आहे की विचारधारेने भारावून जाऊन डॉक्टर्स अथवा इंजिनियर्स सुद्धा आयसिस सारख्या अतिरेकी संघटनेशी संलग्न झाले पण तरी ते प्रमाण अत्यल्प आहे. परंतु जेव्हा जिहादच्या नावाखाली तरुण मुस्लिम मुलांचे ब्रेनवॉश करून अतिरेकी कारवाया करण्यास उद्युक्त केले जाते तेव्हा इतर धर्मियांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तसेच जगात कुठेतरी काहीतरी घडते उदा. पॅरिसच्या मासिकातील व्यंगचित्रांवरून उसळलेला उद्रेक, सलमान रश्दीच्या विरोधात निघालेला फतवा अथवा तस्लिमा नसरीन या लेखिकेची गच्छंती, अशा कुठच्याही गोष्टीचा पडसाद भारतात का उमटावा? पॅरिसमधील घटनेचा सोलापुरातील मुसलमानांशी काय संबंध? पण नाही; मोर्चे निघणार, घोषणाबाजी होणार, काही प्रमाणात दंगली होणार; याला काही अर्थ आहे का? जेव्हा याकूब मेमन (मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी) याच्या अंत्ययात्रेला 20000-25000 मुसलमान रस्त्यावर उतरले किंवा अमर जवान ज्योतीचा विध्वंस करताना महिला पोलिसांशी केलेले अश्लाघ्य वर्तन यामुळे कित्येक उदारमतवादी हिंदूंचे मतपरिवर्तन झाले. अतिरेकी कारवाया अथवा अशा सामाजिक घटना या विरोधात बोलणारे सर्वसामान्य मुस्लिम धर्मीय फार दिसत नाहीत त्यामुळे त्यांची या गोष्टींना मूक संमती आहे असे वाटू लागते. या सर्वाचा परिपाक म्हणजे एकमेकांमधील विश्वासाला गेलेला तडा. आज भारतात मुसलमानांना वाटते की सर्व हिंदूंचा आणि सरकारचा त्यांच्या विरोधात काहीतरी कट चालू आहे आणि दुसरीकडे हिंदूंना वाटते की मुसलमान फार लाडावले गेले आहेत त्यामुळे त्यांना थोडी जरब बसायलाच हवी. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा, कोरोना विषाणूच्या संक्रमण सुरु असताना, तबलिगी जमातचे लोक सगळे नियम पायदळी तुडवताना दिसतात तेव्हा हा जिहाद आहे असा प्रचार सुरु होतो.
मला नेहमी प्रश्न पडायचा की सर्वसामान्य मुस्लिम जनता आपला विरोध दर्शवत का नाही? जरा जास्त माहिती काढली तेव्हा असे लक्षात आले की मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांना वाळीत टाकले जाण्याची खूप भीती असते कारण तसे झाल्यास त्यांना मृत्यूपश्चात अंत्यविधी करायची परवानगीच मिळत नाही.
एक उदाहरण देतो. पालघरमधील ओळखीतील एका मुसलमान डॉक्टरने ख्रिश्चन बाईशी लग्न केले. कालांतराने त्याची अंकलेश्वरला राहणारी सासू त्याच्याकडे पालघरला आली आणि नंतर बरीच वर्षे परत गेलीच नाही. पुढे जेव्हा ती मरणासन्न झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जर ही आत्ता मेली तर तिचा अंत्यविधी पालघरात होऊ शकणार नाही कारण तिची तिथे काहीही नोंद नाही. म्हणून मग तो आधीच अंकलेश्वरला गेला आणि तेथील चर्चच्या पाद्रीला भेटला; त्याला पटवून दिले की ही बाई इकडचीच आहे. त्या चर्चकडून पालघरातील स्मशानभूमी करीता No Objection Certificate घेतले आणि मग तो परत आला आणि म्हणूनच नंतर दफनविधी सुरळीत पार पडला.
बऱ्याच अंशी हीच अडचण मुसलमानांची आहे त्यामुळे धर्माविरुद्ध बोलायला ते कचरतात. ह्या उदाहरणात हिंदू नाहीत म्हणजे असा अर्थ होत नाही कीं हिंदू धर्मात सगळे आलबेल आहे. आज हिंदू धर्म अठरापगड जातींमध्ये असा काही विभागला गेला आहे की विचारता सोय नाही. हिंदू धर्मात माणसाची ओळख ही फक्त जातीवरून होते असे दिसते. एखाद्या व्यक्तीला जर हिंदू धर्म स्वीकारायचा असेल तर ते शक्यच होणार नाही कारण त्याची गणना कुठल्या जातीत करायची याचा निर्णय घेणार कोण?
आपल्या नागरिकांमध्ये एक प्रकारचे वैफल्य आणि राग ठासून भरला आहे. त्याला स्वतःलाही माहित नसते की तो का रागावला आहे ते पण तो रागावलेला असतो. लोकांची अशी मानसिकता असण्याचे कारण मुख्यत्वे करून आपली न्याय संस्था आणि राजकीय यंत्रणा आहे. कुठल्याही राजकारणी माणसाला कडक शिक्षा झालीय असे कधीच दिसत नाही त्यामुळे भारतात न्यायव्यवस्थेचा अभाव आहे असे जनतेला वाटते. याचा दुष्परिणाम म्हणजे त्यांची फक्त मानसिक घुसमट आणि मग त्याचे पर्यवसान रागात होत असते. ह्या सुप्त रागाला जर ब्रेन वॉश करून वळवायचे ठरवले तर त्यातून अतिरेकी कारवाया पण घडवून आणणे शक्य होईल. तसेच या सुप्त रागाचे प्रतिबिंब आपल्याला झुंडशाहीत दिसते; आणि याच्यात प्रत्येक वेळी धर्माचा संबंध असतोच असेही नाही. केवळ अफवेच्या जोरावर तीन आठवड्यांपूर्वी गडचिंचळे (पालघर) घडलेली घटना आठवून पहा. त्यात स्वतः पोलिसांनी तीन प्रवाश्यांना (ज्यात २ साधू आणि एक वाहनचालक होता) जमावाच्या ताब्यात दिले, हे विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. नंतर त्या जमावाने असहाय्य लोकांना लाठ्या काठ्यांनी मारून त्यांचा जीव घेतला आणि त्यात देखील कोणीतरी शांतपणे तो व्हिडीओ रेकॉर्ड केला. मी तो व्हिडीओ पूर्ण बघूच शकलो नाही. माणुसकीला काळीमा फासणारी घटना असं मला वाटलं. परंतु अत्यंत व्यथित करणारी गोष्ट म्हणज. जेव्हा झुंडशाहीचे बळी झाल्याचे कळते तेव्हा लोकं काय विचार करतात? तो आपल्या पक्षाचा आहे का? कुठल्या धर्माचा आहे? अरे लेकांनो, आपल्यात माणुसकी काही शिल्लक आहे की नाही?
दुर्दैवाने मीडिया सुद्धा पक्षपाती रिपोर्टींग करताना दिसतो. आपण भारतीय म्हणून विचार करायला कधी शिकणार? जमावातील माणूस हा जगातला सर्वात क्रूर आणि विकृत प्राणी असतो हेही परत परत सिद्ध झाले. मनात एकच प्रश्न उभा राहतो - आपण खरंच लोकशाहीला लायक समाज आहोत का?
आपल्या देशात आर्थिक दरी ही 5000 वर्षांपूर्वी होती; आजही आहे आणि भविष्यात सुद्धा ती राहणार. परंतु आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्यातील सामाजिक दरी कमी व्हायला हवी. कान, डोळे आणि तोंड बंद करून बसून राहून कसे चालेल? As the famous saying goes - if we are not a part of the solution, then we are part of the problem.
आपल्या देशाचा प्रॉब्लेम आपणच सोडवायला हवा; कोणीही मदतीला येणार नाही. आज भारतात दर सात लोकांपैकी एक मुसलमान आहे; त्यामुळे सरसकट सर्व मुसलमानांना देशद्रोही मानणे जितके चुकीचे आहे तितकेच धर्मातील खटकणाऱ्या गोष्टींवर सर्वसामान्य मुसलमानांनी आवाज न उठवणे देखील चूक आहे.
आज या सगळ्या वातावरणाला सोशल मीडिया नावाच्या एका राक्षसाची जोड मिळाली आहे. फोटोशॉप केलेले फोटो, संकलित केलेले व्हिडिओ आणि बरोबरीने धादांत खोट्या बातम्या यांच्या महापूरात शिकल्या सवरल्या माणसाचे पण डोकं गरगरेल, तिथे अशिक्षित माणसाची काय अवस्था होत असेल याची कल्पना सुद्धा थरकाप उडवते. They become a easy fodder. त्यामुळे ऐकीव बातम्यांवर अंध विश्वास ठेवणे सगळ्यांनीच सोडून दिले पाहिजे.
आपल्या देशातील ही सामाजिक दुही कमी करायला काय करायला हवे? प्रथमतः सर्व धर्म आणि जाती जमातींच्या लोकांनी स्वतःच्या कोषाबाहेर पडायला हवे. आणि नुसतं तेवढ्यानेच भागणार नाही कारण हा रोग आता कॅन्सरसारखा आपल्या पूर्ण समाजात पसरला आहे त्यामुळे थोडे जालीम उपाय करावेच लागतील.
आज भारताची सगळ्यात जटिल समस्या ही अफाट लोकसंख्येची आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सर्व धर्मियांनी स्वंप्रेरित होऊन देशासाठी जे करावे लागेल ते करायलाच हवे.
कुठलाही धर्म असो, त्याला नियमांचे बंधन हे हवेच. गेली काही दशके लोक कानी कपाळी ओरडता आहेत की पर्यावरण आणि सुरक्षा यांचा विचार करून गणपती मूर्तींच्या उंचीवर निर्बंध यायला हवेत आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवू नका पण कोणी ऐकेल तर शप्पथ. तीच गोष्ट दहीहंडीची. दर वर्षी शेकडो लहान मुले कायमची जायबंदी होतात तर काही मृत्युमुखी पडतात पण दहीहंडीची उंची कमी करायला कोणी तयार नाही. प्रत्येकाने धर्म हा स्वतःच्या चार भिंतीत ठेवावा; मग तो नमाज असेल किंवा आरती असेल. घराच्या बाहेर धर्माला स्थान असूच नये. प्रत्येक धर्मात काही प्रमाणात बदल करण्याची सक्ती करावी लागेल अन्यथा भविष्यात यादवी माजण्याची ही नांदी आहे.
सरकारने काहीतरी करावे म्हणून आपण काहीच करायचे नाही असा जर प्रत्येकाने विचार केला तर कशी सुधारणा होणार? आपल्या सगळ्यांचे काहीच कर्तव्य नाही का? फक्त विचार करून बघा की कॅन्सर पीडित एक हिंदू आणि एक मुसलमान एकाच हॉस्पिटलमध्ये बाजूबाजूच्या बेडवर असतील तर त्यांच्यातील आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक तेढ आपोआप गळून पडेल. याचाच अर्थ ही तेढ, बेबनाव, दुही ही मानसिक आहे आणि त्याच्यावर मात करणे ठरवले तर शक्य आहे. जग हे आपल्या मनाचा आरसा असते आणि तो आरसा आपल्या भावना अजून मोठ्या करून आपल्यासमोर प्रोजेक्ट करत असतो.
जेव्हा माणसा माणसात मित्रत्वाचे नाते निर्माण होईल तेव्हाच ही मनातील किल्मिषे दूर व्हायला मदत होईल. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या गुणांचा आदर करण्याची वृत्ती आणि विवेकी वागणूक आपल्या आचरणात आणत नाही तोपर्यंत खरी समरसता येणे शक्य नाही.
आज आंतरराष्ट्रीय मातृदिन आहे त्यामुळे निदान आजपासून तरी आपण आपल्या भारतमातेचे ऋण फेडून तिला सुजलाम सुफलाम करण्याचा विडा उचलुया.
मला कल्पना आहे की सामाजिक ऐक्य हे माझे स्वप्न असेल तरी देखील राजकारणाच्या गदारोळात त्या स्वप्नाचा भंग होऊ नये एवढीच एक माफक अपेक्षा.
एक आशावादी भारतीय.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Polarisation #Lynching