बांगलादेश युद्ध

नुकताच १६ डिसेंबर होऊन गेला आहे आणि बरोब्बर ५० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला होता त्याची आठवण झाली म्हणून हा लेख.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरे युद्ध १९७१ मध्ये ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत घडले. फक्त १३ दिवसात संपलेले हे युद्ध जगातील सर्वात कमी काळ चाललेल्या युद्धांपैकी एक आहे. या युद्धात भारताचा नेत्रदीपक विजय झाला आणि पाकिस्तानचा दारुण पराभव.

हे युद्ध झाले तेव्हा मी फक्त ११ वर्षांचा होतो त्यामुळे तेव्हाच्या माझ्या आठवणी खूपच बाळबोध आहेत. युद्ध सुरु व्हायच्या बरेच दिवस आधीपासून युद्धाचे वारे घोंघावत होते. मग अशी बातमी आली की युद्ध नक्की होणार आणि पाकिस्तान १००% मुंबईवर हल्ला करणार. झालं, सगळ्यांचं धाबं दणाणलं. असं सांगण्यात आलं की जेव्हा सायरन वाजेल तेव्हा सर्वांनी सगळे दिवे बंद करायचे आणि प्रकाश कुठूनच दिसू नये म्हणून सगळ्यांनी आपल्या खिडक्यांच्या काचांना ब्राऊन पेपर चिकटवायचा. आम्ही सोसायटीतील सगळी मुलं कामाला लागलो. युद्धाची भयाणता कुठे समजत होती? काचांना पेपर चिकटविण्यातच आम्ही मग्न होतो. मग अधूनमधून टेस्ट सायरन वाजायचा आणि सगळे दिवे बंद होतात की नाही ते चेक करायला. आम्ही सगळे खाली उतरून कोणाचा दिवा चालू असेल तर बोंबाबोंब करून ते बंद करायला लावायचो. मग एका मित्राला काय वाटले माहित नाही पण म्हणाला जर खरंच हल्ला झाला तर ओरडायचं नाही; पाकिस्तानी विमानांना कळेल आणि आमच्या मंदबुद्धीची परिसीमा म्हणजे आम्हाला सगळ्यांना ते पटलं आणि मग आम्ही सगळे कुजबुजत बोलायची सवय करू लागलो. दिवे बंद झाल्यावरचा तो मिट्ट अंधार कधी बघायची सवयच नव्हती आणि त्यामुळे सगळे घरात न बसता खाली एकत्र जमायचे. नशीब नोव्हेंबर महिना असल्याने असह्य उकाडा नव्हता. मग रेडियोवरून सांगण्यात आलं की जेव्हा सायरन वाजेल तेव्हा सगळ्यांनी एकत्र न जमता घरातच बसावे पण ते देखील टेबलच्या खाली आणि मग आमची ती ही प्रॅक्टिस करून झाली.

अखेरीस ३ डिसेंबरला युद्ध सुरु झालं. तेव्हा टीव्ही नव्हता त्यामुळे बातम्या मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे वर्तमानपत्र. पण आज मला खात्री आहे की तेव्हा मिळणाऱ्या बातम्या या नक्की सरकारी नियंत्रणाखाली असणार. माझे वडील आणि इतर मोठी माणसे रेडियोवरील बातम्या पण सारखे ऐकायचे आणि मग त्यांच्यात गहन चर्चा. आमच्या कानी काही शब्द पडायचे पण फारसा अर्थ काही कळायचा नाही. नंतर अशी एक गोष्ट ऐकली, खरी की वदंता याची कल्पना नाही, की कोळी लोकांना असं सांगण्यात आलं आहे की त्यांनी त्यांच्या होड्यांमध्ये दिवे लावून त्या समुद्रात उभ्या कराव्या. कारण काय तर म्हणे पाकिस्तानी विमानांना वाटावं की तीच मुंबई आहे आणि जे काही बॉम्ब पडतील ते समुद्रातच पडतील. आता विचार केला तर वाटतं की हे किती हास्यास्पद होते. पण तरी देखील आमची भीती कायमच कारण आम्ही अगदीच समुद्रकिनारी राहणारे; आम्ही कसे वाचणार?

नक्की तारीख आठवत नाही पण युद्ध सुरु झाल्यावर साधारण १० दिवसांनी, बहुदा १३ किंवा १४ डिसेंबरला, रात्री साधारण ८-८.३० च्या सुमारास सायरन वाजला आणि पाठोपाठ आकाशात एकामागे एक असे खूप लाल रंगाचे ठिपके दिसू लागले. सगळ्यांना वाटलं की पाकिस्तानने मुंबईवर हल्ला केला. सगळ्यांचेच धाबं दणाणलं; तेव्हाची ती भीती आजही अगदी स्पष्ट आठवते. अर्ध्या तासानंतर ऑल क्लिअरचा भोंगा वाजला आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. पण ते लाल ठिपके कसले होते ते काही कळलंच नव्हतं त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांचा नुसता चर्चेचा महापूर. मग दुसऱ्या दिवशी कळलं की भारतीय नौदलाला काही शंका आली म्हणून त्यांनी deterrent च्या स्वरूपात ट्रेसर बुलेट्सचा (हा शब्द बरोबर आहे की नाही याची कल्पना नाही) गोळीबार केला होता.

हा लेख लिहिण्याकरता जेव्हा मी जुने संदर्भ शोधत होतो तेव्हा असं वाचनात आलं की त्याकाळी पाकिस्तानी एयर फोर्सची एवढी क्षमताच नव्हती की ते मुंबईवर हल्ला करून परत जाऊ शकतील.

अखेरीस १६ डिसेंबरला पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि युद्ध संपले. सर्व मोठ्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हे युद्ध निर्णायक जिंकल्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी या एकदम हिरो झाल्या आणि १९७२ साली झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी भरघोस यश मिळवलं.

आज तंत्रज्ञान एवढं पुढारलं आहे की जर भविष्यात परत कधी पाकिस्तानशी युद्ध झालं तर त्यावेळेसारखी मुंबई नक्कीच सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे आपण एवढीच इच्छा आणि प्रार्थना करू शकतो की असे संहारक युद्ध होऊच नये.

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com 

Leave a commentशिरीष वैद्य

4 years ago

मस्त! जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

Vaidehi Deshpande

4 years ago

Yashwant khup chan lihilayas,apan tevha 10-11 varshanche hoto..tyavelechi athavan zali,amchehi anubhav kahise asech ahet…junya athavanina ujala milala.Amche Harinivas sudhha ashach charchet hote.

Ravindra Deodhar

4 years ago

I was 10 years old. We were living in Godrej colony at Vikhroli. We had the mountains in our colony where anti aircraft guns were placed. There used to be marshals doing the rounds during night. With the intermittent sirens going on in case of an air raid, we had put dark carbon paper on our windows for black outs. There were a few flares fired during that period and we used to run under our beds ( we were trained in school what was to be done). That was the closest war like experience for me.

Ravindra Deodhar

4 years ago

Post the war there was a grand welcome of all the 3 chiefs of staff organised by the Godrej family in our school. We had the opportunity to meet and listen to Field marshal Sam Manekshaw, AIr chief P C Lal and admiral Nanda. I still get goose bumps

Yeshwant Marathe

4 years ago

Lucky you

aroundindiaghansham

4 years ago

बांग्लादेश हा दिवस मुक्तीदिन म्हणून साजरा करतो. तर पाकिस्तानमध्ये हा `सकुते ढाका` या नावाने पाळला जातो. यु ट्यूबवर पाकिस्तानी मिडिया फॉलो केल्यावर याबद्दल बरीच त्यांच्या बाजुची माहिती मिळते. बंगाली आपल्याला समजत नाही, पण पाकिस्तानी उर्दू सहज समजते. त्यातून खुपच मनोरंजक माहिती हाती येते. पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्याची सल पाकिस्तानच्या मनातून जात नाही. हे दोन तुकडे होण्यास प्रत्यक्ष पाकिस्तानच कारणीभूत होता हे पाकिस्तानातील अनेक विचारवंतांनी मान्य केले आहे. एकतर दोन्ही भागात खूप मोठे अंतर, त्यात पाकिस्तानी पंजाब्यांची बंगाल्यांना तुच्छ मानण्याची वृत्ती, बंगाल हा आपल्यावरील ओझे आहे अशी पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भावना होती. त्यातून बंगालकडे दुर्लक्ष झाले. शेख मुजिबुर रहमान यांना बहुमत मिळाले असतानाच त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आले. बंगाली भाषेऐवजी उर्दू लादण्याचा प्रयत्न, लष्करात बंगाल्यांना स्थान न देणे, बंगालच्या निर्यातीमधून मिळालेला निधी बंगालला न देणे अशा अनेक कारणांचा यात समावेश आहे.
मात्र पाकिस्तानातील कट्टरपंथीय मात्र याचा सारा दोष भारतावर टाकतात. बांग्लादेशातील हिंदू शिक्षकांनी तेथील मुस्लिमांना भडकवले, त्याला भारतीय गुप्तचर यंत्रणेने साथ दिली व यातून भारताने कट रचून पाकिस्तानचे दोन तुकडे केले ही यांची भावना असते. आताही १६ डिसेंबरला पुन्हा एकदा या साऱ्याची उजळणी पाकिस्तानी मिडिया करताना दिसेल. यात झुल्फिकार अली भुट्टोंचे दोन उद्गार प्रसिद्ध आहेत. मुजिबूर रहमान यांना बहुमत मिळाल्यानंतर जाहिर सभेत भुट्टोंनी `उधर तुम, इधर हम ` असे उद्गार काढले होते. यातून एकाच देशात दोन पंतप्रधान होतील असे संकेत दिले होते. पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली आणि बांग्लादेश स्वतंत्र झाल्याची बातमी कळल्यावर भुट्टोंची प्रतिक्रिया होती, `चलो, पिछा छुटा`.
आज तोच बांग्लादेश सर्व क्षेत्रात पाकिस्तानच्या पुढे आहे.

Anil Joshi

4 years ago

हे युध्द चालू असताना मी फक्त ९ वर्षांचा होतो . युद्ध जिंकल्यावर साऱ्या गावांनी मिळून एक विजय मिरवणूक काढली . त्यात एका हात गाड्यावर सैनिकाचा वेश करून मला उभे करण्यात आले . आसपास कुंड्या वगैरे ठेऊन जंगलाचा आभास निर्माण करण्यात आला होता . पुढे घोड्यावर स्वार काही सैनिक वेशातील मुले होती . चौका-चौकात मला लोक ओवाळत होते ,हार घालत होते ,पेढे भरवत होते. त्यासाठी तो हातगाडा थांबवावा लागत असे . पुन्हा तो गाडा गतिमान होताना तोल सांभाळायला मोठी कसरत करावी लागे . काही तास ही मिरवणूक चालली होती . इतके पेढे एका दिवसात मी नंतर कधीही खाल्ले नाहीत .

पुष्कराज चव्हाण

4 years ago

यशवंत,
छान लिहिलंयस. विषयही तुला पटापट सुचतात हे चांगलं आहे.
७१ च्या युद्धाच्या वेळेस आम्ही तळेगांवच्या शाळेत होतो. युद्ध तिकडे लांब सुरु होतं पण तू म्हणतोस तसं सगळ्यांनाच असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी पाकीस्तानी सैनिक समोर येऊन उभा राहील की काय. बालबुद्धीच ती तिला काय भराऱ्या मारायला? तिन्हीसांजेला तावदानांना ब्राऊनपेपर लावलेल्या खिडक्या बंद करुन बंद खोल्यांमधे आम्ही बसायचो. युद्धाचे विचार करतच झोपत असू. दिवस उजाडल्यावर शाळेत जाताना आम्ही एखादी बंदुकीची गोळी पडलेली सापडते का किंवा न फुटलेला बाँब सापडतो का हे रस्त्याने शोधतच शाळेत पोचायचो. जवळच एक टेकडी होती त्यावर एक छोटसं बांधकाम केलेलं घरासारखं काहीतरी होतं आमच्या मनातल्या कल्पने प्रमाणे तिथे रडार होतं आणि त्यातून शत्रूची येणारी विमानं दिसतात असा समज होता. रात्रीच्या वेळेस सायरन वाजला की पाठोपाठ शत्रूची विमानं येतात की काय असं वाटायचं बाल मनच ते त्यात काय येईल काही सांगता यायचं नाही. पण एकंदरीत सगळी गंमतच वाटायची. त्यावेळी आम्हाला छोटा जवान सिनेमाही दाखवला होता. त्यामुळे असं वाटायचं की आपणही सीमेवर जायची वेळ आल्यास बेधडक जायचं. कालांतराने युद्ध संपल्याचं समजलं आणि परमानंद झाला. त्या आनंदात आपला देश जिंकला होता, आपण तळेगावात सुरक्षित आहोत, आई-बाबा मुंबईत सुरक्षित आहेत आणि सारं काही आलबेल आहे या भावना होत्या.
असो, फार छान आठवणी जाग्या केल्यास. अशाही युद्धस्य कथा रम्यः म्हणायच्या.

Ajit S Gokhale

4 years ago

खरं आहे… त्यानंतरच्या वह्यांची कह्वरे सुद्धा युद्ध प्रसंग दाखवत असंत

Om Marathe

4 years ago

This is incredible, Kaka.

Cannot believe that in the same housing society, your generation and mine had such different experiences growing up. An anthology of memories over the generations in Citizen society needs to be document. Wish we could have interviewed our Aba, as even he moved to the society when he was a schoolboy.

Hemant Marathe

8 months ago

👍 Memories of the drill (after siren sound) we practiced so many times in school as well as in our society is still fresh in my memory.

Vinayak Gokhale

8 months ago

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. चांगले वाटले.

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

8 months ago

त्याकाळच्या लहान मुलाची रोजनिशी छानच!👌
मीही त्याकाळी ११ वर्षांचा असल्याने लिखाण अधिकच भावले. 🙂👍

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS