कल्पवृक्ष

कल्पवृक्ष म्हटले की माडाचे झाड नजरेसमोर येते. परंतु मी जर तुम्हाला सांगितले की त्यापेक्षाही उपयुक्त झाड महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात आहे आणि तरी देखील त्याची वारेमाप कत्तल चालू आहे तर तुम्हाला पटेल का? पण ते खरं आहे आणि ते आहे मोहाचे झाड
 
दुर्दैवाने मोहाचे झाड म्हटले की लोकांना फक्त दारूच आठवते. काजू हे भारतातील फळ नाही; ते पोर्तुगीजांनी बाहेरून गोव्यामध्ये आणले. काजूपासून बनवलेली "फेणी" निव्वळ राजाश्रय मिळाल्यामुळे तयार होऊ शकली परंतु तसा राजाश्रय मोहाला दिला गेला नाही. त्यामुळे जग एका अतिशय सुंदर दारूला मुकलेले आहे कारण यावर संशोधनच  झालेले नाही. हे लिहिताना मी फक्त आर्थिक विचार करतो आहे त्यामुळे कृपया नैतिकता वगैरेचे डोस पाजू नका. आदिवासींची मोहापासून दारू बनविण्याची पद्धती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) मध्ये त्या प्रोसेसला रजिस्टर करून तिच्यापासून पेटेंट मिळवता येऊ शकेल इतकी ती वेगळी आहे. परंतु आपल्याकडील सर्व अतिशय खराब आणि इंपोर्टेड म्हणजेच अतिशय सुंदर हा भ्रम भारतीयांच्या मनात झाल्यामुळे आपली कायमच गोची होते.
 
 
 
मध्य भारतात किमान 50 जिल्ह्यांत आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. आपल्यासाठी ते कदाचित हे फक्त एक झाड म्हणून गणले जाईल परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘देव’ आहे. याच झाडाच्या खाली ‘मुटम्या देव’ किंवा 'मोठा देव' मांडला जातो. 
 
मोहाचे झाड अत्यंत उंच असल्याने आणि तप्त उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असल्याने या झाडाचे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत मोठे महत्त्व आहे, अनेक प्राणी आणि पक्षी यांचा आश्रय म्हणजेच मोह आहे. मोहाच्या झाडावर अनेक वानरे येऊन मोहफुले खातात आणि नशा आली की झाडावर धिंगाणा करतात. अस्वल, गावठी डुक्कर, रान डुक्कर, ससा, सांबर, नीलगाय, शेळ्या, गाई, बैल, हरीण हे सर्वच प्राणी मोह फुले खात असतात. या झाडाची बायोलॉजिकल जैविकता इतर कोणत्याही झाडांपेक्षा जास्त आहे.
 
 
 
 
हे लाकूड लवकरच फुटते आणि लवकर जळते त्यामुळे इंधन म्हणून मोहाचा सगळ्यात जास्त वापर होतो. मोहाच्या झाडाची मूळं, फांद्या आणि खोड इंधन म्हणून वापरला जाते. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाची (भाताची) शेती खूप आहे, या सर्व लोकांच्या घरी विशेषतः शेतकरी अथवा पाटलांच्या घरी बैलांना पाणी पिण्यासाठी मोहाच्या लाकडाच्या डोंग्या बनवले जातात. हीच स्थिती बालाघाटकडे पाहावयास मिळते. कुऱ्हाडीच्या एकाच घावात मोठ्या लाकडाचे सुद्धा दोन उभे तुकडे होतात त्यामुळे या लाकडाच्या पाट्या चांगल्या बनतात आणि म्हणूनच टेबल-खुर्ची अशी साधने बनवण्यासाठी मोहाचा वापर होतो. मासेमारीसाठी लागणारा डोंगा मोहाच्या लाकडाचा असतो, आणि सोनार मोहाच्या कोळशावर सोने, चांदी ठेवून नळीने फुंकर घालीत असतो, लोहार तर नांगर पाजवताना मोहाचेच कोळसे घेऊन या असे आवर्जून सांगतो. 
 
मोहाची साल पाण्यात शिजवली जाते आणि एखाद्या मनुष्याच्या अंगात जर थंडी भरली असेल तर किंवा त्याचे अंग दुखत असेल तर अशा पाण्याने त्या मनुष्याची आंघोळ केली जाते, याचा त्वरित फायदा होत असतो. गायी किंवा बैलांचे शरीर सुद्धा मोहाच्या सालीने शेकले जाते. मोहाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोण बनवले जातात. गावागावांत जंगलातून मोहाची पाने गोळा करून उन्हाळ्याच्या दिवसात लग्नकार्य व इतर समारंभात विकल्या जातात. या पत्रावळींपासून आदिवासींना मोठा रोजगार मिळतो. अक्षयतृतीयेला मोहाच्या पत्रावळी विकताना गावातील बायका अजूनही दिसतात कारण आदिवासी त्या पत्रावळीवर अन्न ठेवून आपल्या पूर्वजांना अर्पण करतात. मोहाचे स्थान निव्वळच आदिवासी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात त्यांच्या धर्मकार्यात, त्यांच्या लग्नकार्यात आणि सामाजिक जीवनात अत्यंत मोठे आहे. जंगलामध्ये इतरही झाडांची पाने आहेत परंतु सर्वसाधारणपणे मोहाच्या पानांनाच प्राधान्य दिले जाते. पोळा हा आपल्या सर्व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे; पोळ्याच्या दिवशी फक्त मोहाच्या पत्रावळीत बैलाला जेवायला दिले जाते.
 
गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या भागांमध्ये भात पिकवला जातो. त्या भागात धानाची रोवणी करताना मोहाच्या पानांचा बनवलेला मोर्या अंगावर घेतला जातो. बांबू आणि मोहाची पाने यापासून बनवलेला हा मोर्या विशेषतः पेरणी करताना, धानाच्या पेंड्या उपटताना, व धानाचे प्रत्यारोपण करताना अत्यंत महत्त्वाचा आहे; याशिवाय रोवणीची कल्पनाच करता येत नाही. शेतीची कामे आटोपली की या मोऱ्याची पूजाही केली जाते, नंतर ते सुरक्षित ठेवले जातात आणि पुढील वर्षी त्यात पुन्हा सुधार करून त्यांचा वापर केला जातो. पावसाळ्यात मोर्या एक तर गरम राहतो आणि शरीराला पाणी लागू देत नाही
 
असे अनंत गुण आणि कार्य असताना देखील मोह फक्त दारूसाठी बदनाम करण्यात आलेला आहे आणि मोहामुळे आदिवासींची सुद्धा बदनामी केली जाते. खरे तर ते आपल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. दारूशिवाय आदिवासींचे जीवन खरंच चालत नाही. जन्म होताना, लग्न होताना आणि मरताना सुद्धा दारू आदिवासींची सोबती आहे. मोहाची दारू पिऊन लोक गावात फिरत असतात आणि त्याच गावात झामपर नसलेल्या स्त्रिया सुद्धा रस्त्याने जात असतात तसेच अगदी जंगलात सुद्धा तशाच फिरत असतात. परंतु आदिवासींच्या परिसरात बलात्कार झाला, कुणी एखाद्या स्त्रीची छेड काढली असे कधीच ऐकायला मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी मोहाची दारू सुद्धा पाजली जात असे कारण तिने बळ येते व बाळंतीणीचे शरीर गरम राहते. लग्नात नवरदेव आणि नवरी मोहाच्या पाटावर बसतात. लग्नात मोवईचे खांब केंद्रस्थानी लावले जातात आणि त्या खांबांवर सुंदर नक्षी काढली जाते. मोहापासून दारू व्यतिरिक्त इतर अनेक उत्पादने मिळू शकतात. मोहाचे लाडू, लहान बिस्किट्स देखील तयार केली जातात. डाळीच्या पुरणपोळी एवढीच मोहाची पुरणपोळी स्वादिष्ट असते.
 
 
 
मोहापासून आणखी एक पदार्थ मिळतो तो म्हणजेच टोळ होय. मोहोर संपल्यानंतर फुलाच्या जागी फळ लागते; तो म्हणजे टोळ होय. टोळीचे तेल काढले जाते, आयुर्वेदात या तेलाला महत्त्वाचे स्थान आहे. हात पाय दुखल्यास अथवा खूप थकल्यास हे तेल गरम करून हातापायाला चोळल्यास दहा मिनिटात तुमच्या शरीराला आराम मिळतो. टोळीचे तेल डोक्याला लावतात, परंतु नवरत्न तेलाची जाहिरात करणारा जसा अमिताभ बच्चन आहे तसा कोणी याची जाहिरात करेल तर ते सातासमुद्रापार पण विकले जाऊ शकते. पूर्वी देवळात टोळीच्या म्हणजेच मोहाच्या तेलाचा दिवा लावला जात असे. तसेच आधी गावागावांमध्ये तेलाचे घाणे असायचे, टोळ टाकून त्यात तेल वेगळे आणि ढेप वेगळी केली जात होती कारण ती जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक होती. टोळीच्या आतील बियांपासून आंघोळीचा साबण तयार केला जातो. पावसाळ्यात स्वयंपाक झाल्यानंतर गरम चुलीत काही टोळी टाकतात, त्या वासाने साप घरात येत नाही असा समज होता. टोळ बाळंतीण बाईला खायला देतात, कारण त्याच्यामुळे तिला चांगले दूध येते अशी मान्यता आहे. टोळीपासून खाण्याचे अनेक पदार्थ सुद्धा बनवले जातात.
 
परंतु या सर्व गोष्टींना आता आपण मुकायला लागलो आहोत. 1955-56 च्या आसपास मध्य प्रांताची नागपूर राजधानी असताना सरकारने मोहाची झाडे तोडून टाका असा एक अधिनियम जारी केला होता कारण त्यापासून आदिवासी दारू बनवितात आणि त्यांचे जीवन उध्वस्त होते. परंतु हास्यास्पद गोष्ट म्हणजे त्याच अधिनियमात असेही म्हटले गेले की आदिवासींच्या जीवनात टोळीचे खूप मोठे महत्त्व आहे म्हणून टोळीच्या झाडांचे संरक्षण झाले पाहिजे. जंगल या विषयाचा सरकारचा किती सखोल (?) अभ्यास आहे हेच या निर्णयातून स्पष्ट दिसते, नाही का?
 
एवढं सगळं असून देखील आज महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने सरसकट मोहाची झाडे कापली जाऊन त्या ठिकाणी फक्त साग आणि बांबू लावला जातो. जो साग लावला जातो त्याची बायोलॉजिकल जैविकता किती याचा आपण कधीच विचार करत नाही. सागाच्या झाडावर पक्षांचे घरटे दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती आहे. खरं तर शासनाने 'नॉन टीम्बर फॉरेस्ट प्रॉडक्ट' या विषयातील संशोधकांना चालना दिली तर या संपूर्ण भागातील आदिवासींचे जीवन उंचावू शकते. 
 
सध्या आंबा हा महाराष्ट्राचे राज्य झाड आहे परंतु आंब्याच्या तुलनेत मोह हा कल्पवृक्ष आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आंब्यापेक्षा मोह जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे मग मनात येते मोह हे राज्य झाड झाले तरच टिकेल अन्यथा पुढील काही वर्षात हे झाड नामशेष होईल. 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 
 
 
(प्रेरणा आणि माहिती साभार :- डॉ. योगेश दुधपचारे, चंद्रपुर)

Leave a comment



Prashant Naik

3 years ago

नवीन माहिती मिळाली. खूप अभ्यास करून लेख लिहिला आहे.
धन्यवाद

Shivadatt Atmaram Sawant

3 years ago

खूप छान माहिती मिळाली

Satish Dharap

3 years ago

Great and lot of unknown information. Thank you Yashwant. Your study in various subjects is making us 'Jack of all' without taking efforts of Deep study in various topics.

सुनील सुखठणकर

3 years ago

मोहाच्या झाडाला जेव्हा मोहोर येतो त्यावेळी तो अतिशय सुंदर दिसतो. संपूर्ण झाड लाल पिवळ्या रंगाने बहारते, जणू काही तो पेटला आहे असा भास होतो. तू वर्णन केल्याप्रमाणे त्या झाडाच्या खाली देव वसतो अशी खरेच कल्पना आहे. माझ्या फार्म मध्ये असेच एक मोहाचे झाड आहे आणि गावातले शेतकरी पेरणी करण्यापूर्वी माझ्या फार्म मध्ये परवानगीने येऊन दरवर्षी पूजा करतात, आणि मगच पेरणी करतात.

Hemant Marathe

3 years ago

माहित नसलेली पण अतिशय उपयुक्त अशी माहिती 👌

Parag Vishwanath Dandekar

3 years ago

The article is well written. It is full of information about Moha tree.
I am wiser after reading the blog.

Suhas Halbe

3 years ago

Good initiative to preserve our heritage. If botanists and agriculturists are involved to market the importance of this 🌴 it will be sale fast

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS