मृत्यू सोहळा

!! मृत्यू !!

या जगातील प्रत्येक मानवाला सगळ्यात जास्त भीती कशाची असेल तर ती मरणाची असते. आपल्या जवळच्या माणसाच्या मरणाने होणाऱ्या दुःखाची भीती आणि काळजी असणे स्वाभाविक आहे. पण मी बोलतोय ते आपल्या स्वतःच्या मरणाबद्दल.

मी या जगात असणार नाही; मग माझ्या बायको, मुलांचं काय होईल हा चिंतेचा घोर. माणूस जर बिझनेस मध्ये असला तर मग काळजीचा डोंगरच. माझ्या पश्चात धंद्याचं काय होणार? कोण बघणार? कोणी बघायला हवं? वगैरे वगैरे प्रश्न भंडावून सोडतात. पण खरं सांगायचं तर आपण या जगात नसणार ही कल्पनाच माणसाला पोखरून टाकते.

नीट विचार केला तर तशी भीती अनाठायी आहे. कोणाचंही कोणावाचून अडत नाही; मग तो देश असो, धंदा असो वा कुटुंब असो. Nobody is indispensable in this universe. पण हे सर्वसाधारणपणे वळत नाही. आपल्या मरणाने आपल्या जवळच्या लोकांना (कुटुंब, मित्र, नातेवाईक) थोडाफार त्रास होईलही पण त्याला काळ हे एकमेव औषध असते.

प्रत्येकाची इच्छा काय असते की आपण भरपूर जगावं आणि ते देखील शेवटपर्यंत ठणठणीत तब्येत असताना. आता आपण काही महाभारतातील भीष्मासारखे इच्छामरणी तर होऊ शकत नाही; अजून आयुष्य किती आणि कसे आहे हे तो भगवंतच जाणे.

अगदी मनापासून सांगायचं तर मला खरंच मृत्यूची नाही भीती वाटत. मी माझ्या कुटुंबाप्रतीच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहेत. देवाची कृपा, दुसरं काय. सुदैवाने माझी बायको आणि मुलं इतकी आत्मनिर्भर आहेत की मला त्यांची काळजीच नाही. मला अगदी ह्या क्षणी जरी मृत्यू आला ना तरी मी त्याचे सहर्ष स्वागत करीन. मला कल्पना आहे की माझ्या अशा बोलण्यावर माझी बायको खूप चिडेल. जाऊ दे, जेव्हा तो क्षण यायचा असेल तेव्हा येईल.

त्यामुळे जेव्हा केव्हा मी मृत्यू शय्येवर असेन तेव्हा माझी आंतरिक इच्छा अशी आहे की माझ्या मनात खालील विचार असतील किंवा असावेत:

१. आयुष्य कृत्रिमरित्या अथवा अनैसर्गिक पद्धतीने वाढविणे निरर्थक किंवा मूर्खपणाचे आहे. I want to quit as my time is up.

२. I have done my share; it is time to go. I will do it elegantly.

३. लवकर गेला; आणखीन जगायला हवा होता असं कोणालाही म्हणायची संपूर्ण बंदी हवी. उलट मित्रजनांनी असं म्हणावं की हा xxx आयुष्यातील सर्व कर्तव्ये पूर्ण करून वेळेवर या जगाचा निरोप घेतोय.

पुढचा प्रवास आहे की नाही आणि असला तर कसा असेल ह्याची काहीच कल्पना नसली तरी भीती अजिबात नाही. उलट अज्ञात असलेल्या त्या रस्त्याची प्रचंड उत्सुकता मात्र आहे कारण मागील प्रवास छान झाल्याचा आनंद आहे. म्हणूनच निघता, निघता मला मित्रांना असं बोंबलून सांगायला आवडेल की साल्यांनो, मज्जा करा, कट्ट्यावर बसून मनसोक्त शिव्या द्या, कॉफी प्या, सिगरेटी फुका.

मी मेल्यानंतरचे १३ दिवस सुतक पाळायची मात्र अजिबात परवानगी नाही. सर्वांनी आनंदोत्सव साजरा करा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत लावा, ऐका. माझ्या आवडीच्या गोष्टी म्हणजे उदा. दही भात, बटाट्याच्या काचऱ्या आणि गोडात आमरस, रव्याचे लाडू, फ्रुटसॅलड, मुद्दामून खा. माझ्या सर्व मित्रांनी, भावंडांनी आणि मुलांनी माझी आवडती सिंगल मॉल्ट व्हिस्की पिताना दोन थेंब माझ्या आठवणींना अर्पण करा. मी जिथे असेन तिथे ते मला मिळून मी तृप्त होईन.

एकूण काय माझा मृत्यू सोहळा साजरा करायला सर्व मंडळींनी कंबर कसून तयार व्हा.

मला त्यावेळी शेवटी एवढंच म्हणावसं वाटेल “आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा”.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#DeathCelebration #DeathDay #Single_Malt

Below is the audio format of the above Blogpost.

Leave a commentपुष्कराज चव्हाण

4 years ago

एक सहसा न स्पर्शिला जाणारा विषय सहज हाताळलाय. मृत्यू हे अंतिम सत्य आणि अटळ आहे तरीही आपण सतत त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. नव्याने येणाऱ्याला जागा खरुन दिली पाहिजे.आयुष्यातली आपली कर्तव्ये पार पाडल्या नंतर त्याचे खरं तर आनंदाने स्वागत करायला हवं आणि मरणाऱ्याने आपली कर्तव्ये यथास्थित पार पाडली म्हणून आनंदाने त्याला निरोप दिला पाहिजे. छान लिहिले आहे.

Anuradha

4 years ago

वेगळा विषय नीट हाताळला स,तुझे विचार मनोमन पटले
चांगले लिहिलेस, असाच लिहीत जा,वाचायला आवडेल

Ajit S Gokhale

4 years ago

मस्त !!!

श्रीकांत भिडे

4 years ago

विषय न चर्चिला असून , खूप छान लिहले आहेस

संतोष राऊत

4 years ago

या विषयावर लिहिण्यास हिंम्मत लागते भाऊ। छान लिहिले आहे.

Vaidehi Deshpande

4 years ago

बाप रे यशवंत किती गंभीर विषयावर सहज पणे लिहिले आहेस !!खरच कौतुक आहे. लिखाण असंच चालू ठेव.

स्नेहा धारप.

4 years ago

मृत्यूविषयीचे विचार खूप आवडले. आपली मानसिक तयारी आपणच करायला हवी.

nitintag

4 years ago

मृत्यू…….
माझी आजी म्हणायची… आपण मरो आणि जग बुडो… आपण मेल्यानंतर ह्यांचं कसं होईल अशा फालतू काळजीत वर्तमानातील आयुष्य फुकट घालवू नका आहे तो क्षण आनंदाने उपभोगायला शिका.

जसा आपला जन्म केव्हा, कुठे, कोणाच्या पोटी यावा हे आपल्या हातात नाही, तसेच मृत्युही हि आपल्या हातात नाही तो केव्हा कधी कुठे कसा येईल हे हि आपल्या हातात नाही. पण ह्या दोन्हि मधील पौगंडावस्थेतील सुरवाती ची काही वर्षे सोडल्यास नंतरची संघर्षमय वर्षे नंदनंतर आलेली स्थिरता ,सुबत्ता बरोबरीने आलेला समाजातील घडामोडींचा व आप्तेष्टाचा मित्रांचा अनुभव व त्यातून आपल्यात आलेली प्रगल्भता आणि आपण उपभोगत असलेलं वर्तमानातील आयुष्य ह्या सगळ्यांचा परीणाम आपल्या विचारांवर होत असतो.
माणसाला मरणाच्या भिती पेक्षा तो मृत्यू कसा, केव्हा, कुठे कधी येईल ह्याची काळजी व भिती जास्त वाटते आणि ती सहाजीकच आहे.
(ह्या मध्ये बरेच वेळा मृत्यूच्या भिती पेक्षा आपणा मुळे इतरांना त्रास नको हेच विचार असतात)

१) जर मृत्यू अचानक अकाली अपघाती असेल तर.
२)जर तो दुर्धर आजाराने तरुण वयात हंतरूणात परावलंबी होऊन होणार असेल तर.
३)जर तो आजन्म अपंगत्व परावलंबी होऊन येणार असेल तर.
अशा जर तर च्या परीस्थितीत आपल्या इच्छेला काहीच अर्थ उरत नाही.

ह्या मध्ये मला वाट़तं जे आपल्या हातात आहे अजातशत्रूत्व व मरणोत्तर अवयव दान.
ज्यामुळे मृत्यू पश्चात आपण अनेकांच्या आयुष्यांत आनंद आणू शकतो. 🙏

श्रीरंग माधव तगारे.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS