मेरा सुंदर सपना बीत गया

इजाजत मधलं 'मेरा कुछ सामान' हे गाणं गुलजारजींना कसे सुचले असेल असे नेहमी वाटत राहते. कधी कधी अशी दाट शंका येते की गुलजारजी कदाचित गीता दत्तला भेटले असतील तेव्हा तिचं दुःख, तिच्या अबोल वेदना या त्यांच्या हृदयात बंदिस्त झाल्या असाव्यात. एका मनस्वी देखण्या अभिनेत्रीची ती आर्तकरुण शोकांतिका त्यांच्या मनात घर करून राहिली असेल कदाचित.

 

जेव्हा गीता दत्तने गुरुदत्तचे वहिदा रेहमानशी वाढत चाललेल्या जवळीकीपायी सगळे संबंध तोडले, नाते तोडले, त्याला घटस्फोट दिला, तेव्हा तिचा जीव तळतळला असणार. आपल्या नवऱ्यापायी, संसारापायी तिने करिअर अर्ध्यात नासवून घेतले होते, आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवले आहे याची तिला कल्पना नव्हती. नंतर गुरुदत्तला उमजले की आपण जिच्यामागे धावत होतो ते तर मृगजळ होते. पण तोवर त्याला गीतादत्तचे दरवाजे बंद झाले होते. त्याच्यापायी ती अक्षरशः गालिचावरून रस्त्यावर आली होती. तिने त्याला शेवटच्या रात्रीपर्यंत माफ केले नाही. अखेर तो आत्महत्त्या करून अकाली देवाघरी गेला. तिचा जीव पुन्हा तळमळत राहिला. गीताने जेव्हा गुरुदत्तला सोडले तेव्हा नवरा आपल्याला फसवतोय अशी वेदना असेल. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई आल्यामुळे आपले स्थान डळमळीत झाले आहे असेही कदाचित वाटले असेल. तेव्हा त्या अवस्थेत एक संवेदनशील, प्रतिभाशाली स्त्री आपल्या पतीला अखेरचं मागणं म्हणून काय मागू शकते हे गीतादत्तला भेटल्यावर गुलजारजींना नक्की जाणवले असावे. (अर्थात हा तर्क आहे; याला काहीही पुरावा नाही).

 

त्या शापित स्वरागिनीची गीता दत्तची आठवण आजही अस्वस्थ करून जाते. गुरुदत्तही तिच्यासारखा दुर्दैवी होता. गीता दत्त आणि गुरु दत्त... खरोखर 'दृष्ट लागावी' अशी जोडी. पण एका अत्यंत देखण्या पोर्ट्रेटचे हे दोन कॅनव्हासचे तुकडे कधी एकत्र येऊच शकले नाही. एक चित्र विस्कटलेलेच राहिलं. अर्धे तिच्या घरी आणि अर्धे त्याच्याकडे. कदाचित नियतीला तेच मंजूर असावे.

 

गीता दत्त, एक असामान्य प्रतिभाशाली गायिका. तिच्या एका आवाजात अनेक पैलू लपलेले होते. कधी अतृप्त आत्म्याची व्याकुळता तर कधी भारावून टाकणारा, भावनेचा परमोच्च बिंदू गाठणारा, कधी उद्दीपित करणारा मादकपणा तर कधी अल्लड तरुणीचा खट्याळपणा, कधी व्याकुळतेची परिसीमा तर कधी योगिनीचा आर्त उत्कट भक्तिभाव. भारतीय नारीच्या मोहक भावछटा तिने आपल्या गाण्यातून खुबीने व्यक्त केल्या आहेत. जगाच्या अंतापर्यंत प्रतीक्षा करणारी विरहिणी, उपेक्षेच्या दारूण दु:खाने उन्मळून पडणारी अर्धांगिनी, प्रियकराच्या नुसत्या चाहुलीने नखशिखांत मोहरून जाणारी अभिसारिका, त्याची अलगद फिरकी घेणारी अल्लड प्रेमिका, त्याच्यात आत्मविश्वास जागृत करणारी स्फूर्तिदायिनी, त्याच्या जवानीला आव्हान देणारी मदिराक्षी. ही तिची शेकडो गाणी ऐकूनही यातली खरी गीता कोणती हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कवी ग्रेस यांनी तिच्या आवाजाला 'रेशमाच्या चाकूच्या झळझळत्या पात्याची' उपमा दिली होती. 

 

दादरच्या एका चाळीवजा इमारतीत एका शाळेच्या वरच्या मजल्यावर राहात असताना एका सकाळी गीता स्वत:च्याच तंद्रीत गात होती. तिचे मधाळ स्वर तिच्या घराखालून जात असता संगीतकार हनुमान प्रसादजींच्या (ललिता पवार यांचे यजमान) कानी पडले. त्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी गीताचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सर्व जगाला ऐकविण्याचा निर्धार केला. त्यांच्याभक्त प्रल्हादचित्रपटासाठी गीताने सर्वप्रथम पार्श्वगायन केले. गीताच्या चित्रपट संगीतातील प्रवास इथूनच सुरू झालाभक्तिगीतं भजनांसाठी साजेसा आवाज असल्यामुळे सुरवातीला तिने अशाच प्रकारची गाणी गायली. तिच्या खऱ्या गुणांची पारख अजून व्हायची होती. जसे एखादा निष्णात जवाहिरी हिऱ्याची खरी पारख करून त्याला सोनेरी कोंदणात सजवतो तसे प्रतिभावंत कलाकारातील खरी प्रतिभा एखादा अव्वल अन् अवलिया कलावंतच ओळखू शकतो. गीताची ओजस्वी अलौकिक प्रतिभा सचिनदा सारख्या पारख्या माणसाच्या नजरेस पडली अन् तिथून गीताच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. या चित्रपटामधील गाणी विशेष लोकप्रिय झाली नसली तरी गीताच्या भावनाप्रधान आवाजाने संगीतकार सचिन देव बर्मन मात्र भारावून गेले.

 

बर्मनदांच्या पुढच्या चित्रपटासाठी त्यांनी गीताला बोलावले आणि हा गीतासाठीचा मोठा ब्रेक-थ्रू नक्कीच होता. शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी, नूरजहां, सुरैय्या यांच्या आवाजाची मोहिनी रसिकमनांवर अधिराज्य गाजवत होती. सचिनदांचा विश्वास मात्र अनाठायी ठरला नाही. ‘मेरा सुंदर सपनासोबतयाद करोगेहे गाणे देखील गाजले. गाण्यामध्ये तिनं टाकलेला हलका उसासा दर्दी रसिकांची दाद घेऊन गेला. हे असले बारकावे कुणी शिकवून आत्मसात करता येत नाहीत; तर ते उपजतच गळ्यात असावे लागतात. ‘दो भाई’ (१९४७) च्या या दोन गाण्यांमुळे गीता रॉय प्रकाशात आली.खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचली. तिच्या आवाजात बर्मनना आपले भावी यश दिसत होते. या चित्रपटाच्या यशामुळे साहजिकच इतर संगीतकारांना देखील गीताचे अस्तित्व जाणवले. खेमचंद प्रकाश, ज्ञानदत्त, गुलाम हैदर, श्यामसुंदर, सज्जाद इत्यादी संगीतकारांचे देखील या नव्या आवाजाकडे लक्ष गेले. गीता रॉयने देखील त्यांचा विश्वास सार्थ केला

 

बर्मनदांनी तिला भजन-भक्तीगीते यापासून अलिप्त केलं आणि अनोख्या मेलोडीयस मदहोश गाण्यांच्या नोट्स तिच्या हाती ठेवत रेकॉर्डिंग रूमच्या माईकपुढे उभे केले. सचिनदांनी गीताच्या आवाजाची पारख करून तिला वेगळ्या धाटणीची गाणी गाण्यासाठी प्रवृत्त केलं. १९४७ मध्ये ‘दो भाई’ या चित्रपटातील गाण्यांना दिलेल्या संगीतामुळं सचिनदांची व गीताची केमिस्ट्री जुळली आणि १९५१ मध्ये ‘बाजी’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलेल्या ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’ या गाण्यामुळं वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी गीता उत्तुंग लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचली.

 

हा सात्विक आवाज जेव्हा ‘बाजी’ चित्रपटात आला तेव्हा बेहोशीने भरलेला हा आवाज खरा का ‘जोगन’ मधल्या साध्वीचा असा प्रश्न रसिकांना पडला. बर्मनदांचा बाजी (१९५१) प्रदर्शित झाला. ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, असं म्हणत गीता आली. त्यावेळी पुन्हा एकदा नवा साक्षात्कार सर्वांनाच झाला. उत्तेजक, आत्मविश्वास जागरूक करणारा गीताचा आवाज, साहिरची अर्थपूर्ण रचना आणि सचिनदांचे संगीत सारेच धुंद करणारे होते. या चित्रपटाने शब्दश: बाजी मारली आणि एक नवा इतिहास घडवला. ‘जाल’ चित्रपटातसुद्धा ‘छोडो भी ये राग पुराना दिलका’ या गाण्यातून नखरेलपणाने ‘पुराना’चा उच्चार ‘पुर्राना’ करून सहजसुंदरपणे खट्याळपणा तिने व्यक्त केला आहे. ‘सुनो गजर क्या गाए, ये कौन आया के मेरे, लाख जमानेवाले डाले दिलोंपे डाके, आज की रात पिया’ ही सगळी नवी लहेर घेऊन गीता अवतरली आणि बर्मनदाच नव्हे तर हेमंत कुमार, ओ.पी.नय्यर सारखे संगीतकार देखील गीताला झुकते माप देऊ लागले.

 

सचिनदांनीच संगीत दिलेली ‘आज सजन मोहे अंग लगा लो’, ‘हम आपकी आँखों में’, ‘हवा धीरे आना’, ‘वक्त ने किया’ अशी बरीच गाणी गीताने गायली. ती अफाट लोकप्रिय झाली. ओपींनी संगीत दिलेली ‘बाबूजी धीरे चलना’, ‘थंडी हवा काली घटा’, ‘जाता कहाँ है दीवाने’, ‘मेरा नाम चिन चिन चूँ’, ‘कैसा जादू बलम तू ने डाला’ अशी वेगळ्याच स्टाईलची गाणी गाऊन गीताने आपल्या तडफदार आवाजाची ओळख रसिकांना करून दिली. हेमंतकुमारने संगीत दिलेल्या ‘जय जगदीश हरे’, ‘न जाओ सैय्या’, ‘न ये चाँद होगा’, ‘पिया ऐसो जिया में’ गाण्यांमधून तिने आवाजातील मृदुतेचा आणि सोज्वळपणाचा अनुभव रसिकांना दिला. नौशादजींनी संगीत दिलेली तिच्या आवाजातली ‘तू मेरा चॉंद, मैं तेरी चाँदनी’, ‘मुझे हुजूर तुम से प्यार है’ ही गाणीही चिकार लोकप्रिय झाली. अमल मुखर्जी, कनू घोष, नचिकेत घोष आदी संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली गाणीही गीता दत्त यांनी गायली. रफी, किशोरदा, मन्ना डे, हेमंतदा, तसेच लताजी, आशाजी, सुमनजी, सुधा मल्होत्रा अशा अनेक दिग्गज गायक-गायिकांसमवेत गीताने माईक शेअर केला होता.

 

संगीतकार रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘बावरे नैन’ (१९५०) मधील मुकेश बरोबर गायलेले 'खयालोंमे किसी के इस तरह आया नहीं करते ’ हे युगलगीत हा लोकप्रियतेचा कळस होता. या गाण्यामुळे रोशन एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. १९५० हे सालच गीता रॉयच्या दृष्टीने अनेक नितांत सुंदर गाण्यांचे वर्ष होते. ज्ञानदत्त यांच्या ‘दिलरुबा’ मध्ये नऊ, अविनाश व्यास यांच्या ‘हरहर महादेव’ मध्ये आठ तर बुलो सी रानी च्या ‘जोगन’ मध्ये १२ गाणी गीताने गायली होती. सी. रामचंद्रच्या ‘शहनाई’ मध्ये ‘जवानी की रेल चली जाये रे’ या गाण्यात तिच्याबरोबर कोरसमध्ये लता होती तर हंसराज बहलच्या ‘चुनरिया’ मधील तिच्या गाण्यात आशा भोसलेने कोरसमध्ये गाऊन फिल्मी संगीतक्षेत्रात पदार्पण केले होते. ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिए है’ या खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात गीता देहभान हरपून गायली. ‘जोगन’ मध्ये गीताने मीराबाईच्या रचना गायल्या होत्या. ‘घुंगटके पट खोल मैं तो गिरीधरके घर, ए री मैं तो प्रेम दिवानी’ आणि ‘जोगी मत जा’ या मीराबाईच्या रचनांमुळे गीता रॉयच्या आवाजातील आर्ततेला एका दृष्टीने मान्यताच मिळाली. ‘प्यासा’मधील ‘आज सजन मोहे अंग लगा लो’ गाण्यात समर्पणाची उदात्त भावना आहे तर ‘काला बाजार’ मध्ये ‘ना मै धन चाहूं ना रतन चाहूं, तेरे चरणोंकी धूल मिल जाए’ हे भजन सुधा मल्होत्राच्या साथीने तिने अतिशय सुंदर रंगविले आहे. बंगाली शैलीतील ‘देवदास’मधील ‘आन मिलो आन मिलो श्याम सावरे’ हे भजनही कानाला गोड लागते. ‘राजरानी मीरा’ मधील तिने गायलेली ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ ही पारंपारिक रचनाही उल्लेखनीय ठरली.

 

गीताचा आवाज रागदारी संगीताची तालीम घेऊन वा मेहनत करून रूंद तसेच जड झालेला नव्हता. खरे सांगायचे झाल्यास, गीता दत्त अशा प्रकारच्या गायनासाठी नव्हती हेच खरे आणि हीच तिच्या गळ्याची खरी मर्यादा.

 

इतरही काही भाव गीताच्या गायनात आढळतात. हताश भाव - "ठेहेरो जरासी देर" (चित्रपट सवेरा), काकुळतीचा आणि स्वीकार करणारा भाव - "वक्त ने किया (चित्रपट कागज के फूल), नाजूक आणि मृदू भाव - "हवा धीरे आना" (चित्रपट सुजाता) उत्साही आणि उसळी घेणारा भाव - "दो चमकती आँखों में" (चित्रपट डिटेक्टीव), हलका फुलका आणि प्रेमपूर्वक खट्याळभाव - "कैसा जादू बालम तूने डाला" (चित्रपट १२ ओ क्लॉक), फक्त शब्दोच्चारात विनोदी व गायन नेहमीचे - "ये है बॉंबे मेरी जान" (चित्रपट सी. आय. डी.) तसेच "जाने क्या तुने कही" (चित्रपट प्यासा) हे गीत आशंका आणि प्रेमभरल्या भावनांचे आहे आणि अतिशय सौम्य तक्रारीच्या सुरांत गायले असल्याने, चटका लावून जाते.

 

‘बाजी’मधील गाण्यांपासून गीता खऱ्या अर्थाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली होती. त्याच चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिची ओळख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत असलेल्या गुरुदत्तशी झाली. मुळात पडद्यावर 'नायक' रंगवणारा माणूस 'नायिकेच्या' प्रेमात न पडता 'गायिकेच्या' प्रेमात पागल होतो हीच गोष्ट किती वेगळी. गीता दत्त दिसायला चांगलीच होती... पण गुरूला मुख्य भुरळ पडली होती ती तिच्या गाण्याची. गुरुदत्तने गीताला मागणी घालण्यासाठी बहीण ललिताच्या हातून सोन्याची अंगठी व पत्र पाठवलं, तेव्हा गीताने आधी अंगठी परत केली. तेव्हा गीता ललिताला म्हणाली होती, ‘Tell your brother, I am not a flirt.’ एवढी मोठी गायिका आपल्याला होकार देईल की नाही, अशी भीती त्यांच्या मनात होतीच. घडलेही तसेच. पण गुरुदत्त हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. पुढं दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर थाटामाटात त्यांचं लग्न झालं. आता ती गीता दत्त झाली होती.

 

 

यशोमंदिराची दालने त्यांच्यासाठी उघडली गेली. तिच्यातील अभिसारिका आनंदाने गिरक्या घेत गुणगुणु लागली ‘ये कौन आया मेरे दिल की दुनिया में बहार आयी’, ‘न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे ’ १९५४ च्या ‘शर्त’ चित्रपटातले गीता दत्तचे गाणे आणि हेमंतकुमारचे संगीत म्हणजे त्याकाळी प्रितीचा आदर्श होता. ओ.पी. नय्यरनी गीताच्या गळ्यातील नजाकतीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. गुरु दत्त, गीता दत्त आणि ओ.पी. या त्रिवेणी संगमातून एक कलाकृती निर्माण झाली. चित्रपट होता ‘आरपार’ (१९५४).‘ बाबुजी धीरे चलना प्यार में जरा संभलना, आss बडे धोखे है बडे धोखे है इस राहमें ’ या गीतातील सेक्सी आलाप, धुंदी आणि नशा निर्माण करणारा होता.

 

जा जा जा बेवफा, कैसा प्यार कैसी रीत रे’ या गाण्यात भडकपणा नाही. ‘ये लो मै हारी पिया, हुई तेरी जीत रे’ ही गाणी कर्णमधुर होती. ‘मिस्टर एंड मिसेस ५५’ मध्ये ‘ठंडी हवा काली घटा आ ही गयी झुमके’, ‘ उधर तुम हंसी हो इधर मै जवां हूं ’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली. १९५६ च्या ‘भाई भाई’ चित्रपटात संगीतकार मदन मोहननी सर्व गाणी लताकडून गाऊन घेतली पण एकच गाणे गीताला दिले. ‘ ए दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है’. तसेच ‘सी.आय.डी’ मधील ‘जाता कहा है दिवाने’ तसेच  ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहां’ या गाण्यांची नशा आजही आहे. 'गरीब जान के हमको न तुम मिटा देना’ हे लाडिक मनधरणी करणारे गाणे असो वा ‘नन्ही कली सोने चली, हवा धीरे से आना’ हे ‘सुजाता’ मधील अंगाई गीत असो ही गीते भावप्रधान आहेत. ‘तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ या गाण्यात गीता अगदी खळखळून हसली आहे. तसेच ‘जानू जानू री काहे खनके है तोरे कंगना’ या ‘इन्सान जाग उठा’ चित्रपटात गीताने आशा भोसलेसोबत अवखळ मिश्कीलपणा छान प्रदर्शित केला आहे. ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ (सुजाता) या गाण्यात ती निरागस तर ‘आंखों में तुम दिल में तुम’ (हाफ टिकट) मध्ये ती खट्याळ अन खोडकर असते. ‘कोई दूर से आवाज दे’ (साहिब बीबी और गुलाम) मधला गूढ स्पर्श तिचाच असतो अन ‘मेरा नाम चिन चिन चू’ (हावडा ब्रिज) सारखा गिर्रेबाज आविष्कार घडवणारीही गीताच असते.

 

‘रिमझिम के तराने लेके’ (काला बाजार) मधला गीता दत्तचा गोड आविष्कार बाहेर कोसळत असलेल्या पावसाची रंगत वाढवतो अन पाऊस शांत झाल्यावरही तिचा आर्त स्वर घुमत असतो. या गाण्याचा एक किस्सा आहे. बर्मनदांना हे गाणे गीतानेच गायला हवे होते पण पडद्यावर वहिदाच्या तोंडी असणार म्हटल्यावर गीताने साफ नकार दिला. त्यामुळे हे नितान्तसुन्दर गाणे बॅकग्राउंडलाच ऐकू येते. 

 

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणून गुरु दत्तने तीन क्लासिक चित्रपट केले. प्यासा, कागज के फूल आणि साहिब बीबी और गुलाम मधील गीताने गायलेले जाओ सैंय्या छुडाके बैय्या’, ‘पिया ऐसो जियामें समाय गयो रेतसेचवक्तने किया क्या हंसी सितम’(कागज के फूल) किंवाआज सजन मोहे अंग लगा ले’ (प्यासा) ही गाणी तर चिरंतन स्वरूपाचीच आहेत. ‘प्यासाचित्रपटातीलहम आपकी आंखोंमें आणि जाने क्या तूने कहीही गाणीसुद्धा खूप लोकप्रिय झाली. सुरेलता आणि माधुर्य यांची परमावधी गाठणारी लता, चतुरस्त्र गायकीचं मूर्तिमंत उदाहरण असलेली आशा; पण गीताच्या आवाजात एक वेगळंच अजब रसायन होतं. काहीजणांनी त्या आवाजालामादकअसं विशेषण खुशाल लावलं. पण एवढ्या एका शब्दात बंदिस्त करण्याएवढा हा आवाज एकसुरी नव्हता. ऐकताना थक्क व्हावं अशा नाना छटा या आवाजाला होत्या. विलक्षण काही तरी गीता दत्तच्या आवाजात होतं. .पी. नय्यर तर तिलानॅचरल मिरॅकलम्हणायचे.   

 

'साहेब बिबी और गुलाम' चित्रपटातील 'पिया ऐसो जिया में - हे साधे गीत खेड्यातील वातावरणाचा गंध घेऊन येणाऱ्या स्त्री गीतांच्या वर्गात मोडेल. अशिक्षित आवाजाचे साधेपण गायनात आणून गीताची परिणामकारकता सुंदरपणे वाढवली आहे. तसेच 'न जाओ सैंय्या' यात कारुण्य आणि शोक भाव सापडतात पण ते देखील अंतर्मुखी आणि व्याकुळ सुरात प्रगट होतात.

 

गीता दत्त यांनी गायलेली चार-पाच मराठी गीते नेटवर ऐकायला मिळतात. त्यातील 'जा लक्ष्मणा, सांग रामरायाला' हे वसंत बापट यांनी लिहिलेले आणि जी एन जोशी यांनी स्वरबद्ध केलेले गीत अप्रतिम आहे. त्यातले सीतेच्या मनातील आर्त भाव गीताच्या स्वरात उमटलेत.  

 

 

गुरु दत्त आणि गीता दत्त या दोन कलासक्त जीवांची गाठ दैवानं बांधली. एकमेकांच्या कलांवर लुब्ध असलेल्या दोन प्रेमिकांचं सहजीवन सुखकारक होण्यात अडचण ती कसली? त्यांच्या जीवनात सुखाची बरसात न होता गुरुदत्त गीताच्या प्रीतीला दृष्ट लागलीकारणं काहीही असली तरी. भारतीय पतिव्रतेचं एकनिष्ठ जीवन जगणाऱ्या गीताच्या वाट्यालामेरा सुंदर सपना बीत गयाम्हणण्याची वेळ आली. त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची काही वर्षे चांगली गेली. तीन अपत्ये झाली. गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेची गीता ही एक हिस्सा होती. 'जिन्हें नाझ है हिंदपर वो कहाँ है' असे म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचे वास्तव आपल्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वतःच्या चित्रपटखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता हे वास्तव नाकारता येत नाही. गीताच्या 'गाण्यामुळं' तिच्याकडं आकृष्ट झालेल्या गुरदत्तनं तिच्या गाण्यावरच बंधनं आणावीत याहून अधिक दैवदुर्विलास कुठला? 'एखाद्या पक्ष्याच्या गगनभरारीवर मनापासून प्रेम करावं आणि नंतर त्याच पक्ष्याला पिंजऱ्यात जखडून ठेवावं' असाच हा प्रकार होता. संगीत क्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यातही गीताच्या वाट्याला उपेक्षाच आली. दरम्यानच्या काळात गुरुच्या वैवाहिक जीवनात वहिदा रेहमानने प्रवेश केला आणि त्यांचा सुखी संसार पार उद्ध्वस्त झाला.  

 

 

गुरुदत्तचे काळीज त्याच्या अखेरच्या काळात अक्षरशः तळमळत होते. त्याच्या अखेरच्या दिवशीची ऑक्टोबर १९६४ ची ही ऐकलेली घटना काळजाचा थरकाप उडवते (अगदी अशीच घडली का हे कोणीच सांगू शकणार नाही). रात्रीचे दहाएक वाजले होते. आसमंतात मंद उदास हवा वाहत होती. थंडी अजून म्हणावी तशी सुटलेली नव्हती. तिने बंगल्यातले दिवे मंद केलेले होते. झोप येत नव्हती तरी जबरदस्तीने बेडवर पडल्या पडल्या तिचे डोळे छताकडे लागलेले होते. इतक्यात दिवाणखान्यातील फोन खणाणला. बराच वेळ रिंग वाजत राहिली तशी ती नाईलाजाने उठली, इतक्या रात्री कुणाचा फोन आला असेल असा विचार करत तिने फोन उचलला. काही सेकंद ती हॅलो हॅलो करत राहिली रिसिव्हर ठेवणार इतक्यात पलीकडून आवाज आला. गुरुदत्त फोनवर होता. बऱ्याच कालावधीनंतर त्याचा आवाज तिच्या कानी पडला.

 

त्याच्या आवाजावरून गीताला वाटले की बहुतेक त्याने दारू प्यायली असावी. तो अस्पष्ट पुटपुटत होता. त्याच्याशी इतक्या काळानंतर अन् अशा अपरात्री अवेळी काय आणि कसे बोलावे हे तिला काही केल्या सुचत नव्हतं. शेवटी तोच म्हणाला, ‘मला नीनाला भेटू वाटतेय, तिला बघायचे आहे. प्लीज फक्त एकदा... तू इतकी कठोर होऊ शकत नाहीस, प्लीज.’ तिच्या मनात राग, दया, हतबलता, द्वेष, करुणा आणि प्रेम या सर्व भावनांचा कल्लोळ माजला होता. ती काहीच बोलू शकली नाही, ती रिसिव्हर हातात धरुन पुतळ्यागत थिजून उभी राहिली. तिच्या प्रतिसादाची वाट बघून त्याने फोन ठेवला. हताश आणि हतबल झालेला तो रात्रभर दारू पीत राहिला. त्याच्या आधी सलग कित्येक महिने तो निराशेच्या गर्तेत होता. त्या मध्यरात्री त्याने झोपेच्या मूठभर गोळ्या घेतल्या. भल्या पहाटेपर्यंत तर त्याची या 'जालिम दुनियेतून' मुक्ती झाली होती. तो सर्व काही अर्ध्यात टाकून निघून गेला होता. गुरदत्तने ज्या नीनाला भेटायची इच्छा व्यक्त केली होती ती नीना या दांपत्याची दुर्दैवी कन्या होती.

 

आपल्या पतीच्या अकाली एक्झिटमुळे गीता दत्त पार कोलमडून गेली होती. मधुर आवाजाची अन अभिजात प्रतिभेची देखणी गायिका अशी तिची ओळख या धक्क्याने पुसून निघाली अन् नवा अपयशी संसाराचा ठपका तिच्यावर बसला. त्यानं तिचं सांगीतिक जीवन जवळपास लुप्तच झालं. परंतु तिच्यातली गायिका तिला स्वस्थ बसू देईना. संगीताशिवाय जीवन व्यर्थ आहे, हे ज्या क्षणी तिला जाणवलं, त्या क्षणी तिने पुन्हा नव्या उमेदीनं जगायचं ठरवलं, उभं राहायचं ठरवलं; परंतु बराच उशीर झाला होता. अशा वेळी कोणत्याही कलाक्षेत्रात जे घडते तेच तिच्याबरोबर घडले होते. तिची स्पेस भरून निघाली होती. तिची जागा अन्य कुणी तरी भरून काढली अन् तिला काम मिळेनासे झाले.

 

अतिशय दिलदार असलेल्या या गायिकेनं एके काळी काही संगीतकारांना पैशाची मदत केली होती पण तिच्या संकटकाळी तिला कुणी मदतीचा हात दिला नाही. चरितार्थासाठी तिला पैशाची गरज भासू लागली तेंव्हा तिला रस्त्यावर येणं भाग पडलं. आधी आवड म्हणून पुनरागमन केलेल्या या ज्येष्ठ गायिकेला पुढे कुटुंबाच्या खर्चाचे वांदे पडले. तिचा नाईलाज झाला अन् आपल्याकडे गणेशोत्सवात गातात तसे तिने तिच्या राहत्या भागात कोलकत्त्यात दुर्गापूजेसारख्या उत्सवामध्ये स्टेज शो करायला सुरवात केली. एके काळी जिला हजारो चाहत्यांचा गराडा पडलेला असायचा, ती लाकडी फळकुटाच्या स्टेजवर गाऊ लागली.

 

तिच्या दुर्दैवाचे उलट फेरे सुरु झाले होते. एकेकाळी मुंबईचा एकही रेकॉर्डिंग स्टुडियो असा नव्हता की जिथे तिची पायधूळ झडली नव्हती. ती आता धुळकट रस्त्यावर, मैदानात शो करत होती. बंदिस्त वातानुकुलित रेकॉर्डिंग रूम आणि लाईट, ऍक्शन, कॅमेरा या विश्वात रमलेली ती एके काळची अप्सरा आता रस्त्यावर गाणी म्हणत होती. 'बाबूजी धीरे चलना…' असलं मदहोश गाणं गाणारी ती. आता तिलाच चालायला कोणाचा हात सोबतीला नव्हता.

 

गुरुदत्त गेल्याचा धक्का गीताला आयुष्यातून आणि करियरमधून उठवून गेला. तरीही तिने जमेल तितका संघर्ष केला. १९६७ मध्येबधु भरणया बंगाली चित्रपटात तिने काम केलं. १९७१ मध्ये कनू रॉय यांनी संगीत दिलेल्याअनुभवया चित्रपटासाठी गात गीता दत्तने चित्रपट संगीतामध्ये पुन्हा पाऊल ठेवलं; परंतु त्या चित्रपटात गायलेलंमुझे जा कहो मेरी जाहे तिचं शेवटचं गाणं ठरलं. २० जुलै १९७२ रोजी म्हणजेच गुरु दत्त गेल्यानंतर आठ वर्षांनी स्वप्नांच्या मोहमयी दुनियेत घेऊन जाणारा हा भावुक नशीला आवाज अंतरिक्षात अखेर विलिन झाला. एका उत्कट, उत्फुल्ल आणि जीवनरसानं परिपूर्ण अशा गायकीचा अस्त झाला. मागे उरली ती तिच्या याच गायकीचा समृद्ध अनुभव देणारी गाणी. हिंदी सिनेमाच्या संगीतातील १९५० ते १९७० ही २० वर्षे सुवर्ण युगाची होती. या सुवर्णयुगाची एक साक्षीदार होती गीता दत्त. सारेच विझून गेले. मागे उरल्या फक्त हुरहूर लावणाऱ्या गीताच्या गीतरूपी आठवणी.

 

गीताने गायलेल्यामेरा सुंदर सपना बीत गया’, ‘मैं प्रेम में सब कुछ हार गई’, ‘बेदर्द जमाना जीत गयाहे गाणं तिच्या वैयक्तिक जीवनाशी मिळतं-जुळतं आहे. गीताची भाची कल्पना लाझमी गीताला श्रद्धांजली वाहताना म्हणाली होती, ‘हमारी मामी में थोडासा पेशन्स होता और थोडा कम रेस्टलेसनेस होता तो वो आज तक गाती रहती.’ परंतु हे अर्धसत्य आहे. कारण त्या-त्या क्षणाला येणारे दुःख, अवहेलना, विश्वासघात आणि अपमान यांचे कढ कोण कसे पचवू शकेल हे कुणी सांगू शकत नाही. संवेदनशील माणसाबरोबर असं काही घडलं तर तो पूर्णतः उन्मळून पडतो. त्यात त्याला दोष देता येणार नाही. बहुतेक कलाकारांच्या जीवनाचा डोलारा त्यांच्या कलेच्या आधारेच तोललेला असतो. हा आधारच नाहीसा झाला तर तो कलाकारच उध्वस्त होतो

 

प्रतिभावान गायिकेची घुसमट आपण दोन सिनेमात पहिली... 'अनुराधा' आणि 'अभिमान!' पण या दोन्ही नायिकांची घुसमट 'एकमार्गी' होती. तिथं नायकाच्या आयुष्यात कुणी 'अन्य स्त्री' नव्हती. शिवाय त्या केवळ पडद्यावरच्या नायिका. गीताचं दुःख प्रत्यक्षातलं होतं... आणि 'दुहेरी' होतं. 'तिचं गाणं बंद करूनही गुरु तिच्याशी प्रामाणिक राहिला असता, तिच्यावर अखंड प्रेम करत राहिला असता' तर कदाचित गीता तग धरून राहिली असती. पण दैवाला तेही मंजूर नव्हतं. मग तिची सदैव वाढती व्यसनाधिनता या कथेच्या शेवटाशी येऊन थबकली आणि अखेर मृत्यूनंच तिला सोडवलं.

 

प्रेमाचा डाव मांडून सुखी संसाराची सुंदर स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्याचे स्वप्न अधुरेच राहिले. अकाली अन दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या सहजीवनाची अखेर झाली. संसाराचे सर्व खेळ अर्ध्यावरती सोडून राजा आधी अनंताच्या प्रवासाला गेला अन मग राणी गेली. तिच्याच आवाजातलं 'तू मेरा चांद, मै तेरी चांदनी…' हे गाणं त्यांनी या पृथ्वीतलावर अनुभवले नाही पण निदान स्वर्गस्थ तारांगणात तर त्यांनी नक्कीच याची अनुभूती घेतली असेल ही आशा. या दाम्पत्यास तरुण आणि अरुण ही दोन मुले अन नीना ही मुलगी होती. त्यातील तरुण दत्त यांनी देखील नंतरच्या काळात आत्महत्त्या केली. ज्या प्रमाणे तरूण दत्तने आत्महत्या केली होती त्याच प्रमाणे अरुणनेही आत्महत्त्या केल्याचे वाचलंय पण ऑन रेकॉर्ड ती आत्महत्या सिद्ध होऊ शकली नाही. अशा प्रकारे पूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याने कधी कधी गुरुदत्त वा गीता दत्तचे नाव देखील कधी गप्पाष्टकात निघाले तरी उगाच उदास वाटत राहते.

 

 

गीताच्या अनमोल गायकीला अन् तिच्या लोभस व्यक्तीमत्वाला रसिकांनी मनाच्या एका कप्प्यात आजही जतन केलेलं पहायला मिळतं. तिच्यावर लोकांनी केलेलं हे निखळ प्रेम असंच टिकून राहावं, तिच्या आवाजातले 'ना जाओ सैय्या छुडाके बय्या…' हे मनावरचं गारुड तिच्यासाठी रसिकांच्या मनात सदैव राहावं अशी मनोकामना.

 

 

@यशवंत मराठे 

yeshwant.marathe@gmail.com
 
 

संदर्भ: 'एबीपी माझा' वेब आणि जयश्री दानवे तसेच धनंजय कुरणे यांचे लेख. 

Leave a comment



Mukta Gupte

2 years ago

Sunder 👌👌

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS