काक: पुराण 

कावळा असे म्हटले की मानेजवळ थोडाफार करडा पण बाकी काळा कुळकुळीत आणि दिसायला एक प्रकारे अत्यंत विद्रुप असा पक्षी. आता तुम्हाला प्रश्न पडेल की या पक्षाबद्दल मी काय काव काव करणार आहे? कावळ्याबद्दल लहानपणापासूनच एक विलक्षण कुतूहल आणि गूढ असल्यामुळे त्याच्याबद्दल चार शब्द लिहिण्याचा कंड, ही काव काव केल्याशिवाय, शमणार नाही.
 
आपल्या सर्वांच्या जीवनात कावळ्याचे आगमन चिऊ काऊ या गोष्टीतून येते. पण तरी देखील चिऊ खास प्रेमाची. कावळा आपला गरीब बिचारा कारण त्याचे घर शेणाचे ठरवून माणसाने त्याला निम्नवर्गीय करून टाकला. खऱ्या जीवनात कावळा कधीही चिमणीच्या जवळपास पण जात नाही तरी देखील कावळा मात्र गयागुजरा कारण तो रस्त्यातील सगळी घाण खातो. लहानपणी तर आम्हा सर्वांना सांगण्यात येई की तो माणसांचा शेंबूड देखील खातो त्यामुळे त्याच्याबद्दलची एक प्रकारची घृणाच निर्माण व्हायची. तरी देखील माझे गूढ आकर्षण मात्र कमी झाले नाही.
 
परंतु कावळ्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार कै. आर के लक्षण. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांमध्ये त्यांच्या कॉमन मॅन सहित कावळा हा एक मूक साक्षीदार असे.
 
कावळा तसा माणसापासून लांब राहण्याचाच प्रयत्न करतो, परंतू आपल्याला सर्वांना अनुभव असेल की आपली आई जेवण बनवत असताना हे महाशय हमखास स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन जोरजोरात काव काव ओरडून खायला दे म्हणून विनवणी करताना दिसायचे. प्रत्येक आईचे आणि त्यांचे काय ऋणानुबंध असायचे ते देव जाणे. ती दररोज “मेल्यांनो, थांबा रे, किती घाई करता?” असे लडिवाळपणे म्हणते. पण ह्यांचा उतावीळपणा इतका की काव काव थांबतच नाही. मग आईचे संवाद सुरु होतात, “देते रे, थांब, ओरडू नकोस”, “धीर धर, किती ओरडतोस, देत नाही का तुला?” पण तरी देखील उत्तरादाखल त्यांचे कर्कश्य काव काव सुरूच. अखेरीस अर्धी पोळी व भाताची मूद दिली जायची. कावळ्याकडून एक गोष्ट मात्र शिकण्यासारखी आहे. अन्न मिळेपर्यंत भले तो एकटाच केकाटत असेल पण ते मिळाले की तो कधीही एकट्याने खात नाही. आपल्या किमान दोन ते तीन साथीदारांना बोलाविल्याशिवाय तो रहात नाही. एकदा का भात खाल्ला की त्यांचे ओरडणे बंद आणि मग उडून जायची तयारी.
 
तो अथवा ती (उडताना सर्व कावळे सारखेच दिसतात), पोळीचा मोठा तुकडा तोंडात धरून भुर्र उडून जाई. तेव्हा वाटायचे की त्यांची पिल्ले कदाचित आतुरतेने वाट बघत असतील. अर्थात हे कोणी कधी सांगितले नाही पण माझा एक अंदाज. इतर वेळी जरी कधी घरटे दिसले तरी अशा वेळी मात्र ते घरटे मात्र कधीही दिसायचे नाही. खिडकीतून अगदी निरखून लांबवर बघायचा प्रयत्न केला तरी दिसले नाही. कावळ्यांची उडत जाताना एक खासियत म्हणजे ते कधीही सरळ रेषेत जात नाहीत, कायम कुठल्यातरी अंशाचा कोन करून ते दृष्टीआड होतात. आपल्या शहरात दिसणाऱ्या कावळ्यांचा मोठा भाऊ म्हणावा असा संपूर्ण काळा असलेला डोमकावळा. 
 
 
दुसरी एक कावळ्यांची खासियत म्हणजे जर त्यांचा एखादा भाऊबंद जखमी झाला आणि त्यातून तो वाचणे शक्य नाही हे इतरांना लगेच समजते. परंतु त्या नंतरची त्यांची कृती मला फार क्रूर वाटते. सगळे कावळे त्याला चोची टोचून टोचून ठार मारतात. असा अघोरी उपाय ते का करत असतील? कदाचित त्यांना भीती वाटत असेल की जखमी कावळा जर मानवाच्या हाती लागला तर त्याचे फार हाल होतील म्हणून मग त्याला यमसदनी पाठवून देणेच चांगले. परंतु जर कधी एखाद्या झाडाखाली कावळा मरून पडला तर मात्र शेकडो कावळे आजूबाजूच्या इमारतीवर व झाडावर ठाण मांडून बसतात. त्याला श्रद्धांजली देण्याचा छोटेखानी कार्यक्रमच जणू. परंतु एक गोष्ट कळत नाही की निरोप देण्याची अशी कोणती क्लुप्ती त्यांच्याकडे आहे ज्यायोगे दूरदूरचे नातलग इतक्या कमी वेळात एकत्र येतात? त्या काळात ते कुणालाही झाडाजवळ फिरकू देत नाही. कुठल्या टारगटाने प्रयत्न केला तर ते त्याला चोच मारायला मागेपुढे बघत नाहीत. दुसरी एक गंमत म्हणजे कावळे म्हणे 40-50 वेगवेगळ्या प्रकारे ओरडतात; आपल्याला मात्र त्यातील फरक पटकन कळत नाही.
 
पक्षी साधारण दोन गटात विभागता येतील, शाकाहारी व मांसाहारी. मांसाहार करणाऱ्या पक्षांचे पुन्हा दोन भाग करता येतात, पहिला जे मारून खातात व दुसरे मेलेले प्राणी खातात. कावळा हा दुसऱ्या श्रेणीत बसतो, तो हत्या करण्याच्या वृत्तीचा नसतो. जर प्राणी मेला तरच त्याचे मांस भक्षण करून निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे काम हा इमाने इतबारे करतो. त्यामुळे मला कावळ्यांचे नेहमीच फार कौतुक वाटते.
 
कावळा हा अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा कारागीर आहे. त्याचे घरटे हे घरटे नसून काड्या, पाने यांचा पसारा असतो. त्याला काड्या विणून घरटे करणे जमतच नाही. कशातरी काड्या एकमेकात फसवून एकदाचे घरटे बांधणे संपवतो. आमच्या बाल्कनीच्या ग्रीलमध्ये दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत कावळा घरटे बांधायचा प्रयत्न करतो. आम्ही लक्ष ठेऊन असल्यामुळे लगेच काड्या साफ करतो. लागोपाठ चार-पाच दिवस प्रयत्न करून झाल्यावर त्याच्या लक्षात येत असावे की इथे आपली डाळ शिजणार नाही आणि तो घरटे बनविण्याचा प्रयत्न थांबवतो. कावळीण मात्र असल्या घरट्यावर खुश होऊन कशी काय रमते याचे नवलच वाटते. खरं म्हणजे कावळा हा काही निर्बुद्ध पक्षी नव्हे परंतु कोकिळ त्याच्या घरट्यात स्वतःची अंडी ठेवते कारण कावळीण आपल्या अंड्यांची छान काळजी घेईल याची तिला खात्री असते. कावळीण मात्र काहीच लक्षात न आल्याने अंड्यांना उबविण्याचे मस्त काम करते (माणूस स्वतःचे काम outsource करायला कोकिळेकडून शिकला असेल का?). अनेक आदिवासी जमाती मात्र कावळ्याने किती अंडी घातली यावर लक्ष ठेऊन असतात कारण त्यांचा पावसाचा अंदाज त्या गोष्टीशी निगडित असतो. मानो या ना मानो, परंतु तो अंदाज बहुतेक वेळा खरा ठरतो. निसर्गाने त्यांना दिलेले शहाणपण, दुसरं काय म्हणणार?
 
कावळा किती हुशार असतो याचे एक गंमतीचे उदाहरण तुम्हाला सांगतो. शेकडो वर्षांपूर्वी काही कावळे बोटीत स्वार होऊन इस्राईल येथे पोहोचले. तिथे पक्षी जमात तशी कमीच म्हणून सुरुवातीला त्यांचे स्वागत झाले. परंतु कालांतराने त्यांच्या लक्षात आले की कावळे इतर पक्ष्यांची अंडी खातात त्यामुळे इतर पक्षी कमी होऊ लागले. त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी जाळे लावून कावळे पकडायचे ठरवले. काही काळ ते यशस्वी देखील झाले परंतु नंतर पालिकेची गाडी बघितली की कावळे गायब व्हायचे. मग त्यांनी एयर गन वापरून कावळ्यांना मारायचे ठरवले. थोड्याच दिवसात असे लक्षात आले की कावळ्यांनी एयर गन किती उंचीपर्यंत घातक ठरू शकते हे ताडून ते त्याच्या वरूनच विहार करायचे. शेवटी पालिकेने कावळ्यांनी घरटी करू नयेत म्हणून झाडांची छाटणी केली. परंतु कावळे इतके हुशार की ते जवळपासच्या प्रदेशात घरटी करायचे आणि परत तिथेच यायचे. शेवटी सरकारने कंटाळून त्यांचा नाद सोडून दिला.
 
आम्ही लहानपणी आजोळी जायचो तेव्हा दर काही दिवसांनी घरातील स्त्रियांपैकी, म्हणजे मावश्या, माम्या, ताया, कोणाला तरी कावळा कसा काय शिवतो हे कधीही न सुटणारे कोडे होते. बरं जर शिवला तर कोणालाच का दिसायचा नाही? म्हणे कधी कधी रात्री व पहाटे पण शिवायचा, असे कसे होऊ शकते? आणि हो, तो आम्हा लहानांना, घरातील पुरुष मंडळीं व वयस्क स्त्रिया यांना का शिवत नाही याचे एक वेगळेच गूढ. आजीला विचारले, तर पाठीत धपाटा मिळायचा आणि वरून मेल्या, तुला काय करायचंय, हा ओरडा. बरं चला, शिवला तर शिवला पण म्हणून चार दिवस सर्वांच्या पासून लांब का बसायचे? आमच्या भावंडांपैकी काही जणांना त्यांच्या आईशिवाय झोप यायची नाही, आणि स्वयंपाक पण तिच्याच हातचा लागायचा. त्या चार दिवसात ती आई आपल्या मुलाला जवळ येऊ द्यायची नाही, आणि लांब कोपऱ्यात बसून राहायची. तिला जेवणाचे ताट वाढून हातात दिले जात नसे, तर तिच्या समोर खाली ठेवावे लागायचे, झोपायला गादी नसायची. आम्हा भावंडांना तिचे हे हाल पाहून कावळ्याचा भयंकर राग यायचा, की कावळा घराच्या जवळपास भटकला तरी दगड मारून हुसकावून द्यायचो ज्यायोगे तो शिवायला जवळ येऊ नये. परंतु तो आमच्या नकळत येऊन जायचा त्यामुळे आम्ही अनेक वेळा त्याला शाप पण द्यायचो. 
 
पुढे मोठे झाल्यावर हे कोडे अलगद सुटले खरे पण मग वाटले की, कावळ्याला बदनाम करून मानवाने काय मिळवले हे तो भगवंतच जाणे ! मानवजातीने त्या गरीब बिचाऱ्या कावळ्यावर हा अन्यायच केला आहे. 
 
बरं इतका बदनाम केला मग स्वयंपाकात तेल वापरण्याच्या भांड्याला कावळा हे नाव का दिले असेल? याचे उत्तर कधीच मिळाले नाही. तसेच कावळे महाराज म्हणे घराबाहेर बसून जोरजोरात ओरडून, लवकरच तुमच्या घरी पाहुणे येणार असे सांगतात. ज्ञानेश्वर माउली देखील “पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे” असा अभंग करून तेच सूचित करतात. आणि या अभंगाला हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून आणि लता दीदींनी गाऊन अजरामर केला. त्यावरून एक गंमतीशीर विचार मनात येऊन जातो. पुण्यातील सदाशिव पेठेतील मंडळी कावळ्याचा हा संकेत ओळखून, पाहुणे ही बला टाळण्यासाठी घराला कुलूप लावून दुसऱ्यांकडे पाहुणे म्हणून तर जात नसतील? तसेच मुंबईतील काडेपेटी समान छोट्या घरांमुळे मुंबईकरांना देखील तो कदाचित अशुभ संकेत वाटत असेल. 
 
आता कावळ्यांना आपले पितर दिसतात हे खरं की खोटं या वादात न पडलेले चांगलं. यावर फार पूर्वीपासून अनेक लोकांनी नानाविध कोट्या केल्या आहेत. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ भारतातच व हिन्दू धर्मातच नव्हे तर जगातील जवळजवळ सगळ्या कल्चर्स मधे कावळा हा आफ्टर लाइफमध्ये आत्म्याला घेऊन जाणारा समजला जातो. 
 
सर्वपित्री अमावास्येला अनेकांचे याच्याशिवाय पान हालत नाही. त्याने जेवणाला चोच लावली की त्यांच्या पोटातील कावळे शांत होण्याचा मार्ग सुकर होतो. त्या कावळ्यांना पोटातील कावळ्यांची दया येत असावी म्हणून अंत न पाहता ते लगेच सुटका करतात. परंतु दहाव्याला मात्र त्याची कितीही बडदास्त ठेवली तरी तो त्याच्या मर्जीचा बादशहा असतो. काही ठिकाणी त्याने पिंडाला चोच लावावी म्हणून लोक भजी, पकोडे, चिकन व मटण ठेवायला देखील कमी करत नाहीत. इतके करूनही जर तो शिवला नाही तर मात्र सर्वांच्या जीवाला घोर लागतो (तुम्हाला काकस्पर्श हा सिनेमा आठवत असेलच). ह्या एकाक्ष पक्ष्याला कसली जाणीव होते कुणास ठाऊक पण आजूबाजूला भरपूर कावळे असून सुद्धा तो पिंडाला शिवत नाही हा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला आहे. तसेच कोणी जवळच्या माणसाने काही बोललं अथवा मृताची अत्यंत जवळची व्यक्ती तिथे आल्यास कावळा पटकन शिवला हा ही प्रकार अनुभवला आहे. त्यामुळे हे कधीही न उलगडणारे कोडे आहे हे निश्चित. परंतु मानव हा महाचतुर प्राणी, त्याने त्यातून देखील एक पळवाट शोधून काढलीच. कावळा अगदी नाहीच शिवला तर दर्भाचा कावळा करून काम निभावून न्यायचे.
 
भारतात सर्वत्र कावळा बघायला मिळतो असे म्हणतात. मुंबईत तर पोत्याने कावळे आहेत. परंतु गंमत म्हणजे मुंबईपासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघरमध्ये मला एकही कावळा दिसत नाही. मग मला प्रश्न पडतो की पालघरमध्ये लोकं सर्वपित्री अमावास्या तसेच दहाव्याला काय करतात? काहीतरी जरा रंजक माहिती मिळू शकेल.
 
असो, आता तुम्ही माझ्यावर ओरडायच्या आत माझी काव काव बंद करतो. काय सांगावे कदाचित माझ्या या काक: पुराणामुळे “कावळा” या पक्ष्याबद्दल तुम्हाला आपुलकी निर्माण होईल. 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 

Leave a commentNitin

4 weeks ago

Is it really true that a crow is एकाक्ष?

RAJENDRA MADHUSUDAN PHADKE

4 weeks ago

रंजक काव काव !

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS