नागपंचमी

आज नागपंचमी. आमच्या लहानपणी गारुडी सापाला टोपलीत घालून घेऊन यायचा आणि नागोबाला दूध असे ओरडत फिरायचा. आम्ही सगळी लहान मुले एकत्र जमून तो गारुड्याचा नाग डोलावण्याचा खेळ बघायला उत्सुक असायचो. पण खरंच हा सण आणि प्रथा कशी सुरु झाली याचा आपण कधी विचार केला आहे का?

हा सण कसा चालू झाला यावर भरपूर दंतकथा वाचायला मिळतील. कोणी म्हणतं की जन्मेजय राजाने केलेला सर्पसत्र यज्ञ ज्या दिवशी थांबवला तो हा दिवस, कोणी म्हणतं की कृष्णाने कालियामर्दन केले तो हा दिवस, कोणी म्हणतं की कुठल्यातरी शेतकऱ्याच्या मुलीने नागाला दूध पाजून त्याची माफी मागितली तो हा दिवस. खरं काय माहित नाही पण पुरातन कालापासून हा सण साजरा होतोय यात काही शंका नाही.

कृषीवलांचा म्हणजे शेतकऱ्यांचा देश म्हणून पूर्वापार ओळखल्या जाणाऱ्या भारतात सापांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायला नागपंचमीच्या सणाला सुरुवात झाली असावी. ज्या देशातली बहुतांश प्रजा निव्वळ शेतीवर अवलंबून असते, त्या देशात नागपंचमीसारख्या सणाला सुरुवात होणं स्वाभाविकच होतं. मात्र आधुनिकीकरणाच्या रेट्यात या सणाच्या निर्मितीमागचा सुंदर हेतू मागे पडून अंधश्रद्धा व भीतीच्या विळख्याने या सणाला कधी ग्रासलं हेच कळलं नाही. साप म्हणजे सरपटणारा मृत्यू हे अनेक शतके समाजमनात पक्कं बसलेलं भीतिदायक समीकरण होते. त्यात आपल्या बॉलिवूडच्या सिनेमांनी अजून अधोरेखित केले. इच्छाधारी नाग, नागमणी, बदला घेणारा नाग हेच आपल्यासमोर मांडण्यात आले. त्याची सत्यता कोणीही कधीही पडताळून बघण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

जगभर साधारण तीन हजार जातीच्या सापांची नोंद झाली असून आपल्याकडे साधारण दोनशे सत्तर जातीचे साप आढळतात. या सापांपैकी मुख्य चार जातीचेच साप, म्हणजेच ‘बिग फोर स्नेक्स‘ मानवाला धोकादायक असतात. या मुख्य चार विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस या सापांचा समावेश होतो. भारतीय राजनाग अर्थात किंग कोब्रा हा सर्वात मोठा विषारी साप आपल्या भोवती सहसा दिसत नाही. या पाच जणांखेरीज उरलेले सर्व साप आपल्यासाठी प्राणघातक नसतात.

सापांचं विश्व खूप वेगळं आणि अद्भुत आहे पण दुर्दैवाने आपण मात्र ते समजून न घेता दिसला साप की हाण काठी याच न्यायाने वागत असतो. सापाचा चावा म्हणजे मृत्यू हा गैरसमज पिढ्यांपिढ्या पक्का झाल्याने सर्व साप विषारी समजले जातात.

सापांमध्ये कुटुंबसंस्था नसल्याने एकमेकांबद्दल प्रेम, स्नेह नसतोच. याच विधानाला धरून सांगायची बाब म्हणजे साथीदाराला मारल्यास दुसरा डूख धरतो आणि माग काढत येतो असं जे म्हटलं जातं ते साफ चुकीचं आहे. समागमाच्या काळात नराला आमंत्रण देण्यासाठी मादीच्या त्वचेतून अथवा गुदद्वाराजवळील ग्रंथीतून झिरपणाऱ्या विशिष्ट स्रावामुळे नर मागोवा घेत मादीच्या दिशेने येतो. पूर्वी सापाला मारण्यासाठी वापरण्यात आलेले अस्त्र म्हणजे काठी, चप्पल इ. परसातच ठेवले जायचे. एखाद्या मादीला त्या अस्त्राने मारलं गेलं असेल आणि मादीच्या शरीराच्या विशिष्ट गंधाचे कण या अस्त्राला लागलेले असतील तर त्याचा माग काढत नर तिथे पोहोचायचे आणि आपलं भित्रं मन लगेच समजूत करून घ्यायचं की हत्येचा बदला घ्यायला डूख धरलेला साप आला आहे. सापाची सतत आत-बाहेर होणारी जीभ हवेतील वेगवेगळे गंधकण गोळा करून सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान करून घेत असते. समागमाला तयार असलेल्या साथीदाराचा मागोवा हा त्यातला एक भाग आहे. हल्ली भीतीने सापांना मारायचे प्रमाण कमी झाले असले तरीही ग्रामीण भागांमध्ये अजूनही या गोष्टी सुरू आहेतच.

उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, इतर लहान साप, पक्ष्यांची अंडी असा आहार असणारे साप सहजच किंवा विनाकारणही दूध पीत नाही. पाण्यात, मातीत सहजतेने वावरताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून निसर्गत: सापाच्या डोळ्यावर एक पारदर्शक पडदा असतो. यामुळेच साप पापणी न लवता पाहून संमोहित करतात असा गैरसमज जोपासला गेला आहे. हात आणि पायाप्रमाणेच सापांना कानही नसतात. जमिनीवर निर्माण होणारी आघात कंपनं त्यांना त्वचेद्वारे समजत असतात. या शारीरिक कमतरतेत, अधू दृष्टीचा शाप हा गरीब जीव भोगत असतो. म्हणूनच नजरेच्या काही फुटांपलीकडे सापाला कुठलीही गोष्ट स्पष्ट दिसत नाही.

नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणून गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. तसेच सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हायला लागल्यावर हळूहळू या रूढी बदलायला सुरुवात झाली. त्यामुळे गारुडय़ाने अगदी चेहऱ्याजवळ हलवलेल्या पुंगीकडे नाग वळून पाहात नसतो किंवा तालावर डोलत नसतो हे सत्य हल्ली आपल्याला पचायला लागलंय. समाजाने आता अनेक विधी, घटना कालानुरुप कालबाह्य, थोतांड ठरवल्या. दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबवला गेला आणि नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये सांगितली जाऊ लागली. सरसकट सगळेच साप मृत्युदूत नसतात हे मोठं सत्य समाजाने हळूहळू स्वीकारायला सुरुवात केली आहे.

आसमंतात पावसाळा स्थिरावला की सुरू होतात ते पुनःनिर्मितीचे सोहोळे. मुबलक चारा, पाणी उपलब्ध झाल्याने अवघी जीवसृष्टी सुखावलेली असते. आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागपंचमीला नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. तसेच त्या दिवशी शेतीची काहीही कामे करण्यात येत नाही की ज्यामुळे चुकून सुद्धा सापाला अपाय होऊ नये.

आपण लहानपणापासून ऐकत आलो की नागपंचमीला नागाची पूजा केली की मोप पीक येते. आता पिकाचा आणि या पूजेचा काय संबंध असा प्रश्न मनात येतो. ही पूजा खरी कशी केली जायची हे जरा समजून घेऊया. वेगवेगळे चणे आणि लाह्या हे खरपूस भाजले जातात. नंतर हे खाद्य आणि दूध सापाच्या घराच्या, म्हणजे वारुळाच्या, आसपास पसरले जाते. नाग दिसत नसला तरी लांबूनच नमस्कार केला जातो. बस्स, संपली पूजा. आता ह्याने होते काय? त्या खरपूस वासाने उंदीर, घुशी आकर्षित होतात. आणि सापाचे खाद्य त्याच्याकडे आपसूक स्वतःहून चालत येते.

आपल्याला कल्पना नसते पण जर आपली हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर आणि घुशी खातात. आता सापाने उंदरी-घुशी खाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान कमी होते. शेतीला त्रासदायक ठरणाऱ्या या छुप्या शत्रूंचा नायनाट करण्याचं काम हे सर्पजगत करत असतं. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा‘ अशा नुसत्या उद्घोषणा न करता ते कृतीतूनही दिसायला हवे.

धामण, अर्थात रॅटस्नेक खरा तर शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. धान्याचा नाश करणारे उंदीर फस्त करणारा हा साप नागाशी असलेल्या किंचित साम्यामुळे अजूनही विषारी समजून बऱ्याच वेळा मारला जातो.

यावरून मला दुसरी एक मजेदार गोष्ट आठवली.

नागपंचमीच्या आसपासच आदिवासी क्षेत्रात एखाद्या झाडाची मोठी फांदी तोडली जाते आणि ती उलटी (म्हणजे निमुळती बाजू जमिनीत) शेतात पुरली जाते आणि फांदीचा मोठा भाग व्यवस्थित तासला जातो. हे करण्याचे कारण काय सांगितले जाते की पीक चांगले येते. आपल्याला काही कळतच नाही की हा काय वेडेपणा आहे? पण होते काय माहितेय? फांदीचा मोठा भाग बाहेर असल्याने घुबडांना बसायला एक छान जागा तयार होते. It becomes a resting pad for them. घुबड उंचावर बसल्याने उंदरांना ते दिसत नाही पण त्याला मात्र सगळे दिसत असते. अशा प्रकारे घुबडाला त्याची शिकार आयतीच मिळते. आणि महत्वाचा फायदा म्हणजे घुबड एका रात्रीत तीन ते चार उंदीर सहज फस्त करू शकते. साप हा साधारणपणे एका वेळेला एकच उंदीर खाऊ शकतो. त्यामुळे ही घुबडाची शक्कल आहे की नाही नामी?

यातून काय लक्षात येते की आपल्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती अथवा रूढी यांच्या मागे सुद्धा काहीतरी शास्त्रीय किंवा व्यवहारिक अर्थ दडलेला असतो परंतु दुर्दैवाने आपल्या ते कळत नसल्याने आपण अशा गोष्टींची सर्रास खिल्ली उडवतो. यापुढे तरी निदान थोडे डोळसपणाने बघायला शिकलो तर अशा अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकेल.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Snake #Rats #Naag_Panchami

Leave a commentAjit S Gokhale

1 year ago

बरोब्बर आहे. पूजा वारुळाची करायची आणि तिथे खमंग वासाचे कडधान्य आणि धान्य सोडायचे दूध आणि साखर तिथे वाहायचे ज्यामुळे मुंग्या किडे आकर्षित होतील… खमंग वास आणि हे किडे खायला उंदीर घुशी येतील आणि म्हणून त्यादिवशी शेतात जायचे नाही
मानवी हालचाल कमीतकमी ठेवायची. त्यादिवशी घरामध्ये कुठलाही पदार्थ भाजलेला करायचा नाही. म्हणजे गावात कुठेही खमंग वास नाही आणि खमंग वास फक्त वारुळापाशी आहे अशी परिस्थिती निर्माण करायची. खरंच हे सगळे सुरू करणारे आपले पूर्वज खरे शास्त्रज्ञ होते.

Dilip Sule

1 year ago

फार सुंदर माहिती, लहानपणीच्या आठवणींना उजाळा,- दिलीप

Sadhana Sathaye

1 year ago

Yashwant, Khup abhyas purna lekh lihilays.

स्नेहा धारप

1 year ago

लेख खूप आवडला. घुबडासंबंधी माहित नव्हते ते कळले.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS