अध्यात्म हा शब्द उच्चारला की सर्वसामान्यपणे अंधश्रद्धा, देवपूजा, कर्मकांड असेच चित्र उभे रहाते. ज्याला आयुष्यात काही जमले नाही (म्हणजे पैसे कमावता आले नाहीत) अशाच व्यक्ती अध्यात्माच्या मार्गाला लागतात अशी एक सरळधोप समजूत. जे काही अंशी खरं देखील असावे कारण यशोशिखरावर असलेला माणूस अध्यात्मिक आहे असं चित्र कधी दिसतंच नाही. आपण सर्वच जण दुःखाच्या किंवा संकटाच्या क्षणीच देवाची आठवण काढतो. यश माझ्या कर्मामुळे, म्हणजेच माझ्यामुळे, परंतु दुःख मात्र देवामुळे अशीच धारणा दिसून येते.
मी स्वतः काही या संकल्पनेपासून फार वेगळा नव्हतो. मी लहानपणी कधीच कुठच्याच मंदिरात स्वखुशीने गेलो नाही. आपले मत आई वडिलांना सांगण्याएवढे किंवा पटवून देण्याएवढे वय देखील नव्हते. मला अत्यंत अपवादात्मक मंदिरांमध्ये प्रसन्न वाटायचं आणि बाकी सर्व ठिकाणांहून पळ काढावा अशी भावना यायची.
मी सज्ञान झाल्यावर विचार करू लागलो की मला अशा ठिकाणी अस्वस्थ का वाटते? मनात खालील प्रश्नांचे मोहोळ उठायचे पण त्याची उत्तरे मात्र मिळत नव्हती.
१. अध्यात्म म्हणजेच पूजा, उपवास, व्रते?
२. हिंदू धर्मात देवांची नुसती रेलचेल; मग कुठला देव मोठा मानायचा?
३. देवाचे अस्तित्व कसे सिद्ध करायचे?
४. जर देवाचे अस्तित्व सर्वत्र आहे तर मग देवळात का जायचे?
५. सगळे भाविक देवाची भक्ती एक प्रकारे घाबरून का करतात? नाही केले तर कोप होईल वगैरे.
६. देवळात जाताना प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कुवतीप्रमाणे मोठ्यात मोठे हार, फुले, प्रसाद घेऊन जाताना का दिसतो? भक्तांच्या देवाकडच्या मागण्या संपत का नाहीत?
७. आपल्या समाजात गुरूंच्या नावाखाली भोंदू बाबा, साधू लोकांचा सुळसुळाट झाला आहे. आपल्याला खरंच अशा गुरूंची गरज आहे का?
८. अध्यात्मिक होणे म्हणजे एक प्रकारची निष्क्रियता?
या सर्व प्रश्नांबरोबरच समाजात वावरत असताना खूप गोष्टी जाणवत असतात पण त्याची कारणमीमांसा समजत नाही.
९. समाजातील सर्वच जण सदैव सुखाच्या शोधात असतात आणि ते प्राप्त न झाल्यामुळे कायम एक प्रकारचा निरुत्साह, विषण्णपणा आलेला दिसतो.
१०. प्रत्येक मनुष्य वासनेने तसेच स्वार्थाने लडबडलेला दिसतो. वासना अनेक प्रकारची असते; अन्नाची, पैशाची, कपड्याची, प्रतिष्ठेची, लौकिकाची, मोठेपणा मिरवण्याची आणि शारीरिक
११. इतरांना हेवा वाटाव्या अशा अनेक गोष्टी मिळाल्यानंतर सुद्धा माणसांना आनंद झालेला का दिसत नाही?
१२. आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची एखादी गोष्ट आवडत नाही त्यामुळे आपण तिचा राग किंवा द्वेष करतो.
१३. प्रत्येक जण सर्व चैनीच्या गोष्टी दुसऱ्यांना दाखवण्याकरताच का करतो? घर, गाडी, कपडा वगैरे वगैरे. आणि वर अपेक्षा काय तर लोकांना त्याचे कौतुक वाटावं आणि हेवा पण वाटावा.
१४. अध्यात्माचा समाजाला उपयोग काय?
१५. अनेक श्रीमंत लोक खूप प्रकारची आर्थिक मदत करताना दिसतात, परंतु नेहमी असे वाटते की ते एक प्रकारे पुण्य पदरी जोडण्याचा तर मार्ग नाही ना ज्यायोगे पापाचे पातक कमी होईल?
उत्तरे काही मिळत नव्हती त्यामुळे मनाचा गोंधळ आणखी वाढत होता.
आपल्या सर्वांनाच स्वतःच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात खूप कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मानसिक रितेपण जाणवते, सारखं वाटतं काहीतरी कुठेतरी कमी आहे (something is amiss) आणि मग मनःशांती पार बिघडून जाते. वाटायचं की आपल्याला कोणी मार्गदर्शक मिळेल का? आता मार्गदर्शक म्हणजे गुरु का? समाजात इतके तथाकथित गुरु दिसतात, त्यातला चांगला कोण हे ओळखणार कसं? पण सारखं असंही वाटत होतं की आपल्याला जीवित गुरूंची गरजच काय? आपल्या महाराष्ट्रात एवढी थोर संतपरंपरा आहे की ज्यांचे वाङ्मय हाच सगळ्यात मोठा गुरु होऊ शकतो. म्हणून भरपूर वाचन केलं.
आश्चर्य म्हणजे मला माझ्या प्रश्नांची हळूहळू उकल होऊ लागली. मी ज्या क्षणी अडलो तेव्हा तेव्हा कोणी वेगवेगळ्या व्यक्ती जीवनात आल्या आणि ज्यायोगे मार्ग जरा सुकर झाला. काही काही वेळा तर अगदी अगम्य पद्धतीने त्याची उत्तरे मिळू लागली. मला जी उत्तरे मिळाली ती सर्वांनाच पटतील हे शक्य नाही आणि तशी माझी इच्छा किंवा आकांक्षा पण नाही कारण ही सर्वस्वी वैयक्तिक गोष्ट आहे.
हे सर्व लिहिताना मी कुठल्याही प्रकारचे प्रवचन देण्याचा प्रयत्न अजिबात नाही. मी स्वतःला काही ज्ञानी वगैरे समजत नाही. मला ज्या गोष्टी जाणवल्या आणि पटल्या त्या मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
१. मी कोण आहे? हे जग काय आहे? आणि या जगाशी आपला संबंध काय हे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे अध्यात्म. त्याचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. पूजाअर्चा, तीर्थयात्रा, व्रते वगैरे ही साधने असून परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे पण आपण साध्य बाजूलाच राहून आपण सर्व साधनांनाच घट्ट पकडून बसलो आहोत.
मनुष्याला आपल्या आचारांमध्ये, विचारांमध्ये तसेच जगण्याच्या पद्धतीमध्ये अपेक्षा आणि वास्तविकता यामध्ये अंतर जाणवत असेल तर तो बदल घडवून आणण्याचे सगळ्यात मोठे साधन म्हणजे अध्यात्म.
२. सगळे देव एकच आहेत; एकच चैतन्य पण मानवाने दिलेले वेगवेगळे चेहरे. ज्याला ज्या रूपाबद्दल प्रेम वाटते त्याने ते भजावे आणि सर्व ठिकाणी तेच रूप आहे असं मानावे म्हणजे श्रद्धेचा गोंधळ उडणारच नाही.
३. देव ही गोष्ट सिद्ध करण्याची नसून अनुभवण्याची आहे.
४. आपण आपल्या घरालाच देवळाप्रमाणे पवित्र ठेवले तर देवाला शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरजच राहणार नाही.
५. देव किंवा कुलदेवी म्हणजे काय कोपऱ्यावरचा गुंड आहे की जो वर्गणी अथवा दक्षिणा दिली नाही तर त्रास देईल? मनापासून केलेला नमस्कार देवाला/देवीला पोहोचतो.
६. देवाला वाहिलेले हार, फुले या गोष्टींची त्याला गरजच नाही आहे. हे फक्त आलेल्या इतर भक्त मंडळींना दाखविण्यासाठी असतं. ही एक प्रकारे देवाला दिलेली लाच असते ज्या बदल्यात त्याच्याकडून अपेक्षापूर्तीची आसक्ती असते.
७. सदगुरु अथवा मार्गदर्शक आपल्या हृदयातच आहेत. तिथेच प्रश्न विचारावे - उत्तरे नक्की मिळतात. सद्सदविवेकाच्या पारड्यात कोणतीही गोष्ट तोलून बघितली की सत्य समोर येतं.
८. अध्यात्मिक होणे म्हणजे निष्क्रियता हे साफ चूक आहे. "योगक्षेमं वहाम्यहम्" याचा अत्यंत विचित्र विपर्यास केला जातो. कर्म करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
९. कितीही धन कमावले आणि प्रतिष्ठा मिळाली तरी जोपर्यंत मनःशांती नाही तोपर्यंत त्यास काही अर्थ नाही.
१०. वासना जिंकता येत नाही; तिची उपेक्षा करणे जमले पाहिजे म्हणजे तो आपोआप गळून पडेल.
११. जोपर्यंत दुसऱ्याशी तुलना करणे आपण थांबवणार नाही तोपर्यंत कुठचीही गोष्ट मिळाली तरी आनंद मिळणार नाही.
१२. आपण ज्या कारणाने दुसऱ्याचा द्वेष करतो तेच कारण त्याने आपला द्वेष करायला पुरेसं आहे कारण त्याला न आवडणारी गोष्ट आपल्याला आवडते.
१३. आपला सगळ्यात मोठा शत्रू हा आपला अहंकार आहे. आत्मपरिक्षण हा अहंकार नाहीसा करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे.
१४. समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचे अंतिम ध्येय हे समाजातील प्रत्येक घटकाला सुख आणि समाधान मिळावे हे असते. समाजस्वास्थ्यासाठी प्रत्येक घटकाने नीतिनियमाने वागणे, दुसऱ्यावरती अन्याय न करणे, स्वार्थ कमी करणे, संयम आणि विवेक यांचा अंगिकार करणे अशी अपेक्षा असते. अध्यात्मिक व्यक्तीमध्ये वरील बदल स्वयंस्फूर्तीने घडत असल्याने ते कायमस्वरूपी असतात आणि अशा व्यक्तींचे आचरण दुसऱ्यांना बदल घडवण्याची स्फूर्ती देते. हे कार्य मूक असलं तरी प्रभावी असतं.
१५. आर्थिक मदत करताना कुठची तरी लालसा अथवा परतफेडीची / प्रतिष्ठेची इच्छा असेल तर काय उपयोग? मदत सत्पात्री असावी. ती समुद्रात पडणाऱ्या पावसाप्रमाणे, भरल्या पोटावर जेवणाप्रमाणे आणि दिवस दिव्याच्या उजेडाप्रमाणे असू नये.
तसेच या उत्तरांशिवाय खालील काही गोष्टी जाणवल्या आणि पटल्या.
• आपण जीवन जगत असताना १००% स्वतःसाठी जगत असतो. अगदी आपल्या आईपासून निःस्वार्थी समाजसेवकापर्यंत विचार केला तरी कुठेतरी वृद्धावस्थेत काळजी घेण्यापासून, समाजाकडून मिळणाऱ्या श्रेयापर्यंत अत्यंत सूक्ष्म पातळीवर कुठेतरी स्वार्थ हा दडलेला असतोच. प्रत्येक नाते हे भावना, प्रेम या सगळ्या धाग्यांपेक्षाही स्वार्थाच्या बळकट धाग्यांनी जोडलेले असते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
• जर आपल्याला अध्यात्म नीट समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःचे जीवन एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे वाचता यायला हवं, चिकटलेली पाने सोडवायला हवी.
• अध्यात्माने आपल्यात बदल घडलाच पाहिजे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि अहंकार तसेच असतील तर अध्यात्म वृथा आहे.
• सदगुरु हे एखाद्या चिलखताप्रमाणे किंवा शॉक ऍबसॉर्बर प्रमाणे काम करतात, ज्यायोगे क्लेश, दुःख, भय, असुरक्षितता आपल्यापर्यंत येते, आपल्याला पार मुळापासून हलवते पण संपवून टाकत नाही.
• लहान बालक जेव्हा भूक लागते तेव्हा आईचे लक्ष वेधण्यासाठी रडतं, तसे आपण देखील आपल्या सदगुरूंपाशी अधूनमधून रडायला हरकत नाही परंतु ते रडणं केवळ लक्ष वेधण्याइतपतच मर्यादित असावं.
• मागण्या मागत वेळ घालविण्यापेक्षा नामस्मरण, मानसपूजा आणि संवाद हे सदगुरूंपर्यंत पोहचण्याचे जास्त जवळचे मार्ग आहेत.
• भक्तीत शरणागती यायला हवी, आत्यंतिक तळमळ हवी.
• अध्यात्माचे खरे गमक म्हणजे अत्युच्य आनंद किंवा अपरिमित दुःखाच्या वेळी आपले मानसिक संतुलन कसे ठेऊ शकतो ह्यात आहे.
शेवटी के.वि. बेलसरे ह्यांच्या पुस्तकातील एक परिच्छेद उधृत करतो जो माझ्यामते ह्या विषयाकरता उत्तम उदाहरण आहे.
"बीजगणितात उदाहरण सोडवताना एक अज्ञात 'क्ष' घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या 'क्ष' ची खरी किंमत काय हे आपल्याला कळत नाही पण तो घेतल्याशिवाय चालत नाही, त्याचप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहित धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल."
|| श्री स्वामी समर्थ ||
यशवंत मराठे
#spirituality #अध्यात्म #rituals