पानिपत – भळभळती जखम

पानिपत स्मृती दिवस..

पौष शुद्ध अष्टमी बुधवार १४ जानेवारी १७६१.

 

भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल २५९ वर्षे पूर्ण झालीत. अहमद शाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मराठे मावळे प्राणपणाने लढले.

 

 

स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योद्धे या निकराच्या लढाईत कामी आले. १४ जानेवारी १७६१ हा दिवस आम्ही कदापि विसरणे शक्य नाही. लाखांनी बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. याच कारणाने संक्रांतीचा तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाही, आमच्या आया बहिणी संक्रांतीसारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्र परिधान करतात.

 

कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानिपती !!
गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी

 

मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.

 

पण पानिपत म्हणजे नक्की काय?

  • कुरुक्षेत्रानंतर भारतभूमीवर घडलेला घनघोर संग्राम
  • मराठ्यांच्या पराक्रमाची सर्वोच्च शौर्यगाथा
  • राष्ट्राच्या रक्षणासाठी केलेला सर्वस्वाचा होम
  • महाराष्ट्राच्या प्रत्येक उंबरठ्याने राष्ट्रहितासाठी यज्ञात वाहिलेली समिधा
  • “आम्ही अब्दालीचा हिसाब बाळगत नाही.!” असे म्हणत अखंड हिंदुस्तानासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिगरबाज मराठ्यांच्या तीन पिढ्यांनी गिलच्यास (रोहिले आणि अब्दालीचे सैनिक) आपल्या तलवारीचे पाणी पाजून आपल्या झुंजारवृत्तीचा करून दिलेला परिचय
  • चौदा-पंधरा वर्षे वयाच्या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या कुमारांपासून मजबूत हाडापेराच्या म्हाताऱ्यांनी काळाच्या  छाताडावर पाय रोवून केलेला मदमस्त तांडव
  • आणि स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या राजपूत, जाट, शीख, डोग्रा, ठाकूर सारख्या तथाकथित लढवय्यांनी बायकांच्या पदराआड लपून पाहिलेला तमाशा..

 

युद्ध म्हटले की त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का ?
मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का ?

 

या युद्धानंतर काय झाले ? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण. तो पराजयातला असामान्य विजय होता कारण त्यामुळेच सिकंदरच्या काळापासून सुरू असलेल्या वायव्य प्रांताकडून होणाऱ्या आक्रमणाला कायमचा विराम मिळाला.

तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा ! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली. अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही. घरी जाऊन तो मेला. पुन्हा “अल्लाह हु अकबर” च्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत. आर्यावर्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही.

 

हेच तर साधायचे होते या युद्धातून ! साधले ही ! मग पराभव कुठे झाला !

म्हणूनच पानिपत हा मराठी साम्राज्याचा सर्वोच्च शौर्य दिवस.. पानिपत ही मराठ्यांनी देशासाठी दिलेली सर्वोत्तम आहुती होती. पानिपतचे युद्ध म्हणजे जाज्वल्य अभिमान वाटायला हवा होता कारण पंजाब- सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत ! त्यामुळे पानिपत ही साधी लढाई नाही, तर हे महाभारताएवढेच मोठे आणि महत्वाचे महायुद्ध होते.

 

आज दुर्दैवाने पानिपत म्हटले की आपल्यांकडूनच पराभव हेच प्रथमदर्शनी डोळ्यासमोर येते. आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका !! या अर्थी पानिपत ही एक प्रचंड मोठी शिकवण आहे !!

 

मराठे एकाकी लढले ! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत ! तरी देखील मराठा एकाकी पडला, पण अडला नाही तर नडला आणि थेट भिडला !! “बचेंगे तो औरभी लढेंगे” म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाही ! परंतु मराठा एकाकी का पडला ?? आपल्याविषयी विश्वास निर्माण करण्यास का कमी पडला ?? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला ?? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे ! आणि ही भळभळती जखम आहे.

 
मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा, आपला अभिमान, आपले देशप्रेम, आपला त्याग लोकांना कधी कळलाच नाही आणि तो कळावा पण आपण कधी प्रयत्नही केले नाहीत कारण आम्हाला पानिपताच्या युद्धाच्या पराभवाची लाज वाटते. आपणच आपला इतिहास विसरलो मग तो इतर प्रांतीय का लक्षात ठेवतील? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व सुद्धा आपण मराठी माणसापुरते मर्यादित करून टाकले आहे. आपल्या पेशव्यांचे कर्तृत्व एवढे मोठं पण आम्ही त्यांना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादात इतके संकुचित करून टाकले की त्यांना इतिहासात स्थानच राहिले नाही. त्याची आजची परिणीती काय तर आज देशाच्या राजकारणात मराठी माणसाला नगण्य महत्व.

 

मा. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना एकदा पानिपतला गेले होते तेव्हा त्यांनी खास करून काला आम या मराठ्यांच्या युद्ध स्मारकाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी बोललेलं वाक्य प्रत्येक मराठी माणसाने मनावर कोरून ठेवायला हवं – या भूमीत मराठे जे लढले ते हिंदुस्थानाच्या संरक्षणासाठी लढले, आपल्या स्वतःसाठी नाही.

 

म्हणूनच पानिपत ही समस्त मराठ्यांनी अभिमानाने मिरवावी अशी अश्वत्थाम्याची भळभळती जखम आहे.

 

पानिपताच्या त्या शापित भूमीवर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्व मराठा वीरांना विनम्र अभिवादन…

 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com

Leave a commentPushkaraj Chavan

11 months ago

अश्वत्थामा या भूमीवर आपली भळभळती जखम घेऊन फिरतोय की नाही हे माहिती नाही परंतु महाराष्ट्र आज ही ही भळभळती जखम घेऊन जिवंत आहे. पानिपत हा मराठी मनाचा हळुवार फुंकर घालण्याजोगा हळवा कोपरा आहे. दर संक्रांतीला या जखमेतून रक्तस्त्राव होतोच.

Nitin

11 months ago

Panipat was a defeat for Marathas, though a glorious defeat. But some inconvenient questions have to be answered:
1) Why was Sadashivrao Bhau entrusted with the Command of the Marathas? Why not Raghobadada who had proved his valour in the North West?
2) Why were a lot of non military people taken along with the army? They took families, Priests, cooks and so many unnecessary people. Ultimately the strain of providing for these, broke the back of the forces

वसंत तुकाराम चिकोडे

11 months ago

अप्रतिम. खरंच,एक भळभळती जखमच.मन सुन्न होतं फारच ऊत्कंठता पूर्ण माहिती. डोळ्यासमोर चित्रपट च ऊभा राहिला. धन्यवाद. भावनिक शब्दांकन. छान. धन्यवाद शुभेच्छा.

Pravin prataprao ranaware

11 months ago

पानिपतच्या लढाईत मराठयांनी लढलेल्या लढाईला लाख लाख मुजरे .

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS