मुहूर्तमेढ

मित्रहो,
 
नमस्कार, आदाब, सत श्री अकाल.
 
एक मार्चला मला सरमिसळ या नावाने ब्लॉग लेखन करायला सुरुवात करून चार वर्षे होतील. मी जरी मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये लिखाण करत असलो, तरी स्वाभाविकच माझा कल मराठीकडे जास्तच राहिला आहे. जवळपास सत्तर टक्क्याहून अधिक लेख मराठीतच आहेत. आता ब्लॉगच्या नावाप्रमाणेच माझे लिखाण हे एका विषयाला धरून कधीच नव्हते. विविध प्रकारच्या वाड्मय प्रकारांचा तो एक संग्रह किंवा संचय आहे. मनाला जो विचार भावेल, पटेल किंवा खुपेल त्या विषयावर मी माझी लेखणी मोकळी सोडली.
 
लिखाण, मग ते कसल्याही प्रकारचे असो, हे एक संवाद साधण्याचे माध्यम आहे ज्यायोगे आपल्या भावना, कल्पना दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचवता येतात. लिखाण हे गोष्ट सांगण्यासारखेच आहे, त्यामुळे मी एखाद्या टेकडीवर बसून आणि नुसतेच बोंबलून काय होणार? माझे लिखाण हे वाचकांसाठी आहे आणि ते त्यांना रंगतदार तसेच रोचक वाटले पाहिजे की त्यांना ते शेवटपर्यंत वाचावेसे वाटेल आणि ते माझ्या पुढच्या लेखाची वाट बघतील. त्यामुळे लिहिताना मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो ज्यायोगे ते जास्ती मनोरंजक होऊ शकेल आणि वाचकांना आकर्षून घेईल. माझ्या सुदैवाने तुम्हा सर्वांना माझे लेख आवडले आणि ग्रंथाली सारख्या प्रतिथयश प्रकाशन संस्थेने डिसेंबर २०२० मध्ये माझे छपाई ते लेखणी हे पुस्तक प्रकाशित केले. माझ्या लिखाणाची अनौपचारिक शैली वाचकांना भावली; बऱ्याच जणांना तर मी समोर बसून बोलतोय असे वाटले. मी असा संवाद साधू शकल्यामुळे शहरी भागात सुद्धा पुस्तके विकली जाऊ शकतात हे माझ्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली यावरून लक्षात येते.
 
सुमारे 10-12 वर्षांपूर्वी वाचकाला एखादे पुस्तक हवे असेल तर तो करायचा? तर जवळपासच्या क्रॉसवर्ड सारख्या एखाद्या बुक स्टोअर मध्ये जायचे. आणि ज्याप्रमाणे मॉलमध्ये गेलेला माणूस आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी व्यतिरिक्त आणखीन दोन-चार गोष्टी जास्त घेतो त्याचप्रमाणे हा वाचक त्या पुस्तकाबरोबर आणखीन एक-दोन पुस्तके तरी जास्ती घेऊन बाहेर पडायचा. तसेच पुस्तकाच्या मागे लिहिलेली किंमत द्यायला त्याच्या दृष्टीने बरोब्बर असायची कारण त्याच्यावर सवलत मिळण्याचा प्रश्नच उदभवत नसे. ज्याला विकत घेणे परवडत नसे तो लायब्ररीची पायरी चढत असे. आजची परिस्थिती काय? सर्व बुक स्टोअर्स अथवा लायब्ररी मरणासन्न अवस्थेत आहेत. शहरांमध्ये तर ऑनलाईन पुस्तक विक्री हाच एकमेव पर्याय असावा अशी परिस्थिती आहे आणि ते देखील पुस्तकाच्या छापील किंमतीच्या 25 ते 40 टक्के सवलतीत. वाचक देखील हव्या त्याच पुस्तकाची ऑर्डर देऊन लॉगआऊट होतो. त्यामुळे दुकानात जाऊन पुस्तके हाताळणे बंदच झाले आहे. काही वर्षांपूर्वी असे लेखक होते आणि त्यांची पुस्तके आजही आवर्जून विकत घेतली जायची; परंतु पुढील लेखकांची भाषा बदलत गेली आणि वाचकसंख्या रोडावली असे लक्षात येते.
 
आज सगळीकडे अशी बोंब आहे की मराठी वाचक रोडावला आहे. त्यावर मला असे वाटते की ते शहरांच्या बाबतीत खरे असू शकेल. पण मराठी माणूस कमी झाला आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. माझ्या मते मराठी माणूस, मग तो वाचक असेल किंवा प्रेक्षक, हा महाराष्ट्रातील निम-शहरी अथवा ग्रामीण विभागात आहे. आपण नीट विचार केला तर असे लक्षात येईल की हे इंगित मराठी चॅनेलवाल्यांनी छान ओळखले आहे. आज सर्व चॅनेल्सवर चालू असलेल्या मालिका बघा. त्यातील विषय, पात्रे, भाषा आणि सेटिंग हे अशाच दर्शकाला नजरेसमोर ठेऊन लिहिण्यात आल्या आहेत आणि त्या तुफान लोकप्रिय होत आहेत. आजच्या मराठी मालिका लोकप्रिय होता आहेत कारण त्या त्यांच्या दर्शकांशी कनेक्ट होता आहेत. याचाच अर्थ लोकांशी संवाद साधला जाणे हे अतिशय महत्वाचे आहे. शहरातील लोकांनी त्या मालिकांच्या नावाने खडे फोडण्यात अथवा नुसते बसून नाके मुरडण्यात काहीच अर्थ नाही. जोपर्यंत वाचकाशी भावनिक संबंध सांधणारी भाषा नसेल तोपर्यंत नवीन लेखकाला मराठी वाचक लाभणे महाकर्मकठीण. 
 
मी आजपर्यंत व्यक्तिचित्रणे, आठवणी, चालू घडामोडी, संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान, प्रवास वर्णने, राजकारण आणि सामाजिक कार्य या बहुविध विषयांवर लिखाण केले. यातील इतिहास या विषयासाठी मी हिस्ट्री कॅफे नावाचा नवीन ब्लॉग सुरु केला आहे. तसेच आम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती मी आमच्या नीरजा संस्थेच्या वेबसाईट मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. प्रवास वर्णन ही एखादी कथा लिहिण्यासारखे असते आणि कथा फुलवण्याची प्रतिभा माझ्यात नाही याची मला जाणीव आहे. तसेच तत्वज्ञान मांडण्याएवढा मी काही मोठा पंडित नव्हे. मी आपला एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याला स्वतःच्या भावना मोकळ्या करायला लेखणी हे साधन मिळाले आहे. राजकारण हा माझा कधीच प्रांत नव्हता कारण ती माझ्या मते एक दलदल आहे. त्यात पाय ठेवला तर आपल्यावरच चिखल उडतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात राजकीय मते इतकी टोकाची घृवीय झाली आहेत की अगदी नवरा बायको अथवा सख्खी भावंडे यांच्यात देखील कडाक्याची भांडणे जुंपतील. त्यामुळे त्याच्यापासून जेवढे लांब राहता येईल तेवढे चांगले. म्हणूनच ह्यापुढे माझ्या सरमिसळ ब्लॉगवर ‘चालू घडामोडी आणि संस्कृती’ एवढ्याच विषयांसाठी मी लेखणी पाजळणार आहे. हां, आता कधी काही खास घडले तर मग ‘व्यक्तिचित्रणे, आठवणी’ यांना हात घालीन. ही जरी माझी Potpourri असली तरी त्यातल्या त्यात कुठेतरी फोकस करणे गरजेचे असते आणि तो स्वतःला ओळखता यायला पाहिजे. 
 
गेल्या चार वर्षात माझ्या असेही लक्षात आले की लिखाणाचे माध्यम मराठी असल्यामुळे वाचकांपर्यंत पोहोचताना खूप मर्यादा पडतात. ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असते ते अगदी मराठी असले तरी मराठी वाचन जवळपास शून्य असते. त्यांना नीट बोलता येते, मराठी सगळे समजते पण वाचन आणि लेखन हे त्यांच्या पार पल्याड असते. इतरांना दोष देण्यात काहीच हशील नाही, माझी मुले देखील त्याच कॅटेगरीत मोडतात. पण तरी देखील मला पूर्ण लेखन इंग्रजीत करायला आवडणार नाही. मराठी ही नुसतीच माझी मातृभाषा नाही तर माझी भावनिक भाषा आहे. अजूनही पहिला विचार हा बहुतांशी मराठीतच असतो. त्यामुळे मला या अशा इंग्रजाळलेल्या वाचकांशी संलग्न व्हायचे असले तर काय करायचे हा प्रश्न भेडसावत होता. 
 
आजच्या तांत्रिक युगात एक गोष्ट चांगली आहे की सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळू शकते. बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यावर याला पॉडकास्ट हे सर्वोत्तम solution आहे असे लक्षात आले. एका सर्व्हेनुसार वाचक अथवा श्रोते यांचा attention span वाचनासाठी तीन ते चार मिनिटे, व्हिडीओसाठी पाच ते सहा मिनिटे परंतु ऑडिओ म्हणजेच पॉडकास्ट करिता सुमारे तीस मिनिटे असतो. या गोष्टीचा विचार करून मी पुढील एक-दोन महिन्यात माझा मराठी पॉडकास्ट चॅनेल launch करणार आहे. महिन्याला साधारण तीन पोस्ट करण्याचा मानस आहे आणि ज्या पंधरा वीस मिनिटांपेक्षा मोठ्या नसतील. तुम्ही जसे माझ्या ब्लॉगला भरभरून प्रेम दिलेत तसेच प्रेम माझ्या या नवीन उपक्रमाला द्याल अशी खात्री आहे. 
 
मराठी पुस्तकांच्या तुलनेत इंग्रजी पुस्तकांची परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. नवनवीन लेखक वेगवेगळे विषय घेऊन व्यक्त होताना दिसतात आणि पुस्तकांचा खप देखील चांगला आहे. त्याचे मुख्य कारण पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मार्केटिंग, प्रसिद्धी, वितरण आणि विक्री यांना दिला जाणारा फोकस आणि त्यादृष्टीने केलेले प्रयत्न. हे आजच्या युगात पुस्तक प्रकाशित होण्यापेक्षाही जास्त महत्वाचे झाले आहे. देवदत्त पट्टनाईक अथवा अमिश यांच्या पुस्तकांच्या विक्रीचे आकडे बघितले की विश्वासच बसत माही. इंग्रजी माध्यमातील लिखाणाचा हा reach लक्षात घेता त्या भाषेत देखील काहीतरी लिखाण करायला हवे असे डोक्यात घोळत होते.
 
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून मी कृष्ण या विषयाला हात घालण्याचा धाडसी निर्णय घेतला. आता या विषयाचा आवाकाच इतका मोठा आहे की अभ्यास, संदर्भ आणि research याशिवाय ही अशक्यप्राय गोष्ट आहे. गेल्या वर्षभरात या विषयावरील किमान पन्नास पुस्तके वाचून काढली. मग मान मोडणाऱ्या आणि दमवून टाकणाऱ्या लिखाणाला सुरुवात झाली होते. आता लिखाणा एवढेच महत्वाचे असते त्याचे editing आणि जे professional मदतीशिवाय शक्य नसते. सध्या editing च्या आधीच मी माझ्या चौथ्या draft लेव्हलला पोहोचलो आहे त्यामुळे अजून किमान तीन ते चार revision होतील असा अंदाज आहे. 
 
 
Krishna
 
यातील महत्वाचा मुद्दा असा होता की कृष्ण हा देव होता असे न बघता एक व्यक्ती म्हणून त्याचे मूल्यमापन करण्याचा, विचार म्हणा अथवा वेडेपणा म्हणा, प्रयत्न मी करणार आहे. कारण एकदा देवत्व दिले की देव म्हणून कुठच्याही गोष्टी justify करायला खूप सोप्या असतात पण मला आडमार्ग चोखाळायचा होता. त्यामुळे वेळ खूप गेला पण हरकत नाही. सुदैवाने माझ्या डोक्यावर काही टांगती तलवार नव्हती की इतक्या दिवसात पूर्ण व्हायलाच हवे. आता सर्व विचार अखेरीस एखाद्या सूत्रात अथवा कथेत जोडल्याशिवाय flow येत नाही आणि आधी सांगितल्याप्रमाणे ती प्रतिभा माझ्यात अजिबात नाही. मीडिया क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती सहलेखक म्हणून लाभली आणि अडकलेली माझी गाडी रुळावर आली. मी खूप नशीबवान आहे की अशी व्यक्ती माझ्या संपर्कात आली 
 
कोण आहे सहलेखक? पुस्तकाचे नाव काय? पुस्तक नक्की कधी प्रकाशित होणार? या प्रश्नांची सरबत्ती मला ऐकू येत आहे. अहो, पण जरा दम धरा की. योग्य वेळ आली की सर्व प्रश्नांची उत्तरे देणारच आहे किंवा तुम्हाला ती आपोआप मिळतील.
 
सब्र का फल मिठा होता है.
 
असो, तेव्हा अशा वेगवेगळ्या माध्यमातून भेटत राहू. मला अभिप्राय जरूर कळवा ज्यामुळे मला भविष्यात अजून नवनवीन गोष्टी करायला हुरूप येईल आणि काही कमतरता असेल तर ती दुरुस्त करता येईल. 
 
Take Care, शब्बा खैर, धन्यवाद. 
 
@ यशवंत मराठे

Leave a commentSwati Abhang

10 months ago

Great idea

दीपक वैद्य

10 months ago

मस्त लिहता मराठे साहेब. चालु द्या असेच दणकटपणे.

Sadhana Sathsye

10 months ago

वाह वाह, यशवंत. खूप उत्सुक आहे, नवनवीन वाचायला आणि ऐकायला. तुझ्या नवीन उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा👏👏

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Comments

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS