हवामान बदल आव्हाने

हवामान बदल होतो आहे हे निश्र्चितच. या बदलाची कारणे बऱ्याच शास्त्रज्ञांच्या अनुसार, मानवाने केलेल्या इंडस्ट्रियल रेवोल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती मध्ये आहेत. औद्योगिक क्रांती मध्ये इंधनाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. हे इंधन जळताना निर्माण होणारा धूर (त्यातही मुख्यत्वे कार्बन डाय ऑक्साइड) हा वातावरणात कोंडला जाऊन त्यापासून एक उष्णता शोषून घेणारे आवरण पृथ्वीवर तयार झाले. या आवरणामुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन पुरेसे नीट न झाल्यामुळे वातावरण गरम झाले. असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या माणसाने पांघरूण घेतले म्हणून त्याला उष्मा व्‍हायला लागला, उकडायला लागले याच्याशी वरील कारणाचे साधर्म्य दिसते. अर्थातच पांघरूण काढून टाकले तर उकाडा कमी होईल. हवामान बदलाच्या भाषेत बोलायचे झाले तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी केला की झाले, असे यातून ध्वनीत होते. यामागील पार्श्वभूमी थोडक्यात पाहू

सर्वसाधारणपणे 1980 च्या दशकात याबाबत प्रथमतः शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली. डॉक्टर रश्मी मयूर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ओझोनच्या थराला खिंडार पडत आहे, यामुळे तापमान वाढ होईल आणि अंटार्टिकाचे बर्फ वितळेल असे जगासमोर आणले. यावर तातडीने उपाय करायला हवेत हे ते हिरीरीने मांडत होते. मुख्यत्वे फ्रीऑन आणि त्याच्यासारख्या इतर रेफ्रिजरंट म्हणजेच शीतकांच्या रेणूंमुळे पर्यावरणाच्या वरच्या थरात असलेल्या ओझोन या वायूला खिंडार पडत आहे असा अभ्यास पुढे आला सहाजिकच या रेफ्रिजरंटच्या पर्यायाचा शोध सुरू झाला.

हे पर्याय उपलब्ध झाले परंतु एक प्रवाद असाही आहे, की पर्याय उपलब्ध झाल्यावरच ही ओरड सुरू करण्यात आली; ते पर्याय विकण्याकरता सुरू केली. मग त्या तंत्रज्ञानाचा व्यापार सुरू झाला. प्रगत देश, ज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान होते ते अव्वाच्या सव्वा भावात हे तंत्रज्ञान अप्रगत देशांना विकू इच्छित होते. प्रगतिशील आणि अप्रगत देशांना हे परवडत नव्हते. हे ओझोन भगदाड आणखी कशानी पडते याच्या संशोधनाला चालना मिळाली. त्यात समोर आला कार्बनडाय ऑक्साइड. तोपर्यंत कार्बनडाय ऑक्साइड वायूला प्रदूषक मानलेच जात नव्हते. आता कार्बनडाय ऑक्साइडचा प्रचंड मोठा स्रोत म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्प, इतर कारखाने आणि मोटारगाड्या. या सर्व बाबी म्हणजे आधुनिक पाश्चात्त्य जीवनशैलीचे मानदंड.

ओझोन खिंडार व तापमान वाढ या सर्व त्रासाला कारणीभूत अशी आधुनिक पाश्चात्त्य जीवनशैली तुम्ही त्यागा आणि पर्यावरणस्नेही साधी जीवनशैली जगा असा धोशा अप्रगत आणि विकसनशील राष्ट्रांनी लावला. याला कुठल्याही विकसित देशातील नागरिक आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असलेले औद्योगीकरण मान्यता देणार नाही. हे सरकारांना स्पष्ट कळले आणि मग एक विचित्र चढाओढ सुरू झाली.

अमेरिकेतील बहुसंख्य राजकारण्यांनी पर्यावरण बदल आणि तापमान वाढ होतच नाहीये अशी भूमिका घेतली. इंधनांच्या धुरामुळे कोंडलेल्या सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे तापमान वाढते आहे. याला छेद देणारे संशोधन पुढे आणण्याची निकड प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थांना जाणवली. तेथील शास्त्रज्ञांनी पर्यावरण बदलाकरता अन्य कुठली रसायने कारणीभूत आहेत हे शोधायला सुरुवात केली. तसेच आपल्यावरील आरोप अप्रगत आणि विकसनशील देशांकडे कसे वळवता येतील याचीही चाचपणी व्हायला लागली. आणि नंतर प्रत्यक्ष उपयोग सुरू झाला. आमच्या गाड्या आणि विमानामुळे तसेच कारखान्यांमुळे पर्यावरण बदल होतो आहे असे म्हणता काय?

हे बघा संशोधन की ज्यातून असे सिद्ध होते आहे की गाईंच्या रवंथ करण्याच्या ढेकरांमधून आणि पादण्यामधून मोठ्या प्रमाणावर मिथेन वायूची निर्मिती होते आहे. या वायूमुळे कार्बन डाय ऑक्साईडची बावीस पट हानी होते. आणि गाई सगळ्यात जास्त कुठे आहेत तर भारतात. म्हणून भारताला पर्यावरण बदलासाठी अमेरिकेएवढेच जबाबदार धरले पाहिले. अमेरिकन जीवनशैली पेक्षा जास्त त्रासदायक भारतीय गाईगुरे आहेत असे सिद्ध करण्याचा हा आटापिटा होता. त्याचबरोबर भात शेतीमध्ये, जिथे पाणी भात खाचरात अडवले जाते तिथे, मिथेन निर्मिती होते आणि यामुळे भात शेती करणारे सर्व अविकसित विषुववृत्तीय देश सुद्धा पर्यावरण बदलाला कारणीभूत आहेत असे प्रतिपादन अमेरिकी व युरोपीय शास्त्रज्ञांकडून करण्यात आले.

त्यातच आणखी काही शास्त्रज्ञ या वादविवादात उतरवले गेले. ते म्हणू लागले, पृथ्वीच्या तापमानातील वाढ आणि घट नैसर्गिकच आहे. त्यामध्ये मानवी गतीविधींचा, मानवी हस्तक्षेपाचा, फारसा परिणाम होतच नाही. त्यामुळे होते आहे ती तापमान वाढ नैसर्गिकच आहे. मानवी हस्तक्षेपाचा आणि पाश्चात्त्य जीवनशैलीचा याच्याशी सुतराम संबंध नाही.

एकूणच पुढारलेल्या पाश्चात्त्य जगानी तापमान वाढ आणि पर्यावरणीय बदलाकडे अतिशय बेफिकिरीने बघितले किंवा त्याला नाकारण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

नंतर मात्र मोठ्या प्रमाणावर सर्व जगभरच पर्यावरण बदलाचे फटके बसायला सुरुवात झाली. भारतात गायी आणि तिसऱ्या जगात भातशेती अनेक सहस्रकांपासून चालू आहे आणि त्यामुळे पर्यावरण बदल झाला नाही किंवा होत नाही हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट आहे. विशेष अन्नावर वाढवलेल्या गायी, डुकरे, कोंबड्या, बकऱ्या, बदके यांची मांसासाठी शेती करणे त्यासाठी जंगले तोडणे, आगी लावणे यामुळे निश्चितच हवामान बदल होतो हे स्पष्ट आहे. आता तोंड लपवून बसणे हे पाश्चात्य जगाला कठीण झाले. त्यामुळे त्यांच्यामधील काही सामान्यजन आणि निदान काही निरपेक्ष शास्त्रज्ञ व अधिकारीगण तापमान बदलाला सामोरे जाण्याची तयारी करू लागले.

त्यातही जीवनशैली बदलाऐवजी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान निर्माण करणे आणि ऐषारामी जीवनशैली कायम ठेवूनच, "बघा बघा आम्ही पर्यावरणासाठी कायकाय करत आहोत" असा अभिनिवेश जास्त होता. ब्रिक्स आणि इतर देशांनीही यांच्या आडून आपला तथाकथित विकास चालू ठेवण्याचा चंग बांधला आहे.

पर्यावरण बदल झाला आहे; होतो आहे. तापमान वाढ खरंच होते आहे. आणि त्याचे दुष्परिणाम हे भयंकर असणार आहेत. हे आता सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. पण त्याचे कारण फक्त वातावरणातील प्रदूषण असे म्हणणे चुकीचे आहे. वातावरणातील प्रदूषण म्हणजे अंगावर घेतलेले पांघरूण त्यामुळे होणारा उकाडा हे खूप वरवरचे आहे. खरा आजार दुसराच आहे. हा उकाडा नाही; हा ताप आहे आणि साधासुधा नाही तर काही अंतर्गत व काही बाह्य कारणाने आलेला आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ कार्यकर्ते, ऍक्टिव्हिस्ट सुद्धा पर्यावरण बदलाच्या या मोठ्या कारणांबद्दल अनभिज्ञ आहेत किंवा पुरेसे गंभीर नाहीयेत किंवा चक्क दुर्लक्ष करत आहेत. सहाजिकच इतर सर्वजण त्याबाबत पूर्ण अंधारात असणे स्वाभाविकच आहे.

या हवामान बदलाबरोबरच इतर मानवनिर्मित उत्पातांचा आपल्या जीवनदायिनी नद्या आणि भूजमीन यावरील होणारे दुष्परिणाम पुढील दोन लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

(with Technical Inputs from Dr. Ajit Gokhale, Natural Solutions)

हा लेख शिवमुद्रांकन या मासिकात काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आला.

Leave a comment



Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS