अर्जेंटिना – सातासमुद्रापार

जुलै/ऑगस्ट १९९७ च्या सुमारास आमच्या कंपनीला एक पत्र आलं आणि ते सुद्धा अर्जेंटिना या देशातून. त्याकाळी दक्षिण अमेरिका हा प्रदेश दुसऱ्या ग्रहावर असल्यासारखा अनोळखी; भाषेचा खूप मोठा अडसर.

त्यावेळी अर्जेंटिनाची आपल्याला ओळख म्हणजे फक्त फुटबॉल आणि Diego Maradona.

बरं, ज्या कंपनीतून पत्र आले ती आमच्याच प्रिंटिंग मशीन फिल्ड मधली तशी त्या देशातील अनुभवी कंपनी त्यामुळे दुर्लक्ष करणं पण पटेना. पण नुसत्या पत्रापत्रीवर त्यांना डीलर म्हणून कसे नेमायचं? कोण, काय बघायला तर हवं म्हणून मग मनाचा हिय्या करून तिथे जायचे ठरवले.

बरं तिथे जायचं तर आता सारख्या व्हाया आफ्रिका फ्लाईट पण नव्हत्या त्यामुळे युरोप वरून जाणे हाच एक पर्याय. British Airways किंवा Lufthansa ने जायचे म्हणजे इकडून ८-९ तासाचा प्रवास, १४ तासाचा हॉल्ट आणि पुढे १५ तासाची नॉन स्टॉप फ्लाईट; म्हणजे परिस्थिती बिकटच होती. त्यावेळी माझ्या एका मित्राचं लंडनमध्ये हॉटेल होतं म्हणून त्याच्याशी बोललो. तो म्हणाला, तू एअरपोर्ट वरून बिनधास्त हॉटेल वर ये, मस्त झोप काढ आणि १० तासाने जा परत पुढच्या फ्लाईटसाठी. ठरलं सगळं, व्हिसा काढला, तिकीट काढलं आणि मी आणि माझा एक सहकारी, अभय, यांनी जायची तयारी केली.

आता ज्या दिवशी रात्रीची फ्लाईट त्या दिवशी सकाळी (३ ऑक्टोबर) मला British Airways मधून फोन आला की फ्लाईट इतकी फुल्ल आहे की आम्ही जाऊ शकणार नाही. मग काय धावपळ; शेवटच्या क्षणी Lufthansa चे तिकीट काढलं पण जर्मन व्हिसा नाही. ट्रॅव्हल एजंट ने सांगितलं की इथे व्हिसा काढायला आता वेळच नाही तेव्हा तुम्ही Frankfurt एअरपोर्ट वर ट्रान्सीट व्हिसा घ्या, बाहेर फिरून या शहरात. नाही म्हणून सांगणार कोणाला? म्हटलं चला, आलिया भोगासी असावे सादर.

४ ऑक्टोबर १९९७ आमच्या स्वाऱ्या रवाना झाल्या. Frankfurt पर्यंतचा प्रवास ठीकठाक झाला. व्हिसा काउंटर वर गेलो तर त्यांनी आम्हाला पार झिडकारून लावलं; ते म्हणाले असा व्हिसा देताच येऊ शकत नाही. तुमच्या देशातूनच व्हिसा काढायला हवा. झाला की आमचा पोपट. एअरपोर्टच्या लाऊंज मध्ये १४ तास काढायचे या कल्पनेनेच कापरं भरलं पण करणार काय? बरं आम्ही इकॉनॉमी क्लास वाले त्यामुळे ट्रान्झिट लाऊंज. ना धड झोपण्याच्या reclining खुर्च्या!! बसून किती वेळ काढणार? १४ तास काही दारू पीत बसू शकत नाही. एखाद-दुसरा ग्लास बियर; याच्यापलीकडे काय? नशीबाने कपड्याचा extra set होता. साधारण ८-१० तासानंतर रुपये ५०० (25 DM) भरून आंघोळ करून आलो. कंटाळून कंटाळून वेळ काढला आणि पुढची नॉन स्टॉप १५ तासाची फ्लाईट पकडली.

Buenos Aires ला त्यांच्या वेळेनुसार सकाळी ६.३० ला फ्लाईट पोहोचली तेव्हा आम्ही अर्धमेल्या अवस्थेत होतो. कंपनीचा मालक Fernando Babio हा दुभाष्याला घेऊन हजर होता. त्याची लगेच ९ वाजता भेटायची तयारी होती पण आम्हाला शक्यच नव्हतं. अक्षरशः कसेबसे आम्ही त्याला लंचला भेटलो. साधारण गप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या फॅक्टरीला जायचे ठरले जी साधारण दीड तास लांब होती. त्या फॅक्टरीत तो प्रिंटिंग मशीनचे पार्ट बनवत असे. सकाळी लवकर निघून, फॅक्टरी व्हिझिट आटपून आम्ही लंचला एका अर्जेंटनियन रेस्तराँ मध्ये गेलो. मला Babio ने विचारले की मी बीफ खातो की नाही कारण त्या देशाची ती खासियत आहे. मला बीफ आवडते म्हणून मी हो सांगितले; अभय खायचा की नाही याचा अंदाज नव्हता पण तो ही चालेल असं म्हणाला. प्रथम एक प्लॅटर आला ज्यात आपल्या कबाब प्रमाणे ५-६ वेगवेगळे प्रकार होते.

अभयने खायचा प्रयत्न केला पण त्याला काही ते जाईना. मी बरेचसे खाल्ले. काय आहे असे विचारले तर गाईच्या पोटातील अवयव असे सांगण्यात आले. ते खाऊन जवळजवळ पोट भरले होते. पण Babio म्हणाला, now let us order main course! आमची बोबडीच वळली. नाही पण म्हणता येईना. थोड्या वेळाने मांसाचा एक मोठा लोद्या समोर आला. That dish was considered to be Argentenian delicacy known as Asado. गाईच्या मासाचा एक भला मोठा तुकडा.

अबब! हे कसे खाणार तेच लक्षात येईना. Babio साहेब सपासप खात होते. मी थोडेफार खाल्लं आणि कधी नव्हे ते टाकून दिले कारण संपवणे शक्यच नव्हतं. नंतर dessert म्हणून आईसक्रीम सर्व्ह करण्यात आलं. चार स्कुप आईसक्रीम आणि वरती फळांच्या फोडी. ते बघून मी पटकन म्हटलं, there is no way I can finish this. तेव्हा त्या कंपनी मधील एक मुलगी, जी दुभाष्याचे काम त्या दिवशी करत होती ती माझ्या जाडजूड शरीरयष्टीकडे बघत हसत हसत म्हणाली, how is that possible, Mr. Marathe? My six year old son can also finish this.

त्या दिवशी संध्याकाळी अभय मला म्हणाला की त्याला हे जेवण जातच नाहीये तेव्हा मी काहीतरी अगदी लाईट खाणं मागवतो. त्याला मेनू कार्ड मध्ये एक पदार्थ असा दिसला – Pineapple & Jam. अभयने ते मागवले तर काय आले तर Pineapple with Raw Ham. तो पार रडवेला झाला मग आम्ही Babio ला जमेल तसे सांगून त्याच्याकरता Egg Omelette ची सोय केली त्यामुळे तो थोडंफार जेवू शकला.

बाकी आमची ट्रिप मस्त झाली. अर्जेंटनियन आणि एकूणच दक्षिण अमेरिकेतील मुली आणि बायका यांचे सौंदर्य हा एक फार मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी रोज सकाळी Babio मला पिक अप करायला येण्याच्या आधी किमान अर्धा तास खाली उतरून हॉटेलच्या दरवाज्यात उभा रहात असे. अन्य बऱ्याच देशांमधील सुरेख समजल्या जाणाऱ्या स्त्रिया आणि मॉडेल्स लाजेने तोंडात बोट घालतील अशा नैसर्गिक सौंदऱ्याची नुसती रेलचेल बघत उभे राहिले की पुढचा पूर्ण दिवस कसा मस्त जायचा. अत्यंत सुरेख रूप, एक प्रकारची तांबूस तपकिरी रंगाची नितळ त्वचा, उन्मादक शरीरसौष्ठव यांचे तांडेच्या तांडे. कुठे कुठे बघू एवढाच प्रश्न. मी भारतात परत आल्यावर अदितीला गंमतीत विचारलं होतं की, बघ ग जरा, माझे डोळे फाटून जरा जास्तच बाहेर आले आहेत का?

ट्रिप संपल्यावर आम्ही Babio ला डीलर म्हणून नेमण्याची तयारी दाखवली तर तो म्हणाला की जसे तुम्ही इथे येऊन मी काय करतो ते बघितलेत तसेच आता मी पण भारतात येतो आणि तुमचा manufacturing set-up बघतो. आपण agreement भारतात सही करू. लगेच पुढच्या महिन्यातली तारीख ठरवली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

आता Fernado Babio यांची भारत ट्रिप कशी memorable झाली ते बघूया.

आमच्या अर्जेंटिना ट्रिप मध्ये ठरल्याप्रमाणे Fernando Babio २४ नोव्हेंबर १९९७ रोजी भारतात आले. दुसऱ्या दिवशी लगेचच आमच्या नाशिक फॅक्टरीला जायचे ठरले. त्यावेळी आजच्या सारखे इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर ब्रिज नव्हते. आणि सकाळी साधारण सहा साडेसहा नंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोटा परेड लागलेली असे. आता ही परेड Babio ने बघू नये अशी माझी आत्यंतिक इच्छा. पण टाळणार कसं? दुसरा रस्ताच नाही. मी त्याला सांगितलं की लांबचा प्रवास आहे त्यामुळे आपण लवकर निघू. त्याने लगेच हो म्हटलं तेव्हा वाटलं की कदाचित तो सुप्रसिद्ध सीन टळेल.

त्याला सकाळी ५.३० ला हॉटेल मधून पीक-अप करून आम्ही निघालो. नोव्हेंबर अखेर असल्याने सूर्योदय जरा उशीरा होणे माझ्या पथ्यावर होते. परंतु सकाळच्या अंधुक प्रकाशात ती लोटा परेड काही पूर्णपणे चुकवता आली नाही. त्याला ते बघून काहीच कळत नव्हतं म्हणून त्याने मला विचारलं, “What are these people selling?” त्याची कल्पना की ते लोकं काहीतरी विकायला बसलेत. मला हसू आवरत नव्हते पण प्रयत्नपूर्वक चेहरा थंड ठेऊन मी म्हटलं, “I have no idea”. पण overall बचावलो.

नाशिकला पोहोचेपर्यंत आपल्याकडच्या ट्रॅफिकची परिस्थिती बघून तो सुन्न झाला होता. दोनच लेनचा नॅशनल हायवे आणि ज्या प्रकारे गाडया एकमेकांना ओव्हरटेक करत होत्या ते त्याच्या आकलनेच्या पल्याड होतं. गाडीच्या डॅश बोर्डवर गणपतीची मूर्ती होती. त्याने दुभाष्याच्या मार्फत माझ्या ड्रायव्हरला विचारलं की ती मूर्ती कोणाची आणि कशासाठी आहे? माझ्या ड्रायव्हरने त्याच्या तोडक्या मोडक्या भाषेत सांगितलं की ती देवाची मूर्ती आहे. तर तो जोरात हसून म्हणाला, “looking at the road & the traffic, you need a real big idol. This is too small.” आमची नाशिक व्हिसिट चांगली झाली पण परत येताना आम्हाला भिवंडी शहरातून यावे लागले. तेव्हा तर Babio ची बोलतीच बंद झाली होती. शहरातील घाण, कचरा, माणसं आणि गुरं; फक्त अबब म्हणायचंच बाकी. त्याने भिवंडीचे किती फोटो काढले हे तो भगवंतच जाणे. मला तोंड दाबून बुक्यांचा मार! पण सांगणार कोणाला?

मग २७ तारखेला आम्ही डीलर ऍग्रीमेंट सही केले तेव्हा Babio म्हणाला की आजचा डिनर मी तुम्हाला देणार आहे. मी, माझे वडील, ऑफिस मधील दोन कलिग्स आणि Babio आणि त्याची दुभाषी बाई असे सहा जण आम्ही ओबेरॉय हॉटेल मधील Casa Mexicana या मेक्सिकन रेस्तराँ मध्ये गेलो. आम्ही ठरवलं की बील आटोक्यात राहण्याच्या दृष्टीने फक्त बियरच प्यावी. जेवण वगैरे छान झालं आणि मधेच Babio उठून कुठेतरी गेला. आम्हाला वाटलं की गेला असेल टॉयलेटला. पण ५-१० मिनिटांनी तो हॉटेलच्या एका माणसाबरोबर परत आला; त्या माणसाच्या हातात शॅम्पेनची बाटली. Babio ने ऍग्रीमेंट सही झाल्याबद्दल सेलिब्रेशन म्हणून ऑर्डर केली. मला तशी शॅम्पेन अजिबात आवडत नाही पण मान राखायला बळेबळे प्यायलो.

थोड्या वेळाने बील आलं आणि ते बघून Babio एकदम सुन्न झालेला वाटला. बराच वेळाने ते बील त्याने मला दिलं आणि सांगितलं की तू जरा चेक कर. मी रक्कम बघून बेशुद्ध पडायचा बाकी होतो. बील झालं होतं रुपये २४८००. (त्या काळातील पंचवीस हजार म्हणजे आजचे कमीत कमी दीड लाख). प्रॉब्लेम असा झाला होता की साहेबांनी विचार न करता सगळ्यात महाग फ्रेंच शॅम्पेन (Don Perignon) ऑर्डर केली होती आणि त्याचीच किंमत अठरा हजार लावण्यात आली होती. साहजिकच मी त्याला म्हटलं की आपण दोघे हे बील शेअर करू पण तो ऐकायला तयारच नव्हता. त्याने बील भरलं आणि आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी साहेब अर्जेन्टिनाला परत गेले.

एक दोन महिन्यातच त्याने चांगला बिझनेस द्यायला सुरुवात केली पण त्याच वेळी अर्जेंटिना हा देश प्रचंड आर्थिक अडचणीत आला. त्यांच्या पेसो या चलनाची अक्षरशः वाताहत झाली. सगळा धंदाच चौपट झाला. १९९७ मध्ये एका पेसोची किंमत एका डॉलर एवढी होती म्हणजे १ पेसो = रु. ३६ आणि आज त्याच पेसोची किंमत रु. १.९० आहे आणि डॉलर आहे रु. ७२.

नंतर त्या Digitar S.R.L. या कंपनीचं आणि Fernando Babio या माणसाचं काय झालं काहीच कळलं नाही. माणूस अतिशय उमदा होता त्यामुळे धंदा झाला नसता तरी वैयक्तिक संबंध ठेवायला मला खूप आवडलं असतं पण नाही झालं तसं.

ईश्वरेच्छा बलियसी; दुसरं काय म्हणणार?

यशवंत मराठे

#Argentina #Travelogue #Asado #digitar #Babio #FernandoBabio

Leave a commentDeepak Dandekar

4 years ago

Very well written, can literally see what you have written, in front of my eyes👍👍

Vishakha Bhagvat

4 years ago

as usual well articulated. Exposure to different places and people adds to one’s personality.

पुष्कराज चव्हाण

4 years ago

काही वेळेला माणसं जशी अचानक आयुष्यात येतात आणि तशीच अचानक निघून जातात पण कायम लक्षात रहातात. छान लिहिलंय.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS