पौराणिक कथा – एक थोतांड?

पौराणिक कथा असं म्हटलं की साधारणपणे सगळ्यांच्या मनात काय येतं? कपोलकल्पित, अतिरंजित आख्यायिका आणि देवावर विश्वास बसावा म्हणून भाबड्या, अडाणी लोकांना सांगण्यात आलेल्या दंतकथा (म्हणजे खोट्या).

आमच्या पिढीतील बहुतेक जणांनी अशा पौराणिक कथा लहानपणी ऐकलेल्या आहेत. रामायण, महाभारत आणि आपल्या पुराणात अशा कथांची नुसती रेलचेल आहे. त्यावेळी सुद्धा त्या कथांवर विश्वास बसायचा नाही. कसा बसणार? कारण जेव्हा आपण वाचतो की कोणीतरी हजारो वर्षे तप केले, कोणाला शेकडो मुले झाली; हे पटणे कसे शक्य आहे? आजची पिढी तर त्या धादांत खोट्या म्हणून झटकून टाकेल.

गेल्या काही वर्षात अशी अनेक वाचाळ मंडळी पैदा झाली आहेत की ती सांगतात की बघा, आपल्या पुराणात काय लिहिले होते? याचाच अर्थ आपण किती प्रगत होतो हे लक्षात घ्या. असं ऐकलं की आपलं डोकंच चालायचं बंद होतं आणि आपण अशा कथांपासून अजूनच दूर जाऊ लागतो. आमचीच पिढी अशा दंतकथांपासून दूर पळते त्यामुळे आमच्या पुढच्या पिढीबद्दल तर बोलायला नको.

तेव्हा विचार आला की खरं काय असावे? ज्यांनी या गोष्टी सांगितल्या त्या अशा भाषेत का सांगितल्या असतील? आणि ज्या लोकांनी त्या ऐकल्या त्यांचा या गोष्टीवर विश्वास कसा बसला? कारण कोणतीही गोष्ट लोकांना पटली तरी पाहिजे किंवा ती पटण्याचा मार्ग तरी त्यांना दाखवायला हवा.

पण मग हा काय प्रकार आहे? या काही रूपक कथा असतील का? आपण असा विचार करूया की एखादा ज्ञानी माणूस आहे आणि त्याला अशिक्षित, आदिवासी लोकांना काही सांगायचे आहे. तो जर त्यांना स्वतःच्या भाषेत सांगू लागला तर त्यांना काहीच कळणार नाही. आता त्यांना कळणाऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे मग प्राणी, पक्षी, झाडं यांचा संदर्भ गुंफुनच ते सांगावे लागेल. पण तीच गोष्ट आपण ऐकली तर आपण म्हणू की हा काय फालतूपणा आहे, असं होऊ शकतं का? कारण आपल्याला त्याचा अर्थच कळणार नाही. कारण ती भाषा अथवा रूपके याचा आपल्याशी कधीच संबंध आलेला नसतो.

म्हणून मग मी विचार करू लागलो की आपण ज्या पुराणकथा वाचल्या आहेत त्याचा गाभा त्यापेक्षा काही वेगळा असू शकेल का? आणि असला तर तो काय असेल? तेव्हा ठरवले आपण ज्या कथा लहानपणापासून खूप वेळा ऐकल्या आहेत, त्या कथांचा काय अर्थ असू शकेल असा एक अभ्यास करून त्याच्या मागच्या संदर्भांचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा का? आणि त्या कथा आजच्या युगामध्ये समर्पक असण्याची शक्यता पडताळून बघावी का?

कथा हजारो आहेत त्यामुळे त्या सगळ्याच काही अभ्यासणे शक्य नाही. त्यामुळे काही वेचक आणि प्रातिनिधिक स्वरूपाच्या आठ ते दहा कथांचा अभ्यास करण्याचा मानस आहे. दर महिन्याच्या कुठल्यातरी एका शनिवारी कथा निवडून त्याच्यावर वरील प्रमाणे उहापोह करावा असा विचार आहे.

त्याच बरोबरीने आपण लहानपणापासून अनेक पारंपरिक, तसेच धार्मिक रूढी आणि रीतिरिवाज यांनी गुरफटून गेलो आहोत. त्याची प्रतिक्रिया म्हणून त्या सगळ्याच रूढी कंडम असा एक समज सध्याच्या पिढीमध्ये रुजू लागला आहे. थोड्याफार प्रमाणात त्याचाही अभ्यास करून त्या का बनवल्या गेल्या असतील हा ही विचार करणे मला तरी गरजेचे वाटते. त्यानुसार पौराणिक कथा आणि पारंपरिक रूढी असा एकत्रित विचार करून दर महिन्याला एक असे बारा लेख तयार होतील असं आत्ता तरी वाटतंय.

परंतु आता मुख्य प्रश्न असा आहे की अशा उपक्रमाला तुम्हां वाचकांचे पाठबळ असेल का? कारण नसेल तर मग विषयच संपला. कोणतेही लेखन वाचकच नसतील तर लेखन काय कामाचे? तेव्हा मला तुमचे प्रामाणिक मत हवे आहे की असा प्रयत्न करावा की नाही?

उत्तराची अपेक्षा आहे, कारण तुमच्या उत्तरावर पुढील संशोधन करावे की नाही ते अवलंबून आहे. धन्यवाद.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a commentPrakash Bhave

2 years ago

अशा संशोधनाची नक्कीच गरज आहे.

Ajit S Gokhale

2 years ago

जरूर मला फार आवडेल यात भाग घ्यायला…माझ्या आवडीचा आहे हा विषय

Aditi Marathe

2 years ago

जरूर ,खूप आवडेल वाचायला.

संजय सोमण

2 years ago

अेक समांतर व आभ्यास पूर्ण समिक्षा -निरूपण प्रत्येक पुराण कथे साठी तयार झाले तर कायमस्वरुपी संग्रह होईल, कदाचित त्या कथांचे कालातीत स्वरूपही समोर येईल!
प्रयत्न करावा.

sylviasolo

2 years ago

Nakkich!

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS